यंदा पावसाने जोर केला होता.दक्षिणेला आडव्या पसरलेल्या ढोकळ्या डोंगराला पाझर फुटला होता.त्यामुळे डोंगराच्या पायथ्याला असलेले अनेक नाले,ओढे पाणी भरुन वाहत होते.आणि ते ओढे वाहत वाहत पुढे कऱ्हा नदीला मिळत होते.त्या कऱ्हेच्या काठावर वाळुंज गाव वसलं होतं.गाव सुखात होतं.पावसाच्या क्रूपेने शेतकरी सुखावला होता.दिवसभर रानात राबून,घाम गाळून काळ्या मातीतून सोनं पिकवीत होता.सारा शिवार हिरव्या रुपानं नटला होता.रानातली पिके वाऱ्याच्या झोतावर डुलत होती.
सकाळ झाली.लोकांनी नित्याची कामे उरकून रानाची वाट धरली.गुरे,वासरे,शेतकरी यांच्या गर्दित रानवाटा बुडाल्या.शिवारात शेतकऱ्यांच्या कामांची लगभग सुरू झाली.बापू ही आपल्या रानात आला होता.हा बापू खूप धूर्त आणि स्वार्थी होता.तो लोकांना धमकावीत असे.वेळ प्रसंगी त्यांना मार ही देत असे.म्हणूनच गावातील लोक त्याला वचकून होते.त्याच्या पासून दोन हात लांब राहत होते.आता तो आपल्या रानातील संत्र्यांच्या झाडांकडे पाहत उभा होता.झाडांच्या पानात दडलेली संत्र्यांची फळे हळूच बाहेर डोकावीत होती.ऊन्हाची पिवळी किरणे झाडांच्या अंगावरून जमिनीवर ठिबकत होती.त्याच्या रानाला तहान लागली होती हे त्याने जाणले.हळू हळू चालत तो त्याच्या शेताच्या वरच्या बांधावर आला.तिथूनच पाण्याचा एक पाट पाणी घेऊन पुढे धावत होता.व शेजारच्या लक्ष्मण दादांच्या संत्र्याच्या बागेत पाणी पोहचवीत होता.तिथे दादांची मजुरी करीत असलेला साधूअण्णा झाडांना पाणी देत होता.बांधावर उभ्या असलेल्या बापूच्या डोक्यात एक धूर्त विचार आला.मग तो धोतराचा काचा खोवून पाटाच्या पाण्यात उतरला.व तो पाट फोडून आपल्या रानात त्याने पाणी घेतले.
काही वेळाने पाणी कमी झाल्याचे साधूअण्णाच्या लक्षात आले.कुठे तरी पाट फुटला असावा ह्या विचाराने तो बागेतून बाहेर आला व पाटाच्या कडेने चालू लागला.चालत चालत तो बापूच्या बागेजवळ आला व थबकला.त्याने तो बापूने फोडलेला पाट पाहिला नी बापूला हाक मारली.बापू त्याच्याजवळ आला व म्हणाला,"काय झालं बोंबलायला?" साधूअण्णा म्हणाला,"ह्यो पाट फुडून तुम्ही माझं पाणी घेतलं". बापू खवळून म्हणाला," व्हयं घेतलं, काय करणार हाय तू?" साधूअण्णा विनवणीच्या सुरात बोलला," माझं थोडसं ऱ्हायलया भिजवायचं". बापू गुरकत म्हणाला,"तू उद्या भिजव". हे एेकून साधूअण्णा रागाने म्हणाला," मी पुन्हा पाणी घेतो बागंत". बापू म्हणाला,"घेऊन तर बघ".त्याचे हे शब्द ऐकून साधूअण्णाचं मस्तक अधिकच पेटलं व कसलाही विचार न करता तो पाटात उतरला.व पाट फोडणार तोच बापू ने त्याच्या सदऱ्याची मागून काँलर धरून त्याला मागे खेचला व त्याच्या एक जोरदार मुस्काडीत ठेऊन दिली.साधूअण्णा रागातच तिथून निघून गेला.
साधूअण्णा थेट लक्ष्मण दादांच्या वस्तीवर आला.वस्तीच्या डाव्या बाजूने एक ओढा दक्षिणेकडून उत्तरेकडे वहात होता.वस्तीत प्रवेश करण्यासाठी त्या ओढ्यातूनच एक वाट वस्तीत शिरत होती.ओढ्यातून पुढे आल्यानंतर त्या वाटेच्या दोन्ही बाजूला दोन चिंचेची उंच झाडे होती. ती ओढ्यातल्या वाहणाऱ्या पाण्याकडे पहात उभी होती.ती सहा सात घरांची वस्ती होती.पण साऱ्या पंचक्रोशीत तिचा दरारा होता.कोणताही माणूस त्या वस्तीच्या वाटेला जात नव्हता.जर कोणी त्यांच्या वाटेला गेलं तर त्याला वस्ती आपला हिसका दाखवीत होती.कुणी त्यांच्याशी प्रेमाने वागले तर वस्तीही त्याच्याशी प्रेमाने वागत असे.शेजारच्या गावातून अनेक मजूर वस्तीवर कामाला येत होते व आपली पोटं भरीत होते.साधूअण्णा लक्ष्मण दादांच्या घरासमोर आला व तिथूनच त्याने दादांना हाक मारली.त्याचा आवाज ऐकून दादा आपल्या घरातून बाहेर आले व त्याला विचारले,"काय रं काय झालं?" "मी आज संत्र्याला पाणी देत व्हतो तवा तिथं शेजारचा बापू आला व त्यानं पाट फुडून पाणी त्याच्या रानात घेतलं". साधूअण्णा उत्तरला.दादा थोडे चिंताग्रस्त झाले.तोच साधूअण्णा पुढे म्हणाला,"आन् त्यानं माझ्या येक तोंडातही मारली". हे ऐकताच दादांच्या मनात राग उफाळून आला.पण त्यांनी तसे चेहऱ्यावरती दाखवले नाही.ते साधूअण्णाला म्हणाले," तू आता जा घरी.मी बघतो काय करायचं ते".साधूअण्णा निघून गेला.
