अढळपद..

Submitted by onlynit26 on 17 January, 2018 - 04:59

दिघ्या म्हणजे मुंबई लोकलमध्ये कायम खिडकीजवळची जागा पकडून अढळपद मिळवणारा अवली. दिघ्या अवली होता पण त्याच्यात प्रेमळपणा ठासून भरलेला.
त्याची माझी ओळख ट्रेनमध्येच झाली. एकदा अशीच मला रोजची ट्रेन चुकली. नेमकी त्याच दिवशी माझी तब्बेत बिघडलेली. प्रयत्न करून पण मला सीट काही पकडता नाही आली. कसाबसा सीटमधल्या जागेत उभा राहू शकलो. दिघ्याने नेहमीप्रमाणे खिडकीजवळ जागा पकडलेली. माझी हालत बेकार होती. सकाळीच औषध घेतल्यामुळे डोळ्यावर झापड सुद्धा होतीच. अशातच एकदा आपटलो. हे त्या दिघ्याने पाहीले. माझी अवस्था बघून त्याने लगेच आपले अढळपद सोडले आणि मला बसायला जागा दिली. खुप बरे वाटले. मनोमन त्याचे आभार मानले. मला हळूहळू झोप लागायला लागली. दिघ्याची बडबड चालूच होती. त्यानंतर बऱ्याच वेळाने मला जाग आली. बघतो तर दिघ्या उतरून गेला होता. मी त्याच्यासोबत असलेल्या माणसाला विचारले.
"सुरूवातीला खिडकीजवळ बसलेले गृहस्थ कुठे गेले"
"अच्छा, दिघ्या का?" तेव्हा त्याचे नाव मला कळले.
"ओह.. मला त्यांचे आभार मानायचे होते." मी बोललो.
" अहो त्यात काय! उद्या याच ट्रेनला वडापाव घेवून या, वडापाव दिघ्याचा विकपॉईंट आहे. खुश होईल तो."
"कहीच हरकत नाही" मला हा पर्याय खुप छान वाटला.
दुसऱ्या दिवशी मी ती ट्रेन न चुकता पकडली. दिघ्याने नेहमीप्रमाने ध्रुवपद मिळवले होतेच. मी वडापाव नेलेच होते. दिघ्या खुश झाला.
" काय, तब्बेत बरी आहे ना? " दिघ्या वडापाव पिशवीतून काढताना बोलला.
"हो , साधारण ठीक आहे" मी बोललो.
" मग बसा इथे." परत उठून मला जागा दिली.
***
अशा प्रकारे मी तीच लोकल पकडू लागलो. या ग्रुपमध्ये १५ जण होते. हळू हळू सर्वांची ओळख होऊ लागली. दिघ्याचा प्रेमळ , गमत्या स्वभाव आवडायला लागला. रोजचा ट्रेनमधला वेळ कधी निघून जायचा कळत नव्हते. त्यामुळे उभ्यानी केलेला प्रवासही सुखकर होऊ लागला. दिघ्याची परोपकारी वृत्ती भावू लागली. स्वता जागा पकडून पण कधी १० मिनिटाच्यावर सीटवर बसला नव्हता. कोणालातरी आपली जागा दान करायचा. किंबहूना दान करण्यासाठीच जागा पकडत असावा.
***
एके दिवशी मी संध्याकाळी कामावरून घरी येत असताना वाटेत मला तो दिसला. ओले मोड आलेले कडधान्य विकणाऱ्या बाईला तीचे दूकान लावायला मदत करत होता.
"काय दिघूशेट इकडे कुठे? मी त्याला विचारले.
" भाऊ हे आपलेच दुकान आहे, माझी बायको बसते दुकानात" मला तो भाऊ बोलायचा.
मला बघून त्याची बायको लाजली. रस्त्यावर एक स्टूल आणि बाकडे टाकून बसायला तीला शरम वाटत असावी.
" वहीनी , अजिबात लाजायचे नाही, कोणतेही काम हलके नसते, मी पण दारोदारी केळी विकून शिक्षण पू्र्ण केलय. फक्त आपल्यात धमक असताना कोणाकडे हात नाही पसरले. तुम्ही करताय ते खुप चांगले आहे. पडत्या काळातच ठाम उभे राहायचे असते, मला पाव कीलो पावटे द्या" असे बोलल्लावर वहीनींना बरं वाटले असावे.
एखाद्या माणसाच्या दुखाःपेक्षा आपले दुखः मोठे करून सांगीतले की त्या व्यक्तीला थोडं बरे वाटते. त्या व्यक्तीला वाटते की आपले दुखः , कष्ठ काहीच नाहीत जेवढे इतर व्यक्तीना आहेत. आणि व्यक्तीला बरे वाटते.
"अहो भाऊ , तुमचे लेक्चर बस झाले, चला आपण चहा घेऊ." दिघ्या मला ओढतच घेऊन जाऊ लागला.
" अरे माझे पावटे राहीले की"
