बोकलवाडीच्या सेंट परषु महाविद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापक दाबे साहेबांचा दराराच तसा होता. अक्कड मिशा, फेंदारलेले नाक, चेहऱ्यावर विक्राळ भाव आणि अंगात हुप्या माकडासारखी मस्ती. शाळेला भेट देणाऱ्या कुठल्याही बेसावध पालकाला दाबे साहेब एक मुख्याध्यापक न वाटता पॅरोलवर सुटलेला अट्टल दरोडेखोर वाटून ते दचकत असत. त्यांच्या या कल्ट पर्सनॅलिटी मुळे शाळेतले सगळेच बापडे मास्तर लोक दाबे सरांना दबून असत. अजिबात ज्ञान नसलेला उच्चपदस्थ मनुष्य जसा सतत काहीही बिनडोक चुका काढून हाता खालच्या हुशार माणसाला नामोहरम करतो नेमके तेच दाबे साहेबांचे दबाव तंत्र होते.
नालायक आणि अभ्यासू दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या पाठीत अकारण बुक्की घालण्यात त्यांना एक अवर्णीय आनंद मिळत असे. स्टाफ मिटिंग मध्ये तर अखंड मिशा पिळीत वाद घालत बसण्यात त्यांचा हातखंडा होता . कुणी स्टाफने कधी चुकून माकून दिलेली चांगली सूचना कशी अत्यंत बिनडोक आहे हे आरडाओरडा करत सांगितले तर ते समोरच्याला लगेच पटते हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. अनेक निष्पाप मास्तर आणि मास्तरणी स्टाफ रूम मध्ये दाबेच्या झापण्यामुळे ढसढसा रडल्याच्या करूण कथा साने गुरुजींच्या फोटो मागच्या मूक भिंती आनंदाने सांगतील. अशा या खविस दाबे साहेबांच्या हाताखाली कुणी म्हणजे कुणीच टिकत नसल्याने अर्थातच त्यांचा शिपाई म्हणून निवड झाली तेव्हा मला विशेष अभिमान वाटला हे वेगळे सांगायला नको. लहानपणा पासूनच मला राकट, बिनडोक, धसमुसळा, कोडगा वगैरे विशेषणे ऐकण्याची सवय होतीच त्या मुळे दाबे साहेबांच्या आरड्याओरड्याला घाबरणारा मी गडी नव्हतोच. माझा फक्त एकाच प्रॉब्लेम होता ते म्हणजे मी दिवसातून तीनचार वेळा तरी कशाला ना कशाला अडखळून पडत असे. लहानपणा पासूनच माझ्या धांदरट स्वभावामुळे ही अशी धडपडण्याची सवय मला होती. तसा बाकी मी भक्कम गडी असल्याने मला मामुली खरचटण्या पलीकडे फारसे काही होत नसे.
आजच सकाळी साहेबानी चार पाच वेळा टाळलेली वार्षिक पगार वाढीची स्टाफ मिटिंग भरायला एकदाचा मुहूर्त लागला. चहा देण्याच्या निमित्ताने मी पण खोलीतच घुटमळत होतो. या वर्षी तरी बरा पगार वाढेल या आशेवर अंगचोरून बसलेल्या सर्व मास्तरांना आपल्या अक्कडबाज मिशा पिळत साहेब म्हणाले.
"तर मला असे कळले आहे की तुम्हाला सर्वांना पगार वाढ पाहिजे आहे, बरोबर?" सर्वांनी पटापट मुंड्या हलवल्या.
"छान अगदी छान कुठल्याही लायक शिक्षकाला किंवा शिक्षिकेला पगार वाढ मिळायलाच हवी." सर्वांनी हसरे चेहरे करत पुन्हा पटापट मुंड्या हलवल्या.
"छान छान, प्रथम मला काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही सर्वांनी खडू पहिलाच असेल?"
काही लोक साहेब विनोद करताहेत म्हंणून सगळेच खो खो हसले. दाबेचा विनोद म्हंटल्यावर तर पाटील मास्तर जरा जास्तच वेळ हसले. मग एकदाचे ते खोकत दमून थांबल्यावर. मराठीच्या भक्कम कवियत्री कुसुमवल्ली बाई म्हणाल्या. "इश्श, म्हणजे काय सर एका शिक्षकाला खडू कसा माहीत नसेल? ... खडू म्हणजे काही जणू काही शिक्षकाचे अकरावे बोटंच."
