कुठराई अवसरी आणि पालीचा धोंड

Submitted by योगेश आहिरराव on 7 February, 2018 - 23:46

कुठराई अवसरी आणि पालीचा धोंड

साईडोंगर कुसूर घाटाच्या ट्रेक नंतर हूमगावातून ढाकला जाणाऱ्या घाटवाटा मनात होत्या पण ठोस माहिती हाथी लागत नसल्यामुळे दरवेळी हा प्लान थोडा पुढे पुढे ढकलत होतो. हूमगावातल्या ‘सोपान’ जो आमच्यासोबत साईडोंगर ट्रेकला होता, तसेच ‘राहुल’ सोबत या बद्दल बरीच चर्चा झाली. ‘तुम्ही या, आहे वाट जाऊ आपण’. पण वाटेचे नाव अजुन काही माहिती विचारली तर दोघे निरुत्तर. शेवटी डिसेंबर महिन्यात हा बेत ठरवला, विकिमापिया वर सगळं निरीक्षण केले. नेमके त्याच वेळी ‘प्रीती पटेल’ सोबत चर्चा होत असताना या वाटे बद्दल दुजोरा मिळाला. सर्व तयारीनिशी रात्री हूमगावात राहुलच्या घरी आमची चौकडी दाखल झाली. सोबतीला होते ‘नारायण अंकल’, ‘हेमंत’ आणि ‘शिल्पा’. अमावस्या एक दोन दिवसांवर होती. त्यात नेमके याच आठवड्यात उल्का वर्षाव दिसण्याची शक्यता, त्यामुळे रात्री निरभ्र आकाशात बराच वेळ निरीक्षण करत बसलो.
N.jpg
शिल्पाला या बद्दल बाकी भरपूर माहिती. शेवटी घड्याळाकडे पहात आणि दुसऱ्या दिवशीचा पल्ला आठवत घरी परतलो. तरी गप्पा हाणत झोपायला उशीर झालाच.
ठरल्याप्रमाणे जितेंद्र आम्हाला पहिल्या कर्जत लोकल ने येऊन जॉईन झाले.
सकाळची आवरा आवर आणि नाष्टा करतो तोच सोपान आला. साईडोंगर ट्रेक नंतर बहुतेक वेळा स्वतःहून फोन करून विचारपूस करणाऱ्या सोपानशी चांगलेच सख्य जुळले. ‘आपल्याला पाली पोटल कडून ढाक पठार चढून परस्पर खिंडीतून कुसूर मार्गे साईडोंगरने खाली यायचे आहे’, असे सांगितल्यावर राहुलच्या घरातली मंडळी आणि सोपान हसून विरोध दर्शवून म्हणाले, ‘खूप अंतर आहे नाही जमायचं’. मी म्हणालो, ‘चल तू सर्व चालणारे आहेत बघू काय ते’. शिल्पा आणि जितेंद्र तर ढाक टॉप सुद्धा होईल असे आत्मविश्वासाने सांगत होते. पण पुढे काय वाढून ठेवलंय याची थोडीच तेव्हा कल्पना होती !
हूमगावच्या ईशान्येला टाटा पॉवरची लाईन तसेच कुसूर घाट आणि दक्षिणेकडे ढाकचे लांबलचक पठार पसरलेले आहे. याच ढाकवर या भागातून ‘कुठराई’ आणि ‘पाथराई’ या दोन वाटा पदरात चढतात. पदरापासुन माथ्यापर्यंत चढणार्या वाटेला अवसरीची वाट असे म्हणतात. सोपानला हे सर्व नीट समजावून सांगितले. त्याला पुन्हा विचारले, ‘बाबा रे तू गेला आहेस का कधी’? या वर त्याचे उत्तर ‘नाही गेलो,चला तुम्ही जाऊ आपण’. थोडक्यात आता आम्हालाच वाटा शोधाव्या लागणार. सर्व चर्चेअंती निघेपर्यंत साडेसात झाले.