" ते देतो तुम्हाला" असे बोलून मला बाईकवर बसवले. एका गल्लीत शिरून मला त्याच्या घरी घेवून आला. घरात प्रवेश केला तेव्हा त्याची दोन मुलं अभ्यास करत होती. मला बसायला सांगून तो किचनमध्ये शिरला. घर साधंच होतं. जेमतेम फर्निचर. जुना टि व्ही. भींतीना पोपडे आलेले. पण घरात कमालीची स्वच्छता. टापटीप मुलं शिवाय शिस्तीची होती. आई वडील घरात नसताना सुद्धा अभ्यास करत होती हे विशेष. दिघ्या पाच मिनटात चहा घेऊन बाहेर आला. चहाचा घोट घेतल्यावर दिघ्या चहा उत्तम बनवतो इतपर्यंत माझं मत झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या आणि थोड्या वेळाने आम्ही दोघेही बाहेर पडलो. दिघ्याचे वरवर दिसणारे रूप आत काहीसे वेगळे होते. एक जबाबदार पिता, काळजी घेणारा नवरा आणि इतरांसाठी दयावान होता. मला त्याचे हे रूप त्याच्या सानीध्यात आल्यामुळे कळले. नाहीतर इतर लोकांसाठी दिघ्या मस्करी करणारा, बडबड्या असाच होता.
***
काही दिवस असेच गेले. माझी चार महीन्यासाठी कंपनी कामानिमित्त अहमदनगरला बदली झाली. माझा आणि लोकलचा संबध काही काळ तुटणार होता. पर्यायाने दिघ्याचाही. फोन वर बोलणे व्हायचे. पण दिघ्या कायम मस्करीच्या मुड मध्ये असायचा. मला तो संवेदनशील दिघ्या अनुभवायचा होता. लोकांची गरज ओळखून मदत करतानाचा दिघ्या पाहायचा होता. त्याचा रोज एकाला मदत करायचा मंत्रा आत्मसात करायचा होता. त्याच्या सारख्या दुवा मिळवायचा होता. मी थोडे दिवस का होईना यासाठी मुकलो होतो. अशातच मध्ये बरेच दिवस गेले. दरम्यान माझा मोबाईल गहाळ झाला. सर्वांचे संपर्क नंबर गमावून बसलो. मोबाईल गहाळ झाल्यामुळे एक प्रकारचे अपंगत्व आले. अजुन काही दिवसानी मुंबईत असणार होतो. पण थोड्या दिवसात कोणाशी संपर्क करायचा म्हटला तर नंबर नव्हते. होम मिनिस्टरचा नंबर सोडला तर कोणाचाच नंबर तोंडपाठ नव्हता.
***
आणि तो दिवस उजाडला. माझे मुंबईत पाऊल पडले एकदाचे. दुसऱ्या दिवशी गाडीला दिघ्याला भेटणार. जागा पकडण्यासाठी एक स्टेशन डाऊन केले. दिघ्याला सप्रार्ईज द्यायचे होते. जशी लोकल स्टेशन प्लँटफॉर्मला लागू लागली तश्या मला उकाळ्या फुटू लागल्या. दिघ्या त्याच्या धृव पदावर मी बसलेला पाहून चकीत होणार होता तो क्षण पाहायला मी उत्सूक होतो. पण तसे काही झाले नाही. दिघ्या काही चढला नाही. उलट त्याच्याबद्दलची वाईट बातमी ऐकून काळजात धस्स झाले.
***
दिघ्याच्या घरचे जिने चढताना मनावर विलक्षण ताण आला होता. देवा जे काही बघायला मिळणार होतं ते सहन करायची क्षमता माझी अंगी येऊ दे. डोअर बेल वाजवली तेव्हा संध्याकाळचे साडेसात वाजले होते. दोनदा बेल वाजवून सुद्धा दार उघडले गेले नाही. बहूदा बेल बंद असावी म्हणून कडी वाजवली. त्याच्या छोट्या मुलीने दरवाजा उघडला. मी आतली परिस्थिती बघून हडबडून गेलो. मेणबत्तीच्या प्रकाशात सारच भयान वाटले. अपुऱ्या प्रकाशात पण अभ्यास करणारी दोन बछडी आणि कॉटवर असहाय झोपलेला दिघ्या पाहून मला गलबलून आले.
" दिघ्या काय करून घेतलस हे?" माझे हात डोक्यावरून फिरताच तो लहान मुलासारखा रडू लागला.
भाऊ कुठे होता तुम्ही? त्याचे डबडबलेले डोळे मला प्रश्न करत होते. आणि मी मात्र स्वताला दोष देत होतो. माझा मोबाईल गहाळ व्हायला आणि दिघ्याचा अपघात व्हायला एक गाठ झाली. दिघ्या महीनाभर इस्पीतळात. घरी आला तेव्हा त्याच्या मनात मला कॉल करायचे खुप वेळा आलं पण इतरांसारखीच मीही पाठ फिरवली असं समजून त्यानेही मला संपर्क केला नाही. कायम दुनियेच्या उपयोगी पडणाऱ्या दिघ्याच्या पडत्या काळात कोणी साथ दिली नाही आणि आता खुप हलखीचे जीवन जगायची वेळ त्याच्यावर आली होती.
