मित्रा चेस्टर ...

Submitted by भास्कराचार्य on 12 January, 2018 - 06:51

"It's like I'm paranoid lookin' over my back
It's like a whirlwind inside of my head
It's like I can't stop what I'm hearing within
It's like the face inside is right beneath the skin ...

... The sun goes down
I feel the light betray me
The sun goes down
I feel the light betray me ..."

मित्रा चेस्टर, ह्या ओळी गात गात जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आलास, तेव्हा खरं तर इंग्लिश गाण्यांचा वगैरे मला फारसा गंध नव्हता. पण तुझ्या त्या स्वच्छ आणि कसल्यातरी अनामिक आक्रोशाने भारलेल्या आवाजाचं माईक शिनोडाच्या रॅपशी होणारं द्वंद्व तितक्याच उर्जेने मनाला भिडणार्‍या गाण्याच्या शब्दांबरोबर मनात घुमत राहायचं ते वय नक्कीच होतं. पौगंडावस्थेच्या त्या पायरीवर मी 'रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा' अशी भावना घेऊन उभा होतो. आपल्या शरीराला, मनाला हे नक्की काय होतंय, हे कळत नव्हतं. (खरं सांगायचं तर अजूनही कधी कधी कळत नाही.) 'कुणीच नाही अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे' असं सारखं कळवळून म्हणावंसं वाटत असताना तू तिथे आलास, आणि तुझ्या त्या चपळ तारसप्तकातल्या निर्मळ आवाजाने माझ्यावर, आणि माझ्यासारख्या अनेक मुलांवर ते नभ धरलंस. ह्या निर्मलतेची मोहिनी आज गेलं एक तप मी बरोबर घेऊन चालतो आहे. तुझ्या अकाली मृत्यूची घणाघाती बातमी डोळ्यांसमोर चमकली, तेव्हाही तुझंच गाणं ऐकत होतो रे.

1280px-Linkin_Park,_Brixton_Academy,_London_(35957242826).jpg
(https://en.wikipedia.org/wiki/Chester_Bennington#/media/File:Linkin_Park...(35957242826).jpg येथून Drew de F Fawkes ह्यांच्याकडून CC BY 2.0 ह्या लायसन्सद्वारे साभार.)

आम्हां सर्व फॅन्सचा हात धरणारा तू, तुझा हात आम्ही धरू शकलो नाही, म्हणून किती अश्रू त्या रात्री ओघळले आणि अजूनही ओघळत आहेत, ह्याची गणतीच नाही. लैंगिक अत्याचाराच्या आठवणींशी, आणि त्यामुळे लहान वयात लागलेल्या अंमली पदार्थांच्या सवयीशी आयुष्यभर तू झुंजत आलास. ती अभद्र वार्ता ऐकताच आत्महत्येची अभद्र शंका मनात चमकून गेलीच. वरवर सगळं बरं, चांगलं वाटत असताना मध्येच कुठल्यातरी गाफील क्षणी तो राक्षस आ वासून उभा राहतो. काय करायचं काही कळत नाही.

I need a little room to breathe
'Cause I'm one step closer to the edge
And I'm about to break

असं ओरडून तू २० वर्षांपूर्वी अनेकांना 'त्या edge पाशी असणारं आपल्यासारखं अजून कोणी आहे' ही जाणीव करून दिली होतीस. तुझ्या मनोव्यापारांमध्ये कधी ती ओलांडून जायची इच्छा प्रबळ झाली, हे कोण सांगू शकेल? आता उरले तू नसलेल्या जगात जगणे. ज्या आवाजाच्या आणि ओळींच्या जोरावर मनात एक वेगळीच बंडखोरी आली, त्या ओळी ऐकताना आता त्यांना मिळालेल्या अर्थाच्या वेगळ्याच शोकाकुल चौकटीने व्याकुळ होणे.

It's easier to run
Replacing this pain with something numb
It's so much easier to go
Than face all this pain here all alone ... दिज लाईन्स आर हाँटींग नाऊ, मॅन ... बट दे मेड मिलियन्स ऑफ फॅन्स कनेक्ट टू इच अदर अ‍ॅण्ड टू यू.