हुमगावातून निघाल्यावर कॅनलच्या बाजूने जात ढाकचा डोंगर आणि पेज नदी समोरुन उजवीकडे वळालो. पण आमच्या मते आत डावीकडे नदीला समांतर जाऊन पलीकडील बाजूस वाट असावी कारण दिशेनुसार तेच योग्य होते. सोपान भराभर पुढे निघाला. विचार केला पाली पोटल मधे जाऊन चौकशी करू. डाव्या हाताला ढाकचे पठार त्याचा एक लांब दांड पश्चिमेकडे वदप आणि गौरकामत च्या दिशेने उतरलाय आणि सोपान त्याचं दिशेला हातवारे करीत होता. मला शिल्पाला जितेंद्र तसेच नारायण अंकल आम्हा चौघांना त्या गाळदेवी घाटाने जायची मुळीच इच्छा नव्हती. ‘भिवगड’ ते ‘ढाक’ व्हाया गाळदेवी आमची चढाई उतराई आधी झाली होती यावेळी ध्यास होता ते नवीन अल्पपरिचीत वाटेचा. सोपानला तेच बजावून सांगितले. अर्ध्या तासाच्या चालीनंतर ‘पालीपोटल’ मध्ये पोहचलो.
गावात ‘देशमुख’ नावाचे एक वयस्कर मामा भेटले. सोपान त्यांच्या समोर पोटलच्या दांडाने यांना घेऊन जातो असे काहीतरी बडबडत होता त्या गोष्टीला आम्ही स्पष्ट विरोध दर्शविला. जितेंद्र आणि नारायण अंकल तर म्हणाले, चला गाडी फिरवू आणि बैलं घाट व कौल्या करून येऊ. आता सोपानला आईनें अकबरी दाखवण्याची वेळ आली होती. देशमुख मामांनी कुठराई आणि अवसरी घाटाबद्दल व्यवस्थित माहिती दिली. रूट समजवून घेतला आणि सोपानला जरा दमाने घ्यायला सांगितले. शेवटी तेच झाले पुन्हा आल्यापावली मागे वळून नदी काठाने धनगर पाडाच्या दिशेने निघालो. वाटेत आम्ही आलो ती हूमगावहून येणारी वाट सोडून सरळ निघालो, थोडक्यात दिशेप्रमाणे हीच वाट आम्ही सोपानला समजवण्याचा प्रयत्न करत होतो. घडल्या प्रकरणात सकाळचा बहुमूल्य तासभर वेळ वाया गेला. उजवीकडे पेज नदी तर डावीकडे साईडोंगर घाटाची सोंड यामधोमध बैलगाडी जाईल अशी मळलेली वाट अर्ध्या तासात धनगर पाडा गाठला.
तिथे थोडे विसावून पाणी पिऊन बाटलीत भरून पुन्हा एकदा वाटेच्या खाचा खुणा लक्षात घेऊन निघालो. पदारातून उजवीकडे वळून तिसऱ्या ओहोळच्या धारेने अवसरी घाटची वाट वर चढते. सध्या वाट जास्त वापरत नाहीत रान माजलेले तुम्हालाच वाट सारत जावे लागेल असे धनगर आजोबांनी सांगितले. रुंद पात्राची दगड गोट्यानी भरलेली नदी पार करून पलिकडच्या बाजूला गेलो.
पावसाळ्यात नदीचे रूप भलतेच महाकाय असणार यात शंकाच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात जंगलातली चाल खूपच सुखावह. यंदा पाऊस चांगला झाल्याने खाली नदीत ठिक ठिकाणी पाण्याचे छोटे डोह आढळले. संथ लयीत टप्पा टप्प्याने चढाई अनुभवत होतो.
थोडी उंची गाठतो तोच वायव्येला घोडेपाडी घाटातले उच्च विद्युत दाबाचे मनोरे दिसले, खाली नदी पलिकडे धनगर पाडा, समोरच आमच्या आजच्या नियोजनाप्रमाणे उतराई ठरलेल्या साईडोंगर घाटाची सोंड तर पश्चिमेकडे ‘पालीपोटल’ ‘हूमगाव’ ‘वैजनाथ’ ते ‘भिवपुरी’ पर्यंतचा मुलुख. झाडीभरल्या मळलेल्या वाटेने पदरात दाखल झालो.
घड्याळात पाहिले तर दहा वाजून गेले होते. पदरातून आडवे उजवीकडे वळालो. या भागात ही जंगल चांगलेच बहरलेले, त्यात छोट्या कातळातल्या ओढ्याना कमी प्रमाणात का असेना पण वहाते पाणी आढळले.
