लोकल देवदूत..

Submitted by onlynit26 on 21 January, 2018 - 05:58

©

भाग पहीला.

" अग माझे मोजे कुठे ठेवलेस? सागर बुट घालता घालता बोलला.
" रोजच्या ठिकाणीच तर आहेत " सान्वी किचनमधुन बोलली. टिव्ही चालू असल्यामुळे त्याला काहीच ऐकू गेले नाही. तो परत ओरडला. तव्यावर चपाती असल्यामुळे ती पण परत आतुनच बोलली. आता मात्र तो चिडला. बुट भिरकावत किचन मध्ये शिरला. सान्वीच्या हाताला धरून तिच्यावर हात उगारला.
" काय गं तुझे कान फुटले का? मघासपासून हाका देतोय आणि तु काहीच प्रतिसाद देत नाहीयेस."
सान्वीने बाहेर येऊन मोठ्या आवाजातला टिव्ही बंद केला. कधी नव्हे ते तिच्या डोळ्यात पाणी आले.
सकाळचे आठ वाजले असावेत. त्याची नेहमीचीच घाई असायची. बरं ह्याला काय हवं नको ते सान्वीच बघायची. अगदी कपड्याच्या इस्त्रीपासून मोज्या पर्यंत. सान्वीला पण त्याच वेळेला निघायचं असायचं. पण हा पठठ्या कधी साधी मदत देखील करत नव्हता. धिम्मासारखा मोबाईलमध्ये डोके खुपसून असायचा. एक नंबरचा आळशी होता. यालट सान्वी चपळ, तरतरीत कायम हसतमुख होती. सान्वी ऑफीसमध्ये त्याच्याएवढेच काम करून परत घरचे सर्व काम हातावेगळे करायची. लग्न झाल्यानंतर सान्वी नवीन घरात लगेचच रूळली होती. दोघांशिवाय घरात तिसरे कोणी नव्हते. अगदी राजा राणीचा संसार होता. भांडणे व्हायची पण एकतर्फी. सागरने बडबडायला सुरूवात केली की सान्वी अजिबात बोलत नसे. पण आज मात्र सान्वी दुखावली होते. आपल्या चांगुलपणा पाहून तरी सागर सुधारेल असं वाटायचं. शुल्लक कारणावरून भांडायची त्याची ही पहीलीच वेळ नव्हती. पण आज तर बोलता बोलता हात उगारला होता. ती चपाती तशीच तव्यावर टाकून बेडरूम मध्ये जाऊन मुसमुसू लागली. सागर बडबड करून ऑफीसला निघून गेला. सान्वीला पण रडत बसून चालणार नव्हते नाहीतर ऑफीसमध्ये बॉसचेही बोलने खावे लागले असते.
