Submitted by निशिकांत on 19 January, 2018 - 00:37
मनी जोपासला होता थवा लाखो इराद्यांचा
प्रवासी का तरी झालो अधूर्या कैक स्वप्नांचा ?
जरी भोगून झाली सर्व दु:खे सात जन्मांची
सदा कबरीत का असतो तरी वावर उसास्यांचा?
किती अंधार बघुनी शोधली जागा लपायाला!
कवडसा आठवांचा दावतो आलेख शल्यांचा
मना मारून जगलो, मीच जुळते घेत सर्वांशी
कसा सोडू थवा हा स्वार्थसाधू सर्व आप्तांचा?
जसा झालो तसा झालो, शिकायत ना कधी केली
घडवले मीच मजला, दोष नाही भाग्यरेषांचा
मला जग चांगले म्हणते, मनी पण शल्य कायमचे
प्रयत्ने लपविला इतिहास आहे कृष्णकृत्त्यांचा
पुरेसा काजवा होतो कराया दूर तिमिराला
मनी अंधारल्यावर लागतो कस कैक सुर्यांचा
जरी निष्पर्ण आहे वृक्ष वठलेला, कधी काळी
स्वतःची देत छाया, लाडका होता प्रवाशांचा
अनाथाचेच जगणे, ना कुठे घर चार भिंतींचे
निवारा भेटला "निशिकांत"ला मक्त्यात गझलांच्या
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा