आमचे पोस्टरप्रेम...! अमर अकबर अँथनी

Submitted by अतुल ठाकुर on 14 January, 2018 - 01:08

22279757_1189093061235764_5089657737859561677_n.jpg

जेम्स बाँडचे चित्रपट मनावरील तणाव दूर करायला पाहायचे. तेथे लॉजिक लावायचं नाही. मार्टीनी, गर्ल्स अँड गन हा फॉर्म्युला मला मस्त वाटायचा. तिथे लॉजिक यायला लागलं, तो गंभीर अ‍ॅक्शनपट होऊ लागला आणि त्यातली गंमत संपली. डॅनियल क्रेगला तर विनोदाचे वावडेच आहे. तशीच मजा मला मनमोहन देसाईचे चित्रपट पाहताना येते. त्याच्या सर्व चित्रपटांचा मुकूटमणी शोभेल असा चित्रपट म्हणजे "अमर अकबर अँथनी". आजही या चित्रपटाचे आकर्षण कमी झाल्यासारखे वाटत नाही. मी मनमोहन देसाई आणि बाँडपटाची तुलना ही फक्त त्यातील "फन" या फॅक्टरपुरताच केली. मात्र मनमोहन देसाईचे चित्रपट भावनिक बाजूने तथाकथित आर्ट सिनेमापेक्षा मला कितीतरी सरस वाटतात.

या चित्रपटातील मुलांपासून दूर झालेल्या प्राणची तगमग, जीवनचा बेरकीपणा, रंजीतचा मवालीपणा, अमिताभचा दारुड्याचा अभिनय, त्याचे किरिस्ताव बोलणे, चालणे, वागणे, विनोदखन्नाचा मोठ्या भावाचा आब, ऋषी कपूरचा पान खाऊन लुंगी लावून फिरणारा अकबर, निरुपा रॉयची अंध आई, दडपणाखाली वावरणारी शबाना, मादक परविन बाबी, लोभस नितू सिंग ही मंडळी अभिनय करतात असे वाटतंच नाही. मात्र मनमोहन देसाईच्या चित्रपटांचा आनंद घ्यायचा तर तशी तयारी ठेवून जावे लागते. तिथे तर्काचे काम नाही. ते जर जमले तर त्याच्या चित्रपटांसारखा निखळ आनंद देणारे चित्रपट नाहीत. आणि आश्चर्य म्हणजे त्यातील काही प्रसंग तुमच्या डोळ्यात पाणीही आणू शकतात. विनोद आणि गांभीर्याचा इतका सुरेख संगम त्याच्या चित्रपटात आढळतो.

वरील पोस्टर हे "अमर अकबर अँथनी" सारख्या त्यावेळाच्या खर्‍या अर्थाने मल्टीस्टार चित्रपटाचे आहे हे आधी लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त करामत केलेले हे पोस्टर आहे. सर्वप्रथम म्हणजे मुख्य पात्रे त्यात आली आहेत. तिन प्रमुख नायक आणि आणि त्यांच्या नायिका आहेत. विनोदखन्नाच्या बाजूला शबाना आणि अमिताभच्या बाजूला परविन आहे. तर ऋषी कपूरच्या फोटोखाली नितू सिंगचा फोटो टाकला आहे. तिन्ही नायकांच्या डोक्यावर टोप्या आहेत हे एक या पोस्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. अमिताभच्या टोपीवरून त्याचे व्यक्तीमत्व अधोरेखित केले आहे. अ‍ॅन्थनी गोन्साल्विस आधुनिक पद्धतीच्या कॅपमध्ये आहे. तर ॠषी कपूरचा अकबर टिपिकल मुसलमानी टोपीत (कदाचित तो रुमालही असेल). विनोदखन्नाची टोपी तर तो कोण आहे हेच थेट जाहीर करते.