आज दोघांनाही उशीर झाला होता. रोजची लोकल मिस झाली होती. सागर तिच्याशी बोलत नसला तरच पुढे निघुन जायचा. नाहीतर दोघे सोबतच निघायचे. त्यात आणि दोघांचे भांडण झाले की सागर आपला मोबाईल बंद करून टाकायचा. सान्वी आपली चुक असो वा नसो त्याला कॉल करून माफी मागायची. आज पण तेच झालं. सान्वीचा कॉल येईल म्हणुन सागरने मोबाईल बंद केला. सान्वीला तर आज त्याला कॉल करावासा वाटला नाही.
सागर सकाळच्या ८.११ च्या ट्रेनने पुढे निघून गेला. सान्वीला ८.४५ ची लोकल मिळाली. रोजची ट्रेन चुकल्यामुळे सान्वीला खुप त्रास होत होता. बसायला जागा तर मिळाली नव्हतीच पण नीट उभं पण राहता येत नव्हते. सागरचाच विचार मनात येत होता. लग्नाला जवळ जवळ वर्ष होत आलं होतं , सागरची मनमानी वाढतचं चालली होती. त्याला लगेच राग यायचा आणि तोही शुल्लक गोष्टीवरून. सान्वीने नोकरी सोडून घरी राहावं असं सागरला वाटायचं आणि सान्वीला तसं करायचं नव्हतं. सान्वीने थोडावेळ सागरच्या फोनची वाट पाहीली आणि तीने पण कधी नव्हे तो फोन बंद केला.
भाग पहीला समाप्त..
----------–----------------------------------------
शब्दांकन - नितीन राणे ( सातरल - कणकवली )
----------------------------------------------------
भाग दुसरा..
सखाराम रात्री उशीरा आल्यामुळे सकाळच्या साऱ्याच कामांना उशीर झाला होता. पार्वती बाई नवऱ्याचा डबा करून धुनी भांड्याच्या कामाला निघून गेली होती. ती २ वर्षाच्या मुलाला आपल्या बहीनीच्या स्वाधीन करून बिनधास्त कामं करायची. आजही नवऱ्याला न उठवता आपली घरातली कामं उरकून मुलाला घेवून कामाला गेली होती. सखाराम एमआयडीसी मध्ये हातगाडी चालवायचा. ती दोघं संसाराचा गाडा कसाबसा रेटत होती. पण कुठे तक्रार नसायची.
सखारामही तासाभरात आपली तयारी करून कामाला निघाला होता. पार्वतीने त्याच्या आवडीची भाजी डब्यात दिल्यामुळे स्वारी जाम खुश होती. तसंही दोघं एकमेंकाची आवड जपायचे. दोघंही अनाडी असले तरी एकमेकांची मनं वाचायला मात्र शिकले होते. त्यातुनच झोपडपट्टीतला त्यांचा संसार सुखात चालला होता. आज पार्वतीला साडी घेऊन जायची असं मनोमन ठरवत त्याने ८.१९ ची ट्रेन पकडली. रोजच्या प्रमानेच गर्दीतुन वाट काढत तो आतल्या जागेत आला.