हॉलमधली मिनमिनती मेणबत्ती सोडली तर घरात कुठेच उजेड नव्हता. तो जसा सावरला तसा त्याला विचारले.
" घरात लाईट का नाहीये?"
" भाऊ काहीतरी प्रॉब्लेम झालाय, इलेक्ट्रेशियन बोलवलेले पण अजून आला नाही" खिडकीकडे तोंड करत बोलला.
"काका, बिल नाही भरले म्हणून वायरमेन काकानी आमची लाईट घालवली" दिघ्याचा छोटा मुलगा लगेच बोलून आणि मला सत्य परिस्थिती कळली.
"दिघ्या.." या व्यतीरिक्त मी काहीच बोलू शकलो नाही .
मी लगेच माझ्या एम एस इ बीमधील मित्राला कॉल लावला.
" चिकू बेटा लाईट बिल कुठे ठेवलय."
"भाऊ , काय करताय तुम्ही?" दिघ्याने उठायचा प्रयत्न केला पण पायाला झालेल्या वेदनेने कळवळला.
" तु गप्प पडुन राहा, तुझ्या घरातला अंधार संपला समज" मी त्याला सावरत बोललो.
चिकूने लाईट बील आणून दिल्याबरोबर थकलेले बिल मी ऑनलाईन भरले. थोड्याच वेळात वायरमनने येऊन लाईट सुरू केली. लाईट यायला आणि सुमा वहीनी यायला एक गाठ झाली.
"अगं बाई, भाऊ तुम्ही कधी आलात. थांबा हा चहा टाकते असं बोलून माऊली आत गेली. तिने आत मधून चिकूला आत बोलवीले. आतूनच तीची दिघ्याशी खुणवाखुणव झाली. सर्व प्रकार.माझ्या लक्षात आला. घरातील सामान संपले असणार.
" वहीनी चहा राहुदे, दिघ्याचा पाय जरा शेकता का? " मी असं बोलल्याबरोबर तीचा नाविलाज झाला. तीने पाणी गरम करत ठेवले.
" चिकू चल आपण, रिचार्ज करून येऊया." दिघ्याला सांगून मी बाहेर पडलो. गल्लीजवळच्या वाण्याला सर्व आवश्यक कीराणा सामान काढायला सांगून घरी पोचवायला सांगीतले. चिकू आणि चिमीला आईस्क्रीम घेवून परत दिघ्याच्या घरी यायला निघालो.
"चिकू, आवडला काय रे आईस्क्रीम?" चालताना विचारले.
" हो, पण अर्धाच खाणार, बाकीचा चिमूला देईन, तीला खुप भूक लागलीय, ती दुपारी जेवलीच नाहीये"
" अरे पण तिच्यासाठी घेतलाय ना?"
" पण तिला खुप भुक लागली आहे, मी मघाशी चुरमूरे खाल्लेत" त्याचे वाक्य काळीज चिरून गेले.
मी परत मागे फिरलो. सर्वांसाठी खायला घेवूनच वर आलो.
त्या नंतरचे काही क्षण आदर्श कुटूंब कसं असावं, कुटूंबातील संस्कार काय असतात याची प्रचिती मला आली. प्रत्येक जण आपल्याकडचा घास एकदुसऱ्याला भरवत होता. त्या कुटूंबातील प्रत्येकाला वाटत होतं की आपल्या पेक्षा दुसऱ्यालाच भुक जास्त आहे. त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहीले नाही.
***
दुसऱ्यादिवशी नेहमी प्रमाणे लोकल पकडली. दिघ्याची कमी जाणवत होती. मी गोवा पिकनीक विषय काढला. पिकनीकचा विषय काढला की सगळ्यांच्या उड्या पडतात. तसेच झाले १० मेंबर तयार झाले. प्रती मेंबर ५००० रूपये काढायचे ठरवले . दोन तीन दिवसात पैसे जमा होऊ लागले. सर्वच पैसे आगाऊच जमा करण्याचे ठरले होते. हा हा म्हणताना सर्वांचे पैसे जमा झाले. दरम्यान एके दिवशी माझ्या घरी सत्यनारायणाच्या पुजेचे आमंत्रण सगळ्यांना दिले आणि पत्ता मात्र दिघ्याचा दिला. माझ्याकडील पुजेची सबब ट्रेनमधील मेंबर्सना दिघ्याच्या घरी यायला पुरेशी ठरली. एक एक जण दिघ्याच्या घरी जमू लागला. घरी आल्यानंतर दिघ्यासहीत सगळ्यांना धक्के बसत होते. या बाबतीत मी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. कोणीच काही बोलत नव्हते. सर्वांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना होती. दिघ्याच्या अपघातानंतर कोणीच दिघ्याकडे फिरकले नव्हते. अखेरीस सर्व जण जमल्यानंतर मी बोलायला लागलो.
