"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा."
रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड जोएल गॉर्नरने पहीलाच चेंडू शिवसुंदर दासला बाउंसर टाकल्यावर त्याची जी अवस्था होइल तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. शाळा कॉलेजातले सारे खडूस मास्तर बायकोचे रुप घेउन माझी सरप्राइज टेस्ट घ्यायला उभे आहे असे वाटत होते. हा सारा त्या जॉली एलएलबी सिनेमाचा परिणाम होता. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि तो सिनेमा बघायला गेलो असे झाले होते. त्यात तो अक्षयकुमार म्हणजे जॉली आपल्या बायकोला मस्त गरम गरम जेवण करुन वाढत असतो आणि ही बया त्याच्या हातच्या जेवणाचे तोंड भरुन कौतुक करीत त्यावर मस्त ताव मारीत असते. सिनेमाच्या गोष्टीचा आणि या प्रसंगाचा काहीही संबंध नव्हता तरी त्यांनी टाकला असा प्रसंग आणि त्यामुळे माझ्यावर मात्र भलताच प्रसंग ओढवला.
"अग त्या सिनेमातल तुझ्या येवढच लक्षात राहील? तू म्हणशील तर मी त्या सौरभ शुक्लासारखा नाच करुन दाखवतो. जरा इत्तर गिरा दो. कसा मस्त नाचला ना तो"
"सध्या फक्त एक पदार्थ करुन दाखव."
या टोमण्यासोबत एक खोचक लुक फुकट मिळाला, मिरचीच्या ठेच्यासोबत तिखटाचे पाकीट फुकट. मी खोचक बोलत नाही असे नाही उलट खोचक बोलणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार अशाच अविर्भावात मी वावरत असतो. हीने केलेल्या पदार्थांवर खोचक बोलल्याशिवाय मला तो पदार्थ पचतच नाही. मेरे दिलको ठंडक नही मिलती वगेरे म्हणतात ना त्या प्रकारात मोडनारे. ऑफिसमधे तर मी बायकोने केलेल्या पदार्थावर खोचक टोमणे मारणे या विषयाचे क्लासेस घेतो. लग्नानंतर हिने पहल्यांदा मसाला डोसा केला आणि मला प्रतिक्रिया विचारली त्याला मी शांतपणे उत्तर दिले 'मस्त क्रिस्पी झाला, त्रिकोनी आकार दिला तर समोसा म्हणून खपून जाइल.' एकदा इडली जरा आंबट झाली तर मी लगेच प्रतिक्रिया दिली 'थोडी हळद कमी पडली म्हणून नाहीतर ढोकळा म्हणून खाल्ली असती.' तिने यावर नाक मुरडले तर मी त्यावर व्यावसायिक सल्ला दिला 'आपल्याकडे व्यावसासिक वृत्तीच नाही. ठोकळा फसला तर लोचो म्हणून चालतो तर मग इडली ठोकळा म्हणून खाल्ली तर काय वाइट'. अर्थात यावर काही दिवस रुसवाफुगवी झाली पण ते चालायचेच भाषण स्वातंत्र्यासाठी तेवढी किंमत मोजावीच लागते. गेल्यावर्षी हीने चकल्या केल्या तेंव्हा पण मी माझ्या भाषणस्वातंत्र्याचा पूर्ण सन्मान करीत लगेच प्रतिक्रिया दिली 'चकल्या खूप सुंदर आणि चवीष्ट झाल्या फक्त त्या चवीचा आस्वाद घ्यायला घरात खलबत्ता नाही.' तेंव्हाच तर या एकंदरीत प्रकाराची मूहुर्तमेढ रोवली गेली. माझे हे अस खोचक बोलणे ऐकूणच तर ती म्हणाली होती की 'पुढल्यावर्षी तू एकतरी फराळाचा पदार्थ बनवून दाखव.' गेल्या दहावर्षात जिला स्टेशनचा रस्ता पाठ झाला नाही, ती मी बोललेल वाक्य वर्षभर डोक्यात ठेवेल असा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाही मी ही प्रतिवाद केला
"अग मेसी कितीही चांगला फुटबॉलपटू असला तरी त्याला क्रिकेट खेळता येइल का?" कस सुचत ना मला.
"अच्छा. मेसी. कोणत्या क्षेत्रातला मेसी आहेस तू?" च्यायला अक्कल काढली होती.
"ते जाउ दे. तू ते दिवाळीच्या पदार्थाच जरा जास्तच सिरीयस घेतेस. तुझ्या हाताची चव कुणाला येउ शकते का?"
