खुळवाक झाला जी..

Submitted by onlynit26 on 22 January, 2018 - 02:05

खुळवाक झाला जी..

गजाल सांगाची म्हणजे, काय झाला...
सकाळी मालग्या ऊठला आणि चुलीत आग साकटूक म्हनान चुलीकडे गेला. बघता तर चुलीतली सगळी रका भायर इली होती, फळयेवरच्या लोणच्याची बरणी पण जमनीवर उताणी झालेली. चुलीच्या पाटनावर याक गलास उपडी घातलेला दिसला. मालग्यान गलास सरळ केल्यान तेवा, दारयेचो भासकन वास नाकात घुसलो. मालग्या समजान गेला. ह्यो सगळो आपल्या घोवाचो प्रताप हा.
" काय ओ, म्हशींका सोडतास ना? चुलीकडना मालग्या ओराडला.
मालग्यान बोललेला सुमळ्याच्या कानावर कायतरी आपाटला पण डोळे काय उघडत नाय हूते.
मालग्यान दोन तीन येळा हाक मारल्यान पण सुमळो काय दाद देयना. मग मालग्यान पिंट्याक उठवल्यान आणि कानत कायतरी बोलल्ला. त्याबरोबर पिंटो साटदीशी उठलो. न्हानयेकडे जावन डोळ्यार पाणी मारल्यान आणि चुलीकडे धावलो. चुलीकडच्या भीतीवर पिशयेत ठेवलेल्या लवंग्या फताकडेची एक माळ घीतल्यान आणि अगरबत्ती घेवक देवाच्या होवरेकडे गेलो पण तेची आजी होवरेच्या दारावर झोपली असल्यामुळा तेचे वांदे झाले. पण मालग्यान तेचा काम केल्यान. म्हातारेक एका ढेंगात वंडाळून झीलाक अगरबत्ती हाडून दिल्यान. मग काय, पिंटो सरळ बापूस झोपलो त्या खोलयेत गेलो आणि लवंगेची माळ उशाक पेटवून दिल्यान. फटाक्याच्या आवाजान सुमळ्याचा न्हेसान सुटाचा बाकी ऱ्यवला. स्वताचो झील आसान पण सुमळो पिंट्याक टरकान हूतो. कारण मालग्याची पिंट्याक फुस हूती.
" फुटी देत काय गो " टावेलान त्वांड फुशीत सुमळो बोललो.
"चुलीकडे ह्यो बोवाळ करून , चाय मागुक लाज वाटत नाय" चुलीकडचा लोणचा भरताना मालग्या तरपासला.
सुमळो गप ऱ्यवलो. राती दारयेच्या नशेतच ह्यो बोवाळ करून ठेवल्यान हूतो. अधिक काय बोलल्लो तर दुपारचा जेवान दुकू गावला नसता. भाताच्या ख़ोलयेत जावन, कनगेत लपवून ठेवलेली एक पैट कंबरेक लावक इसारलो नाय.
पाच म्हशी, दोन रेडे आणि दोन बैल घेवन पांदीक लागलो. चाय पिवूक मिळाक नसल्यामुळा त्याचा त्वांड बुळबुळीत झाला हूता. सारखी तेका थुकरी भरली हूती. शेवटी ढोरांका जरा पुढे जावक देवन अर्धी पैट पोटात रिकामी केल्यान आणि चकना म्हणान प्लास्टीकच्या डबयेतना एक दोन जाड्याचे मिठाचे खडे काढून तोंडात टाकल्यान. थोड्या येळात तरंगाक लागलो. कशीबशी ढोरा कुडणात घातल्यान आणि बेळ्याकडेच आडवो होवच्या उरलेली पैट पण पोटात ढकलल्यान .