थोडे अंतर पुढे जाता शिंग कापलेली म्हैस ओढ्याजवळ निवांत उभी होती. दोन तीन छोटे ओहोळ पार करून डावीकडे कुठे वाट वर जातेय का ते पाहू लागलो. माथ्याकडे नजर जाताच जाणवत होते की अजुनही निम्मी चढाई शिल्लक आहे. पुढे एका मोठ्या ओढ्याजवळ ब्रेक घेतला, ठेपले आणि पराठे असा दमदार नाश्ता.
अंकल आणि सोपान इथून पुढची वाट शोधायला गेले, सगळ्यांना विनाकारण फेरा नको म्हणून बाकी आम्ही तिथेच विश्रांती घेत बसलो. काही वेळातच दोघे परत आले, या ओढ्याच्या आजूबाजूने कोणत्याही वाटेच्या खुणा नव्हत्या. पदरातल्या वाटेने पुढे जाऊन पाहायचे ठरले, जसजसे पुढे जात होतो तसे नदी पलीकडचा धनगर पाडा मागे जात होता कारण त्या ठिकाणाहून आजोबांनी सांगितल्या प्रमाणे फार आडवी चाल नव्हती. त्यांनी ज्या ओढाच्या बाजूने अवसरी घाटाची सुरुवात सांगितली ते फार अंतरावर नसावें. पुढे एखादी डाव्या हाताला वर जाणारी वाट मिळेल याच अंदाजावर ती मळलेली वाट धरून सरकत होतो.
आणखी एका ठिकाणी पुन्हा ओढाच्या उजवीकडून चढाई, वारेमाप वाढलेले गवत आणि त्या गचपणातून एका टेपाडावर आलो.वाटेत रान डुक्करांच्या शिकारीचा सापळा दिसला. इथूनही काही मार्ग नव्हता, परत खाली येऊन पदारातल्या वाटेने निघालो. काही अंतर जात आणखी एक ओढा पार करून सोपान डावीकडे शिरला.
काट्याकुट्या बाजूला सारत अस्पष्ट् वाटेने बऱ्यापैकी उंची गाठून थोडे मोकाळवणात आलो. अंकल आणि सोपान पुढची वाट शोधायला गेले. दहा पंधरा मिनिटे तेवढाच आराम मिळाला, यावेळी ते परत आले ती नेमकी वाट हेरूनच. मधला जंगलातला टप्पा पार करून गवताळ पठारावर आलो डावीकडून छोटी पण स्पष्ट वाट येऊन मिळाली. कुठून आली आम्ही कसे असे आलो हा विचार न करता वाटेला लागलो, खालच्या झाडीभरल्या टप्प्यातच गडबड झाली असावी.
समोर डावीकडे एक घळ उतरत होती, त्याच घळीतून पद्धताशीरपणे वाट नेली होती. शेवटची खडी चढाई संपवली आणि माथ्यावर एकदाचं पोहचलो. वेळ पहिली तर एक वाजून दहा मिनिटे, सकाळचं घडलेले रामायण आणि वाट शोधण्यात बराच वेळ खर्ची पडला. अशा रितीने कुसुर मार्गे साई डोंगर उतराईची शक्यता धूसर झाली. फार वेळ न दडवता ढाक गावाकडे निघालो. गावात बघतो तर दोन चार घरात काय ती म्हातारी वयस्क मंडळी बाकी बहुतांश कामा धंद्यासाठी इतरत्र स्थायिक झालेली. एका घरात विचारपूस मग जेवणासाठी त्यांच्याच अंगणात बैठक मारली.
