बोरांचे दिवस

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 January, 2018 - 23:29

डिसेंबर - जानेवारी महिन्यात आमच्या उरण येथील नागांवातील वाडीमध्ये बोरांचा घमघमाट सुटलेला असायचा. डिसेंबरच्या सुरुवातीलाच अधून मधून एक-दोन लालसर-कच्चट बोरे पडायची मग आम्ही समजायचो की आता थोडे दिवसांत पिकलेल्या बोरांचे सडे झाडाखाली पडणार. माझी आई ह्या बोरे मोहोत्सवासाठी सज्ज असायची. तिच्या टोपल्या वाटच पाहत असायच्या त्यांचं रितेपण भरून काढण्यासाठी. आई प्रार्थमिक शिक्षिका होती. पण शाळेतल्या जबाबदार्‍या पार पाडून ती घरच्या-वाडीतल्या कामांतही लक्ष घालायची. झाडा-फुलांत रमायची. चिंचा-बोरांच्या सीझनला तिची लगबग असायची. वाडीत पाच-सहा बोरांची झाडे होती. प्रत्येक बोराचे खास वैशिष्ट्य असायचं. एक पिठूळ तर एक एकदम गोड गराची, एक अगदीच आंबट तर एक आंबट गोड, एक बोर अशी होती जी पूर्ण लाल झाल्यावरच गोड व्हायची. एका बोरीच्या झाडावर बारीक आणि कडू बोरे लागायची तिला आम्ही चीनीबोर म्हणायचो. ती कडवट लागायची. प्रत्येकाचा आकारही थोड्याफार फरकाने वेगळा असायचा. गोल, लांबट, मोठी, छोटी असे प्रकार असायचे.

बोरांचा सडा पडायला लागला की आई सकाळी आम्हाला घेऊन बोरे गोळा करायची. मग संध्याकाळी बोरे हालविण्यासाठी माणूस यायचा. वर चढून तो गदा गदा बोराचे झाड हालवायचा मग बोरे टपाटप खाली पडायची. ह्या बोरांच्या पावसाचे टणक फटके खाताना गंमत यायची. संध्याकाळी गावातील भावाचे मित्र व माझ्या काही मैत्रिणी आमच्याकडे खेळायला यायच्या त्यांनाही आई ह्या बोरे गोळा करण्याच्या कार्यक्रमात सामील करून घ्यायची. प्रत्येकाच्या हातात एखादे वाडगे, छोटे टोप, पिशवी, टोपली असे गोळा करण्याचे साधन दिले जायचे. मध्यावर एक मोठी टोपली बोरांची वाट पाहत असायची. प्रत्येकाच्या हातातलं भांड भरलं की त्या टोपलीत ओतायचं आणि पुन्हा भरायला लागायचं. बसून-वाकून ही बोरे गोळा करताना तेव्हा गंमत यायची. बोरे गोळा करण्या बरोबर सगळ्यांचा बोरे खाण्याचा कार्यक्रमही एकीकडे चालू असायचा आणि सोबत गप्पा-गोष्टी मजाही. कधी कधी खाऊ-चहा पण असायचा. हे वेचताना काटे लागायचे म्हणून सगळ्यांना चप्पल सक्तीचे असायचे.
रोज सगळ्या झाडावरची बोरे गोळा करणे शक्य नसायचं म्हणून प्रत्येक झाड एक-दोन दिवस आड असा बेत रचलेला असायचा. बोरे गोळा झाली की आई बोरे गोळा करणार्‍या मुलांना पसा भरून बोरे द्यायची, कुणाला जास्त हवी असतील तर जास्तही द्यायची. इतर वेळी म्हणजे सकाळी-दुपारी हिच लहान मुले आमच्या बोरींच्या झाडाखालून हवी तेवढी पडलेली बोरे गोळा करून न्यायची त्यांना आमच्या घरातील कोणीच काही बोलत नसे. पण कोणी दगड मारून पाडायला लागले की मात्र आजीचा ओरडा असायचा त्यांना कारण दगड मारल्याने कच्ची बोरे पडायची.

