मानसशास्त्रातील रंजक प्रयोग - १

Submitted by प्रतिक कुलकर्णी. on 30 January, 2018 - 12:28

  • उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग

१९५० ते १९७२ या काळात अमेरिकन संशोधक जॉन कोलनने लोकसंख्या वाढीचे परिणाम जाणून घेण्यासाठी उंदरांवर काही प्रयोग केले. या प्रयोगा अंतर्गत त्याने उंदरांना राहण्यासाठी सुमारे ३००० उंदरांना पुरेल असा मोठा पिंजरा तयार केला. पिंजऱ्यात अन्न, पाणी इत्यादीचा मुबलक पुरवठा होता. राहण्यासाठी अतिशय उत्तम अशी परिस्थिती तयार करण्यात आली होती. त्यावरुन या प्रयोगाला ‘माऊस युटोपिया एक्सपेरीमेंट’ अर्थात ‘उंदरांच्या नंदनवनाचा प्रयोग’ असे नाव पडले. यात सर्व काही मुबलक असून बंधन फक्त एकच होते ते म्हणजे जागेचे. ती जागा उंदीर आत-बाहेर करू शकणार नाहीत अशा प्रकारे पूर्ण बंधिस्त करण्यात आली होती. या पूर्ण प्रयोगादरम्यान उंदरांची संख्या आणि त्यांचे सर्वसाधारण सामाजिक वर्तन यांची नोंद घेण्यात आली.

प्रयोगाच्या पहिल्या दिवशी यामध्ये सुदृढ अशा ८ उंदीर (४ नर , ४ मादी) सोडण्यात आले. पहिल्या टप्प्यात उंदरांनी आजूबाजूच्या वातावरणात जुळवून घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्यांनी आपापला मोहल्ला निश्चित करणे, राहण्यासाठी सोय करणे इत्यादी गोष्टी केल्या. हा टप्पा जवळजवळ १०० दिवस चालला.

दुसऱ्या टप्प्यात झपाट्याने उंदरांची संख्या वाढू लागली. या टप्प्यात दर ६ दिवसाला उंदरांची संख्या दुप्पट होत असे. या संपूर्ण पिंजऱ्यात काही विभाग केलेले होते. हे सर्व विभाग संसाधने, जागा इत्यादी बाबतीत अगदी एकसारखे होते. तरीसुद्धा काही भागांमध्ये उंदरांचे केंद्रीकरण झाले. अशा भागात संसाधनांचा जास्त वापर झालेला पाहायला मिळाला. या काळात बऱ्याच भागांमध्ये भरपूर गर्दी झाली. खाणे, पिणे इत्यादी क्रिया उंदरांना सार्वजनिक रित्या कराव्या लागू लागल्या. हा टप्पा साधारण अडीचशे दिवस चालला.

तिसऱ्या टप्प्यामध्ये उंदरांच्या संख्येचा समतोल साधला गेला. उंदरांची संख्या (३००० उंदरांना पुरेल इतकी जागा असून) २२०० ला स्थिरावली. परंतु टप्प्यामध्ये उंदरांचा सामाजिक ऱ्हास होत गेला. ‘अतिरिक्त’ नरांवर स्वीकारले जाण्यासाठी झगडा करण्याची वेळ आली. बहुतांश भागात हिंसाचार सुरु होऊन तो हळूहळू वाढू लागला. नरांमध्ये अतिउन्मत्त होऊन वेडेपिसे झाल्यासारखे वागणे, लैंगिक दृष्टीकोन बदलणे इत्यादींपासून ते इतर उंदरांना खाणे इथपर्येंत विकृती दिसू लागल्या. न स्वीकारले गेलेले नर एकलकोंडे होऊन इतर उंदीर झोपलेले असतानाच फक्त खाण्यासाठी बाहेर पडू लागले. त्यांनी स्वतःला समाजापासून पूर्णपणे तोडून घेतले.

माद्यांमध्ये पाहायला मिळालेल्या बदलांमध्ये मातृत्व धारण न करू शकणे. गर्भधारणेचा कालावधी पूर्ण न होणे. स्वतःच्याच पिल्लांना इजा करणे, काही पिल्लांना सुरक्षित ठिकाणी आणून उरलेल्या पिल्लांना विसरून जाणे, इत्यादी प्रकार दिसले.

