पाऊलखाची वाट- अंधारी- खेतोबा - वाजंत्री

Submitted by योगेश आहिरराव on 10 January, 2018 - 02:30

पाऊलखाची वाट- अंधारी- खेतोबा - वाजंत्री

दसऱ्याच्या सुमारास अशोक मामांचा फोन आला, शुभेच्छा खुषाली वगैरे झाल्यावर मामांनी अंधारीचा विषय काढला. "कधी येताय, जायचे आहे ना !" मग काय नंतर लगेच आमचे मित्र जितेंद्रना फोन केला. 'लोहा गरम है मार दो हातोडा' यानुसार बेत पक्का केला. पण पाऊस उशिरा पर्यंत लांबल्यामुळे दिवाळीनंतर जायचे ठरवले. त्यात दिवाळीत वाघजाई घोडेपाडी घाटाचा ट्रेक जबरदस्त अनुभव देऊन गेला.
आता वेध लागले होते अंधारीचे. हळूहळू ऑक्टोबर हीटचा तडाखा कमी होत सकाळी थोडी का असेना थंडीची चाहूल जाणवू लागली होती त्यात जोडीला निर्रभ आकाश. अशावेळी घरात बसून राहणे शक्यच नव्हते. मी आणि जितेंद्र, जोडीला शिल्पा आमच्यात सामील झाली. त्यात हेमंत माझा चांगला जुना मित्र तयार झाला. सुरुवातीचे बरेचसे ट्रेक आम्ही एकत्र केले होते. कार्तिकी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी जितेंद्र हेमंत आणि शिल्पा चौघेही सकाळी लवकर निघून सुद्धा डुक्करपाड्यात पोहचेपर्यंत साडेआठ वाजले. मामांच्या अंगणात गाडी लावली, गावात कार्य असल्यामुळे अशोक मामा सोबत येऊ शकत नव्हते. पण आमच्यासाठी सोबतीला ‘काळूराम थोराड’ नामक कुणालातरी सांगून ठेवले होते.
मामा : "त्याला निरोप दिला होता, सकाळी सकाळी एकदा येऊन गेला. आता पत्ता नाही, चला पुढच्या वस्तीवर बघू तिथं असेल तो". चहापाणी आणि सामानाची आवराआवरी करून मामांना गाडीत घेऊन ठोंबरवाडीत गेलो.
तिथं उतरताच समोर होता तो रंगमंचासारखा भव्य अगदी पदरगड, भीमाशंकर, खेतोबा, नाखिंदा ते पाठीमागे पेठ किल्ल्यापर्यंत पसरलेला सह्याद्री. वातावरण खूपच उत्साहवर्धक, सकाळचे नऊ वाजत आले होते तरी हवेत थोडा गारवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश अजून काय हवं. आजचा ट्रेकही आम्हाला भरभरून देणार यात शंकाच नव्हती. मामांनी वाडीत दोन तीन ठिकाणी चौकशी केली पण काळूरामचा काही पत्ता नाही. पुन्हा गाडी काढून फार्म हाऊसच्या दिशेने निघालो, जवळ जाताच हे महाशय समोरून येताना दिसले. मग कुठे होता, चुकामूक, उशीर झाला वगैरे झाल्यावर मामांनी आमचा प्लान काळूरामला सांगितला. घोघोळ अंधारीचे नाव ऐकल्यावर त्यांनी स्पष्ट नकार दिला. सुरुवातीला विचित्र वाटले. पण मामांनी काळूरामला हे नेहमीचे फिरणारे आहेत, त्यांना थोडीफार माहिती आहे यांना व्यवस्थित घेऊन जा असे सांगितले.
आता आमची काळूराम सोबत चर्चेला सुरुवात झाली. वाजंत्री घाटाच्या दक्षिणेला घोघोळ अंधारीची वाट वर चढते. थोडक्यात पदरापर्यंत सुरुवातीची घोघोळ जी धबधब्यातून मोठमोठाले प्रस्तर पार करत चढणारी आणि पदरातून माथ्यापर्यंत जाणारी अंधारीची वाट ही दैत्यासूर धबधब्याच्या बाजूने डावीकडून थेट माथ्यावर जाते. आमच्या नियोजनाप्रमाणे आम्ही घोघोळ अंधारीची वाटेने माथा गाठून थेट खेतोबा पर्यंत जाऊन नंतर खेतोबा वाजंत्री घाटाने खाली परत असे ठरवले होते. पण रेंगाळलेल्या पावसामुळे सध्या घोघोळच्या नाळेतून निसरड्या मोठ मोठ्या दगडधोंड्यावरून जाण्याचं त्रासदायक आणि धोकादायक ठरू शकते असे काळूरामचे मत पडले. आम्ही सुद्धा फारसे आढेवेढे न घेता सहमती दर्शविली. अर्थात अश्या वेळी स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेत योग्य तो निर्णय घेणं हेच शहाणपणाचे ठरते.