घरातून आणलेली भाजी चपाती, पुरणपोळी, पराठे असा मेनू. ‘भिवा शंकर ढाकोळ’ हे त्या काकांचे नाव. जेवणानंतर आमच्यात चर्चेला सुरुवात झाली, पुढे काय? कारण सर्वात मुख्य प्रश्न होता तो वेळेचा आणि मग वाटेचा, दोन वाजून गेले होते. जितेंद्रनी काही पर्याय सुचवले जसे आल्या वाटेने पदरात उतरून जमले तर पाठराई ची वाट शोधून धनगर पाड्यात उतरणे किंवा पोटलच्या दांडाने पालीत उतराई किंवा गाळदेवी घाटाच्या सरळसोट वाटेने खिंडीत उतरून पोटल मार्गे हूमगाव. भिवा काका सुद्धा गाळदेवीच सुचवत होते, पण खरेतर आम्हाला कुणालाही परत गाळदेवीची वाट पटत नव्हती. कुसुर घाटाचा पर्याय ही वेळेनुसार बसत नव्हता. कुसुर किंवा बहिरीच्या अलिकडून एखादी वाट आहे काय ते विचारताच भिवा काकांनी नाळेतली म्हणजेच ‘पालीचा धोंड’ या वाटेबद्दल सांगितले, क्वचित शिकारीला जाणारे सोडले तर या वाटेला कुणी फारसे जात नाही. या वाटेने कमी वेळात उतरता येऊन पुढे नदीतून धनगर पाडा मार्गे हूमगाव. काकांनी सोपानला विचारले पण तो हि कधी या वाटेने गेला नव्हता, नाही म्हणायला धनगर पाड्यातून खालच्या बाजूने थोडा फार कधी काळी फिरकला होता.
थोडक्यात आता हे म्हणजे आऊट ऑफ सिल्याबस प्रकरण होते, अगदी ‘ड’ गटातील प्रश्न असायचे तसे. पण सोबतीला नारायण अंकल सारखे प्रचंड अनुभवी मात्तबर तसेच जितेंद्र, शिल्पा आणि हेमंत सारखे खंबीर भिडू आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक व जंगलाचे चांगले ज्ञान असणारा सोपान त्यामुळे नवीन वाटेने जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
बरोब्बर सव्वादोन वाजता ढाक गावातून निघालो, भिवा काका थोड्या अंतरावर सोडायला आले. पुन्हा एकदा त्यांना नाळे बद्दल नीट विचारून घेतले जसे कुठे दोर किंवा अडचणीची तर वाट नाही ना, विचारण्याचे कारण नाळेतल्या वाटा तीव्र चढ उताराच्या असतात त्यात भलेमोठे दगड धोंडे तर असतातच पण दरवेळी पाऊस झाल्यावर थोडा फार मार्ग बदलतो अशा वेळी माहित नसलेल्या नवख्या वाटेवर १०-१५ फुटांचा एखादा टप्पा तयारी नसेल तर अवघड पडू शकतो, तसा आमच्याकडे रोप होताच आणि गरज पडल्यावर वापरू शकत होतो. स्थानिक लोक याच वाटेला पालीचा धोंड असेही म्हणतात.
भल्या मोठ्या पठारावरील वाळलेल्या पिवळ्या धमक गवतातून वाट जाऊ लागली. नैर्ऋत्येला ढाकचा किल्ला त्याच्या पायथ्याला असणाऱ्या झाडीतूंन पुढे वळसा घालून नाळेच्या मुखाची जायचे होते. वाटेत एक छोटा तलाव लागला इथेच भिवा काका माघारी परतले.
हाच तो ‘जांभिवली’ ‘कोंडेश्वर’ ‘ढाक’ ट्रेकर्सचा प्रसिद्ध रुट. तासभर चालल्यानंतर मोकळ्या जागेत थांबा घेतला.ढाक किल्ल्यावर याच दिशेने उजवीकडून एक वाट जाते. आता तर वेळेअभावी ढाकच्या माथ्यावर जाणे शक्यच नव्हते, पुन्हा कधीतरी योग येईलच. वाट थोडी चढणीला लागून ढाकच्या पायथ्याचे जंगलातून जात होती.
इथलं जंगल फारच छान पण वाटेवर बऱ्यापैकी प्लास्टिकचा कचरा अगदी पाण्याच्या बाटल्या पासून ते गोळया बिस्किटे गुटखा. सह्याद्रीत प्रसिध्दी पावलेल्या बहुतेक ठिकाणांची अशीच अवस्था झालीय.
