कलिंग युद्ध, एक कारण मीमांसा

Submitted by अतुल ठाकुर on 31 December, 2017 - 11:53

Kalinga war.jpg

अनेकदा असे दिसून येते की काही ऐतिहासिक घटना अतिप्रसिद्ध होऊन जातात ते त्या घटनांच्या झालेल्या परिणामांमुळे आणि ज्यामुळे त्या घटना घडल्या ती कारणे दुर्लक्षिली जातात. फक्त इतिहासकार किंवा संशोधक कदाचित त्यामागिल कारणांची चर्चा करीत असतील. मात्र सर्वसामान्यांना ही कारणे फारशी ठावूक नसतात. त्या घटनेचे परिणामच इतके प्रचंड असतात की त्या एखाद्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणार्‍या परिणामांकडेच जास्त लक्ष दिले जात असावे. भारताच्या प्राचिन इतिहासात कलिंग युद्धाची घटना अशी आहे. सर्वसाधारणपणे त्याबद्दल बहुतेकांना माहिती असते ती अशी की सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्य विस्तारासाठी कलिंग देशावर स्वारी केली. प्रचंड लढाई झाली. कलिंगाचा पराभव झाला. या युद्धात झालेल्या हानीने सम्राट अशोकाचे मन द्रवले आणि त्याने बौद्धधर्माचा स्विकार केला. यानंतरच्या हकिकती इतिहासात रंगवून सांगितल्या जातात. एखाद्या धर्माला राजाश्रय मिळाला की त्या राजाला धर्माश्रय मिळत असावा. आणि त्यामुळे त्या राजाच्या चांगल्या बाजु दाखवणार्‍या कथा घोळवून घोळवून सांगितल्या जात असाव्या. सम्राट अशोक याला अपवाद नाही.

कलिंगयुद्धानंतर अशोकाचे जे मनपरिवर्तन झाले आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा जो जबरदस्त प्रचार आणि प्रसार झाला त्याबद्दल इतिहास बरेच काही सांगतो. मात्र त्यावेळी तेथे राज्य करत असणारा राजा, प्रत्यक्ष युद्धाचा तपशील याबद्दल इतिहास मौन आहे. कलिंगयुद्धाच्या संदर्भात अशोकाचे जे शिलालेख मिळाले आहेत त्यात देखिल युद्ध तपशील फारसा नाही. हानी किती झाली याबद्दल लिहिले आहे. शत्रू राजाचा उल्लेखही नाही. कदाचित कलिंग हे जुन्या परंपरेतील गणराज्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याबद्दल माहिती मिळवताना काही ठिकाणी कलिंग युद्धात कलिंगदेशाचा राजा अनंत पद्मनाभन याचा उल्लेख येतो. एकंदर अशी परिस्थिती असल्याने येथे कलिंग युद्धाची कारणमीमांसा जाणण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीला संम्राट अशोकाचे एक वेगळेच रुप जाणून घेणे त्यासाठी आवश्यक वाटते. त्याला इतिहासात काही ठिकाणी "चंड अशोक" म्हटले आहे.

सम्राट अशोक की चंड अशोक?
सम्राट अशोकाबद्दल सौम्यपणे लिहिणार्‍यांनी असे लिहिले आहे की अशोक पूर्वायुष्यात ब्राह्मणधर्मानुयायी होता. क्षत्रिय राजाला साजेसे त्याचे आयुष्य होते. त्याला अनेक स्त्रिया होत्या. त्याने वारसाने मिळवलेल्या साम्राज्याचा भरपूर उपभोग घेतला. उत्सवामध्ये तो रमत असे. मांसाच्या मेजवान्या, मद्याच्या मैफली, कलावंतीणींचे नाचगाणे, शिकार यांचा पूरेपुर आस्वाद त्याने घेतला. बिंदुसाराच्या मृत्युनंतर त्याचा ज्येष्ठ पुत्र सुषिम याने गादी बळकावली. अशोकाने त्याचे बंड मोडून काढले. त्यासाठी त्याला चार वर्षे लागली. स्वतः बिंदुसाराची इच्छा अशोकानेच आपल्यामागून गादीवर यावे अशी होती. कारण तक्षशीलेतील बंड मोडून वडिलांना आपली कर्तबगारी त्याने आधीच दाखवली होती.

शेवटी अशोकाचा अभिषेक इसपू. २६९ मध्ये झाला. गादीवर आलेला सम्राट अशोक हा चंड अशोक म्हणवला जात होता. याचा अर्थ क्रूर अशोक. हा उल्लेख बौद्ध वाङमयात आढळतो. असे म्हटले आहे की अशोकाने आपल्या भावांच्या कत्तली करून गादी बळकावली. माणसे आणि प्राणि यांना ठार मारणे, छळणे त्याला आवडत असे. अर्थात हे बौद्ध वाङमयात येण्याचे कारण अशोक आधी किती वाईट होता आणि आपल्या धर्मात आल्यावर किती चांगला झाला हे अधोरेखित व्हावे म्हणून असण्याची दाट शक्यता आहे.

कर्तबगार आणि पराक्रमी अशोकाने अभिषेक झाल्यावर साम्राज्य वाढविण्याचा विचार केल्यास नवल नाही. बहुधा कलिंग हे एकमेव राज्य अशोकाच्या वेळी असेल ज्यापासून मगधाला नुकसान होण्याची शक्यता होती. ती कशामुळे होती हे जाणण्यासाठी ज्या कलिंग देशाबरोबर अशोकाचे युद्ध झाले त्या कलिंगाबद्दल माहिती घेणे महत्त्वाचे ठरेल.