संध्याकाळी आई वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांच्या टोपल्या ओटीवर आणून ठेवायची. दोन-तीन घाऊक दरात बोरे विकत घेणार्‍या बायका ठरलेल्या होत्या. त्या रोज येऊन रोजच त्याची किंमतींत घासाघीस करून घेऊन जायच्या. मोठी पाटी पन्नास रुपये, छोटी तिस रुपये त्यापेक्षा छोटी वीस रुपये असा इतक्या मेहनतीचा चिनीमिनी बोरांसारखाच तो भाव असायचा. कधी ह्या बायका येणार नसल्या तर वडील स्वतः सकाळी बाजारात घाऊक घेणाऱ्या बायकांना ही बोरे देऊन यायचे. बरे सगळीच बोरे विकायची नाहीत तर त्यातल्या बोरांच्या नातेवाइकांना, गावकर्‍यांना, आईच्या शाळेत, माझ्या मैत्रिणींना, वडिलांच्या कंपनीत पिशव्या भरून भेटी दिल्या जायच्या. इतक्या मेहनतीच्या फळांच्या आंबट-गोड भेटींतून आपुलकी अधिक रुचकर व्हायची.

गोळा केलेली बोरे आयती खाण्या पेक्षा प्रत्यक्ष बोराच्या झाडाखाली जाऊन गोळा करून खाल्लेल्या बोरांना जास्त चव लागते असे माझे मत म्हणून मी बरेचदा बोरीखाली जाऊन बोरे खायचे. मला विचित्र सवय होती चप्पल न घालून चालण्याची. मी शेतातल्या बोरींमध्ये तशीच जायचे. पायांना लागणारी ठेपळे आणि काट्यांमुळे त्या बोरी स्मरणात राहायच्या. पण लागले तर लागूदे त्यात काय एवढं असा तेव्हाचा स्वभाव त्यामुळे बोरांपुढे काटे-ढेपळांकडे दुर्लक्षच व्हायचं. मला लाल होऊन सुकत आलेली बोरे खायला खूप आवडायची आणि ती फक्त झाडाखालीच राहिली असल्यामुळे मिळायची. बोरे चुलीत भाजून खाण्याचे प्रकारही आम्ही चाळा म्हणून करायचो. जास्तच बोरे असली तर ती मीठ लावून उन्हात वाळवायची. ह्या वाळवलेल्या बोरांची चव अप्रतिम.

एवढंसं बोर असलं तरी संक्रांतीला ह्या बोराला भारी मान हो! कुणाकडे हळदी कुंकू असले की आमच्याकडून बोरे नेली जायची. आधी आईला सांगूनच ठेवलेलं असायची. सुगडीत, हळदी कुंकवाच्या वाणासोबत बोरं तोर्‍यात मिरवायची. बोर न्हाणांतही लहान बाळांच्या डोक्यावरून गडगडाट पडताना बोरे बालिश व्हायची व चिमुरड्यांच्या ओंजळीत दडून बसायची .

पूर्वी शाळेच्या आवारातही ही बोरे विकायला बायका जायच्या तेव्हा मुलांची झुंबड पडायची. मुलांचे खिसे बोरांनी भरलेले असायचे. मधल्यासुट्टीतला आवडता खाऊ असायचा बोरे म्हणजे. आंबट चिंबट बोरे खाताना मुलांचे चेहरेही बोरांसारखेच व्हायचे.

बोरे संपल्यावर आम्हा लहान मुलांचा एक वेगळाच उद्योग असायचा तो म्हणजे बोरांच्या बिया ज्यांना हाट्या म्हणतात त्यातील दाणे काढणे. एका बी मध्ये दोन-तीन-चार असे दाणे असायचे. दोन दगडं घेऊन त्यावर ह्या हाट्या फोडून खाण्यात दंग व्हायला व्हायचं. चार दाणे एका हाटीत मिळाले की श्रीमंत वाटायचं. ह्या दाण्यांची चिकी करतात असे ऐकलेले खूप वेळा वाटीत जमा करून चिकी करावी असा बेत केलेला पण मध्ये मध्ये खाल्ल्याने कधी वाटी भरलीच नाही.

