वेड

Submitted by द्वादशांगुला on 26 January, 2018 - 06:23

आज २६ जानेवारी- गणतंत्र दिवस. आजची सकाळ देशासाठी गौरवशाली होती. पण गावात मात्र ती रोजच्या तमाम सूर्योदयांप्रमाणेच होती. नेहमीप्रमाणे रघूकाका लवकर उठून राखाडीने दात घासत त्याच्या कपिला गायीला पेंढा टाकून तिला गोंजारत होता, तिच्याशी गप्पा मारत होता. गोदाक्का जात्यावर दळण दळत छान ओव्या गात होती. नानूआजोबा त्यांचा जुनापुराणा रेडिओ कानाशी धरून त्याची खरखर ऐकत होते. हनुमान मंदिराच्या पटांगणात येत्या जत्रेसाठी कुस्त्यांची तयारी जोरात सुरू होती. नळावर सुशीलामामी आणि शांताकाकींचं रोजचं भांडण सुरू होतं. कमूमावशी नेहमीप्रमाणे या दोघींच्या सतरा पिढ्यांचा उद्धार करत होती. सरपंचांचं पोरगं गावाला खिजवून दाखवण्यासाठी नवीन आणलेल्या बुलेटवर फडफड करत उगाच पेट्रोल जाळत होतं. राधाक्का भाज्यांची टोपली भरून , पाकीट कनवटीला बांधून तालुक्याच्या गावी जात होती. गावाचा रहाटगाडा नेहमीप्रमाणेच सुरू होता.

मात्र याला आज अपवाद होता गावची ग्रामपंचायत, शाळा , अन् शाळकरी मुले. आज शाळेत अन् ग्रामपंचायतीत लगबग सुरू होती. गावात आज वरून आलेल्या निधीतून शेतीची आधुनिक अवजारे वाटली जाणार होती. मात्र ही सगळी अवजारं श्रीमंत शेतकर्यांच्या अन् निम्मे पैसे सरपंचाच्या पोटात ढकलले जाणार होते, हे अलिखित सत्य होतं. मुलंही आज चक्क आयाबायांच्या लाखोल्या न ऐकता स्वतःहून उठली होती. आपलं कार्ट आज लवकर कसं उठलं हे जाणून घ्यायला दामूने पांढरा शर्ट खाकी हाफपॅटीत खोचणार्या कार्ट्याला हटकलं,
"ओ गंप्याशेट, आज सूर्य पश्चिमेला उगवला का काय? नाय म्हंजे येवढ्याला गाढवावानी ढाराढूर असता तुम्ही.."
बापाच्या अहो जाहो करण्यानं गंप्या हुरळून गेला. तो नाक ओढत खुशीत बोलला,
"नाय वं बापू, आज साळंत ते रंगीत कापड खांबावर लटकवनारेत की नाय , मग गावात परेड, मग चाकलेटं आन गोल गोल गरम तिखट चेंडू सारखं वाटतात आओ. म्हनून जातूय."
दामू आपलं कार्ट काही कामाचं नाही या अविर्भावात समजावणीच्या सुरात बोलला,
"आरं लेका, त्याला झेंडावंदन म्हनतात रं. आन डुकर्या, तू काय तितं खाऊसाठी जातो काय रं? मग साळंत पन तू खिचडीपायीच जात असशील? आनि तीबी बंद केली तं ?"
त्याचं कार्ट बरळलं," म्म क्काय ! मी कश्याला जातूय साळंत. तुमच्यावानी रामूशेटच्या दुकानात 'ए, एक खंबा आन् शेवफरसान आनना.......!' आसं बोलंन आनी तुमच्या टॅक्टरनं शेतात जाईन. शिरप्यासंगं पोप्पटी लावंन. तुमचा ट्रॅक्टर द्याल की तुमी मला...!" अन् दाम्याचा मार चुकवत ,त्याच्या पुढं पळत तो थेट शाळेत पोहोचला...

सातलाच प्रभातफेरी झाली होती गावात. आठ वाजले होते . गावात अन् ग्रामपंचायतीत ध्वजवंदन झालं. कवायती झाल्या. मुख्याध्यापकांचं भाषण झालं. मुलांना चार-चार चाॅकलेटं अन् कचोर्या वाटण्यात आल्या हळूहळू मुलं घरी पांगली. दुपारी सारी वानरसेना मैदानात जमली अन् खेळांना सुरूवात झाली. गोट्यांचे डाव रंगत आले होते. इतक्यात त्यांना एक अजब माणूस येताना दिसला. तो पाचएक फूटी असावा. तिशी-पस्तिशीच्या घरातला असावा. अंगावर मळके कपडे. रापलेली कातडी. त्याच्या खांद्यावरच्या पिशवीत प्लास्टिकचे झेंडे फडफडत होते. हातातल्या काठीला तिरंगी भिंगर्या भिरभिरत होत्या. हातातल्या बंद ट्रेमध्ये तिरंग्याची पितळी बक्कलं होती. अन् असा हा माणूस जवळच्या वस्तूंची विक्री न करत काहीतरी अगम्य बडबडत होता. मध्येच धावत होता.मध्येच थांबत होता.