*************************
खुप दिवसानी अस्सल भारीतलो माल मिळालो हूतो त्यामुळे सुमळो कालपासून लयच पेवा हूतो. पण मालग्याक याक कळत नाय हूता, हेका दारू पिवक पैशे दिल्यान कोणी? तेच्या दारू पिवच्या सवयीमुळा खय मजुरेक गेलो तरी त्याची मजुरी लॉका त्याच्या बायलेकडे स्वाधीन करायचे. त्यामुळा तेच्या हाताक पैसो कधी लागतच नसायचो. पण चुलीकडचो केलेलो बोवाळ बघून सुमळ्याक कायतरी भारीतला घबाड गावला असतला असो मालग्याक संशय हूतोच. सुमळ्यान ढोरा सोडल्यापासना सगळा घर सोदून झाला हूता. पण मालग्याक माल काय हाताक गावाक नाय हूतो.
***************************
"आबानू.. आबानू, तुमच्या कुळदात सुमळ्याच्या रेडकानी सगळी वाट लावल्यानी " हेमलो ओरडत ओरडत आबांच्या पाटल्यादाराक घुसलो.
आबा पांदीत पतेरो झाडीत हूते. हेमल्याची आरड आयकान भलो मोठो दांडो घेवन नमशीकडे ( शेतीचे एक ठीकाण) धावत सुटले.
थय जावन बघतत तर सुमळ्याच्या पाच म्हशीनी सगळ्या कुळदाची वाट लावल्यानी. चार पाच जणानी मिळान सगळ्यांका भायर काढल्यानी, व्हाळाकडे खाग्या (छोटीशी वाट) करून सगळी जणा कुळदात घुसली हूती. आबानी अस्सल गाळी घालूक सुरवात केल्यानी. इतक्यात आकाडो वलांडून मालग्या येताना दिसला. ता दिसल्याबरोबर आबांचो पारो आजूनच चढलो. मालग्यान तेंका बाबा पुरता करून थारवल्यान पण सुकाळ्याचो उद्धार चालूच हूतो.
" आबानू, सुकाळो त्याच्या कुडणात पिवन लास होवन पडलो हा" कोणीतरी सुकाळ्याचो शोध लावल्यानच.
" बघतास काय पोरांनू , तेचो हीडओ करून माझ्याकडे घेवन येवा" आबानी फर्मान सोडल्यानी.
त्याबरोबर सुमळ्याची गुटली करून प्वार घेवन इले. सुमळो काय आजून शुद्धीत येवक नाय हूतो.
"तेका फुटी चाय देवा रे" गर्दीतना कोणतरी बोलला.
"मेल्या तेचे डोळे उघडत नायत आणि चाय पाजूचा काय बोलतस" पयल्या आवाटातलो पकलो बोललो.
"आबानू तेका पेरवणीचो पालो हूंगाक देवक व्हयो लगेच उतारतली" वामनो बोललो. तेवढ्यात कोणीतरी पालो हाडल्यान.
" वामन्या ये हकडे, हूंगव ह्यो पालो" वामनो काय तयार होयना.
"बघलास सांगाक सगळा सोप्या हा पण करूचा इला काय कोण सामने येवचो नाय" पकलो परत करवादलो.
शेवटी आबानी तेका, पडतरीवर बसवून डोक्यार नळ चालू केल्यानी. थोडा वेळ पाणी टकलेर पडल्याबरोबर सुमळ्यान थोडा थोडा आंग सोडल्यान. मालग्या आबांच्या ओसरेक ऱ्यवान घोवाचे होणारे हाल बघीत हूता. तेका मनातना वायट वाटत होता. ता पण आता मनात कायतरी ठरवीत हूता.