बोरे संपली की बोरांचे डुखण म्हणजे थोडे वरून कटिंग केले जायचे. कापलेल्या फांद्या कुंपणाला लावल्या जायच्या त्यामुळे सुरक्षित कुंपण व्हायचे. बोरांच्या झाडांवर चढण्याचा खेळही चालायचा लहानपणी. खालच्या खोडाला काटे नसल्याने झाडावर चढून खेळता यायचे. बोरांच्या झाडावर कावळ्याचे घरटे बरेचदा दिसायचे. शत्रूपासून संरक्षणासाठी कावळे कुटुंब ह्या काटेरी झाडाची निवड करत असावे. कच्च्या बोरांना जरा मांस चढलं की पोपटांची झुंबड ते खायला यायची व मनसोक्त आस्वाद घेऊन जायची.
आता बोरींची झाडे जुनी झाल्यामुळे काही अशीच वाळून गेली तर काही वाटण्या व घरे झाल्यामुळे काटेरी बोरींची झाडे तोडलीही गेली. आईलाही आता झेपले नसतेच वयामुळे. पण आता बाजारात गावठी बोरे कमी व अहमदाबादी बोरे, अ‍ॅप्पल बोरांचा सुळसुळाट झाला आहे. पण ह्या गावठी बोरांची रुची बाजारी संकरीत बोरांना लागत नाही ज्यांचे बालपण ह्या गावठी बोरांमध्ये आपले आंबट-चिंबट-गोड अशा रुचीच्या अनुभवांत मागे राहीले आहे.

दिनांक २९/०१/२०१८ च्या महाराष्ट्र दिनमान या वर्तमान पत्रात प्रकाशित.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. बोरकुटाची आठवण झाली.

बोरं आणि चिंच....... शाळेत मधल्यासुट्टीत चिंच बोरं घेऊन तास सुरु झाल्यापासुन शाळा सुटेपर्यंत चघळत बसायचो आम्ही, चिंचांच्या बिया देखील कडकडुन खायचो, कधीकधी चिंचांच्या बिया भाजुन त्याची साल काढुन खायचो, मस्त आठवणी.

किती सुंदर लिहतेस तु जागुतै..फार आवडल.डोळ्यांसमोर बोरे गोळा करणारी लहान मुले आली.>>+१

मला शाळेत मधल्या सुटीत उकडलेली बोरं खायला खुप आवडायचं..
दात आंबुन आंबुन जायचे पण आहा स्वर्ग होता तो..

घरी पन माझ्याकडे सुकलेली बोर ठेवतो. बरणीत भरुन ठेवाय्ची वर्षभर आणि फोडणीच्या वरणात, भाजीत वगैरे आंबटपणा येण्याकरता टाकायची. मस्त चव येते. किंवा मग सुकलेली बोर खळ्खळ पाण्यात उकळुन चांगली शिजवून घ्यायची आणि त्यावर मिठं, किंचित तिखट टाकुन खायच (हिच ती शाळेबाहेरची उकडलेली बोरं). किंवा सुकुन पूर्ण वाळलेल्या बोरांच बोरकुट करायचं.. आहाहा..रम्य ते दिवस.

माझ्या मामाच्या गावी जाताना रस्त्याच्या दुतर्फा बोरीची झाडं आहे (विदर्भात बोराच झाड न म्हणता बोरी किंवा बोरीच झाड असा वाक्प्रयोग करतात). एकदा कसलातरी कार्यक्रम होता तो आटपून न जेवता निघालो. सप्पाट्टुन भूक लागली होती. काय करावं काय करावं म्हणत असताना रस्त्यालगत एक बोरांनी लगडलेलं झाड दिसल. लहानखुरच होतं म्हणा ३ ४ फुटी आणि बापरे असले टेस्टी बोरं होते त्या झाडाचे. काय खाल्ले भुक्कड सारखे आम्ही Biggrin .
मग वर्षभराने परत सिझनमधे चाल्लो होतो तेव्हा त्या झाडाला शोधल तेव्हा मात्र सारी बोरं तोडून नेली होती कुणीतरी.. इतरही बरेच झाडं होते म्हणा बोरांनी लगडलेली पण आई म्हणते कि ज्या झाडांना कमी बोरं असतात सहसा तिच गोडं असतात. सारेच तोडतात ना प्राणी, पक्षी, माणसं म्हणुन पण जे अगदी काठोकाठ लगडलेलं असतं ते सहसा आंबट असत म्हणे. चुकतही असेल कुठ कुठ पण अजुनपर्यंत हा तिचा अंदाज चुकलेला नाही. पुढे हताश होऊन आजुबाजुला बघीतल तर मग शेतालगत आणखी एक झाड दिसलं. ते पेवंदी बोरांच होत (लंबुळके मोठ्ठाले बोरं. तुम्ही याला काय म्हणता? वर जागूने लिहिलयं ते अ‍ॅप्पल बोरं का? ) मग त्याच झाडाला हलवून हलवून बोरं वेचायची खुमखुमी भागवली.

