तू कोण ह्या फंदात मी हल्ली पडत नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 January, 2018 - 04:06

मी कोण माझी हे मलाही धड कळत नाही
तू कोण ह्या फंदात मी हल्ली पडत नाही

ती जाणते की फसवली जातेय...पण तरिही
देते सही, आई मुलांवर रागवत नाही

जाते तिथे आधीच माझ्या पोचली असते
अफवे तुला उत्कर्ष माझा पाहवत नाही

जातीयवादाचे कुरुप... पोटीस समतेचे !
तलवार उपसुन मोडला काटा निघत नाही

नुसती हवा नाहीस, त्यातिल प्राणवायू तू !
त्याच्या ठरवण्याने तुझी किंमत ठरत नाही

आहे पचवले मी तुझे दुर्लक्ष इतके की;
जातोस तर जा जीवना...चल आडवत नाही

केव्हाच आहे त्यागले आकाश माझे मी आणिक भुईला भार माझा पेलवत नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गझल!
सही, अफवा आणि जीवना चे शेर विशेष आवडले Happy