कलिंग देश
आता ओरिसा नावाने ओळखला जाणारा कलिंग हा अतिशय प्राचीन देश आहे. ऋग्वेदात कलिंगाचा स्पष्ट उल्लेख नाही मात्र पहिल्या मंडलात कक्षीवान ऋषीचा उल्लेख आहे. हा कक्षीवान ऋषी कलिंगाच्या राणीच्या दासीचा पुत्र होता. महाभारतात या देशाचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस असल्याचे सांगतात. हा देश पांडवांच्या इंद्रप्रस्थाच्या अग्नेयेस होता. परशुरामाने कलिंग जिंकला होता, अर्जुन कलिंगाच्या तीर्थयात्रेला गेला होता असे उल्लेख आहेत. सुदेष्णा नावाच्या बलिराजाच्या राणीला दीर्घतमा ऋषीपासून जे पाच पुत्र झाले त्यातल्या एकाचे नाव कलिंग होते आणि त्याने आपल्या नावाने राज्याची स्थापना केली असे म्हणतात.

कौटिल्य अर्थशास्त्रातील दुसरे अधिकरण अध्यक्षप्रचार प्रकरण २० मध्ये कौटिल्याने कलिंगवनातील हत्ती श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. राजाला विजय प्राप्त होणे हे प्रामुख्याने हत्तीवर अवलंबून असते असे तो म्हणतो. कारण अति धिप्पाड शरीराचे असल्याने हत्ती शत्रूसैन्याचे व्युह, दुर्ग आणि छावण्या उध्वस्त करतात आणि प्राणघातक कर्मे करतात.

सम्राट अशोकाने नक्की कलिंगावर चढाई कशासाठी केली याची कारणे पाहता त्यात प्रामुख्याने राजकिय व आर्थिक कारणे आढळतात. राष्ट्राच्या सुरक्षिततेचा प्रश्नदेखिल त्याच्याशी निगडीत आहे असे वाटते. अशोकाच्या बलाढ्य मगध साम्राज्याची कलिंगामुळे झालेली व्यापारी कोंडी हे एक महत्त्वाचे कारण यामागे दिसते. इतिहासकारांनी अनेक कारणे या युद्धाबाबत दिली आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत.

कलिंग युद्धाची कारणे
कलिंगासारखे मोठे युद्ध प्राचिन भारतात झाले. मात्र ते कशासाठी खेळले गेले याबद्दल इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आहे. शिवाय यात अनेक आख्यायिकांची भरदेखिल पडली आहे. त्यातच अशोकाने बौद्ध धर्म स्विकारल्याने आपल्या लाडक्या सम्राटाबद्दल बौद्ध धर्मीयांनी अनेक गोष्टी वाढवून लिहिल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही एकुण कारणे पाहता हे युद्ध राजकिय आणि आर्थिक कारणांसाठीच झाले असावे असे वाटते. ही कारणे अशी आहेत.

१. चंद्रगुप्ताच्या आधी कलिंग हा मगधाचा भाग होता. मात्र नंदांचा पराभव झाल्यावर ते स्वतंत्र राज्य झाले. चंद्रगुप्त आणि बिंदुसार यांनी ते पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी ठरला नाही.

२. अशोकाला राज्यविस्ताराची महत्त्वाकांक्षा होती.

३. कलिंग देश आपल्या व्यापारामुळे बलाढ्य बनला होता. श्रीलंका, मलाया, जावा या देशांशी त्यांचा व्यापार होता.

४. त्यांनी आपले लष्करी सामर्थ्य वाढवले होते.

५. कलिंग हा धनधान्याने समृद्ध असा देश बनला होता.

४. या मुळे असुया वाटून आपले साम्राज्य कलिंगपर्यंत फैलावण्याच्या उद्देशाने अशोकाने त्यावर स्वारी केली.

५. बिंदुसाराच्या काळात कलिंगात उठाव होऊन तो स्वतंत्र झाला असेही म्हटले जाते. (Dr. H. C. Raychowdhury)

६. कलिंगाच्या बलाढ्य सैन्यामुळे मौर्य सामाज्याला धोका वाढला आहे असे अशोकाला वाटले.

७. नंद वंशियांचा उच्छेद करण्याच्या प्रयत्नात जो गोंधळ उडाला होता त्याचा फायदा घेऊन कलिंग देशाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले होते. चंद्रगुप्ताला ते पुन्हा मिळविण्यास वेळ मिळाला नाही. बिंदुसाराला बहुधा त्याची गरज भासली नाही. त्यामुळे सुरुवातीपासूनच मगध देशाचा शत्रू असलेल्या कलिंगावर अशोकाने स्वारी केली.

८. कलिंगाने चौल व पांड्य या दक्षिणेकडील देशांशी मैत्री केली होती.

९. कलिंग देशाला लाभलेल्या समुद्र किनार्‍यामुळे कलिंग बलाढ्य सत्ता झाली होती.

१०. अशोकाच्या स्वारी आधी बर्मामध्ये कलिंगाची सत्ता होती असे म्हणतात.

११. मेगॅस्थेनिसच्या उल्लेखानूसार कलंग राजाच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी ६०००० हजार पायदळ, १००० घोडेस्वार, आणि ७०० हत्ती असलेलं सुसज्ज दल होतं. जर राजा स्वतःच्या आणि राजवाड्याच्या सुरक्षेसाठी इतकं सैन्य ठेवु शकतो त्याचं राज्याच्या संरक्षणासाठी असलेलं सैन्य प्रचंड असण्याची शक्यता आहे.

१२. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात कलिंगातील हत्तींच्या उत्तम पैदाशीचा उल्लेख आहे. (Greek writer Diodorus) कलिंग देशाकडे महाकाय हत्ती होते. त्यांमुळे कुठल्याही परकीय राजा त्यांच्यावर आक्रमण करु धजत नव्हता.

१३. चंद्रगुप्त मौर्याने जवळपास संपूर्ण भारत आपल्या अधिपत्याखाली आणला, ग्रीक राजा सेल्युकसचा पराभव केला मात्र मगधाच्या जवळ असूनही कलिंग देशाकडे तो कधीही वळला नाही यातच कलिंग देशाच्या बलाढ्यतेची कल्पना येते.