अशा परिस्थितीमध्ये जन्मलेली नवीन पिढी अकार्यक्षम होत गेली. हे उंदीर फक्त खाणे, पिणे, झोपणे आणि बाह्य सौंदर्यावर अति प्रमाणात काम करणे यामध्ये पूर्ण वेळ खर्च करत असत. बाह्य सौंदर्याबाबद अति जागरूक असलेहे हे ‘सुंदर उंदीर’ प्रजनन मात्र करत नसत तसेच कुठलीही आक्रमकता त्यांच्यात पाहायला मिळाली नाही. हा टप्पा जवळजवळ तीनशे दिवस चालला.

यापुढच्या टप्प्यात उंदरांची संख्या कमी होऊ लागली. ३००० उंदरांची क्षमता असून सुद्धा सर्वात जास्त संख्या २२०० इतकीच झाली. जन्म झालेले उंदीर जगण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले. अकार्यक्षम अशा ‘सुंदर उंदरांचे’ प्रमाण वाढू लागले. शेवटचे १००० उंदीर हे जगण्यासाठी गरजेच्या गोष्टी, जसे स्वसंरक्षणासाठी आक्रमकता, प्रजनन इत्याही कधी शिकलेच नाहीत. सगळे उंदीर एकमेकांच्या इतके जवळ असून या टप्प्यामध्ये प्रत्येक उंदीर हा इतर उंदरांबद्दल उदासीन होत गेला आणि प्रयोगाच्या जवळजवळ १५०० दिवसानंतर त्या ठिकाणची संपूर्ण उंदरांची जमात नष्ट झाली !

या प्रयोगामध्ये उपलब्ध असलेली जागा उंदरांनी कधीही पूर्ण वापरली नाही. काही जागांमध्ये उंदरांचे केंद्रीकरण झालेले पाहायला मिळाले. काही उंदरांना समाजात कोणतेही स्थान मिळाले नाही, असे उंदीर एकलकोंडे होऊन समाजापासून तुटले. बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम नवीन पिढीवर झाला. प्रत्येक पिढीकडून पुढच्या पिढीकडे अधिक नकारात्मक वृत्ती सोपवली गेली. यातून कुठलेही काम न करणारे, प्रजनन न करणारे उंदीर तयार झाले. या पिढीने जगण्यासाठी आवश्यक अशा आक्रमकता आणि प्रजनन या मुलभूत गोष्टी कधीच आत्मसात केल्या नाहीत. यामुळे कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही अशी परिस्थिती असून उंदरांची जमात पूर्णपणे नष्ट झाली. यामध्ये एक निष्कर्ष असा काढला गेला कि वाढलेल्या संख्येमुळे उंदरांचा एकमेकांशी खूप जास्त संबंध येऊ लागला. त्यांचे खाणे पिणे इत्यादी सर्व क्रिया इतर उंदरांच्या उपस्थितीमध्ये होत असत. हि वाढलेली सामाजिक उंदरांना हाताळता आली नाही. यातून हिसांचार, एकलकोंडे उंदीर, कमी झालेली प्रजनन क्षमता आणि त्यातून निर्माण झालेली सामाजिकदृष्ट्या असक्षम अशी शेवटची पिढी असे परिणाम झाले.

या प्रयोगाच्या उपयुक्ततेबाबद काही मतमतांतरे आहेत. हा प्रयोग जसाच्या तसा मानवजातीस लागू होणार नसला तरीसुद्धा या प्रयोगादरम्यान केलेले निरीक्षणं दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. या प्रयोगादरम्यान पाहायला गेलेले संख्येचे केंद्रीकरण आणि न वापरली गेलेली काही जागा हे मानवी जगात देखील पाहायला मिळते. जर्मनीमध्ये शहरात असलेली अति लोकसंख्या आणि त्याच वेळी देशाच्या काही भागात ओसाड पडेलेले गावं (घोस्ट व्हिलेजेस) हे याचच एक उदाहरण म्हणता येईल.