मग दुसरा पर्याय नाखिंदा घाटाचा पण यंदाच्या आषाढात त्या घाटाने चढाई उतरांई दोन्ही झाल्या असल्यामुळे आम्हाला तरी ते मान्य नव्हते. मग काळूराम म्हणाला, "चला किल्याच्या वाटेनं"
मी : "मला डूक्करपाड्यातली वाट नकोय".
काळूराम : "दुसऱ्या वाटेनं जाऊ मंग वरून येढा घालू".
हा पर्याय ठीक वाटला, नवीन वाट बघायला मिळते तर. या सर्व गडबडीत एक भुभू आमच्या आजूबाजला घुटमळत होते. हेमंतने त्याला थोडे आंजरले गोंजारले, बघतो तर भुभु पण आमच्या वरातीत सामील झाले.
फार्म हाऊसच्या मागच्या बाजूने वाट हळूहळू सोंडेवर चढू लागली. सुरुवातीचा विरळ झाडी टप्पा पार करत ओढ्याच्या साथीने दाट जंगलात शिरली झक्क मळलेली वाट. नाव विचारलं तर, 'पाऊलखाची वाट' असे समजले.
व्यवस्थित दगडी रचाई आणि टप्याटप्यात ऊंची गाठत जंगलातल्या त्या वाटेने तासाभरातच पेठच्या पठारावर पोहोचलो. खरच ही वाट खुपच आवडून गेली. ओढ्यानजिकच नाश्तासाठी थांबलो. सोबत आणलेला उपमा, उकडलेले अंडे खात बराच वेळ रेंगाळलो.
‘लय मोठा येढा हाये’ असं जेव्हा काळूराम म्हणाला तेव्हा पटकन निघालो. खरच पेठ पठारावरून पदरातून वळसा घालुन दैत्यासुर रामखंड मग अंधारीची चढाई पुन्हा खेतोबाची घाट माथ्यावरची चाल शेवटी वाजंत्रीची उतरराई हा पल्ला तसा या दिवसांत मोठाच होता. उजवीकडची पेठवाडीची वाट सोडून डावीकडे वळालो.
किल्ला मागे पडून समोर नाखिंदा आणि कौल्याची धार तसेच माथ्यावरील पवनचक्की नजरेत आल्या. नाखिंदा घाटाची वाट उजवीकडे सोडून डावीकडची पदरातली आडवी वाट पकडली. काही अंतरावर जातो तोच एक कातळात खोदलेले कोरडे पाण्याचे टाके आणि बाजूलाच जनावरांना पिण्यासाठी केलेली सोय.
खरच हे सर्व अवशेष या पुरातन वाटांचे साक्षीदार, पूर्वापार व्यापारानिमित्त उपयुक्त ठरलेले नाखिंदा, कौल्या, बैलघाट, बैलदारा हे घाट आणि लगतचा कोथळीगड यांचा भक्कम पहारेकरी.
वाट काटकोनात वळुन घाटमाथ्याला समांतर अशा आडव्या पदरातून पुढे सरकत होती. कोथळीगड मागे पडू लागला आणि समोरच्या बाजूला घाटमाथ्यावर डोळे बारिक करून खेतोबा मंदिर शोधू लागलो. स्वच्छ हवेमुळे मंदीर सहज ओळखता आले. आमच्या आजच्या भटकंतीतला महत्वाचा टप्पा, त्यावरूनच अंदाज येत होता की अजुन बरीच चाल बाकी आहे. थोडे ईकडचे तिकडचे पाहू लागलो की मध्येच काळूराम बोलायचा, चला लय मोठा येढा आहे.
