थायरॉइड हॉर्मोन्स आणि त्यांचा गोतावळा

Submitted by कुमार१ on 5 February, 2018 - 23:07

टीपः माबोवर थायरॉइडचा नानबांचा धागा गेली ९ वर्षे चालू आहे. त्यातून वाचकांची या आजाराबद्दलची उत्सुकता व जागरुकता दिसून येते. माझ्या सध्याच्या लेखमालेत मी थायरॉइडवर लिहावे अशी वाचकांची सूचना होती. तसेच मलाही या विषयावर लिहिण्याचा मोह टाळणे अवघड होते. तेव्हा वरील धाग्यावर फारशी चर्चा न झालेले मुद्दे घेउन हा लेख लिहीला आहे. तो वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
********************************

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉरमोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५०हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. यापैकी बहुसंख्य हॉर्मोन्स ही स्वयंभू नसून ती मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus होय. हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.

पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते. पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात आणि मग ती विविध पेशींमध्ये पोचून आपापले कार्य करतात. थोडक्यात, एखादी नदी हिमालयात उगम पावते आणि पुढे कित्येक किलोमीटर वाहत जाते, वाहताना काही ठिकाणी तिची नावे बदलते आणि मग लांबवर कुठेतरी संपते, तसाच काहीसा हा प्रकार आहे.

आता हा मुद्दा अजून स्पष्ट होण्यासाठी आपण थायरॉइडचे उदाहरण घेऊ. ही ग्रंथी आपल्या गळ्याच्या भागात असते. ती स्वतः‘थायरॉइड हॉर्मोन्स ( T४ आणि T३)’ तयार करते. पण तिच्यावरील सर्वोच्च ग्रंथींचे नियंत्रण कसे आहे बघा.
Hypothalamus मुळात TRH हे प्रवाही हॉरमोन सोडते. त्याला प्रतिसाद म्हणून pituitary ग्रंथी TSH हे ‘उत्तेजक’ हॉरमोन सोडते आणि ते थायरॉइडमध्ये पोचून तिला T४ आणि T३ ही हॉरमोन्स तयार करायला लावते.आता T४ आणि T३ ही दमदार आहेत खरी पण ती मनमानी करू शकत नाहीत; ती सतत त्यांच्या ‘वरिष्ठ नियंत्रक’ हॉर्मोन्स च्या गोतावळ्यात अडकलेली आहेत.

या लेखात आपण थायरॉइड हॉरमोन्सची मूलभूत माहिती, त्यांच्यावरील नियंत्रण आणि थायरॉइडचे काही आजार यांची माहिती करून घेणार आहोत.
लेखाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचे खालील विभागात विवेचन करतो:
• थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन
• हॉरमोन्सचे कार्य
• हॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’
• थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि
• थायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या

थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन आणि वहन

थायरॉइड ग्रंथीमध्ये ‘थायरोग्लोब्युलिन’ नावाचे एक भलेमोठे प्रथिन असते. त्याच्या मुशीतच थायरॉइड हॉरमोन्सचे उत्पादन होते. त्यासाठी लागणारे एक महत्वाचे खनिज म्हणजे ‘आयोडिन’, जे आपल्याला आहारातून मिळवावे लागते. आयोडिनची गंमत म्हणजे ते समुद्राकाठच्या जमिनीत आणि समुद्री-अन्नात भरपूर असते पण, जसजसे आपण समुद्रापासून लांब जातो तसे जमिनीत ते आढळत नाही. पर्वतीय प्रदेशांत तर ते जमिनीत अजिबात नसते. त्यामुळे सर्वांना हे खनिज आहारातून मिळावे यासाठीच आयोडिनयुक्त मिठाची निर्मिती केलेली आहे.