भारतामध्येही मुंबईसारख्या शहरात झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या अशाच प्रकारच्या आहेत. जगाच्या काही भागात अकारण किंवा अतिशय लहान कारणांवरून होणारी हिंसा, सामाजिक सांस्कृतिक ऱ्हास यात त्या त्या झालेले लोकसंख्येचे केंद्रीकरण हे सर्वात मोठे कारण असू शकते. तसेच विकसित देशांमध्ये या प्रयोगात कमी होत गेलेल्या उंदरांच्या संख्येप्रमाणेच जपान, साऊथ कोरिया इत्यादी देशांमध्ये लोकसंख्या कमी होत आहे.

सर्व काही मुबलक प्रमाणात उपलब्ध असून फक्त आणि फक्त मर्यादित (कमी नाही) जागा संपूर्ण जमातीच्या अस्तासाठी कारणीभूत झाली. मनुष्यांच्या बाबतीत ‘इस्टर आईसलंड’ हे एक अशा प्रकारचं एक उदाहरण आहे. चिली देशाच्या पश्चिमेला सुमारे ३००० किमी दूर पॅसिफिक समुद्रात असलेले इस्टर आईसलंड हे बेट आहे. तेथे इ.स.९०० च्या सुमारास काही टोळ्या जाऊन पोहोचल्या. त्यावेळी हे बेट अतिशय निसर्गसंपन्न होते. संसाधनांच्या मुबलक उपलब्धतेमुळे तेथे आलेल्या टोळ्या तेथेच स्थिरावल्या. या टोळ्या म्हणजेच ‘रापा नुई’ नावाने ओळखली जाणारी जमात. (भलेमोठे तोंड असलेल्या प्रसिद्ध मानवी मुर्त्या यांनीच तयार केल्या.) पुढे त्यांची लोकसंख्या वाढत गेली. अतिवापरामुळे नैसर्गिक संसाधने कमी होत गेली. एक वेळ अशी परिस्थिती आली कि बेटावरून बाहेर पडण्यासाठी होड्या बनवण्यापुरते लाकडं सुद्धा बेटावर उरले नाहीत आणि इथले सगळे लोक बेटावर अडकून पडले. या बेटाच्या आजूबाजूला दोन, अडीच हजार किलोमीटर्स पर्येंत दुसरी मानवी वस्ती नाही. त्यानंतर अन्नासाठी एकमेकांमध्ये युद्ध, मानवाने मानवाला खाणे अशा परिस्थितीमुळे तिथली लोकसंख्या खूप कमी होत गेली. चौदाव्या शतकात १२,००० असलेली हि लोकसंख्या अठराव्या शतकात युरोपियन खलाशांना हे बेट सापडले त्यावेळी १११ पर्येंत खालावली.

या प्रयोगातून समोर आलेल्या गोष्टी मानव जातीला नक्कीच विचार करायला लावणाऱ्या आहेत. मानवजात अशाच प्रकारे नष्ट होईल असा निष्कर्ष यातून काढता येणार नसेल तरी लोकसंख्येच्या केंद्रीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमीअधिक प्रमाणात या प्रयोगात पाहिल्याप्रमाणेच असतील. भारतामधील लोकसंख्यावाढीचे काय आणि कसे परिणाम होतील याचा विचार करून वेळीच उपाययोजना केल्यास सामाजिक ऱ्हास थांबवता येईल.

-प्रतिक कुलकर्णी

--
ब्लॉग वर पूर्वप्रकाशित
https://pratiksk.wordpress.com/

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लेख Happy
छान आहे therory
पण मानवी मन आणि मानवी बुद्धि ह्याचा संबध जोडला तर अनेक अनाकलनिय निष्कर्ष प्रत्यक्षात दिसू लागण्याचीच शक्यता अधिक असावी असे वाटते.

इंटरेस्टिंग आहे लेख
मात्र भारतातले पुणे मुंबई आणि मोठ्या सिटि मधले केंद्रीकरण जास्त करुन राजकीय इच्छाशक्ती मुळे आहे.

