अनवट वाट २

Submitted by अनाहुत on 7 January, 2018 - 22:44

सुरेखा , तिचं नाव येताच मनात कालवा कालव झाली . ती मनात होतीच कायमची पण फक्त माझ्या समोर, पण आज असं दुसऱ्यांकडून ऐकताना बरंच वेगळं वाटलं . खरंच मी थोडं धाडस करायला हवं होत का ? या समाजाला , घाबरून कि इतर काही . कि ते नेहमीचंच लोक काय म्हणतील या विचाराने ? त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आता परिस्थिती वेगळी आहे . तेव्हा सगळे नातेवाईक, भावकी या सगळ्याच्या विरुद्ध होती . आणि त्यांचा मान कि मन राखण्यासाठी कि आणखी कश्यासाठी आज आम्ही सोबत नाही . पण हे सगळे तरी कुठायत आता आमच्या सोबत आता प्रत्येकजण आपापल्या कामात , परिवारात व्यस्त आहे आणि मी मात्र त्यावेळी ....

" अहो कधी येणार आहेत साहेब ? " बराच वेळ वाट पाहून कंटाळलो होतो म्हणून विचारलं त्याला

" येतील कि " त्यानं थोडक्यात उत्तर दिल .

" अहो पण कधी ? "मी

" येतील हो . " त्याच तेच परत .

" मी किती वेळ वाट पाहायची त्यांची ?" मला थोडा राग आलेला , तो व्यक्त केला .

" काम कुणाचं आहे ?" त्यानं आता मात्र जिव्हारी मारलं होत .

" माझं . " उत्तर देणं भाग होत .

" मग थांबा " तो तयारच होता माझ्या उत्तरासाठी .

" तस नाही पण किती वेळ कळलं असत तर बर झालं असत " मी माझी शंका व्यक्त केली .

त्यानं अशा काही नजरेने पहिले कि मला म्हणावंच लागलं,

" नाही मी बघतो वाट "

मग त्याच्या चेहऱ्यावर थोडं समाधान आलं . आपलच काम आहे त्यामुळे थांबणं भाग होत . थोडा इकडं तिकडं फिरत विचार करत वेळ घालवत होतो . मन हळूहळू भूतकाळात जात होत .

" तू राहशील का रे माझ्या सोबत आयुष्यभर ? "

" हो राहीन ना . का पण ? तुला असा प्रश्न का पडला ? "

" असच विचारलं ? " तिनं आपलं डोकं माझ्या खांदयावर टेकवलं,

" तुझा हा हात आहे ना माझ्या हातात तो असाच राहूदे आयुष्यभर , सगळ्या सुखात सगळ्या दुःखात तुला साथ देईन मी "

" मी सोबत असताना तुला कुठलही दुःख होऊ देणार नाही, तुझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही "

कुणीतरी पाठीमागून खांद्यावर हात ठेवला .

" देवा कुठं तंद्री लागलीय "

डोळ्यातल पाणी पुसत उठलो .

" आं, डोळ्यात पाणी काय झालं हो ? "

" नाही ते असच "

" बर मी काय म्हणत होतो , ते सायब येणार नाहीत आज "

" अहो काय म्हणताय, मी इतक्या दुरून आलो, इतकी वाट पहिली आणि आता तुम्ही म्हणताय ....."

तो तसाच मक्ख चेहऱ्याने बघत होता, मी माझं वाक्यही अर्धवटच सोडलं .

" बर मला इथं राहावं लागेल आज . इथं कुठं राहण्याची सोय होईल का ?"

त्याच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटली . आता पुढं काही विचारण्यापेक्षा गेलेले बर म्हणून निघालो तिथून .

" अवो हे कुठं शहरगाव आहे कि राहायला हॉटेल मिळेल . "

मी विचारलं कुठं होत याला जे हा सांगतोय . मी निघालो तसाच .

तेव्हढ्यात मागून एक भारदस्त आवाज आला

" ऐ पावन, थांबा जरा "

मी मग वळून पाहिलं जेव्हढा भारदस्त आवाज होता तेव्हढाच भारदस्त माणूस उभा होता.