सर्वांनी पुन्हा लगेच अनुमोदनपर पटापट मुंड्या हलवल्या एक दोघांनी तर उदाहरण म्हणून करंगळी पण वर केली मग लगेच चूक लक्षात येऊन बदलून मधले बोट वर केले.
साहेब त्या कडे दुर्लक्ष करत पुढे म्हणाले.
"अरे वा छान छान अकरावे बोट म्हणजे खडू काय ..वा वा छान उपमा दिली आहे वसकवल्ली बाई "
"वसकवल्ली नाही सर कुसूमवल्ली ... कुसुमवल्ली" बाई लाजत म्हणाल्या
"हो हो तेच म्हणायचे होते मला कुसुमवल्ली... तर मग मला आपल्या पैकी कुणीही माझ्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या ?" असे म्हणत साहेबानी बेसावध कुत्र्यावर थंड पाणी टाकावे तशी खालील प्रश्नांची सरबत्ती केली:
-"प्रश्न एक, एका महिन्यात एक शिक्षक किती खडू वापरतो?"
-"प्रश्न दोन, एका खडूची लांबी किती मिलीमीटर असते?"
-"प्रश्न तीन, एका खडूने कुठली अक्षरे जास्त लिहिता येतात? इंग्रजी,हिंदी की मराठी?"
-"प्रश्न चार, एका खडूचे सरासरी वजन किती ग्राम असते?"
एवढे बोलून साहेबानी सर्वांकडे रोखून पहिले. आता स्टाफरूम मध्ये भीषण शांतता पसरली. एकाही मास्तरला उत्तर देता येईना. मघाशी जोरात हसणाऱ्या पाटील मास्तरनी तर असा मोठ्ठा आ वासला की त्यांच्याच चहाच्या कपा वरच्या दोन माशा त्याच्याच मुखात जाऊन सहीसलामत परत आल्या. चित्रकलेच्या नयन बाई आणि इतिहासाच्या कोमल बाई तर स्फुन्दू स्फुन्दू रडू लागल्या. गणिताचे मास्तर अवघड गणित घातल्यावर आपलेच विद्यार्थी करतात तसेच पुटपुटत उगाच बोटावर काही तरी आकडेमोड करू लागले. बाकीचे शिक्षक सिनेमाच्या मॉब सिन मध्ये नेमके काय करावे हे न कळल्यामुळे म्हंटले तर हसतोय अन्यथा रडतोय असे चेहरे करून बसले.
यावर दाबे साहेब दाबात म्हणाले
"आत्ता काय झाले सगळ्यांना थोबाड पाडून बसायला? मी काय अवघड फार प्रश्न विचारला का? सध्या खडू बद्दल प्रश्न विचारला ना? रोज वापरताना तुम्ही? बरोबर का चूक?" सगळयांनी नंदी बैला सारख्या माना हलवल्या.
"मग तुम्हाला एकाला तरी यातले एखादे तरी उत्तर यायला नको? बोला? अरे बोला ना???"
(भीषण शांतता)
मग आवाज आणखी चढवत दाबे साहेब म्हणाले,
"आता समजली तुम्हाला तुमची सर्वांची अक्कल? अरे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाली तुम्ही शिक्षक आहेत आणि तुम्हाला तुम्ही जी गोष्ट रोज वापरता तिच्या बद्दल माहिती नाही?"
बरेच जण खाली माना घालून अंगठ्याने जमिनी उकरू लागले
"म्हणे अकरावे बोट, काय हो वसकवल्ली बाई किमान तुम्हाला तरी उत्तर यायला हवे ना?" कुसूमवल्ली बाईंनी डोळ्याला पदर लावला.
"देव जाणे तुम्ही शिक्षक लोक इतकी वर्षे विद्यार्थ्यांना काय शिकवत असाल ते! आता तुम्हीच सांगा कुठल्या कारणाने तुम्हाला पगारवाढ द्यायची? हसे होईल हसे जर बाहेर ही गोष्ट कळली तर की बोकलवाडीच्या शिक्षकांना खडूचे वजन किती असते ते पण माहीत नाहीये, बरोबर ना?"
पुन्हा एकदा सगळ्या मास्तरांनी माना डोलावल्या. कुसूमवल्ली बाईंनी तर आता जवळपास हंबरडाच फोडला. मग दाबे साहेब म्हणाले
"कीव वाटते मला तुमच्या अज्ञानाची. चला निघा आता. पुन्हा माझ्या समोर याल तेव्हा अभ्यास करून येत चला. लाज वाटत नाही पगार वाढ मागायला? " सगळा स्टाफ क्षणात खोलीतून नाहीसा झाला.