१४. बिंदुसारानेही तो विचार केला नाही. कारण दोघेही कलिंगाचे सामर्थ्य जाणून होते. अशोकानेही सिंहासनावर बसल्यानंतर सुमारे आठ वर्षे घालवल्यावर या स्वारीला हात घातला.

१५. भारताचे राजकिय ऐक्य साधण्यासाठी कलिंग जिंकणे अशोकाला आवश्यक वाटले.

१६. कलिंग देश उत्तर आणि दक्षिण यांच्यामधील पुलाप्रमाणे होता. तो जिंकल्यास मगध सैन्याला दक्षिणेकडे स्वारी करणे सोपे जाणार होते.

१७. मगधाला लागून एखादे सामर्थ्यशाली आणि स्वतंत्र राज्य असणे धोकादायक होते. त्या राज्याकडून मगधावर आक्रमण होऊ शकले असते.

१८. कलिंगातील व्यापार्‍यांची पूर्वेकडील समुद्रावर सत्ता होती. व्यापार त्यांच्या ताब्यात होता.

१९. मगधातील व्यापार्‍यांसाठी हा मार्ग जवळपास बंद झाला होता.

२०. जमिनीवरील अंतर्गत व्यापारी मार्ग जे गंगेच्या खोर्‍यांपासून सुरु होत होते ते देखिल कलिंगदेशीयांच्या ताब्यात होते. त्यामुळे त्याचा मगधदेशातील व्यापारावर अणि अर्थकारणावर वाईट परिणाम झाला होता.

प्रत्यक्ष युद्धाचा विचार करण्याआधी दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्य किती होते हे पाहणे युक्त ठरेल. ईसपू भारतात राज्यांच्या लष्करी तयारीवर यामुळे प्रकाश पडतो. भारतावर अनेक परकिय आक्रमणे झाली. त्यात भारत पराभूत होण्याचे कारण कदाचित त्यावेळच्या राज्यामध्ये एकोपा नव्हता हे असेल. मात्र राज्यांकडे सुसज्ज सैन्य होते हे नाकारता येत नाही. प्रथम कलिंग देशाच्या तयारीचा विचार करावा लागेल. ही तयारी अनुमानानेच लावता येते.

लष्करी सामर्थ्य
मेगॅस्थेनिसच्या उल्लेखानूसार कलिंग राजाच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी ६०००० हजार पायदळ, १००० घोडेस्वार, आणि ७०० हत्ती असलेलं सुसज्ज दल होतं. जर राजा स्वतःच्या आणि राजवाड्याच्या सुरक्षेसाठी इतकं सैन्य ठेवु शकतो त्याचं राज्याच्या संरक्षणासाठी असलेलं सैन्य प्रचंड असण्याची शक्यता आहे. अतिशय सुसज्ज असं नाविक दल कलिंग देशाकडे होतं.

चंद्रगुप्ताच्या वेळी मौर्य सैन्यात सहा लाखाचे पायदळ, तीस हजार घोडेस्वार, नऊ हजार हत्ती आणि आठ हजार युद्ध रथ होते. अशोकाच्या वेळेपर्यंत साम्राज्यविस्तारामुळे हे सैन्य अनेक पटींनी वाढलेले असण्याची शक्यता आहे. काही इतिहासकारांच्या मते या सैन्यात सिरिया सारख्या देशातील भाडोत्री सैनिक देखील काम करीत होते.

२०१० मध्ये भारतीय सैन्यात १४ लाख जवान काम करीत आहेत. त्या तुलनेत ईसपू २६१ मधला सहा लाख हा आकडा फार मोठा आहे असे दिसते. याचाच अर्थ कलिंगाच्या तुलनेत मौर्य सैन्य प्रचंड होते.

प्रत्यक्ष युद्ध
ई.स.पू. २६१ मध्ये आजच्या ओरीसात ज्याला धौलगिरी किंवा धौली हिल म्हटले जाते तेथे हे युद्ध लढले गेले. या युद्धाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या युद्धात सम्राट अशोक जातीने युद्धमैदानात हजर होता. आणि त्याच्या आयुष्यातील जातीने हजर राहून लढल्याचे हे पहिले आणि शेवटचे युद्ध होते. कलिंगाचे युद्ध हे कलिंगदेशाकडून लोकांनी लढलेले युद्ध होते असे म्हणतात. स्वातंत्र्यप्रिय कलिंगदेशाकडून अशोकाला प्रखर प्रतिकार झाला. भारताच्या प्राचीन इतिहासातील हे एक अत्यंत रक्तरंजित युद्ध म्हणून ओळखले जाते. मात्र अशोकाच्या अफाट सैन्यापुढे कलिंगदेशाला पराभव पत्करावा लागला.

अशोकाच्या तेराव्या शिलालेखात कलिंगयुद्धातील हानीबद्दल अशोकाने लिहिले आहे. एक लाख कलिंगवीर मारले गेले. जवळपास दीड लाख युद्धकैदी म्हणून पकडले गेले. जवळपास तितकेच मगध सैनिकही मारले गेले. या युद्धस्थानाच्या नजिक वाहणारी दाया नदी रक्ताने लाल झाली होती असा उल्लेख वाचायला मिळतो. लढाईमुळे उदभवलेली रोगराई आणि दुष्काळामुळेदेखिल लाखो लोक मृत्युमुखी पडले.

युद्धाचे परिणाम
कलिंग युद्धाचे परिणाम जीवित आणि वित्त हानीत मोजले तरी जबरदस्त होते. स्त्रीया आणि मुलांचे आक्रोश, जखमीं आणि मरणार्‍यांच्या वेदना पाहून अशोक सुन्न झाला. सगळीकडे रक्त आणि अश्रु दिसत होते. मौखिक परंपरेत अशी गोष्ट सांगतात की एक स्त्री युद्धानंतर अशोकाकडे आली आणि म्हणाली या युद्धाने तिचे वडिल, नवरा आणि मुलगा तिघांनाही तिच्यापासून हिरावून नेले आहे. तिच्या कडे जगण्यासाठी आता काहीही उरले नाही. हे ऐकून अशोकाचे मन द्रवले आणि त्याला पश्चात्ताप झाला. आणि त्याने अहिंसेचा मार्ग सांगणारा बौद्ध धर्म स्विकारला त्याच्या प्रचार प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले.