" आमच्याकडं तुमच्यासारखी हॉटेल नसली तरी आमच्या मनात बरीच जागा आहे आणि काम काय होत राहतील पण गावाचं नाव राहील पाहिजे . या, आज मुक्काम आमच्याकडं करा ."

" नाही म्हणजे नको"

" का काही त्रास हाय का ? "

" नाही त्रास असं नाही पण तुम्हाला कशाला त्रास "

" त्रास बीस काय नाय या तुमी "

शेवटी पर्याय नसल्यामुळं गेलो त्यांच्या सोबत . माणूस जसा होता तसा त्याचा वाडाही भारी होता .

========================================================================

सकाळी आवरायचं म्हणून नदीवर गेलो आंघोळ करून परत येत होतो तेव्हढ्यात ती दिसली आज इथे कोणीही नसल्यामुळे बोलायला काहीही हरकत नव्हती .

" बापू इथच मुक्काम का ?"

" हो काम झालं नाही म्हणून थांबावं लागलं"

" इतके दिवस कधी भेटलो नाही आणि आता काल, आज भेट काही तरी आहे देवाच्या मनात. " आता काय बोलावं या विचारात होतो तेव्हढ्यात तीच बोलली पुढं ,

" बोलायचंच होत तुझ्याशी पण काल नाही बोलता आलं"

" बोल ना"

" सुरकी भेटली होती का कधी तुला"

" नाही लग्न झालं ना तीच , आता कशाला उगाचच तिच्या आयुष्यात मी ढवळा ढवळ करू ? "

" खर आहे तुझं , ती जिवंत राहिली किंवा मेली काय तुला काय फरक पडणार आहे "

" सरे, नीट बोल " एकदम रागात बोलून गेलो . थोडस सावरत बोललो , " शुभ शुभ बोलावं सकाळी सकाळी"

" शुभ बोलून होत नाही ते करावं लागत"

" म्हणजे ? "

" सुरकी भेटली होती , फार वाईट अवस्थेत आहे एव्हढी शिकली, एव्हढी मनानं चांगली पण तिला मानस चांगली नाही मिळाली"

" का काय झालं? "

" तिचा नवरा आहे दारुडा आणि सासरच्यांना काय, तिला मारून टाकली तरी काही फरक पडत नाही, कधी माहेरीही पाठवत नाही, तिच्या भावांनाही काही काळजी नाही, तेही आपल्या संसारात अडकलेत. आज आहे उद्या नाही अशी गत आहे तिची. "

" काय बोलतेयस तू कधी भेटली होतीस तिला ? "

" नवऱ्याला सोडून आले मी तेव्हा बरेच फिरलो आम्ही थोडी भीती होती, थोडी कामाची गरज होती. असच फिरत होते तेव्हा ती दिसली मला. पार रया उतरलीय तिची . लवकर भेट तिला . परत भेटेल, नाही भेटेल सांगता येत नाही . "

" तिच्या बाबतीत असं का झालं ? "

" का आणि कस चा विचार नको करू आपल्याला हवं तसच घडत नाही सगळं . मलाही माहित नव्हत असा नवरा मिळेल अन तो माझ्याशी असा वागेल, मलाही जीव नकोसा झाला होता पण रवी भेटला आणि मी सावरले नाहीतर..."

" बर असुदे आता जास्त नाही बोलत तू जा भेट तिला तिचा पत्ता कुठं लिहून घेणार तुझ्याकडं तर काही नाही लिहायला . "

" सांग तू मला राहील लक्षात . आता माझ्याकडे त्याच्याशिवाय काहीही नाही . "

========================================================================

" काय अवस्था करून घेतली आहेस तू ? "

तिच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्ही दिसले, पण क्षणभरच, भाव बदलून त्यात भीती दिसली, तू नको थांबू माझ्या सोबत कुणी पाहिलं तर काय म्हणेल . मी बरी आहे जा तू आता . " तिनं हसण्याचा प्रयत्न केला आणि ती लगबगीनं जाऊ लागली .

