आवरू केव्हातरी सारा पसारा - तरही

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 January, 2018 - 15:48

ओळीसाठी बेफिजींचे आभार मानून

जन्मणे-मरणे... निरर्थक येरझारा !
(आवरू केव्हातरी सारा पसारा )

काळजीने ते तुझे व्याकूळ होणे
केवढा अप्राप्य झाला हा नजारा

आठवण येते अशी वेळीअवेळी
टपटपाव्या ऐन वैशाखात गारा

कोणत्या दिव्यातुनी भेटीस येतो ?
पावसाच्या एक थेंबाला विचारा

मान्य करते की तुझ्या प्रेमात पडले
रोखण्याला रोग असतो ना फवारा ?

कल्पनेमध्येतरी होशील माझा ?
वास्तवामध्ये असेना बेसहारा !

घे लपेटुन घट्ट अंगाभोवताली
ओढणीमध्ये ' प्रिया ' शिरतोय वारा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users