गावातून निघाल्यापासून दोन सव्वादोन तासात बहिरीच्या खिंडीत पोहचलो. वाजले होते साडेचार थोडक्यात आमच्या हातात दिडच तासाचा अवधी, अंधाराच्या आधी किमान नाळेची उतराई पूर्ण करून जंगल पट्ट्यातून बाहेर पडायचे एवढेच लक्षात घेतले. इथून तीन वाटा जातात पहिली आम्ही आलो ती ढाक गावातली, दुसरी कळकराय सुळक्याच्या खिंडीतून कड्यातल्या बहिरीकडे जाते तर तिसरी जांभिवलीकडे याच वाटेने पुढे जाऊन डावीकडे कूसूरला जाता येते.
खिंडीत काही हुल्लड मंडळी त्यांच्याच धुंदीत होती, आम्हाला पाहून बहिरीला आलेले जांभिवलीतले गावकरी पुन्हा ढाक गावातून गाळदेवी घाटाची वाट सांगत होते. वेळ आणि श्रम पहाता पुन्हा आल्यामार्गे परत जायचा प्रश्नच नव्हता. २००६ सालीं बहिरिला आलो होतो तेव्हा सांडशीतून चढाई उतराई केली होती पण आता मात्र हूमगावात परतायचं होतं त्यामुळे सांडशी पर्याय काही उपयोगाचा नव्हता. वेळ पहाता कुसूर घाट तर अशक्यच. बहिरीच्या खिंडीतून डाव्या हाताला मोठा ओढा दरीत झेपावला हीच वाट ‘पालीचा धोंड’. भिवा काकांनी सांगितल्या प्रमाणे सर्व खुणा लक्षात घेतल्या. तरी अंकल, जितेंद्र आणि सोपान पुढे पाहणी करण्यासाठी गेले. तोवर पुन्हा जांभिवली गावातले दोन गावकरी वरून आवाज देऊ लागले..का बरे अशी दिशाभूल करत आहेत? मनात शंकेची पाल चुकचुकली तितक्यात अंकलने खालून आवाज दिला.
त्या गावकरींना व्यवस्थित जाऊ नाही जमले तर येऊ परत असे सांगून नाळेतून उतराई सुरू केली.
सुरुवातीचा लहान झाडीच्या टप्प्यातून बाहेर आलो. समोर भली मोठी दगडांची रास यातूनच मिळेल तसा मार्ग काढत तोल सांभाळत उतरायचे. अंकल जितेंद्र आणि सोपान यांनी लीड घेतली. अंकल तर झटपट पुढे जात होते.
एक गोष्ट मात्र त्यात बरी होती ती म्हणजे उतार फार तीव्र नव्हता त्यामुळे एका लयीत उतरता येत होते. इतर नाळेच्या तुलनेत ही मात्र बऱ्यापैकी रुंद. लहान मोठे कातळटप्पे उतरण्याची चांगलीच मजा येत होती.
कधी डावीकडून तर कधी उजवीकडून मिळेल तसा मार्ग काढत उतरत होतो. नाळेत अजूनही ठिकठिकाणी पाणी त्यात एक चांगली बाब म्हणजे कुठेही मानवनिर्मित कचरा नाही. साधारण निम्मी ३०० मीटर खाली आल्यावर उजवीकडे कड्यात दोन छोटे कातळडोह तिथेच थोडी विश्रांती घेतली.
डोहाची जागा फारच छान निघावेसे वाटत नव्हते पण हळूहळू अंधारून आलेलं त्यात नाळेची दिशा दक्षिण उत्तर त्यामुळे मावळतीच्या आतच अंधार हमखास होणार.
शक्य तितकी सावधगिरी बाळगून एका लयीत उतरत होतो कारण अपुरा प्रकाश, दगड धोंड्याची उताराची वाट त्यात अतिघाई म्हणजे अपघाताला निमंत्रण. उतरताना गुडघ्यावर ताण जाणवत होता, तसेही दिवसभरात बरीच तंगडतोड झाली होती त्यात भर म्हणजे मला स्वतःला टाचेच्या दुखण्यामुळे फार वेग पकडता येत नव्हता त्यामुळे पुढे गेलेले अंकल, सोपान, जितेंद्र आणि मागे राहिलेल्या आमच्यात अंतर पडू लागले तरी अंकल दरवेळी आवाज देऊन आमच्याकडून खात्री करून पुढे सरकत होते.