धन्यवाद मित्रांनो.
@mi_anu कारणे असू शकतील काहीही. परिणाम काय होतील हा विचार करण्याची गरज वाटते.
@बेबो <<पण मानवी मन आणि मानवी बुद्धि ह्याचा संबध जोडला तर अनेक अनाकलनिय निष्कर्ष प्रत्यक्षात दिसू लागण्याचीच शक्यता अधिक असावी असे वाटते.>> अधिक लिहिल्यास चर्चा करायला मजा येईल

रच्याकने,
येथे प्रतिसादाला प्रतिसाद देण्याची सोय आहे काय?

चांगली माहिती.

उंदीर बाह्य सौंदर्याविषयी जाग्रुक राहायला लागले हे कसे कळले?

तसेच एकाच जागी जास्त वस्ती यामागची कारणे काय असावीत? समूहाने राहायची वृत्ती असेल तर बाह्य कारणाचा परिणाम तितकासा होणार नाही. माणूस महानगरात एकवटायचे कारण तशी वृत्ती नसून देशाची फक्त मोजक्या पॉकेटात झालेली प्रगती आहे.

इंटरेस्टींग प्रयोग!

रच्याकने,
येथे प्रतिसादाला प्रतिसाद देण्याची सोय आहे काय?>>>
नाही, तशी सोय माबोवर अद्याप नाही. कॉपी पेस्ट करुन कोट करावे लागते.

असे लेख अभ्यासाला असते तर परीक्षेसाठी अशीच उत्तरं लिहून मार्क मिळवले असते पऱतू उंदरांच्या प्रयोगात मानसशास्त्रातील प्रयोग म्हणणे व तसे अनुमान काढणे अजिबात पटण्यासारखे नाही. याचा शहरातील वस्ती आणि इतर मानसिकतेशी संबंध जोडणेही भारीच आहे. आंतर प्रजनन त्या बंदिस्त जागेतील उंदरांमध्ये झाले तसे शहरांत वाढत आहे का?

उंदीर बाह्य सौंदर्याविषयी जाग्रुक राहायला लागले हे कसे कळले? >> सुंदर उंदीर म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी न करता फक्त स्वतःची केस (फर जे काय म्हणतात ते) साफ ठेवणे इत्यादी गोष्टी करताना आढळले. नॉर्मल उंदीर हे इतक्या प्रमाणात करत नसत.

तसेच एकाच जागी जास्त वस्ती यामागची कारणे काय असावीत? >> याची २ ३ कारणे प्रयोगात आहेत, एक म्हणजे काही जागा हि 'अल्फा उंदीर' (अल्फा मेल सारखे) त्यांनी अडवून ठेवलेली असे, त्यात काही मादी उंदीर असत मात्र इतर उंदरांना तेथे प्रवेश नसे.
तसेच उंदरांना काही जागांवर ठेवलेले अन्न घेण्याची सवय लागली आणि लोकसंख्या वाढल्या नंतर सुद्धा नवीन जागा न शोधता बरेच उंदीर एकाच ठिकाणी येत राहिले. (सुरुवातीच्या ४ जोड्यांनी आपापल्या टेरीटरीज तयार केल्या होत्या. त्याच्या आजूबाजूलाच सगळी वाढ होत राहिली.)

उंदरांच्या प्रयोगात मानसशास्त्रातील प्रयोग म्हणणे व तसे अनुमान काढणे अजिबात पटण्यासारखे नाही. >>> वन टू वन संबंध साहजिकच जोडता येत नाहीत (तसे लेखात सुद्धा म्हणलेले आहे) तरीही हे प्रयोग टाकाऊ नसतात कारण उंदीर हा माणसासारखाच समाजात वावरणारा प्राणी आहे.
तसेच या प्रयोगातून झालेल्या गोष्टींशी साम्य असलेल्या गोष्टी जगात झालेल्या आहेत, ज्या लेखाच्या शेवटी वाचायला मिळतील.

उंदरांवर औषधांच्या चाचण्या घेऊन मग ते औषध मानवाला दिलेले मान्य असेल तर हेही का मान्य नसावे?

मला तर यातले उंदीर थेट मानवजातीसारखेच वागताना दिसले. फक्त एकच (अव) गुण कमी होता व तो म्हणजे या आळशी झालेल्या उंदरांमध्ये कोणी अवतारी उंदीर निर्माण झाला नाही. तेवढेच एक राहिलेले.