"मित्रानो, खोटं बोलून तुम्हाला इथे आणलं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला न विचारता केलीय , त्याबद्दल माफी मागतो. दिघ्याला अपघात झाला ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत होती. तरी अनअवधानाने आपल्याकडून जे व्हायला नको होते ते झालंय. आपला मित्र म्हणून आपण काहीतरी त्याला देणं लागत होतो , त्याच्या पडत्या काळात आपली गरज होती, पण किरकोळ अपघात झाला असं समजून आपला दुर्लक्ष झाला. अपघात कीरकोळ होता तरी एवढाही कीरकोळ नव्हता की तो परत कामावर लवकर रूजू होईल. तुम्हाला माहीत नसेल पण शिक्षणाअभावी या दिघ्याची नोकरीही फारशी चांगली नाहीये. तुटपुंज्या पगारात घर चालत नव्हते म्हणुन या वहीनी पण छोटं दुकान चालवायच्या. त्यात त्यांचा संसार नीट नाही म्हणता येणार पण कसाबसा रेटत होता. पण त्याची भणक सुद्धा आपल्याला कधी लागू दिली नाही की कधी मदतीला हात पसरला नाही. तशा परिस्थितीतही त्याचे व्यक्तीमत्व आपल्याला आनंद देऊन जायचे. त्याची मस्करी चालायची. पण आज परिस्थिती वेगळी आहे. त्याचा तुटपुंजा पगारही बंद झालाय, नवऱ्याच्या सेवेत वहीनींनाही दुकानात फारसे जाता येत नाहीये. मी नगरवरून परत आलो तेव्हा दिघ्याच्या घरातला अंधार बघून गलबलून आले. आपण उजेडात असुनही अंधारात असल्याची भावना काळीज पिळवटून गेली. तुम्हाला काय वाटते? तुमच्याकडे तो बोलू शकला नसता का? मदत मागीतली नसती का? तर नाही. त्याचा तो पिंड नाहीये. या माणसाने दुसऱ्याला देण्याखेरीज काहीही केलेले नाहीये आणि त्याचे कुटूंब पण त्याच्या सारखेच आहे. त्याच्या मागे खंबीर उभे आहे. त्या दिवशी त्याची मुलं मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करून त्याचा येणारा काळ उज्वल , प्रकाशमय करण्यात गुंतली होती. हे सगळे आपल्या मित्राच्या बाबतीत घडतेय याबद्दल आपल्याला काहीच कळू नये. काही दुखः कळत नसतात तर त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन जाणून घ्यायची असतात. त्याच्याबद्दल अजून सागून तुम्हाला अपराधी करणार नाही. फक्त एवढेच सांगेन अपराधी पणाची भावना धुवायची असेल तर माझ्या मनात एक उपाय आहे."
" सांगा भाऊ" डबडबलेल्या डोळे पुसत सगळे एक स्वरात बोलले.
"आपण आपली गोवा पिकनिक रद्द करून.जमा झालेले पैसे दिघ्याला द्यायचे, आणि मी व्हाट्सअँप वर माझ्या काही मित्राना भावनीक आवाहन करून प्रत्येकी फक्त १०० रूपये मदत करा असा मेसेज केलाय, एका माणसाला १०० ही काही मोठी रक्कम नाहीये पण दिघ्यासाठी त्याचे मोल खुप आहे. विचार करा आपण १००० लोकाना जरी प्रवृत्त केले तरी १ लाख रुपये जमा होतील, माझ्या ८०० कॉन्टॅक्ट पैकी ४०० लोकांनी प्रतिसाद दिलाय, तुम्ही फक्त प्रत्येकी १०० लोकांना प्रवृत्त करा, मग बघा आपल्या दिघ्याची गाडी कशी पटरीवर येते."
" आमचे डोळे उघडलात भाऊ, आम्ही सर्व जण तयार आहोत ह्याला" मक्या पटकन बोलून गेला.
बाकीच्यानी मान हलवली. दिघ्या आणि वहीनी आमच्याकडे बघतच राहीले. दिघ्याला हे उपकाराचे ओझे भारी वाटू लागले होते.
" मित्रानो, नका रे एवढे प्रेम देऊ, मला सवय नाहीये एवढ्या प्रेमाची, माझे सगे सोयरे असून पण असा एवढा विचार कोणी केला नाही." असे बोलून दिघ्याने मला मिठी मारली. त्यावेळी झालेला आनंद गोवा पिकनिकच्या आनंदापेक्षा कीतीतरी पटीने जास्त होता. त्याचवेळी वहीनी वाफाळलेला चहा घेऊन बाहेर येत होत्या. ट्रेनमध्ये धृव पद मिळवणाऱ्या दिघ्याच्या मनात मात्र आमचे अढळपद कायम झाले होते.