काय करणार स्वच्छ सूर्यप्रकाश, हवेतला गारवा, वाटेत लागणारे छोटे छोटे पाण्याचे ओहोळ, विविध कीटक आणि फुलांची रेलचेल त्यात जोडीला फोटोग्राफी मग थोडा वेळ जाणारच ना ! खरतर हेच क्षण अनुभवण्यासाठी आम्ही ईथवर येतो ! अन्यथा कुत्रं मागे लागल्या सारखे पळण्यात काय हाशिल ?
तसा कुत्रा आमच्यासोबत पण होता, पण तो मागे लागला नव्हता.
आम्ही निवांत थांबलो की तो सुद्धा शांतपणे पाण्याच्या ठिकाणी जाऊन स्वत: ला ओले करून घेत त्याचे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवत होता. काही खात असलो तरी जवळ येणार नाही, दिले तेवढेच खाणार एकंदरीत फार गुणी भुभू. पुढे वाटेत लहानसे झाप दिसले, आत डोकावले तर म्हशीचे रेडकू बांधून ठेवलं होतं. झापाची जागा फार छान, एकदम मोक्याचे ठिकाण डावीकडे कोथळीगड उजवीकडे दूरवर पदरगडापासूनची रांग, समोर काही अंतरावर दरी १८० अंशापेक्षा जास्त कोनातला नजारा.
अशा ठिकाणी मुक्काम पडला तर काय मजा येईल असे मनोमन वाटले. जितेंद्रनी तयार करून आणलेल्या लिंबू सरबतचे घोट रिचवत बराच वेळ ते पहात राहिलो. पदरातला हा टप्पा संपूच नये असे वाटत होते.
नाश्ता केलेल्या ठिकाणापासून दीड तासानंतर आम्ही दैत्यासूर धबधब्याचा पदरातल्या टप्प्यात आलो. इथूनच काही अंतरावर घोघोळची वाट येऊन मिळते. तसे पाहिले तर जर आम्ही घोघोळची नाळ चढून वर आलो असतो तर कदाचित कमीत कमी वेळात इथे आलो असतो पण त्याआधी घोघोळच्या पायथ्यापर्यंतची, वाजंत्रीच्या ओढ्यालगतची समांतर आडवी वाट पार करावी लागली असती. मग ही पदरातली रम्य चाल अनुभवता नसती आली तसेही वाजंत्री उतरून त्याच वाटेला समांतर जायचे आहे. सहाजिकच पदरातला हा वरचा मार्ग आणि पाऊलखाची वाट बोनस ठरली.
दैत्यासूरच्या मोठ्या ओढयाजवळ थोडा वेळ विसावलो. पुन्हा एकवार आजूबाजूचा नजारा डोळ्यात सामावून घेतला.
आता पुढची वाट याच नाळेतून अगल बगल देत जाणारी. मोठ मोठाले धोंडे काही ठिकाणचे पाण्याचे छोटे डोह चुकवत वर चढू लागलो.
नाळेतले जंगल चांगलेच दाट, वाटेत एका झाडावर मचाण दिसले.
उजवीकडे थोडी हालचाल जाणवली काही क्षणातच बऱ्यापैकी मोठी घोरपड सरसर आवाज करत पसार झाली. आणखी काही अंतर जाताच एका कातळावर कोरीव पायऱ्या.
इथेच एके ठिकाणी थांबून थोडा सुका खाऊ तोंडांत टाकला. मघाच्या घोरपडीचा विषय निघाल्यावर काळूराम यांनी शिकारीचे किस्से सांगितले. तसे पहाता अंधारीच्या वाटेला शिकारीसाठीच जात असण्याची शक्यता अधिक कारण जवळच्या वाजंत्री आणि नाखिंदा सारख्या सहज शक्य वापरातल्या वाटा असताना कोण या आडवाटेच्या नादी लागेल. नाळेतून वर चढत डावीकडचा कातळटप्पा पार करून डोंगरधारेवरची चढाई सुरु झाली.
थोडक्यात नाळेच्या डावीकडच्या बाजूने चढाई. अरुंद पायवाट, जोडीला घसारा आणि किंचित दृष्टीभय. आजुबाजुला काटेरी झुडुपे, झेड आकाराचे वळणे घेत बऱ्यापैकी ऊंची गाठली. कड्यालगतची ती वाट पार करून झाडीच्या टप्प्यात आलो. इथे पण काटेरी आणि त्यात खाज खुजली प्रकाराची जास्त. किती तरी वाचवायचा प्रयत्न केला तरी हाताला खाज सुटलीच. शिल्पाने त्या झुडूपाचा फोटो घेतला आणि त्या बद्दल राजकुमार डोंगरे यांच्याकडून खालील माहिती मिळवली.