लिंकिन पार्कचे फॅन्स ही सर्वात मोठी कमाई. शाळेत 'बुली' झालेले, वेगवेगळ्या प्रकारे दु:ख सोसणारे, टीनएजच्या उंबरठ्यावर स्वतःला कुठेतरी शोधणारे, स्वतःची जागा निर्माण करू पाहणारे, अश्या अनेकांना तुम्ही एका धाग्याने बांधलंत. हेवी मेटलसारख्या 'व्हाईट' जॉनरला 'आल्टरनेटिव्ह मेटल' म्हणून पर्याय देऊन इतर लोकांसाठीही तो खुला केलात. म्हणूनच अगदी दूरदूरपर्यंत माझ्यासारखे लोक तुझे फॅन्स आहेत रे. त्या दिवशी तुझ्या यूट्यूब व्हिडीओजवर लाखोंनी कमेंट्स आल्या. लिंकिन पार्कशी असलेलं आपलं हृदयाच्या कुपीतलं नातं अनेकांनी तिथे उलगडून दाखवलं, आणि मानवतेचा, मैत्रीचा एक वेगळाच सुगंध दरवळला. एकेकाने जाऊन तुझ्या पायाशी गुलाबपाकळ्यांचा सडा मूकपणे टाकावा, तशी ही पुष्पांजलीच वाटली मला. म्हणूनच तुझ्या माईक, रॉब, ब्रॅड, डेव्ह, जो, ह्या सगळ्या मित्रांनी ऑक्टोबरमध्ये केलेली तुझी 'सेलिब्रेशन' कॉन्सर्ट फॅन्ससाठी आणि त्यांच्यासाठीही गरजेची होती. तुमच्या फॅन्समध्ये आणि तुमच्यात जे नातं होतं, ते क्वचितच कुठे पाहिलं असेल. म्हणूनच जेव्हा त्या कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांकडे माईक ठेवून त्यांनी फक्त 'नंब' वाजवलं, आणि सर्व फॅन्सनी मिळून ते तुझ्याऐवजी गायलं, तो क्षण अगदी अंगावर काटा आणणारा होता. मी स्वतः ती लाईव्ह बघताना घरातल्या घरात गात होतो रे. तेव्हा मी बरोबर १२ तास अपोझिट टाईमझोनमध्ये होतो. पण ही असली बंधनं आपल्यातुपल्यात कशाला? माझी खात्री आहे, तू जिथे असशील तिथेही तेव्हा ते गायलं असशील.

I'm tired of being what you want me to be
Feeling so faithless, lost under the surface
I don't know what you're expecting of me
Put under the pressure of walking in your shoes ...

खरं तर अनेक लोकांना वरच्यासारखे शब्द आवडत नसतील. लिंकिन पार्क म्हणजे काय नुसतं ढ्यँवढ्यँव, असं हेवी गिटार ऐकून अनेकांना वाटतं. पण तुमच्याकडे वेगळीच सकारात्मकता होती आणि आहे. आपल्या मोठ्या भावाने येऊन आपल्याच मनातली गोष्ट ऐकवावी, असं अनेकदा वाटलं आहे. हायब्रिड थिअरी म्हणा, की मिटीऑरा म्हणा, की मिनट्स टू मिडनाईट म्हणा, की अजून कुठलाही आल्बम घ्या, तुमच्या गाण्यात एकही शिवी नाही. जो आक्रोश होता, कल्लोळ होता, तो आवाजातून दाखवलास तू. त्या 'र्‍हिदमिक व्हायलंस'च्या प्रेमात मी आजपर्यंत आहे. पण शब्दांतून कधीच मर्यादा ओलांडली नाहीस, ह्याचं कौतुक वाटतं. 'Fuck it' म्हणणं खूप सोपं आहे, पण तुम्हीच म्हटल्याप्रमाणं, त्या अक्षरांच्या मधल्या अवकाशात जाऊन गाणी लिहिणं, हे खरं ताकदीचं काम. खरंतर माझा पिंड शास्त्रीय संगीताचा जास्त आहे, असं मलाच माझं त्या काळात वाटत होतं. पण प्राण फोडून बाहेर पडणारं तुझं गाणं ऐकताना मन बेभान करणार्‍या गीततत्वाची जाणीव झाली. पंडित भीमसेन जोशींच्या काही वादळी तानांची झड वेगवेगळ्या वेळी ऐकतानाही मला अशीच बेभान उर्जेची जाणीव होते. तोही एक माणूस 'सगळं, सगळं द्यायचंय' अश्या इर्षेने पेटलेला. अश्या वादळाची प्रत कुठल्याही चौकटीत ऐकलं, तरी ह्या जगापलीकडलीच असते, ही जाणीव तू मला करून दिलीस.