एकंदर हे दृश्य पाहून मुलांमधला खोडकरपणा उफाळून आला. ती टवाळकी त्याच्याजवळ गेली. तसा तो माणूस जरा थांबला. झिंप्या त्याला टेर खेचायच्या आवेशात म्हणाला,
"राम्राम पावनं.तू इतं या गावात का आलाय. कशापायी पायपीट करतूसं रं... "
त्याने मात्र काही न कळल्यासारखा विक्षिप्तपणे कटाक्ष टाकला अन् तो परत धावत सुटला. धावत त्यानं आपलं बडबडणं परत चालू केलं. तो बरळत होता,-
" अरेरे, धावा रे धावा
घात झाला रे आपला,
वाचवा वाचवा वाचवा
आईला वाचवा रे
ती पहा कशी गुदमरतेय.."
.................................................................................

नानूआजोबानं रेडिओची घरघर बाजूला सारत त्याला मायेनं ,काळजीनं विचारलं,
" काय रं, काय बोलतूस.? ये. वाईच बस हितं. काय झालंया, कायबी कळंना तुझं. कोन तू? कुठचा?कोनच्या आईला वाचवायचं बोलतूस रं? "

तो माणूस उठला ,अन् उद्गारला,
"कोणाची काय, अहो आपली आई!
तिचंच रक्त दौडतं ना रे आपल्यात...?
आता तेच रक्त तिच्या जिवासाठी वापरायची वेळ आलीय.."

हाॅस्पिटलात वाॅर्डबाॅय म्हणून काम करणार्या वश्यानं गावासमोर आपलं या क्षेत्रातलं चिरमिरं ज्ञान पाजळत त्याला विचारलं,
"कायरं, तुजी आय काय हास्पीटलात हाय काय? कंच्या? ते काय ते........आयस्यूत हाय का,? "

तो माणूस विचार करत बोलला,
"क्काय, हं.. तसं समजा हवं तर,
होय, आयसीयूतच आहे ती,..."

किश्याला हे ऐकून वाईट वाटलं. उधळलेल्या बैलानं एकदा शिंगं मारल्यावर इतरांचं दयादान अन् भयदान केंद्र बनल्याचं आठवलं अन् तो म्हणाला,
"आर्रर्र........च् च् च्... कसं झालं रं हे? अप्घात मनायचा की काय , कोनी क्येलं हे,"

तो माणूस उद्गारला,
"होय , अपघातच म्हणायचा, क्रूर नियतीचा.
कोणी, अरे तिच्या पोटच्या पोरांनीच-माझ्या भावंडांनीच तिचा गळा घोटला रे..."

आपल्या लेकीला- कुमुदला नट्टापट्टा करण्याशिवाय आणि आपल्याशी भांडण्याशिवाय काही येत नाही असं ठाम मत असणार्या आणि एक ना एक दिवस आपली कार्टी आपल्याला विहिरीत ढकलणार असं भाकीत वर्तवणार्या सुमीकाकींनी एक रागीट कटाक्ष आपल्या मुलीकडे टाकला अन् त्या मुद्दाम बोलल्या,

"अरारारा.....! घोर कलियुग हो हे..! हल्लीची पोरं अशीच...! मी म्हंते, त्या माऊलीनं पोरांना पोसलंच आसंल ना.... तर यांनी का मारायचा परयत्न केला तिला. पोटच्या पोरांवर विस्वासच नाय राह्यला बगा......होक्का नाय कमे.. ..!!!!"

कमूनं नाक मुरडलं अन् त्य माणसानं मान डोलावली.

गोदाक्कानं त्याला आस्थेनं विचारलं,
" का रं पोरा,तुझी आय कुठली ? नाव काय तिचं,?"

तो माणूस उभा राहिला. दूर कुठेतरी बघत मोठ्यानं म्हणाला,
" माझ्या आईचं नाव..........भारतमाता!!!."

तो माणूस सोडून सारेच त्याच्या या वक्तव्याने चकीत झाले. राज्याकाका त्याला रागाने चवताळून बोलला,.
" काय रं , च्येश्टा करतोस व्हय रं आमची?आमालाबी कामं असतात लय.. तुज्यावानी यडं व्हायचं नाय आमाला. भारतमाता मने. ...! चला खुळा हाय तो .. लागा आपल्या कामाला बिगीबिगी......."