सुमळो थोडो आजून शुद्धीत इल्यावर तेका खळ्यात घेवन इले . पकल्यान तेचा आंग पुसान काढल्यान. पकलो सुमळ्याचा दोस्त हूतो. म्हनान तेका कमीत कमी त्रास होयत असा बघीत हूतो. सुमळो कुडकुडाक लागलो तशी तेका गरम गरम फुटी चाय पिवक दिल्यानी. मधीच कोणीतरी तेका काकेतलो वास घी पटकण उतारतली असो पण सल्लो दिल्यान. लोकांची बरीच करमणूक होय हूती.
"सुमळ्या , तुझे लाड बस झाले आता, खरा सांग तुका पाजल्यान कोणी? एवढो झिंगलस तो, काय पिलस तरी काय?" सुमळो हू काय चू करीना.
" सुमळ्या, मी काय बोलतय. उत्तर दी, तेच्याकडणाच सगळा नुकसान भरून घेतलय, तु फक्त नाव सांग"
" कसला नुकसान? " सुमळो थोडो अडखळत बोललो.
" मेल्या, करून सवरून कसला नुकसाण इचारतस ? तुझ्या ढोरांनी माझ्या कुळदाचो सत्यानास केल्यानी हा, तुका तरी कसा कळतळा म्हणा, तुका पाजणारो माको मिळाक व्हयो, तेकाच चांगलोच बघतयबघ " आबा संतापले हूते
इतक्यात भायरसून आबांचो झील आणि त्याच्यावांगडा मुंबयसून इलेले तेचे दोन दोस्त इले.
सुमळ्याक सगळा आठावला. सुमळ्यान आबांच्या झीलाकडे बॉट दाखवल्यान.
"आबानू हेना माका एक खंबो दिल्यान" सुकाळ्याचा बलना आयकान आबा चकीत झाले.
" झीला , सुमळ्याक तु दारू पाजलस , ही गजाल
खरी हा काय? आबानी झीलाक इचारल्यानी.
" होय आबा, काल आम्ही संध्याकाळी मुंबईवरून गावी येताना जंगलाच्या रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलो असताना कोणीतरी आमच्या गाडीतली चार दारुच्या बॉटल असलेले एक पिशवी पळवली, तितक्यात हे गृहस्थ तिथे आले, त्यांनी आम्हाला पिशवी पळवणारे एका वाटेने गेले असे सांगीतले. तिथून आम्ही त्यांचा पाठलाग करू लागलो तशी त्यानी ती पिशवी ते वाटेतच टाकून पळाले, परत आम्ही गाडीजवळ आलो तेव्हा यांना एक बॉटल बक्षीस म्हनून दिली." ह्या सगळा आपल्या झीलाच्या तोंडतना आयकान आबानी कपाळावर हात मारल्यानी. ते बोलान मोकळे झाले हूते पण करतले काय? आपलेच दात आणि आपलेच व्हाट.
" बघलास आबानू , माझ्या घोवाची काय्येक चुक नाया " बरोच येळ गप ऱ्यवलेला मालग्या बोलला.
आणि आपल्या घोवाक घराक घेवन जावक लागला.

सुमळ्याक दोनी कडना क्लीनचिट मिळाली. मालग्याक पण तेची दया इली हूती आणि आता तेका आता घरात चांगली वागणूक मिळणार हूती. मालग्यान आपल्या घोवाक घरातच दारू पिवची परवानगी देवची ठरवल्यान हूता.
आणि सुमळो मात्र मनात गाजरा खाय हूतो. बक्षीस दिलेलो एक खंबो सोपलो असलो तरी आजून दडवलेले तीन खंबे कनगीत सुखरूप हूते जे तेना आबांचो झील आणि तेचे दोस्त जंगलात चोरांचो पाठलाग करीत आसताना लपवल्यान हूते.
सुमळो आता घरातच पिवक बसता. आपल्या लिमिटमधी पिवन मालग्यान चाकण्याक दिलेलो बागडो पण एंजॉय करता.

शब्दांकन - नितीन राणे
(सातरल - कणकवली)
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक नंबर लिवलास.
मालवणी भाषा आवडली.>>> आमची मालवणी. भाषा आवडण्यासारखीच आसा