सागरने लोकलमध्ये कशी बशी सीट मिळवली. पण त्याचा रागाचा पारा अजुन चढलेलाच होता. पुढचं स्टेशन आलं तशी गर्दी वाढली. तो तिसऱ्या सीटला बसला होता. सखाराम त्याला चौथ्या सीटसाठी जागा दयायला सांगत होता पण सागर काही सरकत नव्हता. उलट पाय पसरून बसला होता. नंतर सखारामने पण नाद सोडून दिला. आदल्या दिवशीच्या रात्री ट्रेनमध्ये चढताना त्याच्या गुडघ्याला मुका मार लागला होता. पार्वती काळजी करेल आणि कामाला पाठवणार नाही म्हणून घरी आल्यावर तिला काही बोलला नव्हता. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता ठणकत होता. म्हणूनच सखाराम बसायला जागा मिळते का बघत होता. त्यातच त्याची झोपही अपूर्ण होती. अशातच त्याचा तोल सागरच्या अंगावर गेला. त्याबरोबर सागर चिडला. नीट उभा राहा असे बोलला. सखाराम माफी मागून नीट उभा राहीला. थोड्यावेळात दोन तीन स्टेशन गेल्यानंतर एक गर्दीचे स्टेशन आले. त्यातच खुपच रेटारेटी झाली आणि सखाराम परत एकदा सागरला आपटला. त्याबरोबर सागरने मागचा पुढचा विचार न करता सखारामच्या कानाखाली मारले. सगळेजण त्याच्याकडे पाहू लागले. आपली चुक समजून सखारामने मुकाट्याने ते सहन केलं. गाल चोळत राहीला. आजुबाजुची लोकंही त्यालाच बोलत राहीली. सागरने सखारामची बाजु , त्याची समस्या न विचारात घेता घरचा राग त्याच्यावर काढला होता. सगळ्यांनाच प्रवास करायचा असतो एकमेकांना सांभाळत प्रवास केला काय बिघडणार होते. काही लोकं हीच तर गल्लत करतात. घरचा राग प्रवासात, प्रवासाचा ताण ऑफीसमध्ये आणि ऑफीसमधली कटकट घरी घेउन जातात आणि आपली मनशांती बिघडवतात.
सखाराम गर्दीतुन वाट काढत कसाबसा स्टेशनला उतरला. नाही म्हटले तो मनातून खुप दुखावला होता. असा कोणाकडून मार खायची त्याची ही पहीलीच वेळ होती. जिथे उतरला तिथले काम आटपून त्याला परत ट्रेन पकडायची होती. अर्ध्या तासात काम आटपून त्याने मागुन येणारी ट्रेन पकडली. सकाळची वेळ असल्यामुळे ट्रेन एकदम फुल होती. तो कसाबसा लटकत चढला. त्याला एक स्टेशन सोडून नंतरच्या टेशनला उतरायचे असल्यामुळे तो आत काही गेला नाही.
थोड्यावेळाने सखाराम त्याच्या स्टेशनला उतरला तेव्हा त्याचा गुडघा खुपच ठणकत होता. गाडी सुरू झाली आणि मागच्या लेडीज डब्यातील एक बाई उतरताना गाडी सुरू झाल्यामुळे जोरात प्लँटफॉर्मवर पडली. काही लोक उचलायला धावले. तिला डोक्याच्या साईडने बराच मार लागला होता. कित्येकानी आपले मोबाईल बाहेर काढुन व्हिडीओ शुटींग करायला सुरूवात केली. पण तिला कोणी उचलून डॉक्टरकडे नेण्यासाठी पुढे आला नाही. जो तो रेल्वे पोलीस आल्याशिवाय आपण कसा हात लावायचा? आपण त्या फंदात का पडा? परत पोलीसांचा ससेमेरा कोण झेलेल? असे आपापसात बोलू लागले. सखारामला हे पाहवेना. त्याने पुढे येऊन अजून कोणालातरी पकडायला सांगीतले पण कोणी पुढे येईना. शेवटी एक शाळकरी मुलगी पुढे आली त्या बाईला दोघांनी उचलायचा प्रयत्न केला पण त्या मुलीची बाजु कमकुवत झाली. मग सखारामने आपल्या जवळची बँग तीच्याकडे देत त्या बाईला दोन हातावर घेत स्टेशनच्या बाहेर आला. रिक्षा वाले नेहमी प्रमाणे हात वर करू लागले. कोणतेही वाहन थांबेना. रक्तस्त्राव चालूच होता. वेळ दवडून चालणार नव्हते. तो परत दोन हातावर त्या बाईला उचलून दवाखाण्याच्या दिशेने चालू लागला. लोकानी मात्र बघ्याची भुमिका घेतली होती. शेवटी म्हणतात ना ' प्रयत्नार्थी परमेश्वर' , सखाराम थोडा पुढे गेला असेल आणि एका गाडीवाल्या माणसाला दया आली त्याने त्याच्या गाडीने त्यांना हॉस्पीटल मध्ये सोडले.