समारोप
कलिंग युद्ध हे प्राचिन भारतातील एक प्रचंड युद्ध होते. महाभारत युद्धाप्रमाणे याविषयी संदिग्धता नाही. इतिहासात याचे स्पष्ट पुरावे आहेत. त्यामुळे याची रक्तरंजित भीषणता जास्त अधोरेखित होते. साम्राज्य विस्तारासाठी, व्यापार वाढीसाठी आणि बलाढ्य शत्रूला नमवण्यासाठी लढल्या गेलेल्या युद्धाचा परिणाम अहिंसेचा बौद्ध धर्म स्विकारण्यात झाला. बौद्ध धर्माचा प्रसार हा अशोकाच्या काळात प्रचंड वाढला असण्याची शक्यता आहे. कारण त्याने आपली मुलगी संघमित्रा व मुलगा महेंद्र यांना बौद्ध धर्मप्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले होते. तेव्हापासून श्रीलंका बौद्धधर्मी बनला आहे असे म्हणतात. अशोकाने दूरदूरच्या देशांत बौद्ध प्रचारक पाठवले. बौद्ध धर्म परिषदा भरवल्या. अशोकाने बौद्ध धर्माला राजाजश्रय देऊन तो विश्वधर्म बनवला असे सार्थ वर्णन त्याच्याबद्दल केले जाते. बौद्ध धर्मप्रसाराबद्दल बरेच काही बोलले जाते पण त्याचे मूळ हे कुठेतरी कलिंगयुद्धात आहे यावर फारसे बोलले जात नाही.

मात्र या धर्मप्रसाराला आणि अशोकाच्या आदर्श राजाच्या व्यक्तीमत्वाला दुसरी बाजुदेखिल आहे. मौर्यसत्तेच्या विनाशाची जे काही कारणे दिली जातात त्यात अशोकाने मनपरिवर्तनानंतर जे निर्णय घेतले त्यांचा देखिल परिणाम आहे असे काही जण मानतात. अशोकाच्या बौद्धधर्मानुयायामुळे ब्राह्मण दुखावले गेले आणि मौर्य राज्याविरुद्ध जनतेत असंतोष धुमसु लागला असे म्हटले जाते. अशोकाने अहिंसा आणि शांतीचा पुरस्कार केल्याने सैन्याची कार्यक्षमता कमी झाली असेही म्हणतात. अशोकाने सरकारी खजिन्याचा वापर धर्मप्रसारासाठी केला आणि सैन्यदल सुसज्ज ठेवण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कलिंग युद्धाचे एका विश्वधर्माच्या निर्मितीत आणि एका विराटसत्तेच्या विनाशात एक महत्त्वाचे स्थान आहे असे प्रस्तूत लेखकाला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही इतिहासकारांच्या मते अशोक हा कलिंग स्वारीच्या काही वर्षे आधीपासून बौद्ध झालेला होता. जुन्या बौद्ध लेखनामध्ये सुद्धा कलिंग युद्धाचा संबंध त्याच्या बौद्ध होण्याशी लावलेला नाही. स्वारीच्या काही महिने आधी त्याचा मुलगा महिंद हा देखिल बौद्ध झाला होता. पुरातत्वखात्याला मिळालेले त्या नंतरचे शिलालेख त्याच्या (कलिंग-पश्चात) हिंसक आक्रमणांच्या खुणा देतात.

मगधाचे साम्राज्य लयास जाण्यास कदाचित बौद्ध धर्म आणि ब्राह्मणांचा विरोध कारणीभूत ठरला असेल ही कारणमीमांसा पटण्याजोगी नाही. कोणतीही गोष्ट उत्कर्षाच्या परमोच्चबिंदूला पोचल्यावर निसर्गनियमानुसार तिचा र्‍हास अटळ असतो. ज्या निसर्गन्यायाने भले मोठे रोमन साम्राज्य नष्ट झाले, कुषाणांचे मिनिसुवर्णयुग, शुंगांचे हिंदुराज्य, गुप्तांचा सुवर्णकाळ, सातवाहन, वाकाटक यांच्या हिंदू अथवा ब्राह्मण राजवटी नष्ट झाल्या त्याच न्यायाने मगध साम्राज्यदेखील ढासळले. पण कलिंगयुद्धाने भारतीय द्वीपकल्पाचा आणि अखिल मानवजातीचा फार मोठा फायदा झाला. सम्राट अशोकाला उपरती होऊन त्याचा धर्माकडे ओढा वाढला. धर्मप्रसारासाठी त्याने दूरदूरवर प्रतिनिधी पाठवले. यामुळे पुढे तोवरच्या ज्ञात जगापैकी जवळजवळ निम्म्या प्रदेशाला बौद्ध धर्माची आणि द्वीपकल्पीय संस्कृती/मूल्यांची ओळख झाली. कलिंगयुद्ध, तदुद्भव बौद्धधर्मराजाश्रय, तदुद्भव अहिंसा-शांतीचा पुरस्कार आणि त्यामुले सैन्याची कार्यक्षमता कमी होणे अशी घटनामालिका जुळवणे तर्कसुसंगत नाही. मगध साम्राज्याच्या र्‍हासाला कलिंगयुद्धास जबाबदार धरण्यापेक्षा द्वीपकल्पीय संस्कृती दूरवर पसरण्यास कलिंगयुद्ध कारणीभूत ठरले असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण बौद्ध धर्म आणि द्वीपकल्पाची ओळख अजूनही जिवंत आहे. मौर्य साम्राज्य मात्र अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला नसता तरी इतका तग धरू शकले नसते.