"बिच्छु". नवीन एका रानफुलची आज माझा ज्ञानकोशात भर पडली! बिच्छु हे नाव खूपच इंटरेस्टिंग वाटलं म्हणून कुतूहलापोटी माहिती जाणून घेतली आणि डचकलोच. त्याचं काय आहे की, या झाडाची पानं-फुलं चावतात, डंख मारतात! तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
बरं हा डंख साधा-सुधा नाही, बसला की माणूस सैरभैर होतो. अगदी विंचू चावल्यासारखा. आणि म्हणून हिंदी भाषेत "बिच्छु" हे शोभणारं नाव असावं. उत्तरेत शेताच्या बांधावर याच्या बिया पेरतात, त्यामुळं पिकांचं भटक्या जनावरांपासून संरक्षण होतं. याव्यतिरिक्त ते औषधी सुद्धा आहे. सारखी लघवीला होत असेल, संधिवाताचा त्रास, ऍलर्जी, बाळंतीण बाईला दूध कमी येत असेल तर चांगल्या वाळवलेल्या पानांचा पाण्यामध्ये उकळून काढा केला जातो आणि तो दिला जातो. म्हटलं तर धोक्याचं आणि काळजीपूर्वक वापरलं तर कामाचं हे झाड म्हणावं लागेल.
पण, हे डंख कसं मारत असावं हा प्रश्न उरतोच. त्याचं असं आहे की, याच्या फुलांवर आणि पानांवर बारीक हिरवट पांढरे केस असतात आणि या केसांच्या खालोखाल तैलग्रंथी. या तैलग्रंथीमध्ये फोर्मिक ऍसिड असतं. प्राण्यांचा किंवा माणसांच्या त्वचेचा संपर्क वनस्पतीशी आला की या ग्रंथीमधून केसांद्वारे फोर्मिक ऍसिड सोडलं जातं. या ऍसिड मुळे कुणीतरी चावा घेतल्याचा भास होतो, खाज यायला सुरुवात होते. जितका अधिक वेळ संपर्क तेवढा जोराचा चावा अस्स समीकरण आहे. म्हणजे नुसता धक्का लागला तर मुंगी चावल्यासारखं वाटेल, पण जास्त वेळ संपर्क राहिला तर मधमाशी किंवा विंचू छावल्यासारखं वाटू शकतं. संपर्क अधिक काळासाठी राहिला तर अगदी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो.
निसर्ग मोठा चमत्कारिक आहे याचा प्रत्येय या "बिच्छु"ला पाहून येतो. बिच्छुला शास्त्रीय नाव 'Girardinia diversifolia' असं आहे. मराठी नाव उपलब्ध नाही आणि म्हणूनच मी ठरवलंय त्याचं आज बारसं करायचं! "विंचू" हेच त्याचं मराठी नाव.

बचके रेहेना रे बाबा, बिच्छुसे बचके रेहेना!!!

राजकुमार डोंगरे
माची इको अँड रूरल टुरिझम

या बद्दल शिल्पाचे आणि राजकुमार डोंगरे यांचे खास आभार.
झाडीभरली वाट पार करून ओढ्याच्या वरच्या भागात आलो. खाली नजर टाकली डावीकडे कोथळीगड आणि वाटेचा झाडीभरला पदर.
क्षणभर विसावा घेत, पुन्हा दाट जंगलातून चढाई. इथून पुढची वाट मात्र झक्क मळलेली. मध्येच कुणाचा तरी हुतात्मा म्हणून बॅनर लावलेला तसेच बाजूला चूल अर्धवट जळलेली लाकडे, काही तासांपूर्वी कुणीतरी येऊन गेले असावे. शेवटच्या वीस मिनिटात ही छातड्यावरची चढाई भलताच दम काढणारी निघाली. माथ्यावर आलो तेव्हा थक्क झालो खरोखर ज्यांनी अशा वाटा शोधल्या निर्माण केल्या त्यांना सलाम.