एक मात्र खर, विकत घेतलेल्या बोर, आवळा, पेरू पेक्षा झाडाखालुन चोरुन पळवलेल्या फळांना जास्त गोडी असते Wink .

लेख मस्तच गं जागू.. भरपूर आठवणी जागवल्या. Happy

पलक, अंकू, अंकू धन्यवाद.
टीना खुप छान आठवणी आणि वेगळी माहीती पण. धन्यवाद. ती अहमदाबादी बोरे असावीत तू म्हणतेस ती.

ह्यावर्षी नेमका बोरांच्या सिझनलाच आजारी पडलो, त्यामुळे बोरांची मजा नाही घेता आली.
शाळेत असताना खुप बोरे खाल्ली होती. अजुनही खातो. Happy
शाळा सुटली की गेटच्या समोरच बोरवाला असायचा. काही प्रामाणिक मुले पैसे देऊन बोरे विकत घ्यायची, तर काही मुठ भरुन बोरे उचलून पळून जायची. बिचारा बोरवाला आपली गाडी सांभाळणार की त्या मुलांच्या पाठी लागणार. Sad

मस्त लिहिलंय गं...

हल्ली सगळीकडे बेरीयोंको बेर पक गये... है।
मला पिकल्या बोरांचा वास आवडतो, खायला मात्र ती पिकू घातलेली अर्धकच्छी पिठूळ बोरे आवडतात.

मस्त लेख! शेबड्या बोराना गर कमी आणि अळीच जास्त त्यामुळे बघुन खावी लागायची, जळगावाची बोर टपोरी आणि गोड असतात , गरही भरपुर असतो.

वाह सुंदर वर्णन. फोटोही छान.

चिनीमिनी बोरं माझी आवडती, तिखटमीठ लावून खायची ती, अहाहा.

घरात अहमदाबादी जास्त आणली जातात, ती पिकून ब्राऊन झाली आणि सुरकुत्या पडल्या की खायला आवडतात पण लाडकी बोरं चीनीमिनीचं शाळेच्या दिवसात घेऊन जाणारी.

टीना मस्त प्रतिसाद.

मस्त लिहीलेस जागू. पण तुझे फोटोज मला कधी दिसतच नाहीत... Sad
लहान पणी मामाच्या शेतामधे खायला मिळायची. आंबट गोड आणि जास्त पिकली की एकदम गोड.
त्यानंतर पुण्याला. हॉस्टेलच्या पाठीमागे बोरांचे आणि चिकूचे झाडं होती. कधीतरी खायला मिळायची पण त्यासाठी तारीच कुंपण ओलांडुन जाव लागायच. मग उगीच चोरी केल्या सारख वाटायच. ती पण बोर खुप गोड होती.

मस्त चटकदार लेख!!
बोरे बघूनच तोंडाला पाणी सुटले. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. Happy

व्वा! जुने दिवस अगदी जसेच्या तसे उभे केलेत Happy बोराच्या झाडाशी फारसा संबंध कधी आला नाही. पण तो काळ एकंदर सगळीकडे सारखाच होता ह्याची तीव्र जाणीव झाली हे कथन वाचून. म्हणजे विशेषकरून या ओळी वाचून अगदी माझे बालपण आठवले. आम्हीही असच काहीसं करायचो...