"तेच तर बघायचे आहे. मलाही त्या जॉलीच्या बायकोसारखे तुझ्या हातचे खाउन तुझी तोंडभरुन स्तुती करायची आहे. फेसबुकवर फोटो टाकायचा आहे 'माझा लाडका जॉली', व्हॉट्सअॅपवर तुझ्या पाककलेचे गोडवे गायचे आहेत. माझी खूप स्वप्ने आहेत रे."
"अरे यार या जॉलीची तर. अग तो सिनेमा होता."
"नाही तो अक्षयकुमार घरीसुद्धा जेवण बनवतो, वाचलय मी मासिकात." कोण छापतो असल्या गोष्टी. कुणाच्या घरातल्या गोष्टी कशाला जगजाहीर करायच्या. कुणी घरात स्वयंपाक करो वा न करो या गोष्टी पुस्तकात कशाला छापायच्या. सिलेब्रेटींनाही काही खाजगी आयुष्य आहे की नाही. एक विचार असाही आला त्याची बायको ट्विंकल खन्ना आहे माझी आहे का? माझा विचार मीच गिळला. मघाशीच माझा मेसी झाला होता आता अक्षयकुमार झाला असता. एकवेळ मेसीसारखे खेळाडू होता येइल पण अक्षयकुमारसारखे खिलाडी होने शक्य नाही. स्वतःच्या सामर्थ्याची मला पूर्ण कल्पना असल्याने मी तहाची बोलणी सुरु केली
"तुझी समस्या काय आहे तुलाच दरवर्षी फराळ बनवावा लागतो. हेच ना. तर यावेळेस घरच्या फराळाला पूर्णविराम. आपण बाहेरुन बोलावू. हैद्राबादमधेही आता बरेच ऑपशन्स आहेत. आलमंड हाउस, स्वीट बास्केट. नाहीतर मी कोटीला जाउन अस्सल मराठी फराळ घेउन येतो."
"मला फऱाळचे पदार्थ बनवायला आवडतात पण यावेळेस तुझ्या हातचे खायचा मू़ड आहे." हीची रेकॉर्ड एकाच ठिकाणी अडकली होती यार.
"पोहणे न येनाऱ्या व्यक्तीने धरणात उडी घेउ नये, जॅकेटशिवाय आगीत जाउ नये, पॅरॉशुटशिवाय विमानातून उडी घेऊ नये. तसेच स्वयंपाक आल्याशिवाय दिवाळीचा फराळ बनवू नये."
"का नाही प्रयत्ने यु ट्युब रगडिता बेसनाचे भजेही बने. मागे तूच बोलला होता." मी कधी काळी फेकलेले हे वाग्बाण जपून ठेवून परत मला मारायलाच वापरले जातील असे वाटले नव्हते.
"आता मला समजले. तुला असेच वाटते ना मी तुझ्या हातच्या पदार्थांची खिल्ली उडवतो. त्यावर टिका करतो. म्हणून माझी फजिती करायलाच तू मला हे सारे करायला सांगत आहे. हेच ओळखल ना तू मला. अग मी घरातले वातावरण खेळीमेळीचे राहावे म्हणून झटत असतो आणि तू भलता अर्थ काढते. इतक सुद्धा तू समजून घेउ शकली नाही मला." इमोशनल ब्लॅकमेलींग अँड ऑल.
"नाही रे माझ्या शोन्या. मला अस कशाला वाटेल? तू तर अगदी जॉली व्यक्तीमत्व आहे म्हणूनच तर तुला जॉलीसारखा फराळ करायला सांगितले. तू फराळ कर मी वातावरण सांभाळते." आमच्या घरातला मनिंदरसिंग आज भलताच फॉर्मात होता, अगदी तेंडुलकरी थाटात बॅटींग करीत होता. क्रिकेटच्या इतिहासात मनिंदरच्या नावावर एखादे शतक वगेरे आहे का याचा शोध घ्यायला हवा. माझी सपेशल हार होत आहे असेच दिसत होते. अकराव्या क्रमांकावर बॅटींगला येनारा बॅट्समन जर का शतक ठोकायला लागला तर समोरच्या संघाची हार पक्की असते. मलाही तेच चित्र दिसत होते तेंव्हा हार कबूल करण्याशिवाय पर्याय नव्हता.
"अग तुला ठाउक आहे ना मला साधा चहासुद्धा करता येत नाही. एकवेळ अभिषेक बच्चन अॅक्टींग शिकून घेइल पण मला फराळाचा पदार्थ बनवायला जमनार नाही. मी हात जोडतो बाई." मी तिच्या समोर हात जोडून गुडघ्यावर बसलो. तिच्यापुढे हात पसरले, बाजूलाच पडलेली माझी कॅप हातात घेऊन पुढे बोलू लागलो.