घाटमाथ्यावर उजवीकडे नखिंदा त्या भागातल्या पवनचक्की तर समोर गडाड्याचा डोंगर. लोणावळा भीमाशंकर मुख्य वाटेने खेतोबाकडे निघालो. लोणावळा भीमाशंकर लो भी विषय निघाल्यावर शिल्पाचा चेहरा चांगलाच खुलला. कैक वेळा लो भी ची वारी, कुसुर खांडी सावळा बद्दल तर काय बोलू नी काय नाही अशी तिची अवस्था. हा परगणा तिचे होम ग्राउंड म्हणायला हरकत नाही. त्यात काळूराम सोबत तिचे हा माळ तो माळ, धोत्र्याचा माळ, खेकड्याच्या माळ मग भुताचा माळ असं काहीतरी संभाषण सुरू होते. त्यात भुताचा माळ ऐकल्यावर माझे आणि हेमंतचे कान टवकारले गेले. मग आमची इन्स्पेक्टर महेश दणके, हवालदार टांगमोडे, भुताचा माळ पुलिसवाला सायकलवाला अशी भंकस सुरू झाली. लक्ष्या आणि त्याचे चित्रपट हा एक वेगळा विषय होईल असो.
गडाड्याच्या विहिरीजवळ जेवणासाठी थांबलो. उन्हाळा अखेर पर्यंतचा खेतोबा ते नाखिंदा टप्प्यातील हा एकमेव पाण्याचा साठा.
घरातून आणलेले श्रीखंड भाजी चपाती, पंधरा मिनिटांची पावर न्याप आणि दोन तीन जुनी हिंदी गाणी एवढ्या रिचार्ज वर खेतोबाच्या दिशेने निघालो. घड्याळ पाहिलं तर तीन वाजून गेले होते. इथून पुढे शिल्पाने लीड घेतली. झपाझप पाउले टाकीत निघालो.
भुभू तर मस्त पठारावर ईकडे तिकडे हुंगत पळतच सुटला, कदाचित त्याच्या ही मनात विचार आला असावा कुठे या येड्यांच्या जत्रेत फसलो. मध्ये एके ठिकाणी वादग्रस्त बांधकाम दिसले त्या बाजूने कच्चा रस्ता तांबडवाडीकडे गेला.
आम्ही सरळ मळलेल्या पायवाटेने मधला झाडी भरला ओढा पार करून पलिकडच्या पठारावर पोहोचलो. अवघ्या तासाभरात रणतोंडी धबधब्याच्या वरच्या बाजुला आलो, सरळसोट खाली झेपावलेली धार डावीकडे नखिंदाच्या पठारापासून सुटलेले कातळकडे समोर पेठचा किल्ला आणि उजवीकडे भीमाशंकर पर्यंतची रांग.
आता यापुढील टप्पा मिश्र स्वरूपाचा कधी रानातून, कधी उंच कारवीतून, तर कधी दरीच्या काठाने, तर कधी मोकळंवनातून. सायंकाळच्या सोनेरी सुर्यप्रकाशात ती चाल खूपच रमणीय.
वेळेच्या अभावी जास्त न रेंगाळत भरभर चालत होतो, पण खेतोबा काय लवकर येईना. माझे तर सारखे लक्ष घड्याळाकडे, वाजंत्री घाट उतरेपर्यंत अंधार पडणार हे तर जवळपास पक्के झाले.
बरोब्बर पाच वाजेच्या सुमारास मुख्य वाट सोडून डावीकडे वळालो, काही अंतरावर मुख्य कड्यालगत खेतोबाचे मंदिर नजरेत आले.
थोडक्यात गडाड्याच्या विहिरीपासून इथे यायला वेगात दौड मारून सुद्धा दोन तास लागले.
यंदाच्या वर्षात माझी खेतोबाला दुसरी भेट, जानेवारीत झेनोश पटेल सोबत आंबेनळी भोरगिरी खेतोबा शिडी घाट असा ट्रेक केला होता.
त्यात जितेंद्र यांनी पण हाच ट्रेक आधी दोन वेळा केला तसेच शिल्पाने खेतोबा शिडी आणि खेतोबा वाजंत्री या दोन्ही वाटेने चढाई उतराई केली होती, अर्थात हा परिसर आम्हा तिघांना ही परीचयाचा त्यामुळे अंधाराचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हताच. पुरेशी सावधगिरी बाळगून सावकाश उतरणे एवढेच ध्यानात घेतले. खेतोबा जवळपासच्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान, नवस बोलून कोंबडा कापणे तसेच चुकलेल्या वाटसरू यांना वाट दाखविणे अशा काही आख्यायिका खेतोबा बद्दल आहेत.