सगळे बाहेर पळाल्या बरोबर साहेबानी माझ्या कडे विजयी मुद्रेने पहिले मी लगेच लोचटपणे म्हणालो.
"वा साहेब चांगली जिरवली तुम्ही याची, साहेब तुम्हाला तुमचा आवडता डबल उकळलेला चहा आणू?
साहेबांची मुद्रा आनंदी झाली. मग मी हळूच म्हणालो
"सर लायब्ररीत नव्या पुस्तकाचा स्टॉक आलाय दोन चार पुस्तके घरी देतो पाठवून." मला माहिती होते की साहेब साधारण पणे लग्ना मुंजीत पुस्तकेच भेट देतात. मी कुठल्याही जातिवन्त शिपाया प्रमाणे साहेबांना बातम्या पुरवीत असे त्या मुळे आपली नौकरी शाबूत राहते एव्हढे व्यवहार ज्ञान मला नक्कीच होते.
"अरे वा आला का स्टॉक छान छान..." असे म्हणत साहेब खुशीत हसले आणि लगेच भयंकर चेहरा करून म्हणाले
"जा आता चहा घेऊन ये फक्कड आणि जाताना लायब्ररीयन डिसूझा मॅडमला पाठव ताबडतोब" असे जेव्हा साहेब ओरडले तेव्हा मी तात्काळ बाहेर पळालो.
साहेबांचा आवडता डबल उकळता चहा घेऊन येताना पायऱ्यांवर मी दोनदा धडपडलोच पण नशिबाने चहा सांडला नाही. मध्ये एक शिक्षकांचा घोळका दिसला म्हणून थांबून बघतो तर लायब्ररीयन डिसूझा मॅडम रडून रडून इतरांना सांगत होत्या की दाबे साहेब त्यांनाच म्हणतात की लायब्ररीची गहाळ झालेली पुस्तके त्यांनी चोरली. मी लगेच तिथून सटकलो. साहेबांच्या खोलीत धापा टाकत कधी एकदा ही डिसुझा बाई ढसा ढसा रडतीये ही बातमी साहेबाना सांगेन या आनंदात पायपुसण्याला अडखळून डायरेकट खुर्चीवर बसलेल्या दाबेच्या सरच्या मांडी वरच डबल उकळता चहा ओतला. टिरीवर मधमाशा चावलेल्या कुठल्याही माकडा प्रमाणे अप्रतिम बोंब ठोकत दाबे साहेबानी अख्ख्या खोलीभर ता ता थैय्या नाच केला. मला इतके हसू आले की ज्याचे नाव ते पण मी मोठया मुश्किलीने हसू आवरून त्वरित नम्र सेवकापणे मान खाली घालून शिव्या खाल्ल्या. माणसाने चूक झाल्यावर ती कबुल करायलाच हवी असे माझे प्रामाणिक मत आहे. आता झालेल्या चुकीची दुरुस्ती म्हणून मी साहेबांना म्हणालो "साहेब आपण आपली पॅन्ट आणि शर्ट मला काढून द्या मी शाळेच्या हौदावर धुवून आणि इस्त्री करून आणतो."
"वारे वा शहाणाच आहेस की आणि मी काय इथे असा उघडाच बंब बसू? कुणी स्टाफ मधले आले तर काय प्रतिमा होईल माझी?"
"तसे नाही साहेब मी येतोच की दहा मिनिटात." मग मला एकदम फक्कड युक्तीच सुचली
"आपण असं करू साहेब माझ्या मित्राचे मेन्स पार्लर आहे त्याला घेतो बोलावून जरा फेशिअल बिशिअल करून घ्या तोवर टाइम पण जाईन आणि काम पण होईल कसं?"
"आयडिया चांगलीये पण त्याचे पैसे कोण देईल बे?"
"पैसे मी देतो की साहेब."
मग मात्र साहेबाना माझी आयडिया चांगलीच पटली.
मी लगेच माझा मित्र साधूनाथला बोलावून घेतले तो साहित्य घेऊन पाच मिनिटात हजर झाला. त्याला मी बजावले आपल्या साहेबांची मस्त दाढी, फेशिअल, हेड मसाज करायचा एकदम स्पेशल!