"माझी कॅप माझी इज्जत, मान्य आहे ती अशीच कुठेही धुळ खात पडली असते. ही कॅप तुझ्या पायावर ठेवतो, तुझी हात जो़डून माफी मागतो पण पदार्थ कर असे अभद्र शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडू देउ नको. मी चुकलो. परत कधीही तू केलेल्या कुठल्याही पदार्थाला नाव ठेवनार नाही. पदार्थ पूर्णपणे बिघडला तरीही हूं का चूं करनार नाही. चकलीचा लाकडी ठोकळा होउ दे, शंकरपाळ्याचे वर्तमानपत्र होउ दे, अनरशाचा लाडू होउ दे लाडवाचा चिवडा होउ दे, चिवड्याचा शिरा होउ दे. कशाचे काहीही होउ दे मी काहीही बोलनार नाही. तुला वचन देतो माझे राणी या तोंडातून ब्र सु्दधा निघनार नाही."
"अशी हार नाही मानायची माझ्या राजा. आपल्या बाजीरावाला असे हारलेला बघून कुठल्या काशीबाईला आनंद होइल. मी शिकविते तुला, तू काही काळजी करु नको काही लागलेच तर यु ट्युब आहेच मदतीला."
बाजीराव काय, काशीबाई काय, अरे काय चालले होते. माझा जॉली करायचाच असा ठाम निश्चय हीने केला होता. मी हतबल होतो, गुडघ्यावर बसून तिच्याकडे बघत होतो. तिने तिचा हात देउ केला होता. हा चाळीशीतला रोमिओ आपल्या जुलिएटला फूल देउन प्रेम मागण्याएवजी हातात कॅप घेउन भीक मागत होता. काय करावे सुचत नव्हते हे आव्हान कसे स्वीकारायचे. तेवढ्यात स्वयंपाक घरातून भांडे पडल्याचा आवाज आला. धडाधडा भांडे आपटल्यासारखा आवाज येत होता. त्या आवाजात तिचा चेहरा धूसर होत होता.
आणि मला जाग आली. बापरे केवढे भयंकर स्वप्न पडले होते. सकाळी सकाळी अंगाला घाम फुटल्यासारखे वाटत होते. एक बरे होते सारे स्वप्न होते केवढा घाबरलो होतो मी. रविवारी सकाळचे आठ वाजले होते. सकाळचे स्वप्ने खरे होत नाही रविवार सकाळचे तर नाहीच नाही. मी ब्रश केला आणि चहाची वाट बघत डायनिंग टेबलवर जाउन बसलो. चहा आला, सोबत बिस्किट सुद्धा आले. एफएमवर 'हर फिक्र को धुव्वेमे उडा..' गाणे चालू होते. कस कळत ना या रेडीयोवाल्यांना. मी सुद्धा चहातून निघनाऱ्या वाफेसोबत माझे स्वप्न दूर उडून जात आहे अशीच कल्पना करीत होतो.
"दिवाळी जवळ आलीय."
"हो, पंधरा दिवस राहिलेत नाही."
"आपल काय ठरल होत तुझ्या लक्षात आहे ना?"
"काय?"
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा." माझा जॉली झाला होता.
हा लेख या आधी मराठी कल्चर्स आणि फेस्टीव्हल्सच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.
पंघरा--- इथे पंधरा कराल का
पंघरा--- इथे पंधरा कराल का टायपो झालाय...
लेख छान लिहिलाय!
धन्यवाद, बदल केला
धन्यवाद, बदल केला
छान आहे लेख.. खुसखुशीत!
छान आहे लेख.. खुसखुशीत!
छान आहे, आवडला
छान आहे, आवडला
धन्यवाद कुसुमिता१, ऋन्मेSSष
धन्यवाद कुसुमिता१, ऋन्मेSSष
जॉली ची बायको त्याच्याबरोबर
जॉली ची बायको त्याच्याबरोबर बसून व्हिस्की प्यायची, तिला म्हणावं तू रेडी आहेस का ☺️
छान आहे. आवडला.
छान आहे. आवडला.
मला वाटलेलं, फराळ बनवतानाच्या गंमतीजंमतीही वाचायला मिळणार पण स्वप्नं म्हणून दिलेला ट्वीस्ट आला. पार्ट टू लिहीला तर वाचायला आवडेल.
जॉली ची बायको त्याच्याबरोबर
जॉली ची बायको त्याच्याबरोबर बसून व्हिस्की प्यायची, तिला म्हणावं तू रेडी आहेस का
>> धन्यवाद, असे काही म्हटले तर ती जॉली काय काय करतो हे ऐकवेल. ते सामान्य माणसाला न झेपणारे आहे.
पार्ट टू लिहीला तर वाचायला आवडेल.
>>धन्यवाद, सुचल तर नक्कीच लिहिन
(No subject)
मस्त
मस्त