आकाशात सूर्यास्ताच्या छटा रंगायला सुरुवात झाली.
इथे उभे राहूनच पुन्हा एकदा उलगडला तो आमचा दिवसभराचा पॅनोरमा, पाऊलखाची वाट कोथळीगडाचे पठार ते रामखंड पर्यंत पसरलेला हिरवा झाडीतला पदर वर नाखिंदा पासून या खेतोबा पर्यंत तसेच उत्तरेला नागफणी टोक ते पदरगडापर्यंतची सह्यशिरोधारा खरच सारे लाजवाब. निघावेसे वाटत नव्हते पण पर्याय नव्हता, पटकन डाळिंब आणि बिस्किटे तोंडात टाकली. यावेळी मात्र भुभू बिस्किटे पाहून जवळ आला, चालून पळून तोही दमला होताच. भुभूला खाऊ घालून साडेपाचच्या
सुमारास खेतोबा उतरायला सुरुवात केली.
घाटाची सुरुवात सहसा लक्षात न येणारी कातळाच्या बेचक्यातून अलगद उतरणीला लागली. थोडे उतरताच झाडीभरली घळ दक्षिणोत्तर तिरक्या रेषेत टप्याटप्प्याने पदरात उतरते.
मध्येच एके ठिकाणी थांबून कोथळीगडाच्या मागे सूर्य अस्ताला जाणारे दृश्य पाहून थक्क झालो. छोट्या टप्प्यातील घसार्याची वाट पार करून झाडीभरल्या पदरात उतरलो.
उजवीकडची रानमळा शिडीची वाट सोडून डावीकडच्या आडव्या वाटेने वाजंत्री घाटाच्या दिशेने निघालो. संधिप्रकाशात त्या पदरातल्या जंगलातून वाटचाल एक वेगळाच अनुभव. वीसेक मिनिटात मोकळवनात आलो. समोर रणतोंडी धबधब्या जवळील घळी धडकी भरवणार्या.
इथून पुढे वाट उजवीकडे वळून खाली उतरू लागली. जवळ टॉर्च होत्याच म्हणून फारसा त्रास झाला नाही. पण काय माहित बहुतेक टॉर्चच्या उजेडामुळे भुभू मात्र पायाच्या अधेमधे येऊ लागले. सावधपणे उतराई पूर्ण करून खालच्या भागात आलो. वाटेत एका ठिकाणी मोठा ओढा पार केला हा टप्पा मात्र काळूराम ने बरोब्बर शोधला. अन्यथा घाट उतरने परवडले पण मैदानात आल्यावर अंधारात ओढा पार करणे अवघड झाले असते. पुढे बैलगाडीचा कच्चा रस्ता लागला. जामरुख डोंगर उजव्या हाताला ठेवत आम्ही सराईवाडीत आलो तेव्हा बहुतेकांच्या प्रश्नार्थक नजरा आमच्यावर. सराईवाडीतली दोन चार कुत्री आमच्या भुभू वर धाऊन आली जितेंद्र यांनी त्यांना काठीने पळवुन लावले. तसेच पुढे डुक्करपाड्यात पोहचलो तेव्हा आठ वाजले होते. अशोक मामांचा जेवणासाठी खूपच आग्रह नम्रपणे नकार देऊन फक्त चहा घेतला. भुभू मात्र आम्हाला सोडत नव्हता, अगदी गाडी पर्यंत आमच्यासोबत. निघताना पुन्हा पुन्हा नजर भव्य सह्याद्रीकडे जात होती, चंद्राचा शीतल प्रकाश त्यावर पसरत होता आणि मन मात्र खेतोबा वर रेंगाळत होते.

नोंद : डुक्करपाडा- पाऊलखाची वाट- रामखंड - अंधारी- खेतोबा - वाजंत्री - सराईवाडी- डुक्करपाडा ही २६ किमी तंगडतोड आणि जवळपास ८०० मी. हून अधिक चढाई उतराई एका दिवसात केली.
यात काही मोठेपणा बिलकुल नाही. अगदी हिवाळ्याच्या दिवसांत वेळेचे काटेकोर नियोजन करुन सर्व भिडू अनुभवी आणि चालनारे असतील तर सहज शक्य आहे. अन्यथा एक दिवस मुक्काम करून ट्रेक अजुन छान अनुभवता येऊ शकतो.

फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2017/11/paulkha-andhari-khetoba-vajantr...

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users