जात आहे मी जिथे तेथे कुणाचे घर नसो-तरही

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 January, 2018 - 23:31

ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून ..

डांबणारा उंबरा अन ठेंगणे छप्पर नसो
(जात आहे मी जिथे तेथे कुणाचे घर नसो)

अंतरावर ठेव जितके पाहिजे तितके तुला
पण तुझ्या-माझ्यामधे तिसऱ्या कुणाची भर नसो

जीवना ताज्या दमाने सेट कर पेपर तुझा
त्याच त्या प्रश्नावलीतिल तेच ते उत्तर नसो

तीर्थयात्रा घडविणारा एक श्रावणबाळ दे
कौरवांच्यासारखे योध्दे भले शंभर नसो

द्यायचे तर प्राण दे वा घ्यायचे तर प्राण घे
मामल्यामध्ये मनाच्या बेगडी जर-तर नसो

तू तुला खंबीर कर पश्चात त्याच्या एवढे
पाठ राखाया तुझी माहेर वा सासर नसो

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users