नायिकांचे चेहरेही तसेच, त्यांचे व्यक्तीमत्व दाखवणारे. शबाना आझमीच्या केसांचे वळण, कपाळावरील टिकली आणि गळ्यातली माळ हिन्दू तरुणी दाखवणारी तर परविनचा गेटअप पूर्णपणे आधुनिक. कानावर बटा खेळवणारी नितू सिंग मुसलमान तरुणीचा लूक देणारी. उजवीकडे कॅप, दाढी आणि गॉगलमधला प्राण हा स्मगलर आहे हे निदान सत्तरीतल्या दशकातले हिन्दी चित्रपट ज्यांनी पाहिले आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही. पोस्टरच्या अगदी वर डावीकडे अमिताभ आणि विनोदखन्नाच्या अजरामर अ‍ॅक्शन दृश्याचे चित्र आहे. त्यातील सर्व संवाद संस्मरणीय सदराखाली येतात. अगदी "अ‍ॅंडी रॉबर्ट तो वेस्ट ईडिज चला गया" पासून ते "अपने इलाकेका दादा है तू, चल देखता हू तेरेमें कितना दम है" पर्यंत आणि पुढे "अपूनने सिर्फ दो मारा लेकिन सॉलिड मारा" या समारोपापर्यंत निव्वळ आणि निखळ नेत्रसुख.

खालच्या बाजुला असलेल्या प्राणच्या स्मगलरला वरच्या अ‍ॅक्शन दुश्याने संतूलित केल्यासारखे वाटते. बाकिचा बॅलन्स तीन नायक आणि तीन नायिकांनी साधला आहेच. अ‍ॅन्थनी गोन्साल्विससाहेबांना पोस्टरच्या मधले आणि महत्त्वाचे स्थान मिळाले आहे आणि चित्रपटातही अभिनयात बच्चनच केंद्रस्थानी वाटतो. चित्रपटाचे इंग्रजी नाव तीन रंगांमध्ये रंगवले आहे. तीन नायक, तीन नायिका, तीन धर्म, या तीन आकड्यांच्या खेळात तीन रंग वापरणे हे संयुक्तिकच वाटते. इतकी सारी मंडळी चित्रपटात असताना त्या सर्वांना न्याय देणारे असे या चित्रपटाप्रमाणेच एक परिपूर्ण पोस्टर.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! परवीन ओळखूच येत नाही यात Happy

मात्र या पोस्टरवरून एखाद्याला वाटेल की प्राणच मुख्य व्हिलन आहे. वोह उसकी जिंदगी की सबसे बडी गलती होगी! Wink

भारीये, वेगळाच् लेख आणि वेगळाच दृष्टीकोण... !

या लेखापासून प्रेरणा घेऊन एखाद्या शाहरूखपटाच्या पोस्टरबद्दल काही लिहावे म्हणतोय Happy

छान लिहिलंय. छान पोस्टर.
तर्क बाजुला ठेवुन बघण्याचाच सिनेमा आहे हा.
पोस्टरमधे अमिताभचे डोळे वेगळेच दिसताहेत.

मस्त लिहिलय! पोस्टर्सबद्दल इतका बारकाईने विचार कधीच नव्हता केला.
नाही म्हणायला, लहानपणी राहुरीच्या उषा टॉकिजवर लागलेले अमिताभचा मी. नटवरलालचे पोस्टर, त्यातील दोरखन्डाने बान्धलेला अमिताभ पाहुन जबरदस्त भितीयुक्त उत्सुकता वाढली होती हे आठवले! Happy

मस्त अनालिसीस.
ही पोस्टर कोण डिझाईन करत असेल याबद्दल उत्सुकता आहे.

मस्त लेख. ही पोस्टरे डिझाइन करणारे कलाकार अज्ञातच राहिले. आपले हुसेन साहेब नवीन असताना सिनेमाची होर्डिंग्ज रंगवत असत. चित्रपट माझा लै आव्डता. मला तर शिर्डीवाले साईबाबा पण गाणे आव्डते. पब्लिकची नस ओळखून मनमोहन देसाइ डिलिव्हर करत असत. " बाप ने दिया हुआ पिस्तौल याद है लेकिन पिस्तौल देनेवाला बाप याद नही?! असा लूप कधी होणे नाही.