बाकी 3000 ची क्षमता असतानाही 2200 च्या भोज्याला शिवून उंदरांची पीछेहाट होत गेली, प्रयोग सुरू होऊन 1500 दिवस म्हणजे 4 वर्षात त्यांचा पूर्ण खात्मा उडाला हे वाचून हुश्श झाले. मानवी कॅन्सरच्या विळख्यातून एके दिवशी पृथ्वी मुक्त होईल अशी आशा बाळगायला वाव आहे म्हणायचं तर.

इंटरेस्टिंग!
या आळशी झालेल्या उंदरांमध्ये कोणी अवतारी उंदीर निर्माण झाला नाही. > Biggrin

On second thoughts, हा प्रयोग भारतात झाला असता तरी 1 डझन तरी अवतारी बाबा उंदीर नक्कीच जन्मले असते.

छान लेख.
काही प्रश्न: हे सगळे २२०० आणि त्या ४ वर्षांच्या दरम्यान मेलेले (उंदीर साधारण ३ वर्षे जगतात) उंदीर ४ + ४ गुणसुत्रांच्या जोड्यांवरून जन्मलेले ऑफस्प्रिंग होते. कायम पिंजर्यात बंदिस्त, हवामान, तापमान, अन्न सगळं हवंतसं. थोडक्यात म्युटेशन मध्ये रॅन्डमनेस येण्यासाठी बाहेरच्या घटकांचा कमीतकमी हिस्सा. फिमेल उंदीर साधारण ३ महिन्यापासून माजावर येते सो या चार वर्षांत ज्या काही पिढ्या जन्मलेल्या असतील त्यात लिमिटेड जीन्स पूलचा किती हिस्सा आहे यावर काही भाष्य आहे का मूळ प्रयोगाच्या अनुमानात?
साधना, उंदरांवर प्रयोग करून ते औषधे मानवाला चालणे आणि त्यांची सामाजिक वागणूक मानवाला रेसिप्रोकेट करणे या वेगळ्या गोष्टी असाव्या असं वाटतं. सजीव उत्क्रन्तीमध्ये शरीराचे भाग/ अवयव आधी उत्क्रांत झाले मानवाच्या मेंदूतील उत्क्रांतीची तुलना उंदरावरून कशी करता येईल हा भाग फार पटला नाही.

साधना, उंदरांवर प्रयोग करून ते औषधे मानवाला चालणे आणि त्यांची सामाजिक वागणूक मानवाला रेसिप्रोकेट करणे या वेगळ्या गोष्टी असाव्या असं वाटतं. सजीव उत्क्रन्तीमध्ये शरीराचे भाग/ अवयव आधी उत्क्रांत झाले मानवाच्या मेंदूतील उत्क्रांतीची तुलना उंदरावरून कशी करता येईल हा भाग फार पटला नाही>>>>>

हो, औषधांचे शरीरावर होणारे परिणाम मोजता येतात, मानसिकतेचे तसे नाही. अंतर तसेच बाह्य स्थितीनुसार माणसाची मानसिकता बदलते पण शारीरिक व्याधीवरचे औषध मात्र पूर्ण जगभर कुणालाही चालू शकते.

एसारडीना काहीच पटले नाही म्हणून मी तसे लिहिले Happy Happy

रोचक!

अमितव सारखाच प्रश्न मलादेखील पडला आहे.
• इंटरब्रीडिंगमुळे कितपत शारीरिक, मानसिक वाट लागली असेल यात?
• कमी लोकसंख्या असलेल्यानी स्वजाती/धर्मात लग्न करू नयेत याला बळकटी मिळेल का असल्या प्रयोगातून?

हा प्रयोग भारतात झाला असता तरी 1 डझन तरी अवतारी बाबा उंदीर नक्कीच जन्मले असते
Cult निर्माण झाले असावेत कारण एकाच ठिकाणी खूप उंदीर जमा झालेले आढळून आले होते असे दिसते

नवीन प्रतिसादकांचे धन्यवाद. सविस्तरपणे प्रतिसाद उद्या अथवा परवा जमेल तसे देईन.
धन्यवाद मित्रहो.