तर थायरोग्लोब्युलिनमधील एक अमिनो आम्ल (Tyrosine) आणि आयोडिन यांच्या संयुगातून T३ व T४ ही हॉरमोन्स तयार होतात. T३ मध्ये आयोडिनचे ३ तर T४ मध्ये ४ अणू असतात. या दोघांमध्ये T४ हे मुख्य हॉर्मोन असून त्याचे पूर्ण नाव Thyroxine आहे. शरीरास जेव्हा या हॉर्मोन्सची गरज लागते तेव्हा थायरोग्लोब्युलिनचे विघटन होऊन ती रक्तात सोडली जातात. त्यांच्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्यांचे रक्तात वहन करण्यासाठी त्यांना प्रथिनांशी संयोग व्हावे लागते. तेव्हा रक्तात असताना ही हॉर्मोन्स ९९.५% प्रमाणात संयुगित असतात. पण त्यांचे जे अत्यल्प प्रमाण ‘मुक्त’ असते तेवढेच हॉर्मोन प्रत्यक्ष कार्यकारी असते.

हॉरमोन्सचे कार्य

ही हॉर्मोन्स सर्व पेशींमध्ये अत्यंत मूलभूत पातळीवर काम करतात. सर्व पेशींची परिपूर्ण वाढ होण्यासाठी आणि त्यांचा चयापचय (metabolism) व्यवस्थित होण्यासाठी ही हॉर्मोन्स अत्यावश्यक आहेत. त्यामुळे पेशींमध्ये उत्तम उर्जानिर्मिती होण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. हृदय आणि चेतासंस्थेच्या कामावरही त्याचे नियंत्रण असते.

थायरॉइड ग्रंथी ही मुख्यतः T४ रक्तात सोडते आणि मग ते सर्व पेशींमध्ये पोचते. आता इथे एक गंमत होते. प्रथम T४ चे T३ मध्ये रुपांतर केले जाते. आता खऱ्या अर्थाने T३ हेच सक्रीय हॉर्मोन बनते आणि ते पेशींमधले सर्व कार्य करते. एक प्रकारे T४ हा आदेश देणारा नेता आहे तर T३ हा तळागाळात काम करणारा कार्यकर्ता आहे!
पेशींमध्ये जे T४ पोचलेले असते त्यापासून काही प्रमाणात अजून एक हॉर्मोन – reverse T३ (rT३) – तयार होते. मात्र हे हॉर्मोन ‘बिनकामाचे’(inactive) असते. थायरॉइड हॉर्मोन्सच्या गोतावळ्यात ते एकाची भर पाडते, इतकेच.

हॉरमोन्सवरील ‘सर्वोच्च नियंत्रण’
आपण सुरवातीस हे पाहिले की TRH >> TSH >> T३ व ४ असा हा हॉर्मोन्सचा ‘खोखो’ सारखा पदानुक्रम आहे. मात्र एकदा पुढच्यास ‘खो’ दिला की काम संपले असे अजिबात नाही. या तिन्ही पातळींवर एक ‘negative feedback’ प्रकारची यंत्रणा अस्तित्वात असते. ती अशी काम करते:
१. जर काही कारणाने थायरॉइडने गरजेपेक्षा अधिक T३ व ४ तयार केले, तर ‘वर’ नकारात्मक संदेश पाठवला जातो आणि मग TSH सोडण्याचे प्रमाण खूप कमी केले जाते.
२. याउलट जरका थायरॉइडमध्ये T३ व ४ चे उत्पादन गरजेपेक्षा कमी होऊ लागले, तर ‘वर’ तसा संदेश पाठवून TSH सोडण्याचे प्रमाण बरेच वाढवले जाते.
अशा प्रकारे रक्तातील T३ व ४चे प्रमाण नेहमी नियंत्रणात ठेवले जाते.

थायरॉइड ग्रंथीचे आजार

या ग्रंथीला अनेक कारणांनी इजा होऊ शकते. त्यातून दोन प्रकारच्या रोगावस्था निर्माण होतात:
१. थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता ( Hypothyroidism ) आणि
२. थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य ( Hyperthyroidism )
(येथे जे आजार मुळात थायरॉइडचे (Primary) आहेत, फक्त त्यांचाच विचार केला आहे. तसे Hypothalamus आणि Pituitary यांच्या आजाराचाही थायरॉइडवर परिणाम होऊ शकतो. पण, ते आजार तुलनेने कमी असल्याने त्यांचा विचार केलेला नाही.)
आता दोघांचा आढावा घेऊ.

थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता
: याची दोन महत्वाची कारणे स्थानिक आहारविषयक परिस्थितीनुसार अशी आहेत:
१) जगाच्या ज्या भागात अद्याप आहारातून पुरेसे आयोडिन मिळालेले नाही तिथे ‘आयोडिनची कमतरता’ हे मुख्य कारण आहे. त्यामुळे थायरॉइडमध्ये हॉर्मोन्सचे उत्पादन अपुरे होते.
२) याउलट आहार-संपन्न भागांमध्ये वरील प्रश्न उद्भवत नाही. इथे ‘ऑटोइम्यून थायरॉइडआजार’ हे महत्वाचे कारण आहे. यात रुग्णाच्या शरीरातील काही प्रथिने त्याच्याच थायरॉइडच्या पेशींना मारक होतात आणि मग हळूहळू ग्रंथीचा नाश होतो.
वरीलपैकी किंवा अन्य कोणत्याही कारणाने थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता झाली की ‘feedback’ नुसार pituitary ग्रंथी अधिक प्रमाणात TSH सोडते आणि ते थायरोइडमध्ये पोचल्यावर तिला जास्तीतजास्त उत्तेजित करून पुरेसे T३ व ४ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या रोगावस्थेत सुरवातीस रक्तातील TSH वाढलेले असते. तर आजाराच्या पुढच्या स्थितीत T४ हे कमी होऊ लागते.

थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य

याचे मुख्य कारण आहे Graves-आजार. हाही एक ‘ऑटोइम्यून’ थायरॉइडआजार आहे. पण इथे परिणाम बरोबर उलटा होतो. ठराविक प्रथिने थायरॉइडला नको इतकी उत्तेजित करत राहतात. त्यामुळे T३ व ४ हे अतिरिक्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे त्यांच्या नकारात्मक ‘feedback’ मधून ‘वरून’ TSH सोडणे जवळजवळ बंद होते. त्यामुळे रक्तातील TSH चे प्रमाण नगण्य असते.

थायरॉइडचे रोगनिदानआणि रक्तचाचण्या
थायरॉइडच्या आजारांमध्ये रक्तचाचण्यांचे खूप महत्व आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. तसेच सर्व लक्षणे एकाच रुग्णात दिसत नाहीत. एखाद्याच्या बाबतीत फक्त वजन झपाट्याने कमी/जास्त झालेले असते तर अन्य एखाद्याला फक्त जुलाब/ बद्धकोष्ठतेचा त्रास असू शकतो. तर एखाद्याच्या बाबतीत फक्त नाडीचे ठोके जलद वा मंद होऊ शकतात. एकूणच आजाराचे स्वरूप बऱ्याचदा गूढ असते. अशा वेळेस रक्तातील हॉर्मोन्सची मोजणी हा निदानासाठी महत्वाचा आधार ठरतो.

बहुसंख्य रुग्णांचे बाबतीत मोजक्या २ चाचण्या पुरेशा असतात:
१. TSHची पातळी : ही सर्वात संवेदनक्षम आणि महत्वाची चाचणी आहे. थायरॉइडच्या कोणत्याही रोगावस्थेत सुरवातीस या पातळीत प्रथम बदल दिसतो. ही पातळी अतिसंवेदनक्षम-तंत्राने मोजली जाते.
२. ‘मुक्त (Free) T४’ ची पातळी : रक्तात जेवढे मुक्त T४ असते तेच खरे सक्रीय हॉर्मोन असते. त्यामुळे ते मोजले पाहिजे. ‘एकूण T४’ ची मोजणी काही वेळेस विश्वासार्ह नसते.