800px-Chester_Bennington_@_Sonisphere_2009.jpg
(https://en.wikipedia.org/wiki/Chester_Bennington#/media/File:Chester_Ben... येथून kallerna ह्यांच्याकडून CC BY-SA 3.0 ह्या लायसन्सद्वारे साभार.)

तुमि कॅमॉन कोरे गान कोरो हे गुनी
आमि ओबॉक होये शुनी, केवल शुनी

रविंद्रनाथ टागोरांनी म्हटल्याप्रमाणं असं अवाक होऊन मी तुझं गाणं ऐकलं आहे. झालंच तर, 'व्हॉट आय हॅव डन' च्या व्हिडीओमध्ये मानवजातीने केलेल्या अनेक चुकांची मांदियाळी पाहून 'म्युझिक व्हिडीओजमध्ये हे असंही काही असू शकतं' ह्या अज्ञाताच्या जाणिवेने शहारलो आहे.

Put to rest what you thought of me
While I clean this slate
With the hands of uncertainty
So let mercy come and wash away
What I've done

I'll face myself to cross out what I've become
Erase myself
And let go of what I've done

मध्ये 'व्हॉऽऽऽऽट आय हॅव डन!' ह्या तुझ्या आरोळीवर फिदा होऊन ते गाणं किती वेळा पुन्हा पुन्हा ऐकलं आहे ... सगुण जीवनाला निर्गुणाचा स्पर्श होणारे स्वर, ही काही कुठल्या विशिष्ट संगीताची मक्तेदारी नाही, हे तू मला किती तर्‍हेने दाखवलं आहेस! 'फ्रॉम द इनसाईड' व्हिडीओमध्ये तुझा मुलगा तुझ्या आरोळ्यांनी पोलिस आणि बंडखोर अश्या दोघांना धराशायी करून टाकतो, ते किती प्रभावी आहे! तुझ्या आवाजाने तुला सगळ्याच हिंसेवर विजय मिळवायचा होता. अशी सामाजिक जाणीव असणारे किती सिंगर्स सध्या आम्ही ऐकतो, हा प्रश्नच आहे.

तुझ्या गाण्यात फक्त 'हेवी' स्वर होते, असंही नाही. 'हू केअर्स इफ वन मोअर लाईट गोज आऊट' सारखं तरल गाणं तुम्ही ह्याच उन्हाळ्यात बनवलंत.

Who cares if one more light goes out?
Well I do

हे ऐकून आता विझलेल्या तुझ्याच तार्‍याच्या आठवणीने जीव अर्धाअर्धा होतो. तू स्वतःसाठीच लिहिलंस का हे गाणं? आम्हाला कसं कळलं नाही ते? किती शांत आणि काळजाला भिडणारं गाणं आहे हे. लिंकिन पार्कच्या दीर्घायुष्याचं हेच रहस्य आहे. सतत प्रयोगशील राहणे. काही जुन्या फॅन्सनी त्यांच्या एका साचेबद्ध मानसिकतेतून नाकंही मुरडली 'हेवी' आणि 'वन मोअर लाईट'ला, पण त्यांना तुमची उत्क्रांती कळलीच नाही, असं म्हणावंसं वाटतं. १९९८मधलाच आवाज २०१८ मध्ये ऐकायचं साचलेपण कशासाठी? तोच आवाज वयाचा आब राखून नवीन फुलं फुलवत येतो, तेव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद वेगळ्याच तर्‍हेने मला तरी आला. अजूनही बर्‍याच जणांना आला. कारण काही झालं तरी लिंकिन पार्क इज लिंकिन पार्क. दे फील युवर पेन, रेज अ‍ॅण्ड फ्युरी ऑर नॉट.