काही इतिहासकारांच्या मते अशोक हा कलिंग स्वारीच्या काही वर्षे आधीपासून बौद्ध झालेला होता.
शंतनू, जर असे असेल तर बौद्ध धर्म काय किंवा अहिंसेचा जप सतत करणारे कुठलेही धर्म काय, हे धर्म माणसाने स्विकारले तरीही त्यातील शिकवणूकीमुळे माणसाच्या राज्यविस्ताराच्या आकांक्षेत आणि त्याकरता कराव्या लागणार्‍या अतिरिक्त हिंसेत काडीचाही फरक पडत नाही असे म्हणावे लागेल. कारण बहुधा राजेलोक धर्माचा सोयीसाठी वापर करीत असतात. असेच यातून सिद्ध होते.

<strong>मगधाचे साम्राज्य लयास जाण्यास कदाचित बौद्ध धर्म आणि ब्राह्मणांचा विरोध कारणीभूत ठरला असेल ही कारणमीमांसा पटण्याजोगी नाही. कोणतीही गोष्ट उत्कर्षाच्या परमोच्चबिंदूला पोचल्यावर निसर्गनियमानुसार तिचा र्‍हास अटळ असतो. </strong>

निसर्गनियम म्हणजे नक्की काय? माणुस निसर्गनियमानुसार म्हातारा होतो त्याप्रमाणे निसर्गनियमानुसार राज्यांचा र्‍हास होतो असे आपल्याला म्हणायचे आहे काय? राज्यांच्या र्‍हासाला स्पष्ट कारणे असतात. त्यांची इतिहासात नोंद केलेली असते. त्या र्‍हासाला काही माणसे जबाबदार असतात हे आपल्याला मान्य नाही काय?

<strong>कलिंगयुद्ध, तदुद्भव बौद्धधर्मराजाश्रय, तदुद्भव अहिंसा-शांतीचा पुरस्कार आणि त्यामुले सैन्याची कार्यक्षमता कमी होणे अशी घटनामालिका जुळवणे तर्कसुसंगत नाही.</strong>

तर्कसुसंगत का नाही?

जेव्हा राजवटी उलथल्या जातात किंवा बदलतात तेव्हा आधी त्यांचा र्‍हास होतो आणि मग पाडाव. तात्कालिक कारणे काहीही असोत मोठ्या उलथापालथीची मुळे खूप खोलवर गेलेली असतात. समृद्धीच्या शिखरावर असताना बहुधा संस्कृतीची कला, साहित्य, शिल्प अशी अंगे बहरू लागतात. सभ्यता वाढीस लागते. रानटीपणा कमी होतो. तुलनेने अप्रगत अशा आजूबाजूच्या मानवसमूहांना या शांत सुस्थितीचे आकर्षण वाटू लागते. त्यांचे या प्रदेशात आगमन आणि आक्रमण वाढते. आणि मग राजवटी बदलतात. किंवा राज्याचे पुढचे वारस कर्तबगारीत कमी पडतात, ख्यालीखुशालीत रमतात. गाफील राहातात. अशा वेळी एखादा ट्रिगर पुरेसा होतो. साम्राज्य कोसळते.
धर्मामुळे हिंसा होत नाही. धर्माच्या आडून हिंसा होते. बौद्ध काय किंवा सनातन धर्म काय संपूर्ण अहिंसा कोणीच सांगत नाही. हिंसा अगदी कमीत कमी, अत्यावश्यक असेल तरच व्हावी अशीच शिकवण असते. आज बौद्धधर्मीय अश्या चीन ब्रह्मदेश विएट्नाम येथे रक्तरंजित लढाया झाल्या नाहीत काय? दुसर्‍या महायुद्धातले जपान्यांचे क्रौर्य विसरता येण्याजोगे आहे काय? क्रिस्टिअन धर्म पाळणार्‍या राज्यांत तुंबळ युद्धे झाली नाहीत का? राज्यविस्तार करू नका असे कोणताही धर्म सांगत नाही. खरे तर पौर्वात्य धर्मांतले बहुतेक धर्मनियम हे वैयक्तिकरीत्या पाळण्याचे असतात. बौद्धांचे संघनियम वेगळे आणि थोडेसे कडक होते.
बौद्धधर्मराजाश्रय, त्यामुळे सैन्याची अकार्यक्षमता, त्यामुळे ब्राह्मण प्रजेचा विरोध ही कारणे इतर अनेक- बहुसंख्य राज्यक्रांत्यांत नव्हती. तरीही सत्तापरिवर्तन झालेच. बौद्ध धर्माशिवायही सैन्य अकार्यक्षम बनू शकते.
अनेक धर्म, धर्मप्रवर्तक, संत, तत्त्ववेत्ते आले गेले पण मानवात अजूनही दुष्ट प्रवृत्ती, विकार शिल्लक आहेत. म्हणून काय ते धर्म अथवा ते संत याला कारणीभूत आहेत का? साक्षात् श्रीकृष्ण मानवरूपात समोर असतानासुद्धा कौरव-पांडव युद्ध झालेच.
अशोकाचे बृहद् साम्राज्य सांभाळू शकणारे वारस पुढे निर्माण झाले नाहीत. विस्तृत साम्राज्यावर अंकुश ठेवणे कठिण झाले. परिघावरचे सरदार-मांडलिक स्वतंत्र होऊ लागले. मध्यवर्ती सत्ता खिळखिळी झाली आणि मग पुष्यमित्र शुंग सत्ताधीश झाला.

राज्याचे पुढचे वारस कर्तबगारीत कमी पडतात, ख्यालीखुशालीत रमतात. गाफील राहातात.
हा मुद्दा मान्य आहे मात्र तत्कालिन कारणेच जाणुन घेण्याची माझी इच्छा आहे. ती मला महत्वाची वाटतात. तत्कालिन कारणे काहीही असोत असे कसे म्हणता येईल? ती काहीही असली तरी महत्वाची नाहीत काय? कालोदासाच्या रघुवंशात इक्क्षाकु वंशाचा शेवटचा राजा अग्निमित्र विलासी निघाला असा उल्लेख आहे. त्यामुळे ते राज्य लयाला गेले. लोक "चक्रनेमिक्रमेण" असा भारदस्त शब्द वापरतात. पण मला ते कारण महत्वाचे वाटते.