" थांब सुरेखा, अग कुणाला काय माहित तुझ्या सोबत काय होतंय ते ? " तिच्या डोळ्यात पाहताना त्यातील वेदना समजत होती . त्या वेदनेची सल मला जाणवली आणि न राहवून तिला म्हणालो ,

" अशी नको राहूस . " न राहवून तिच्या डोळ्यात ती वेदना शोधत राहिलो .

" अरे बघेल कोणी , माझं लग्न झालय , असं रस्त्यात कुणाशीही बोलत राहिले तर काय म्हणतील लोक , बदनामी होईल रे माझ्या घरच्यांची . "

" तुझं खरंच कोण राहिलंय का ? असत तर अशी का हालत झाली असती तुझी ? "

डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबत नव्हत .

" तू आहेस ना , तुला आहे ना माझी काळजी . तुला पाहून फार बर वाटलं रे . तुला आजही माझी काळजी आहे हे पाहूनही सुखावले मी . आता आयुष्यभरासाठी तेव्हढं पुरे मला . "

" आयुष्य संपलय का तुझं ? आताच का अशी बोलतेय आणि विचार करतेय ? "

" नाही काही पण जाते मी आता " म्हणत ती वळली आणि जाऊ लागली पण तिला ठेच लागली आणि तिचा तोल गेला , मी पुढं होऊन तिचा हात पकडला आणि तिला सावरलं .

सोड मला . कशाला अस करायचं कोणी पाहिलं ना रे . "

" अगं पडली असतीस तू . "

" अरे पडू दे काही होत नाही . लागेल थोडं बाकी जास्त काही नाही . सवय आहे मला पण असं नको करू तू . कुणी पाहिलं तर बदनामी होईल . "

" अग काय विचार करतेय तू ? आधी स्वतःकडे बघ कशी झाली आहेस ? "

" मला जाऊदे . "

ती जात होती पण तिचा हात माझ्या हातात होता मी तो तसाच पकडून ठेवला . तिने तो सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिला आता जाऊ दिलं तर तिला परत कधी पाहता येईल कि नाही हे सांगता येणार नाही .

" थांब ऐक माझं थोडस , नाहीतर मी जाऊ देणार नाही तुला . "

" का असं करतोय ? "

" असच . पण माझं ऐक थोडं मग जा . "

" हा बोल काय ? " तिनं असं तडकाफडकी विचारल्यावर मला पटकन काही सुचेना . मग

" का आणि कशासाठी हे सगळं ? "

" काय कशासाठी ? "

" बर ते जाऊ दे आधी सांग जेवलीस तू ? "

" नको रे असं काही विचारूस मला . मला सवय नाही रे त्याची . घरात मी जेवले कि नाही याची काय तर मी जिवंत तरी आहे कि नाही याचीही कुणाला फिकीर नसते . एक गुलाम जस सगळं काम करतो तशी मी सगळी काम करते कि नाही एवढच बघतात बाकी काही नाही.

" मग कशाला राहतेस तिथे ? "

" कशाला म्हणजे लग्न झालय माझं . आता हेच माझं घर . "

" ज्या घरात तुला माणूस म्हणून कोणी वागवत नाही तिथे कशाला राहायचं ? "

" असं कस लोक काय म्हणतील ? "

" अग लोकांचं काय आहे ते काहीही बॊलतात पण आपले काय दुःख आहेत ते आपल्यालाच माहित ना . "

" आपले ? तुला कुठं काय त्रास आहे ? हा माझा त्रास आहे आणि तो मी भोगतेय . काहीतरी पाप केलं असणार मी म्हणून होतंय हे माझ्या सोबत . "

" तुला त्रास झाला तर मला त्रास होतोच ना . आणि पाप हे केलंय ते मी . आणि त्याची शिक्षा तुला मिळतेय . "

" तू ? तू कोणत पाप केलय ? "

" तुला बायको मानलं होत आणि तुला आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं होत आणि ते न निभवताच तुला या त्रासात लोटलं मी ."

" हो रे खरं आहे तुझं , मी तुलाच मनापासून वरल होत . तरीही हे लग्न केलं , पण खरं तर मनाने तुझीच पत्नी होते आयुष्यभर . आणि असं असताना जे लग्न केलं ते चुकीचंच आहे ."

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users