मला मनातल्या मनात शिव्या घालीत साहेबानी आपला पॅन्ट-शर्ट काढून मला दिली आणि फॅन फुल्ल करून पंख्याखाली दोन्ही मांडीवरच्या ताज्या गुटगुटीत टम्म फोडांना हवा देत बसले. खरे म्हणजे त्यांची बमबाट ढेरी,चट्टेरी पट्टेरी अंडरवेअर त्यातून लटकणारा गोंडस नाडा आणि भोके असलेली मळकट बनियन या मुळे साहेब मजेदार दिसत होते पण ही वेळ हसायची नव्हती आणीबाणीची होती .
"आलोच साहेब" असे म्हणून मी धावत शाळेच्या हौदापाशी गेलो तर हौदात नेहमी प्रमाणे पाणीच नाही. मग मी तसाच धावत नदी वर गेलो. नदीपासच्या एका झाडाखाली तीर्रटचा डाव रंगात आला होता. मला बघितला की भिडू लोकांनी मोठया प्रेमाने मला बोलावून घेतले.
"अरे आव आव बद्रीसेठ" असे म्हंटल्यावर मलाही त्यांचे मन मोडवेना. चहा चिलीम करत उगा आपले पाच दहा मिनिट खेळूत म्हणता म्हणता सगळेच पैसे हरलो.
मग मी पण जिद्दीला पेटलो आपली कष्टाची कमाई मी थोडीच अशी जाऊ देणार भिडूलोक पण दिलदार पैसेच उरले नाहीत म्हंटल्यावर द्रौपदी सारखी साहेबांची पॅन्ट-शर्ट डावाला लावू द्यायला तयार झाले.
पंधराच मिनिटांनी आता शाळेकडे हात हलवीत निघालो तर डोक्यात एकच विचार होता साहेबाला पँटशर्ट कुठे गेले म्हणून काय सांगायचे? शेवटी खूप विचार करून ठरवले की धुवून वाळत टाकल्या वर गाईने चुकून खाल्ले असे खोटेच सांगायचे. आता साहेब गो मातेचे नाव घेतल्यावर काही म्हणणार नाहीत असे मला वाटले. आजचा दिवसच वाईट या पुढे उठल्यावर आरशात जन्मभर पाहायचेच नाहीच असे मी मनाशी ठरवूनच टाकले . पण म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी. शाळेत आलो तर साहेबाच्या खोली बाहेर ही तोबा गर्दी. त्याचे काय झाले मी बाहेर पडल्यावर साहेबाची दाढी करून गप्प बसावे ना, जरा मिशा अड्जस्ट करतो म्हणत मिशा बारीक करताना मूर्ख साधुनाथने वस्तऱ्याने साहेबाच्या पिळदार मिशा एकी कडे लांब झाली म्हणून दुसरी कडे कमी करत करत पार हिटलर सारख्या करून टाकल्या. तरी नशीब समोर आरसा नसल्याने साहेबाना लगेच कळले नाही. साधूनाथ महाराज आपल्या चुकी मुळे घाबरून घाईघाईत साहेबाच्या तोंडाला हिरवे फेशियल फासून लघवी करून येतो म्हणून जो बाहेर पडला तो परत आलाच नाही. तरी बर जाताना दाराला बाहेरून कडी लाव असे साहेब म्हणाले होते.
एक पंधराच मिनिटांनी कुसूमवल्ली बाई आज अर्धा दिवस सुट्टी पाहिजे म्हणून दाबेच्या खोलीत गेल्या आणि तिथे बसलेल्या हिरव्या तोंडाच्या राक्षसाला पाहून ओरडत पळतच बाहेर आल्या. त्यांच्या ओरडण्याने लोकं जमा झाले. कुसूमवल्ली बाईंनी शक्य तितक्या रंगतदार पध्धतीने जे काही वर्णन केले त्या वरून सगळ्यांना कळाले की चड्डी बनियन गॅंग मधला चोरटा साहेबांच्या खोलीत आहे. मग ताबडतोब लोकांनी साहेबांच्या खोली कडे धाव घेतली तर काय आस्चर्य नालायक चोरट्याने आतून कडी लावलेली. मग शिक्षकांनी धक्के मारून दरवाजा उघडला तर तो हिरव्या तोंडाचा चोर खिडकीतून उडी मारून लायब्ररीच्या दिशेने पळाला होता म्हणे. आता लोकांना कळले कि पुस्तकचोर कोण आहे तो बिचाऱ्या डिसुझा बाई वर आळ.