तिच्यावर लगेचच उपचार सुरू झाले. सखाराम आणि ती शाळकरी मुलगी तिथेच थांबले होते. पण तिच्या घरच्यांना संपर्क कसा करणार हा मोठा प्रश्न होता. सखारामने डॉक्टरांना विनंती करून त्यांच्याच मेडीकल मधून लागतील ती औषधे द्यायला सांगीतले होते. घरच्यांना कसेही करून कळवायला पाहीजे होते. पण कसे? ते त्याला कळत नव्हते. शेवटी सर्वानूमते त्या बाईची पर्स तपासायचे ठरले. नर्सच्या मदतीने पर्स तपासली . टिपीन, पाण्याची बॉटल, काही लेडीच वस्तू आणि एक मोबाईल तोही बंद अवस्थेत आढळला. तो चालू करण्यात आला पण त्या मोबाईला पँटर्न लॉक असल्यामुळे त्याचा काहीच उपयोग झाला नाही. पर्सच्या मागच्या कप्प्यात एक फोटो सापडला त्यामागे लिहीले होते मिसेस सान्वी सागर जामखरे. त्याचाही नाव कळण्यापलीकडे काही उपयोग झाला नाही. संपर्क करायचे सर्व मार्ग खुंटले होते. मोबाईल युगामुळे आजकाल कोणीही हाताने लिहायची तसदी घेत नाहीत. जेवढा माणुस प्रगत झालायं तेवढे त्याने आपले परावलंबीत्व वाढवलेय. टेक्नॉलॉजीवर विसंबणे असे महाग पडत होते.
अशातच दुपार उलटून गेली होती सान्वीला अजुन शुद्ध आली नव्हती. पण धोका टळला होता. शाळकरी मुलगी निघुन गेली होती पण सखाराम थांबून होता आणि तिच्या जवळचे कोणीतरी येई पर्यंत थांबणार होता. त्याचा पाय खुपच ठणकत होता. त्याला लंगडताना पाहून डॉक्टरांनी त्यालाही तपासले. गोळ्या पोटात गेल्याबरोबर पाय ठणकायचा थांबला . थोड्या वेळाने हॉस्पीटलतर्फे पोलीसांना बोलवून आणि टिव्हीवर बातमी द्यायची ठरले.
भाग दुसरा समाप्त..
----------–----------------------------------------
शब्दांकन - नितीन राणे ( सातरल - कणकवली )
---------------------------------------------------
भाग तिसरा आणि शेवटचा.
सागर घरी आला तेव्हा साडेसात वाजले होते. एरव्ही साडेसहा वाजता येणारी सान्वी अजुन घरी आली नव्हती. दार उघडून आत आला. घरातील अंधाराने त्याला कसेतरीच वाटले. रोजच्या प्रमाणे अगरबत्ती आणि धुपाचा सुवास काही आला नाही. खुर्चीत बसल्या बसल्या समोर पाण्याचे ग्लासही नव्हते. थोडावेळ तसाच अंधारात बसून राहीला. मनात विचार येऊ लागले. कुठे राहीली असेल सान्वी? आई कडे गेली असेल का माझी तक्रार घेवून? छे छे असं ती कधीच करत नाही उलट माझा राग जावा म्हणुन घरी थोडी लवकर येऊन काय काय करत असते. आज घरी पहील्यांदाच आपण असे एकटे झाले आहोत. सान्वीची गैरहजेरी त्याला सतावू लागली. तिच्यासोबतचे क्षण आठवू लागले. सकाळच्या आपल्या कृत्याची घृणा वाटू लागली. तीची उणीव प्रकर्षाने भासू लागली. त्याने लगेचच मोबाईल चालू केला आणि काही क्षणात त्याला सासूचा फोन आला. म्हणजे ही माहेरी आहे तर असं मनाशी बोलत कॉल रिसीव केला. फोनवर सान्वीच्या अपघाताची बातमी समजतात त्याला धक्का बसला घशाला कोरड पडली. जागच्या जागी थिजला. फोनवर बोलतच दरवाजा लॉक केला आणि धावत सुटला.