आता वरील दोन्ही पातळ्या मोजल्यावर प्रमुख रोगांचे निदान असे केले जाते:
१. थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता: यात TSH बरेच वाढलेले आणि ‘मुक्त (Free) T४’ कमी झालेले दिसते. रोगाच्या सुरवातीस फक्त TSH वाढलेले पण T४ नेहमीएवढेच असे चित्र असते.
२. थायरॉइड हॉर्मोन्सचे अधिक्य : यात TSH खूप कमी झालेले (कित्येकदा न मोजता येण्याइतके) आणि मुक्त (Free) T४ वाढलेले दिसते.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी की ‘T३’ ची मोजणी ही अजिबात प्राथमिक चाचणी नाही. ‘कमतरते’च्या निदानात त्याची आवश्यकताच नसते आणि ‘अधिक्य’च्या बाबतीत अत्यल्प रुग्णांसाठी तिची गरज पडू शकते. अन्य काही चाचण्या थायरॉइडच्या विशिष्ट रोगानुसार (उदा. कर्करोग) केल्या जातात.

गेल्या तीन दशकांत थायरॉइडचे आजार समाजात खूप वाढत गेले आहेत. स्त्रियांमध्ये त्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तेव्हा या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला त्रास होत नसतानाही थायरॉइडची ‘चाळणी’(screening) चाचणी करणे हितावह ठरते आहे. यासाठी फक्त TSH ची मोजणी पुरेशी असते. दोन महत्वाच्या प्रसंगी TSH मोजणे आता अनिवार्य ठरले आहे:
१. गर्भवतीची चाचणी : जरका गरोदर स्त्रीस थायरॉइड-कमतरता असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम गर्भाचे वाढीवर होतो.
२. नवजात बालकाची चाचणी : जन्मानंतरच्या सुरवातीच्या काळात थायरॉइड हॉर्मोन्स मेंदू व शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असतात. त्यामुळे त्यांची कमतरता नसल्याचे जन्मतःच खात्री करून घेणे आवश्यक आहे.

पन्नाशीनंतर सर्वच स्त्रियांनी TSH चाचणी नियमित स्वरूपात करावी असा एक मतप्रवाह आहे पण अद्याप तो सार्वत्रिक झालेला नाही.

समारोप

थायरॉइड ही एक अतिशय महत्वाची ग्रंथी आहे. तिची हॉर्मोन्स ही शरीरातील सर्व पेशींमध्ये मूलभूत उर्जेसंबंधीचे काम करतात. त्यामुळे त्यांच्या बिघाडाचे परिणाम अनेक इंद्रिय/ यंत्रणांवर होतात. आपली जीवनशैली आणि पर्यावरण यांच्यातील बिघाडांमुळे दिवसेंदिवस थायरॉइडचे आजार वाढत आहेत. आज हॉर्मोन्स संबंधी आजारांमध्ये मधुमेह प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखालचे स्थान थायरॉइड-कमतरतेने पटकावले आहे. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अनेकांना थायरॉइडच्या रक्तचाचण्यांना सामोरे जावे लागत आहे. तेव्हा यासंबंधीची मूलभूत माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने हा लेखप्रपंच.
*************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Noel Rose या ९२ वर्षीय संशोधकांचे निधन झाले.
ऑटोइम्युन आजार या संकल्पनेचे ते जनक.
त्यांनी संशोधनाची सुरवात थायरॉइड पासून केली होती.

आदरांजली !

अंजली

अंडरअ‍ॅक्टिव्ह थायरॉइड
म्हणजेच थायरॉइड न्यूनता (hypo thy).
त्याचे विवेचन लेखात आहेच.

मला मागील म्हणजे २०१९ अक्टोंबर मधे टी एस एच जास्त असल्याचे निदान झाले. हे निदान ब्लड प्रेशर वाढले म्ह्णणुन चाचणी केली त्यात सापडले. फेबृवारी २०२० पासून सातत्याने टी एस एच नियंत्रणात आहे. ब्ल्ड प्रेशरही कमी झाले आहे. तरी माझे डोक्टर ही सकाळची गोळी आयुष्यभर घ्यावी असे सुचवतात. ही २५ मायक्रोग्रेम पहाटेची गोळी सुटु शकते का ? सोडायची असेल तर काय प्रोसीजर आहे ?