आता मग मी पण दोन चार दांडग्या शिक्षका बरोबर लायब्ररीची रॅक धुंडाळू लागलो. दुसऱ्या मजल्यावर एका कोपऱ्यातल्या रॅकपाशी शोधताना मी एकटा आहे हे पाहून मला साहेबानी हळूच शुक शुक केले आणि लाचार आवाजात म्हणाले "अरे बद्री मी आहे मी दाबे सर .... कसेही कर आणि या लोकांना बाहेर काढ फार इज्जतीचा पंचनामा झालाय. हे मला चोर समजतात आता जर मला धरलं तर फार हाणतील रे."
मी पण आश्चर्याचा धक्का बसल्याची ओव्हर ऍक्टिंग करत म्हणालो "अरेच्या सर तुम्ही?" काळजी करू नका साहेब मी करतो काही तरी, लोक फार खवळलेत. तुम्ही आता इथेच गुमाने लपा इथंच मध्यरात्री येऊन बाहेर काढतो तुम्हाला." त्यावर साहेब म्हणाले, "बर बर पण माझे कपडे तर दे की लेका"
मग मात्र मी प्रामाणिकपणे मनाशी ठरवल्या प्रमाणे सांगितले की साहेब कपडे वाळत घातले तेव्हा तुमचे कपडे गाईनी खाल्ले. हे सांगताच साहेब जे भडकले ते आपली परिस्थिती काय आपण बोलतो काय हे विसरून मलाच शिव्या शाप देऊ लागले. म्हणतात ना ज्याचे करावे भले तो म्हणतो आपलेच खरे. या जगात खऱ्याचा वाली नाही!
मग मात्र मी सरळ खाली आलो आणि प्रामाणिक पणे गर्दीला सांगितलं की चोट्ट नेमके कुठे लपले आहे. मग काय विचारता महाराजा लोकांनी हिरव्या तोंडाच्या चोरट्याला रानटी सावज धरावं तसं सिमेंटच्या पोत्यात घालून लाथा बुक्क्यानी कुटले की ज्याचे नाव ते. साहेबाना भरपूर वेळ मारल्या वर मग मीच ओरडलो "अरे हे तर आपले दाबे सर!"
चार दिवसांनी मी साहेबाना भेटायला फुले घेऊन दवाखान्यात पाचव्या मजल्यावर प्रायव्हेट खोलीत गेलो तेव्हा अंगभर प्लास्टर घातलेले हिटलर छाप मिशीचे साहेब मोठे गमतीदार दिसत होते. कुणास ठाऊक पण मला बघून साहेब रागाने एकदम लालीलाल झाले. वेड्या सारखे अद्वातद्वा शिव्या देऊ लागले. नालायक माणसा तुझ्यामुळेच माझे हे असे भजे झाले असे म्हणू लागले. मला वाटते औषधाचा परिणाम असणार नाहीतर एव्हढे राग येण्या सारखे मी काय बरे यांचे घोडे मारले? तेव्हढ्यात खोलीत एक सुंदर नर्स आली म्हणून मग मी आणि दाबेसर दोघेही परिस्थिती विसरून तिच्याकडे एकटक बघू लागलो तर ती नर्स माझ्यावरच वसकली "अहो त्यांच्या ऑक्सिजनच्या नळी वरून बाजूला सरका" अरे बापरे! मग मात्र मी घाबरून घाई घाई ने बाजूला सरकायला गेलो आणि नेहमी प्रमाणे अडखळून साहेबांच्या पलंगाच्या पायाकडच्या बाजूवर धप्पकन पडलो आणि काय आस्चर्य महाराजा माझ्या वजनाने साहेब नळ्या सिलिंडर सकट जे काही उडाले ते सरळ खिडकीतून बोंबलत सूर्राट रॉकेट सारखे बाहेर गेले.
मग जेव्हा मी आणि नर्स बाईने खिडकीतून वाकून पहिले तर प्लास्टर मध्ये गुंडाळलेले आदरणीय दाबे साहेब एका कचऱ्याच्या ट्रकवर निपचित आडवे पडून कचऱ्याच्या ढिगा सोबत लांब लांब जाताना दिसले!
कसलं भारिये हे
कसलं भारिये हे

भन्नाट लिहिलय. डोळ्यासमोर उभं
भन्नाट लिहिलय. डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं.

खुप हसू आलं.
वसकवल्ली बाई.
बोकलवाडी????
बोकलवाडी????
Submitted by बोकलत >> बोकलत तुम्ही दाबेसरांचे विद्यार्थी का?
मस्त
मस्त
म्हाळसा पुष्कळ लिहिला आहे
म्हाळसा पुष्कळ लिहिला आहे बाकीचे पण वाचा. मजा येईल तुम्हाला.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/62912
(No subject)
Pages