सागर हॉस्पीटलमध्ये पोचला तेव्हा, सान्वीची आई एका माणसाच्या पाया पडताना त्याला दिसली. तो माणुस दुसरा तिसरा कोणी नव्हता. ज्याला आपण सकाळी मारले होते तो होता. मग आई त्याच्या पाया का पडत आहेत?
दरवाज्यात सागरला उभा पाहून सखारामही आश्चर्यचकीत झाला.
" सागर कुठे होता तुम्ही, तुम्हाला माहीत आहे का? या माणसामुळे आपली सान्वी आज सुखरूप आहे. या देवदुताचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत." हे बोलताना सागरच्या सासुचा कंठ दाटून आला.
सागर मात्र जिवंत असुनही मेल्यासारखा झाला. अविचाराने मारलेली एक थप्पड त्याला बोचू लागली, त्या थप्पडच्या बदल्यात असंख्य थप्पड आपल्या कानाखाली बसत आहेत अशा वेदना त्याला होऊ लागल्या. डोळ्यातून अपराधीपणाचे अश्रु ओघळू लागले. अशातच सागर स्वताच्याच हाताने तोंडात मारून घेऊ लागला. हे पाहून सासू अवाक झाली. सखाराम पुढे येवून सागरचे हात पकडले आणि त्याला गळाभेट दिली.
"सागरराव मी फक्त माणुसकीला जागलोय बाकी काही मोठसं केलेले नाहीये आणि सकाळच्या प्रकाराबद्दल अपराधी वाटून घेऊ नका फक्त माझं एकच म्हणणं आहे की माणसाला त्याच्या पेहरावावरून तोलू नका किंवा तो अनाडी आहे म्हणुन त्याला वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू नका. माणुसकी हृदयात असते. त्याच्या काही मजबुरी असतात, परीस्थिती असते. वाटल्यास ती समजुन घ्या. त्याला वाचायला शिका, जो माणसं वाचायला शिकतो तो कधीच धोका खात नाही. जास्त बोलत नाही निघतो आता. " असे बोलून सखाराम चालायला लागला.
" भाऊ तुम्हाला एकच विनंती आहे, तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर द्या मला." पण सखाराम थांबला नव्हता. आपला दुखरा पाय ओढत तो केव्हाच दिसेनासा झाला.
सान्वी तासाभरापुर्वीच शुद्धीवर आली होती. सागर तिच्या समोर जाऊन घुडघ्यावर बसला. काही न बोलता तसाच बसून राहीला. त्याच्या डोळ्यात तीला पश्चाताप दिसत होता. आतापर्यंत कधीही न दिसलेले प्रेम दिसत होते.
" वेड्या , तुझं हे रूप बघायला मी हजारदा पडेन" हे बोलल्याबरोबर सागरचा हात तिच्या तोंडावर गेला.
" आता तुला कुठे पडायची गरज नाहीये, तुला हवा असलेला सागर परत आलाय.."
त्यावेळी मात्र दोघांना आपण दोघे कुठे आहोत याचे भान नाही राहीले. एकमेकांच्या मिठीत आकंठ बुडाले होते.
***
सखाराम घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पत्र्याच्या झोपडीत अंधार होता. आजुबाजूला सगळीकडे लाईट होत्या मग आपल्या घरात अंधार कसा? हा प्रश्न सखारामला पडला. दार लोटून घरात पाऊल टाकले तशी त्याच्या डोक्यावर फुले पडली. लाईट लागली. समोर केक, हसतमुख पार्वती आणि सगळी लोकं पाहून सखारामला आपला विसरलेला वाढदिवस आठवला. जो त्याच्या कित्येक वर्षे विस्मृतीत गेला होता. त्याला आठवले चौथीत असताना त्याचा वाढदिवस एकदा शाळेत साजरा झाला होता आणि आज आपल्या बायकोमुळे तो आनंद परत उपभोगता येणार होता. ही मस्ती चालू असतानाच टिव्हीवर सविस्तर बातमी येत होती एका लोकल देवदुताची कथा.. तो देवदूत दुसरा तिसरा कोणी नसुन आपला नवरा आहे हे पाहून पार्वतीच्या आनंदाला पारावर उरला नाही. सखारामला मिठी मारताना तिला फक्त आणि फक्त तिचा देवदूत दिसत होता. बाकी कोणी नाही.
समाप्त....
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
** सदर कथा काल्पनीक आहे तिचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही, असल्यास निव्वळ
योगायोग समजावा. ** नितीन राणे **
---------------------------------------------------
शब्दांकन
नितीन राणे
सातरल - कणकवली.
९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

आवडली.

" वेड्या , तुझं हे रूप बघायला मी हजारदा पडेन"
>> What a loser !--- +१

छान

छान कथा होती
माणुसकीच सुंदर उदाहरण जे माझ्या मते अत्ता ह्या जगात उरलेलीच नाहीये