नितीन,
तुमच्या डॉ नी प्रत्यक्ष तपासून दिलेला सल्लाच महत्वाचा. इथून व्यक्तिगत सांगणे अयोग्य.

तुमचे T4 देखील मोजले असावे.
त्यांच्या सल्ल्यानेच जात राहा
शुभेच्छा !

अंडरअ‍ॅक्टिव्ह थायरॉइड
म्हणजेच थायरॉइड न्यूनता (hypo thy).
त्याचे विवेचन लेखात आहेच.>>>>>> वाचते. धन्यवाद!

कोविडने बाधित काही स्त्रियांमध्ये थायरॉईड-दाह झाल्याचे आढळून आले आहे. एकंदरीत हा विषाणू शरीरातील बऱ्याच अवयवांचा दाह घडवून आणतो असे दिसते आहे.
अर्थात त्या आजाराचा थायरॉईड वर होणारा परिणाम सध्यातरी अल्पकालीन वाटतो आहे. या रुग्णांचे पुढील काळात बारकाईने निरीक्षण केल्यावरच अधिक प्रकाश पडेल.

थायरॉईड न्यूनता आणि आहारातील कोबी व तत्सम भाज्या वर्ज्य करणे, याबद्दल बराच वाद आहे; काही गैरसमज देखील पसरलेले आहेत.

नुकत्याच यासंदर्भात झालेल्या नव्या संशोधनामुळे यावर अधिक प्रकाश पडला आहे.
Brassica या वनस्पतींच्या गटामध्ये कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, सलगम, Brussels sprouts, kale इत्यादी भाज्या येतात. त्यांच्यामध्ये glucosinolates ही रसायने असतात आणि त्यामुळे थायरॉईड हार्मोनच्या उत्पादनात बाधा येते, अशी मूळ थिअरी आहे.

अलीकडे एका प्रयोगात निरोगी व्यक्तींना भरपूर ब्रोकोलीचा रस तब्बल चार महिने प्यायला देऊन त्यांच्या थायरॉइड चाचण्या केल्या गेल्या. तेव्हा त्या चाचण्यांच्या निष्कर्षावर कोणताही अनिष्ट परिणाम झालेला दिसला नाही. या सर्व भाज्या थायरॉईड रुग्णाने वर्ज्य कराव्यात याला पुरेशा शास्त्रीय आधार किंवा पुरावा नाही.

एखाद्या कुटुंबात जेव्हा या भाज्या जेवणासाठी केल्या जातात तेव्हा एका व्यक्तीच्या वाट्याला जेवढे काही येते, तेवढे जरूर खावे.
सारांश : या भाज्या जर आवडत असतील, तर थायरॉइडचा विकार आहे म्हणून त्या जाणीवपूर्वक वर्ज्य करण्याची काही गरज नाही. तारतम्य महत्त्वाचे.

वरील माहितीसाठी आभार. सोयाबीनलाही असेच करावे का ? (सोया चन्क्स , टोफू ई)
आम्ही/मी कमी केलयं. थायरॉईड नाही. पण मतच बदलले काही काही वाचून.

सर्वांना धन्यवाद.
अस्मिता,
होय, बरोबर.
soy milk, tofu, soy sauce, tempeh, and miso या सर्वांत isoflavones असतात. पण त्यांच्या माफक प्रमाणात सेवनाने आपल्या होर्मोन उत्पादनावर परिणाम होत नाही.
बाऊ नको !

थायरॉईड ही अतिशय संवेदनाक्षम ग्रंथी आहे. अनेक जंतुसंसर्ग आजारांचा ही तिच्यावर काही प्रमाणात परिणाम होत असतो. कोविड महासाथीच्या दोन वर्षानंतर यासंदर्भातील काही संशोधनाचा आढावा :

अनेक अभ्यासांमध्ये असे दिसून आले की covid-19 झालेल्या रुग्णांना कालांतराने थायरॉईडच्या काही समस्या उद्भवल्या आहेत. त्या साधारण तीन प्रकारच्या आहेत :
१. थायरॉइड दाह : अशा रुग्णांची संख्या बरीच मोठी आहे. विशेषता जे रुग्ण उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होते त्यांच्या बाबतीत ही अधिक जाणवली आहे. अशा रुग्णांच्या प्रयोगशाळेचे रिपोर्ट T4 अधिक्य आणि TSH न्यूनता दाखवत आहेत.