"काय ह्ये म्हंते मी.." , "येडं कुठलं." ,"कुठून आलंय बेनं देव जानो", "घालवा त्याला गावातनं." अशा प्रतिक्रियांचा पूर ओसरला तसा लोकांचाही. तो उठला.हताशपणे चालत राहिला उगाच. पण नजरेच्या कोपर्यातून त्याचं निरीक्षण करणारं कोणीतरी होतं तिथे, जे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.

●○●○●○●○●○●○●○●○●○●○●○●○●○●○●○●○

हल्ली तो रात्रीअपरात्री ओरडू लागायचा.
" अरेरे, धावा रे धावा
घात झाला रे आपला,
वाचवा वाचवा वाचवा
आईला वाचवा रे
ती पहा कशी गुदमरतेय.."

त्याच्या अशा वागण्याने गावकरी त्रस्त झाले होते. सरपंचांकडे लाख मिनतवार्या केल्या, तसं त्यानं या वेड्याला हालवण्याचं ठरवलं त्यासाठी औपचारिक सभाही भरवली. सरपंच बोलत होते.
" माज्या समस्त गावकर्यांनो,
हा एक येडा मानूस आपल्या गावाची शांतता संप्वत हाये. ग्रामसभा मंडळाने हा हैतिआसिक निरणय घेतला हाये. गावाच्या भल्यासाठी आपण याला यस्टीत बसवनार आन् पाऽर लांबच्या गावात सोडनार. शेवटी गावाचं भलं त्येत आपलं भलं.का नाय...?.."

स्टेजच्या खालून गण्या कोकलला," टाळ्या!!!"
अन् टाळ्यांची बरसात सुरू झाली.

" एक मिनिट......!"
जमावातून एक आवाज आला. तो माजी कर्नल पिसारेंचा होता.त्यांना गावात मान होता. ते साठीला झुकलेले, परंतु कणखर बाण्याचे , अंगावर खाल्लेल्या गोळ्यांचे व्रण मिरवणारे शिस्तप्रिय इसम होते. ते हळूहळू समोर आले. त्यानी दोन शब्द बोलण्याची सरपंच आणि ग्रामस्थांकडे परवानगी मागितली. ते बोलू लागले,
"मित्रहो, आज मला तुम्हाला या वेड्या इसमाबद्दल सांगायचेय. तो वेडा नाहीय हो..... त्याला परिस्थितीनं मजबूर केलंय. सद्य परिस्थितीनंच त्याला वेड लावलंय. मनाचा शुद्ध, सालस माणूस आहे तो. तयाला देशाचा खरा कळवळा आहे. तो खरा देशभक्त आहे. तो देशाला आई मानतो अन् सार्या भारतवासियांना भावंड. हल्ली आपणच लोक भ्रष्टाचार करतो. छोट्याशा कारणांसाठी खून करतो. लालसेपोटी दरोडे घालतो, लूटमार्या करतो. दंगली घडवतो. देवही वाटून घेतलेत आपण. काळा पैसा जमवतो.पण त्याला हे नकोय. सारे गुण्यागोविंदाने राहिलेले आवडेल.....त्याला, आपल्याला,अन् भारतमातेलाही.कृपया आतापासूनच आपण हा प्रण घेऊया अन् -"

कर्नलसाहेब एकवार थांबले.त्यांनी सर्यांवरून नजर फिरवली.सारेच चिताग्रस्त , गंभीर, मताशी सहमत वाटले . सरपंचाची मान शरमेनं झुकली होती.त्याना थांबलेलं पाहून वश्या बोलला, "आन काय सायेब?"

कर्नलसाहेब परत बोलू लागले,
" मला वाटते त्याला मनोविकार तज्ज्ञाची गरज आहे. तो मनोरूग्ण आहे. त्याला आपण जिल्हा रूग्णालयातल्या मनोविकार तज्ज्ञाकडे नेऊया..त्याचा सगळा खर्च मी करेन."

यावर प्रत्येकानं मान डोलावली. सभा संपतेवेळी सरपंच आत गेला. त्याला काहीतरी गावाला द्यायचे होते. अन् परत येऊन बरेच काही बोलायचे होते. वश्याने कधीही लाचार पेशंट्सच्या नातेवाईकांकडून छोट्या कामांसाठी चिरमिरी न घेण्याचे ठरवले होते. सुशीलामामी आणि शांताकाकीनी कधीही न भांडण्याचे ठरवले होते. राधाक्काने कुठल्याच गिर्हाईकाला न फसवण्याचा प्रण घेतला होता. इकडे गेटजवळ बसलेला तो गालातल्या गालात हसत होता.

▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

२६ जानेवारी निमित्त देशातलं देशभक्तीचं खरं वास्तव दाखवण्यासाठी ही कथा लिहिण्याचा घाट घातला. काही चुकले असल्यास क्षमस्व.