धर्मामुळे हिंसा होत नाही. धर्माच्या आडून हिंसा होते.
हिंसा बहुधा धर्माचा चतुर वापर करणार्‍यांकडून होते.
धर्माचे नियम हे वैयक्तीकरित्या पाळण्याचे असतात आणि राज्यविस्तारकांसाठी धर्माने खास वेगळे नियम सांगितलेले आहेत काय?

आज बौद्धधर्मीय अश्या चीन ब्रह्मदेश विएट्नाम येथे रक्तरंजित लढाया झाल्या नाहीत काय? दुसर्‍या महायुद्धातले जपान्यांचे क्रौर्य विसरता येण्याजोगे आहे काय? क्रिस्टिअन धर्म पाळणार्‍या राज्यांत तुंबळ युद्धे झाली नाहीत का? राज्यविस्तार करू नका असे कोणताही धर्म सांगत नाही.

अनेकदा असं दिसतं की धर्माला काहीवेळा राजाश्रय लागतो. आणि राजाला धर्माश्रय. दोघेही अनेकदा एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्यामुळे एकमेकांच्या हिताआड येणे दोघांनाही परवडणारे नसते. म्हणून तर आपण म्हणता तसं नसेल?

बौद्धधर्मराजाश्रय, त्यामुळे सैन्याची अकार्यक्षमता, त्यामुळे ब्राह्मण प्रजेचा विरोध ही कारणे इतर अनेक- बहुसंख्य राज्यक्रांत्यांत नव्हती. तरीही सत्तापरिवर्तन झालेच. बौद्ध धर्माशिवायही सैन्य अकार्यक्षम बनू शकते.

जगात आजवर जेथे जेथे राजवटी उलथल्या तेथ तेथे बौद्ध धर्म त्याला कारणीभूत झाला असे मला म्हणायचे नाही.

अनेक धर्म, धर्मप्रवर्तक, संत, तत्त्ववेत्ते आले गेले पण मानवात अजूनही दुष्ट प्रवृत्ती, विकार शिल्लक आहेत. म्हणून काय ते धर्म अथवा ते संत याला कारणीभूत आहेत का? साक्षात् श्रीकृष्ण मानवरूपात समोर असतानासुद्धा कौरव-पांडव युद्ध झालेच.

हिंसा धर्माचा चतूर वापर करणार्‍यांमुळे होते. धर्मामुळे हिंसा होते असे मला म्हणायचे नाही. इथे काहीतरी गैरसमज झाला आहे. मानवात विकार शिल्लक आहेत याला ते धर्म कारणीभूत आहेत असा अर्थ जर माझ्या लेखनातून निघत असेल तर माझे लेखन सदोष आहे असे मला मान्य करावे लागेल. मला तसे म्हणायचे नाही.

अतुल साहेब काही मुद्दे तर्कसंगत बसत नाही आहे. बाकी ठीक वाटत आहे. मुळात सम्राट अशोक हा अत्यंत खुनशी आणि क्रोधीत व्यक्ती होता याचे वर्णन तत्कालीन सर्वच साहित्यात दिसून येते. मग ते अशोकाच्या बाजूचे असो अथवा त्याच्या विरुद्ध बाजूवाल्यांचे त्यामुळे बौध्दधर्मातील लेखकारांनी अतिरंजित लिहिले असेल असे वाटत नाही.

हा काळ इ.स. पूर्व 200 वर्षातला आहे. त्याकाळातील रक्तरंजितपणा सहाजिक असल्यासारखा आहे. आता आताच्या काळातील लढाया उदा. चंगेज खान, अलेक्झांडर, मुघल, पर्शियन यांच्या काळात तर महासंहाराक रक्तपात झालेला आहे. त्याची तुलना कलिंग सोबत केल्यास तो छोटा वाटू लागेल.

त्याकाळची लोकसंख्या पाहता प्रचंड प्रमाणात असणाऱ्या सैनिकांचे आकडे लक्षात घेतले तर कलिंग सैन्यात सामान्य जनतेचा सुद्धा समावेश झालेला असेल असे वाटते. वर तुम्ही तुलना भारताच्या आताच्या आर्मी सोबत केली त्यानुसार 1.30 अरब लोकांच्या देशात 14 लाख संख्या कमीच आहे. मग 3-4 लाख सैन्य गृहीत धरले तर तेव्हाची संख्या 10-15 लाखाच्या आसपास असायला हवे. जे कलिंग क्षेत्रफळाचा विचार केल्यास शक्य वाटत नाही (हे मला वैयक्तिक वाटते)
याचाच अर्थ की कलिंग राजाने युद्धात अकुशल सैन्य उतरवले होते. जे समाजाच्या विविध स्तरातून लोक आली होती त्यांना जबरदस्तीने अथवा स्वच्छेने लष्करात भरती केले.
तर दुसरीकडे अशोक यांचे लष्कर हे कुशल होते त्यांचा साम्राज्याचा विस्तार तसेच मंडलिक असलेले आणि मित्र असलेले राज्यातून गोळा केलेले सैन्य यांचा विचार केला तर ते 5-6 लाखाचे सैन्याचा आकडा प्रमाणात येतो.
हे देखील पराभवाचे एक कारण म्हणता येईल.