शब्दांकण - नितीन राणे
सातरल - कणकवली
मो.न. ९००४६०२७६८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

chhan!!!

सर्वांना धन्यवाद ...

ही माझी सुरुवात आहे . असचं माझ्या लिखाणावर प्रेम करत राहा ..

Chhan

छान!!

छान.

khup chhan

whatsapp var firtoy ha lekh... tumche nav nahiye bahutek khali.....

ही कथा मिस केली होती.

छान आहे पण "Give a Man a Fish, and You Feed Him for a Day. Teach a Man To Fish, and You Feed Him for a Lifetime."

एखाद्या माणसाच्या दुखाःपेक्षा आपले दुखः मोठे करून सांगीतले की त्या व्यक्तीला थोडं बरे वाटते. >> खरय अगदि
कशी राहिली हि कथा वाचायची...मदत करण्याची कल्पना अगदि छान.. Happy

छान सकारात्मक कथा.
एखाद्या माणसाच्या दुखाःपेक्षा आपले दुखः मोठे करून सांगीतले की त्या व्यक्तीला थोडं बरे वाटते.>>> खरं आहे. निदान कान दिला तरी चालेल. एखाद्याच्या दु:खा समोर माझं बरंय बाबा.. असं सांगून बढाई मारणारे खरे मित्र नव्हेत..