देवाचे साईड इफेक्ट

Submitted by vaibhavayare12345 on 28 December, 2017 - 03:43

रात्रीचे १० वाजलेत, कधी पासुन आठवायचा प्रयत्न करतोय की माझी चुक नेमकी कुठे झाली? पण छ्या कळतच नाहीये, घरात भयाण शांतता पसरली आहे, सायंकाळी ४ वाजल्या पासुन किचन मधे सुरु असलेला रणसंग्राम रात्री ९ वाजता शमल्याची चिन्हे दिसु लागली.

या संग्रामात चिनीमातीचा कप, चार चमचे, पोचे आलेली कळशी, केस पिंजारलेली केरसुणी, फ्राईंग पॅनची मुठ, बादलीची कडी, स्टीलच्या कपाचा कान, फ्री़झ मधील भाज्यांचा ट्रे असे बरेच योद्धे धारातिर्थी पडलेले आढळले.

पण या मागचं नेमकं कारण मला अजुनही कळत नाहीये.

बघा बरं तुम्हाला या सगळ्या प्रकाराचं काही कारण कळतंय का ते.

त्याचं झालं असं...............
सकाळी मी दाढी करता करता बायकोला आवाज दिला. "अगं ऐकलंस का?" किचन मधुनच प्रतिप्रश्न आला "काय झालं?"

मी म्हटलं " सगळं जरा लवकर आवरुन घे, आ़ज ख्रिसमस आहे, देवाला जाऊ." पहिल्या प्रश्नाला तिथुनच प्रतिप्रश्न करणारी माझी बायको त्सुनामीची लाट ज्या वेगात किना-याकडे येते त्या वेगात माझ्या जवळ आली आणि म्हणाली "काय म्हणालात? परत म्हणा." मी म्हटलं "आवरुन घे, देवाला जाऊ."

तशी लगेच हात जोडुन म्हणते " देवा किती चांगली बुद्धी दिलीस यांना."

तिला झालेला आनंद चेह-यावर स्पष्ट दिसत होता आणि आनंदातही परमेश्वराला विसरली नाही हे पाहुन मलाही आनंद झाला होता.
मी माझी दाढी उरकुन, अंघोळ करुन तयार होई पर्यंत बाईसाहेबांनी सर्व कामं आटपली होती आणि आम्ही आज मुव्हीला चाललोय अशी बातमी सा-या चाळीत पसरली होती.

दाराला कुलुप लावुन निघताना शेजारच्या दळवी काकांनी दारातच उभे राहुन विचारलं "काय साने, आज ख्रिसमस जोरात दिसतेय?"

कोप-यावरच्या गिरकर काकु (मिश्किलपणे) "समोसे खाताना आणि कोल्ड्रींक्स पिताना आमची आठवण काढा बरं." असं म्हणाल्या.

जिन्यावरुन उतरुन खाली आलो तर भविष्यातील सचिन, विराट , रोहीत, महेंद्र, हरभजन आपापल्या भविष्याला आकार देत होते. त्यातलाच एक कोणीतरी ओरड्ला "काका पॉपकॉर्न आणा."

अरेच्चा! म्हटलं आज वर्तमान पत्रात छापुन आलंय की काय?

एक कटाक्ष बायकोकडे टाकला तिच्या चेह-यावरचा आनंद ओसंडुन वाहत होता समजुन चुकलो की रिपोर्टर घरातलाच आहे.
पण तिचा तो आनंद थोडावेळच चेह-यावर टिकला नंतर पुर्ण दिवस त्या आनंदाची जागा चिडचिड, टोमणे या गोष्टींनी घेतली ती आता रात्री ९ वाजेपर्यंत.

बरं कारण विचारतोय तर तेही सांगत नाही, पण हे सर्व तेव्हापासुन सुरु झालं जेव्हा चाळीतुन सगळ्यांचे सल्ले ऐकत ऐकत आम्ही रस्त्यावर येऊन टॅक्सी थांबवली दोघंही टॅक्सीत बसलो.

टॅक्सी ड्रायव्हर ने विचारलं "कुठे जायचंय साहेब?"

गाढ झोपलेल्या कुंभकर्णाला मधेच जबरद्स्ती उठवल्यावर जसा भयंकर क्रोध त्याच्या चेह-यावर असेल तसेच भाव क्षणात तिच्या चेह-यावर आले.

जेव्हा मी टॅक्सी ड्रायव्हर ला म्हणालो,
.
.
.
.
"दादर, सिद्धिविनायक मंदीर"

----------------------------------------------------------------------------------------------------------------

वैभव केशव आयरे (वैभ्या)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त

तो गेलाच नाही चित्रपट बघायला तरी विचारतात कसा आहे मुव्ही? कमाल आहे Wink
लेख शेवट पर्यंत वाचा जरा..

हेच उलट असते तर जरा रहस्य ताणता आले असते

मस्तच ..बरं झालं देवा मूवी ला नाही गेलात..खरंच देव आठवला असता....आम्हालाही आठवला..आणि मूवी बघून प्रतिक्रिया होती..अरे देवा..का आलो इथे?

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार, लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या प्रतिसादांमुळे पुढील लेखनास उमेद मिळाली.

छान आहे.
जर टायगर बघायला जाउया म्हणाला असतात तर दोन्ही कडुन विन विन सिचुएशन असती Happy

मस्त आहे!!
मला देवा हा पिक्चर आठवत नसल्याने ट्युब लाईट पेटायला अंमळ उशीर झाला.

जर टायगर बघायला जाउया म्हणाला असतात तर दोन्ही कडुन विन विन सिचुएशन असती>>>>>>>>>> पण ते ओढुन ताणुन विनोद केल्या सारखं वाटलं असतं, कारण हेच संभाषण मुलांसोबत असतं तर 'टायगर' एकदम परफेक्ट जमलं असतं.

मस्त आहे!!
मला देवा हा पिक्चर आठवत नसल्याने ट्युब लाईट पेटायला अंमळ उशीर झाला. +१

छान जमलयं. पुलेशु

पहील्या वाक्याला मला वाटले की तुम्ही नाताळच्या देवाला पक्षी (पक्षी =म्हणजे) चर्चात जात आहात.
जरा नीट आठवून बघा मागच्या आठवड्यात वगैरे बायकोला "देवाची" ऑफर दिली होती का? या बाबतीत बायकांची स्मरणशक्ती चांगली असते. (समस्त ताई माई अक्कांची आगावू माफी मागून हे धाडसी विधान करतोय) Rofl
@ऋ जर हा प्रतिसाद वाचलास आणि गफ्रेची स्मरणशक्ती असा धागा काढलास तर ऋणानिर्देष अपेक्षीत.