मरणापूर्वी काही दिवस आधीचे तुझे व्हिडीओज तुझ्या मित्रांनी आणि बायकोने नंतर शेअर केले. तुझ्या चेहर्‍यावरचे तेव्हाचे भाव पाहून कधीच कोणाला वाटणार नाही, की हा माणूस असं काही करणार आहे. तुझ्या झुंजीविषयी जास्त काय म्हणू? ड्रग सोडवण्याबद्दल तुम्ही लिहिलेलं 'ब्रेकिंग द हॅबिट' माझं ऑलटाईम फेवरिट गाणं आहे.

I don't know how I got this way
I know it's not alright
So I'm breaking the habit
I'm breaking the habit tonight

हे म्हणून तू किती ताकदीने ती सवय सोडली होतीस, हे मला माहित आहे. डिप्रेशन आणि अ‍ॅन्क्झायटी हा असा राक्षस आहे, की तो कधीही समोर येऊन उभा राहतो, व आपण सर्वांनीच एकमेकांना धरून उभं राहिलं पाहिजे, हेच आता वाटतं. तुझ्या मित्रांनी त्यासाठी आता नवीन फंडही चालू केलेला आहे. मृत्यूनंतरही तू त्याद्वारे लोकांना मदतच करत राहशील, ह्यात शंका नाही. पण आता माझ्यासाठी काय उरलं? आपली जमलेली कॉन्सर्ट अशी अर्ध्यावरच सोडून तू गेलास. आता तूच म्हणालास तसं

Should've stayed, were there signs, I ignored?
Can I help you, not to hurt, anymore?

असं वाटतं. आता आम्ही कोणाकडे बघावं? काय करावं? कोणताही वेदांत, किंवा कोणतंही तत्वज्ञान, हे दु:ख हलकं करू शकत नाही रे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट झालेय. या संगीताची काहीच ओळख नसतानाही तुझे त्यांच्यावरचे निस्सीम प्रेम, ती अस्वस्थता आणि वेदना माझ्यापर्यंत पोचली.

फार सुंदर लिहीलंय. RIP Chester..
लिंकिन पार्क इज लिंकिन पार्क. दे फील युवर पेन, रेज अ‍ॅण्ड फ्युरी ऑर नॉट.>> +१०००

फार सुंदर लिहिलंयस आदित्य.
आत्महत्या करणाऱ्या कित्येक कलाकारांच्या कलाकृतींमध्ये असे पुरावे नंतर जाणवतात.
कदाचित त्यांची कला त्यांच्याकासाठी या सगळ्याचा निचरा करायला मदत करत असेल.

तुझं चेस्टरवर किती प्रेम आहे हे या लेखातून जाणवते आहे.

कळवळून लिहिलं आहे! मी पण ऐकलं नव्हतं लिंकिन पार्क. आता ऐकते आहे. जिमी किमल शोवर वन मोअर लाइट ऐकलं/पाहीलं होतं. खूप सच्चा पण अस्वस्थ स्वर होता त्याचा.

या संगीताची काहीच ओळख नसतानाही चेस्टरवरचे निस्सीम प्रेम, ती अस्वस्थता आणि वेदना माझ्यापर्यंत पोचली. लिखाण ज्या तळमळीने झाले ती भावना मलाही अस्वस्थ करुन गेली त्यामुळे पुढे , पुढे वाचत गेलो .

थँक्स सगळ्यांना. Happy ती वेदना तुमच्यापर्यंत पोचली, हे मला आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद. माबोच्या वाचकवर्गात अशा संगीताचे फारसे फॅन्स नसतील, पण तुमचा फीडबॅक माझ्यासाठी अनमोल आहे. गेले सहा महिने मी ह्या घटनेमुळे अस्वस्थच आहे, तिला अशी अवचित कधीतरी वाचा फुटली. हा लेख लिहून मलाच खूप छान वाटलं. असा स्वांत: सुखाय लिहिलेला हा लेख आहे. ह्या लेखामुळे लिंकिन पार्कला काही जणांनी डिस्कव्हर केलं असेल (बस्के, सई, वंदना) तर हेही मला वैयक्तिकरीत्या खूप भावलं. तुम्हा सर्वांचे खूप आभार मानतो.