२. ज्या रुग्णांना थायरॉईड अधिक्याचा Graves-आजार पूर्वी होता आता तो पुन्हा डोके वर काढत आहे.

३. अल्प रुग्णांना थायरॉईड न्यूनतेची समस्या जाणवली आहे.
एकंदरीत पाहता अशा सर्व रुग्णांचे दीर्घकाळ निरीक्षण करावे लागणार आहे.

हायपोथायरॉईड >>>
या आजाराचा मूत्रपिंडावर थेट दुष्परिणाम नाही. परंतु काही शक्यता अशा उदभवतात :

१. अशा बऱ्याच मध्यमवयीन रुग्णांना मधुमेह किंवा त्याची पूर्वावस्था असण्याचा संभव असतो. त्याच्यामुळे मूत्रपिंडावर कमीअधिक परिणाम होऊ शकतो.
२. हायपोथायरॉईडवर वेळीस उपचार सुरू केले आणि नियमित घेतले तर सहसा अशी वेळ येण्याचे कारण नाही.
३. हा आजार दीर्घकालीन असल्याने अशा रुग्णांनी वर्षातून एखाद्या वेळेस मूत्रपिंडाशी संबंधित सामान्य प्रयोगशाळा चाचण्या कराव्यात (क्रिएटिनिन).

अलीकडे अनेक जण आपल्या त्वचा केस आणि नखांच्या सौंदर्यवर्धनासाठी काही औषधी गोळ्या खात असतात. अशा बऱ्याच गोळ्यांमध्ये बायोटीन या ब जीवनसत्वाचे प्रमाण खूप जास्त असते (गरजेच्या दोनशे पट).
जर अशा लोकांची थायरॉईडसंबंधी चाचण्या करण्याची वेळ आली तर समस्या निर्माण होते.

या गोळ्यामधील बायोटीनमुळे थायरॉईड हॉर्मोन्सच्या मोजणीमध्ये गडबड होते. त्यांना जरी थायरॉईडअधिक्य झालेले नसले तरीही T3 , T4ही हॉर्मोन्स वाढल्याचे चुकीचे चित्र समोर येते.
म्हणून अशा लोकांनी थायरॉइड चाचण्या करण्यापूर्वी एक आठवडाभर आधी बायोटीनयुक्त गोळ्या खाणे बंद केले पाहिजे.

टोटल टी 3 ,4 आणि फ्री टी 3 , 4 मध्ये काय फरक आहे ?

कुठली टेस्ट कधी एडवाईज करतात ?

बऱ्याचदा डॉकटर सांगतात , थायरॉईड करा , पण टोटल की फ्री लिहीत नाहीत , मग परत टेक्निशियन फोन करतात

लेखात हे दिले आहे ना:
"तेव्हा रक्तात असताना T3 व T4 ही हॉर्मोन्स ९९.५% प्रमाणात प्रथिनांशी संयुगित असतात. पण त्यांचे जे अत्यल्प प्रमाण ‘मुक्त’ असते तेवढेच हॉर्मोन प्रत्यक्ष कार्यकारी असते".
Total = protein bound T4 + free T4

म्हणून Free T4 & TSH ही जोडी मोजणे सर्वोत्तम.
गरोदरपणाच्या काळात Free T4 ची मोजणी तितकी विश्‍वासार्ह नसते. त्यामुळे त्या वेळेला टोटल मोजले
जावे असा एक विचार आहे.
तसेच, जर प्रयोगशाळा अत्याधुनिक नसेल तर टोटल मोजलेले बरे.
फ्री मोजताना थोडीशी जरी चूक झाली तरी त्याचा अंतिम उत्तरावर मोठा परिणाम होतो.