प्रत्येकाच्या हातात एखादे वाडगे, छोटे टोप, पिशवी, टोपली असे गोळा करण्याचे साधन दिले जायचे. मध्यावर एक मोठी टोपली बोरांची वाट पाहत असायची. प्रत्येकाच्या हातातलं भांड भरलं की त्या टोपलीत ओतायचं आणि पुन्हा भरायला लागायचं.

बोरांच्या जागी भुईमुगाच्या शेंगा किंवा जांभूळ वगैरे टाकले कि झाल्या माझ्या आठवणी तयार. अगदी अशाच Happy

बाय द वे: "बोरांच्या बिया ज्यांना हाट्या म्हणतात त्यातील दाणे काढणे. एका बी मध्ये दोन-तीन-चार असे दाणे असायचे." हे माहित नव्हतं. इंटरेस्टिंग आहे. पुढच्या वेळी बोरं आणेन तेंव्हा ट्राय करून पाहतो...

वा मस्त लेख जागू. बोरे मला फार आवडतात.. पण चिनीमिनी नाही थोडी मोठी अन चांगलीच मोठी आवळ्याएवढी पण लांबट.. Happy

प्रत्येक वेळी यावर कमेंट लिहायचं राहून जात होतं. लेख आवडला, खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. Happy

आमच्या आईकडे घराच्या एका टोकाला मोठं बोरीचं झाड आहे. रोज सकाळी शाळेत जाताना मुलं तिथून बोरं काढून, पाडून घेऊन जायची. म्हणून मी आणि माझी बहीण सकाळी उठून आधी बोरीखाली जाऊन बोरं गोळा करुन शेतात आमचे एकेक खड्डे करुन ठेवले होते, तिथे ती मूठभर बोरं खड्ड्यात झाकून ठेवायचो आणि शाळेत जाताना हातात घेऊन जायचो. Happy घराच्या मागच्या बाजूला एक गॉड बोरांचं झाड होतं, ती बोरं गोड खूप, पण तिकडे जायला आम्हाला मनाई असायची कारण तिकडे मोठ्या कुणाचं लक्ष नसायचं. त्यात शिवाय वाकडं असलेले शेजारी. त्यामुळे मागची बोरं खूप कमी वेळा मिळायची. शेजाऱयांच्या झाडालाही बोरं असायची, ती तर अजून गोड वाटायची. कधीतरी संध्याकाळी मिळाली संधी तर पटकन घेऊन यायचो. Happy हि सगळी बारीक गोड-आंबट बोरं असूनही, कधी पावली हातात मिळाली तर शाळेतून चिनी-मिनी बारीक बोरं विकत घेऊन खायचे. Happy मला ती मोठी, गर असलेली बोरं कधीच आवडली नाहीत. घरापासून ३-४ किमी वर आमचं शेत आहे. तिकडे गेलं की त्या गावात बोरीचं बन होतं. एकदम खुजी, खूप सारी झाडं होती तिथे. तिथे गेलं की इतकी बोरं बघून खूप आनंद व्हायचा. पण हळूहळू जाणवू लागलं की त्या बोरांना तुरट चव जास्त आहे आणि मग त्यांची हौस कमी झाली. Happy आजही बारीक मीठ लावलेली बोरं पहिली की तोंडाला पाणी सुटतं. Happy

अतुल तुम्ही लिहीलत ट्राय करेन त्यावरूनच मला गंमत वाटली. खरच करा. लहान झाल्यासारख वाटेल.
झंपी फोटो क्रोम मधून दिसतील.
ममोताई, द्वादशांगुला, आदिती, अनघा धन्यवाद.

विद्या छान प्रतिसाद आहे. खड्यात बोरे लपविण्याची आयडीया आवडली.

सुंदर लेख.जागू,तुझे बालपण किती तर्‍हांनी समृद्ध होत गेलं ग!
त्या चण्या मण्या बोरांपेक्षा शेंबडी बोरे मस्त लागायची.हल्ली कुठे दिसेनाशीच झाली आहेत.