पण हाच प्रकारा दुसऱ्या महायुद्धात झाला की. मुख्य रशियन सैन्य सुरुवातीच्या काही महिन्यांतच मोठ्या प्रमाणावर बंदी झाले किंवा मारले गेले. त्यानंतर जे रशियन सैन्य लढले ते मुख्यत्वे पकडून आणलेले नागरिक. त्यांनीही युद्धात अकुशल सैन्य उतरवले होते. जे समाजाच्या विविध स्तरातून लोक आली होती त्यांना जबरदस्तीने अथवा स्वच्छेने लष्करात भरती केले.
तर दुसरीकडे जर्मन लष्कर हे कुशल होते त्यांचा साम्राज्याचा विस्तार, आधुनिक शस्त्रात्रे, लुफ्तवाफचा दरारा तसेच मित्र असलेले राज्यातून गोळा केलेले सैन्य यांचा विचार केला तर ते खूपच जास्त होते. तरीही जर्मनीचा दारूण पराभव झाला.

अवांतरः
तात्कालिक घटना या केवळ ट्रिगर किंवा ठिणगी असतात. त्या फारश्या महत्त्वाच्या नसतात. नुसत्या ठिणगीने भडका उडत नाही. त्यासाठी दारूगोळा त्या ठिकाणी तयार असावा लागतो. भडक्याचे मूळ ठिणगीत नसून दारूगोळा योग्य ठिकाणी योग्य काळी जमा होण्यात असते.
बेअंतसिंहच्या गोळीमुळे इन्दिरा गांधींचा मृत्यू झाला आणि त्यांची कारकीर्द संपली. पण बेअंतसिंहात इतका क्रोध का निर्माण झाला? सुवर्णमन्दिरात लष्कर घुसवून तिथे नासधूस आणि धर्माची अवज्ञा झाली म्हणून. लष्कर का घुसवावे लागले? स्वतंत्र खालिस्तानसाठी पाकिस्तानी आणि अमेरिकी मदतीद्वारे सुवर्णमंदिरासारख्या भावनात्मक आणि धार्मिकदृष्ट्या सुरक्षित ठिकाणी दारूगोळा, दहशतवादी आणि ड्रग्जचा साठा जमा झाला म्हणून. हे का झाले? तर पाकिस्तानला अमेरिकेच्या साहाय्याने बांग्लादेश पराभवाचा वचपा काढायचा होता म्हणून.
प्रत्येक मोठ्या घटनेमागे अशी कारणमालिका असते.
सत्तालालसा आणि आपले हितसंबंध जोपासणे ही मोठी कारणे बहुतेक सर्व संघर्षांच्या मुळाशी असतात.

heera hyanchya sagalya posts sundar.
Atul Thakur malahi tumachi karan mimansa patali nahi. esp. jithe tithe brahman chidle mhanun zale asali karane sagali kade vachun farach kantala aalay.
Brahman chidalyane kase parinam zale asatil, he brahmananchi loksankhya, tyancha role aani purave hya sakaT deta yeil ka?

नानबा काडी टाकल्याबद्दल आभार Happy बाकी प्रतिसादांना वेळ मिळेल तसा सविस्तर प्रतिसाद देईन.
ब्राह्मण ब्राह्मणेतर असा फेवरीट संघर्ष येथे या धाग्यावर पेटण्याआधी, त्यामुळे धाग्याचा सत्यानाश होण्याआधी आणि बाकीच्यांनी त्यावर उड्या मारण्याआधी हा धागा आवरावा लागेल याची मला कल्पना आहे.

he brahmananchi loksankhya>> जर हे कारण असेल तर ब्रिटीश बान्ग्लादेशावर पण राज्य करु शकले नसते. Happy

आशुचॅप आपले म्हणणे बरोबर आहे पण दोन्ही घटनेत बरेच अंतर आहे . दोघांच्या हत्यारीत फरक आहे भौगोलिक स्थिती वेगळी आहे. कलिंग युध्द समोरासमोर लढले गेले त्यात अकुशल सैनिकांचा निभाव लागला नसेल तर रशियन युध्द हे समोरासमोर नसून बंदुकी आणि तत्सम हत्यारांनी लांब माऱ्याचे युद्ध लढले गेले.
त्यामुळे तिथे परिणाम वेगळे दिसले.

लेख उत्तम आहे, विश्लेषणात्मक आहे, मात्र "बौद्धधर्मानुनयामुळे ब्राह्मण दुखावले गेले आणि त्यामुळे मौर्य राज्याविरुद्ध जनतेत असंतोष धुमसू लागला असे म्हटले जाते" या वाक्यामुळे तथाकथितपणा आला आणि लेखाला गालबोट लागले. ब्राह्मण दुखावण्यामुळे आम जनतेत, आणि विशेषत: मगधात, जी जनता त्या काळात बहुसंख्येने बौद्ध होती तिच्यात असंतोष कसा धुमसू लागेल?
वेदांतल्या कर्मकांडाचा, सक्तीच्या यज्ञसंस्थेचा, देवापर्यंत पोचण्याच्या मार्गातल्या ब्राह्मण/पुरोहितांच्या सक्तीच्या मध्यस्थीचा सामान्य जनतेला उबग आल्यामुळेच गौतम बुद्धाने हे सर्व टाळून उपदेशिलेल्या नव्या जीवनपद्धतीला आम जनतेचा पाठिंबा मिळाला.
कदाचित असा अन्वय लावता येईल की समाजातले वर्चस्व आणि प्रभुत्व गमावल्यामुळे ब्राह्मणधर्मानुयायी असंतुष्ट झाले आणि ते पुन्हा कमावण्यासाठी पुष्यमित्राच्या रूपाने त्यांनी डाव साधला.
सत्तालालसा हा एक सार्वकालिक असा फार मोठा ड्राइविंग फोर्स असतो. ह्या मुद्द्याचा मी आधी उल्लेख केलेला आहेच.
यात मगध साम्राज्य नष्ट झाले नाही. फक्त सत्ताबदल झाला. मौर्यसत्ता जाऊन त्या जागी शुंगसत्ता आली. ती जेमतेम शंभर वर्षेच टिकली हा भाग अलाहिदा.
पुष्यमित्राने बौद्धांवर अनन्वित अत्याचार केले, स्तूपांची तोडफोड केली, सांचीच्या स्तुपालाही इजा पोहोचवली, अनेक बौद्धांना कंठस्नान घातले, हेही अलाहिदा आणि नंतरच्या शुंगांनी थोडेफार उदारपणे वागून या अत्याचारांची थोडीफार भरपाई केली तेही अलाहिदाच.

praamaaNik pratisadala kadi mhatalyabaddal abhar!
Tumhee jar brahman chidalyamule rajya kase layala gele hyache vida dile asate kinva fakt ek vakya na takata karanmimansa spasht keli asati tar mee ase bilkulach lihile nasate, lihu shakalehi nasate, nahi ka?