थायरॉईड न्यूनता असलेल्या रुग्णांना थायरोक्सिनची गोळी रोज घ्यावी लागते. ती सकाळी उठल्यानंतर काही खाण्यापूर्वी एक तास आधी घेण्याची शिफारस आहे.
बऱ्याच जणांना हे नियोजन करणे गैरसोयीचे वाटते. त्यादृष्टीने आता खाण्याबरोबरच हे औषध घेता येईल का याचे संशोधन चालू आहे.

हेच औषध आता द्रव स्वरूपातही निघाले असून सध्या ते पाश्‍चात्त्य देशात उपलब्ध आहे. ते द्रव स्वरूपात घेतले असता त्याच्या शोषणावर जेवणाचा विशेष परिणाम होत नाही असे प्राथमिक चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. पुरेसे संशोधन झाल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.

सध्यातरी ते द्रव स्वरूपातील औषध गोळीपेक्षा बरेच महाग आहे.

माझ्या काकांना थायरॉइडचा त्रास बरीच वर्षे आहे. त्याचा त्यांच्या डोळ्यावर परिणाम झाल्याने डॉक्टरांनी Tepezza ची बरीच इंजेक्शन्स दिली. आता त्यांना ऐकायला कमी येते आहे. हे त्या इंजेक्शन्समुळे झाले असेल का?

**Tepezza ची बरीच इंजेक्शन्स>>>
बरोबर.
हे औषध घेणाऱ्या सुमारे पंधरा टक्के रुग्णांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो

थायरॉईड चे निदान सहज होत नाही.
कधी कधी निदान करणे खूप कठीण असते
एक पाहण्यात आलेली केस मित्राची..
.तब्बेत बिघाड होत आहे म्हणून अनेक टेस्ट त्यांनी केल्या
कोणी काविळ चे निदान केले तर कोणी कशाचे ....
सर्व टेस्ट करून झाल्या पण निदान काहीच नाही .
फरक काहीच नाही..
आयुष्य अगदी काही महिन्यांवर येवून ठेपले आणि ..
कोणाच्या तरी ओळखीने kokilaben अंबानी हॉस्पिटल मधील अतिशय तज्ञ डॉक्टर ची ट्रीटमेंट चालू केली त्यांनी थायरॉईड चे निदान केले ..उपचार चालू केले आणि काही महिन्यात तो माझा मित्र ठीक झाला.
आज एकदम तंदुरुस्त आहे.

काही हार्मोन्सच्या मोजणी तपासण्या रुग्ण स्वतः घरच्या घरीच करू शकतील असे काही रासायनिक संच प्रगत देशांमध्ये आलेले आहेत. सध्या गुगल आणि चटगपट वाचून स्वयंरोगनिदान आणि स्वयं चाचणी करणारे लोकही दिसून येत आहेत. त्यांना अशा घरगुती चाचण्या म्हणजे वरदान वाटते.

परंतु असे संच वापरण्याबाबत तज्ञ डॉक्टरांनी नापसंती दर्शवली आहे. रुग्णाला कुठली लक्षणे दिसताच त्याने प्रथम डॉक्टरांकडे जावे आणि त्यांना निदानासाठी कुठल्या तपासण्या कराव्याशा वाटतात त्यानुसारच वागले पाहिजे. काही चाचण्यांचे बाबतीत तपासणी करण्याची दिवसरात्रीची विशिष्ट वेळ आणि रुग्णाची एकंदरीत शारीरिक परिस्थिती यांचाही विचार करावा लागतो. तसेच कुठल्याही घरगुती चाचणी संचांना काही अंगभूत मर्यादा असतात..

एकदा हार्मोन्सचा आजार डॉक्टरांनी घोषित केला आणि त्यानंतर दीर्घकालीन उपचार घेताना अशा चाचणी संचांचा घरगुती वापर करायला हरकत नाही.

कॉफी पिण्याचा आणि थायरॉईडच्या आजाराचा
>>>>
या संदर्भात काही प्रयोग झालेले आहेत. परंतु दोन्हींचा कार्यकारणभाव सिद्ध होईल असा निष्कर्ष अजून निघालेला नाही.

Pages