अंधुक संधिप्रकाशात एकदाचे नाळेतून बाहेर आलो. आता होते मोठ मोठ्या दगडांचे नदी पात्र. समोरील बाजूच्या कड्यातून दोन चार मोठ्या घळी याच नदीत उतरत होत्या. याच भागात सोपान ने आणखी एक नवीन वाट सांगितली. म्हणजे पुन्हा कूसूर - हूमगाव यावे लागणार.
नदी पात्रातील आडवी चाल तर नाळेपेक्षा ही वरचढ निघाली, त्यात पूर्ण काळोखात बॅटरी घेऊन साहजिकच जास्त वेळ लागत होता. शेवटी एके ठिकाणी उजवीकडे बारीक अस्पष्ट पायवाट लागली तेव्हा कुठे जरा बरे वाटले. बरेच अंतर चालतोय पुढे वाट थोडी रुंद आणि चांगलीच मळलेली. पण वाटेवर कुठल्याही खुणा नाही फक्त दिशेनुसार नदी डावीकडे ठेऊन सरळ जात होतो. बरेच अंतर कापल्यावर वाटेत गुरांचे शेण दिसले चला म्हणजे धनगर पाडा जवळ आला तर. पण कसले काय जवळपास पंधरा मिनिटांहून अधिक वेळानंतर कुत्र्यांचं भुंकणे ऐकू आले, पाहिले तर वर उजव्या हाताला धनगरांचे घर. सोपान आणि त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. भर रानात असे एकाकी रहाणं म्हणजे कमालच. तसेच पुढे जात आठ वाजेच्या सुमारास सकाळी जिथून सुरुवात केली त्या धनगर वस्तीत आलो. सकाळच्या आजोबांना दिवसभराचा वृत्तांत सांगितला. वाट शोधण्यास लागलेला विलंब त्यानुसार परिस्थिती पाहून दुसऱ्या वाटेचा घेतलेला निर्णय. पण खरे तर या स्थानिकांच्या मते या वाटा आता मोडत चालल्या आहेत कारण ही तसेच आहे ढाक गावात इन मीन तीन रहाती घरे त्यातही सर्व वयस्क त्यांना सोयीची वदप गाळदेवी घाटाची वाट. मग कोण अश्या वाटेवर जाणार क्वचित एखादा धनगर किंवा शिकारीसाठी कोण गेले तरच. नवीन पिढी तर पूर्ण अनभिज्ञ, त्या बद्दल तर बोलायलाच नको. परत येताना सोपान ने उजवीकडून साईडोंगरच्या सुरुवातीच्या वाटेवर नेले. सपाटी वरचा हूमगावचा रस्ता सोडून हा पुन्हा कुठे चढायला लावतोय? काय कळेना? बरं आवाज दिला तर, या तुम्ही असे सांगत होता. मी त्याला म्हणालो, ‘सोपान आज नाही जमले तर राहू दे आम्हाला रात्री साई डोंगर चढायची मुळीच इच्छा नाही’. आजचा दिवस झाले तेवढे पुरे. मग त्याने वाटेत झाडावर स्वतः रंगवून लावलेली गावाची आणि वाटेची दिशा दर्शक पाटी दाखवली. अरे तर या साठी पुन्हा इथे चढवून आणले. असो त्याच्या मेहनतीचे कौतुक करून पुन्हा माघारी उतरत नऊच्या सुमारास राहुल कडे परतलो. राहुलच्या घरात त्याचे भाऊ व इतर नातेवाईक आमची वाट पहात होते त्यात जंगलात नेटवर्क नसल्यामुळे आमचे फोन लागत नव्हते, ते सर्व चिंतेत त्याचे वडील तर दोघांना घेऊन आम्हाला शोधायला निघायच्या तयारीत होते. पुन्हा घडला प्रकार कथन, मग आग्रहाने जेवण. भूक तर चांगलीच लागली होती, जेवण आणि वेगळ्या नवीन आड वाटेच्या गप्पा. रात्री साडेदहा वाजता राहुलच्या घरच्यांचा निरोप घेतला ते पुन्हा लवकरच येण्याचे कबूल करून.
फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2017/12/kuthrai-avasari-palicha-dhond.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users