तुझी आठवण

Submitted by निशिकांत on 1 February, 2018 - 23:50

तुझी आठवण

शब्द सुरांची करता गुंफण
मनी उमलते तुझी आठवण

मधुमासांची आता उधळण
ग्रिष्मऋतूची सरली वणवण

दरवळणारी चाहूल येता
रोमांचित मी होतो कणकण

शुभ्र चांदणे पांघरले तू
कवेत माझ्या जणू नभांगण

तुझ्यात इतका गुंतून गेलो
श्वास तुजकडे माझा तारण

समर्पणाचा भाव एवढा
गळून गेले माझे मीपण

आठवणींची साथ शिदोरी
आयुष्याची येता उतरण

हात तुझा हातातुन सुटता
जगावयाचे सरले कारण

पैलतिराची आस लागली
भौतिकतेची करू बोळवण

"निशिकांता"च्या मनात आहे
आठवणींची तुझ्या साठवण

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users