Nukatech eka jahir sabhet - swatahachya kananni "Aapalyala lihilelaa itihaas badalayacha aahe" "Te ani aapan" "tyanna kasa dhada shikavayacha aahe" he aikalyamule aani bharatat parat aalyapasun satatacha brahmandvesh aikun kiTalyamule kadachit mazi pratikriya jaast Tokdar zali asanyachi shakyata aahe.

sadhyaa jo uthato, to jyanni aattaa kahich kele nahiye, jo he ghadale tevha janmalahi aala navhata, ashaa brahmanna zodapat asato. asha vatavaranat, tumhee nishkarsh detana nidan vida dyal/karanmimansa dyal ashi apeksha chukichi nasavi.

प्रदिपके, प्रतिसादाबद्दल आभार. आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. कलिंगचा सैन्याचा अंदाजच फक्त बांधलेला मला मिळाला. कारण मेगॅस्थेनिसच्या उल्लेखानूसार कलिंग राजाच्या स्वत:च्या सुरक्षेसाठी ६०००० हजार पायदळ, १००० घोडेस्वार, आणि ७०० हत्ती असलेलं सुसज्ज दल होतं.

हीरा
लेख उत्तम आहे, विश्लेषणात्मक आहे,
आभार

"बौद्धधर्मानुनयामुळे ब्राह्मण दुखावले गेले आणि त्यामुळे मौर्य राज्याविरुद्ध जनतेत असंतोष धुमसू लागला असे म्हटले जाते" या वाक्यामुळे तथाकथितपणा आला आणि लेखाला गालबोट लागले

या मताबद्दल मला काहीही बोलायचे नाही. धर्म किंवा एखादे तत्वज्ञान हे राजसत्तेच्या लयाला जाणाच्या कारणापैकी एखादे कारण असूच शकत नाही असे आपले मत असल्यास आपल्याला ते बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहेच. मात्र विश्लेषणात्मक लिहिण्याचा प्रयत्न करीत असताना मला "निसर्ग नियमानुसार" किंवा "तात्कालिक कारणे काहीही असली तरी" किंवा "तल्कालिन कारणे फारशी महत्वाची नसतात" असे शब्द वापरता येत नाहीत.
अवांतर सांगायचे झाल्यास गुरुवर्य नरहर कुरुंदकरांनी प्राचीन भारत परकीय आक्रमणासमोर कोसळला त्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण कामवासनेचा अध्यात्मिक दृषीने विचार करणारे विद्वान हे सांगितले आहे. (रजनिशांवरील लेखात त्यांच्या तत्वज्ञानाचा प्राचिन संदर्भ देताना) त्यामुळे एखादे तत्वज्ञान हे राजकीय र्‍हासाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते हे मला पटते. कदाचित ते बुद्धधर्मात शिरलेल्या तंत्र मार्गामुळे असेल (महायान पंथातील ज्याला योगाचार म्हणतात). कदाचित तो बुद्धाने सांगितलेला मूळ मार्ग नसेलही.
मात्र निर्विकार राहून लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो जे मला अजुन नीट जमलेले नाही कारण अजूनही गांधी, टिळक आणि शिवाजी महाराज हा विषय आला की ममत्वाने लिहिले जातेच आणि मार्क्सवाद्यांबद्दल पराकाष्ठेची चीड वाटतेच. पण तसा प्रयत्न मी करीत राहीन हे नक्की.
अशुचँप प्रतिसादाबद्दल आभार.

आता आपण फक्त अंदाजच बंधू शकतो ठोस भूमिका घेता येणार नाही. मी फक्त तुम्ही जो आकडा लिहिला त्याच्या अनुषंगाने लिहिले.

लेख आवडला. चर्चाही छान.
एखादे तत्वज्ञान हे राजकीय र्‍हासाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकते हे मला पटते. > +१

>> जर असे असेल तर बौद्ध धर्म काय किंवा अहिंसेचा जप सतत करणारे कुठलेही धर्म काय, हे धर्म माणसाने स्विकारले तरीही त्यातील शिकवणूकीमुळे माणसाच्या राज्यविस्ताराच्या आकांक्षेत आणि त्याकरता कराव्या लागणार्‍या अतिरिक्त हिंसेत काडीचाही फरक पडत नाही असे म्हणावे लागेल

बरोबर!

पुष्यमित्र हा सेनाधिपती होता. सेनाच ताब्यात असल्याने एखाद्या सत्ताभिलाषि सेनापतीला विद्यमान सत्तेविरुद्ध यशस्वी बंड करण्याची मोठी संधी असते. सेनापतीने केलेली अशी बंडे इतिहासात नमूद आहेत. पुष्यमित्राने राजासोबत सैन्याची पाहाणी करताना राजाचा वध केला. मौर्य सत्ता उलथून टाकून सत्ता आपल्या ताब्यात घेतली. म्हणजे मगध साम्राज्य लयाला गेले नाही. फक्त सत्ताबदल झाला.
पुष्यमित्राला हे साम्राज्य सांभाळता आले नाही. शुंग घराणे जेमतेम १००- १२५ वर्षे टिकले. साम्राज्याचा ऱ्हास झाला आणि पुढच्या काण्व वगैरे घराण्यांच्या काळात ते लयाला गेले.