दादांनी पायात वहाणा सरकावल्या व ते पांदीत आले.पांदीतूनच त्यांनी अप्पा व भाऊंना हाक मारली.काही वेळातच ते दोघे दादांसमोर हजर झाले.मग दादांनी त्यांना घडलेली सर्व हकीगत सांगितली.ती हकीगत ऐकून दोघेही संतापले आणि गावाची वाट चालू लागले.एक मैल अंतर चालून आल्यानंतर ते बापूच्या बागेजवळ येऊन थांबले.मग दादांनी बापूला हाक मारली. बापू बागेतूनच म्हणाला,"कोण हाय रं?" " आधी बाहेर ये मग सांगतो".दादा म्हणाले. तसा बापू चरफडतच बाहेर आला. दादांसमोर उभा राहून म्हणाला," काय झालं?" " काय झालं? करून सवरून वरती आम्हाला इचारतो काय झालं ते."दादांनी त्याला खडसावले. मग भाऊ म्हणाले " आरं तू आमचा पाण्याचा पाट फोडलास आन् आमच्या गड्याला बी मारलंस ". बापू भाऊंवरती गुरकला व म्हणाला," तू कोण मला इचारणारा?" हे ऐकून दादांना राग अनावर झाला व ते अप्पा आणि भाऊंकडे पाहत म्हणाले ," घ्या रं ह्याला आपल्या बागंत". ते दोघेही दादांच्या इशाऱ्याचीच वाट पाहत होते आणि तो इशारा होताच ते बापूच्या अंगावर धावून गेले व त्याला दादांच्या बागेत घेऊन जाण्यासाठी ओढू लागले. तसे बापू स्वत:चे शरीर जमिनीवर झोकून देऊ लागला मग दोघांनीही बापूला दोन्ही बाजूने धरून उचलले आणि शेजारीच असलेल्या दादांच्या संत्र्याच्या बागेच्या कुंपणावरून आत फेकले. बापू आतल्या चिखलात जाऊन पडला. अप्पा आणि भाऊ कुंपणाच्या एका बाजूला असलेल्या दरवाजातून आत घुसले नी त्याच चिखलात ते बापूचा चिखल करू लागले.दोघांनी बापूला चोप द्यायला सुरूवात केली. बापू मोठ्याने ओरडू लागला. दादा हा प्रकार कुंपणाच्या दरवाजात उभे राहून पाहत होते. कुणीही आत जाऊ नये म्हणून दादांनी दरवाजाला काट्यांची मोठी फांदी आडवी लावली होती. आतमध्ये बापू चिखलाने पूर्ण भरला होता.तरीही ओरडत होता. त्याला मारीत असताना भाऊंचे लक्ष बाजूला पडलेल्या फावड्याकडे गेले. त्यांनी धावत जाऊन ते फावडे आणले व त्याच फावड्याने ते बापूची पाठ बडवू लागले. आता मात्र बापूला मार सहन होईना. तो दादांकडे पाहून ओरडू लागला," दादा मला वाचंव रं माझा जीव घेत्याल रं ही". पण दादांनी त्याच्याकडे लक्षच दिले नाही. बापू आतून ओरडतंच होता.
काही वेळाने बापूची बहीण धावत धावत दादांजवळ आली व बापूला सोडण्याची विनवणी करू लागली. पण दादांचं मन माघार घ्यायला तयार नव्हते.म्हणूनच दादा तिला आत सोडायला तयार नव्हते.तिला आपल्या भावाला होणारी मारहान सहन होत नव्हती.शेवटी ती दादांपुढे पदर पसरून म्हणाली,"दादा बापूची एवढी चूक पोटात घाला.परत त्यो कधीच तुमच्या वाटला जाणार न्हाय".तिचा तो कसनुसा झालेला चेहरा पाहून दादांचा राग मावळला व त्यांनी दरवाज्यातील काट्याची फांदी बाजूला केली.ती धावतच आत गेली व बापूच्या अंगावरती पालथी पडली. तिलाही पडता पडता दोन घाव बसले.हे पाहून दोघांनीही आपला हात आवरला.अप्पा बापूला म्हणाले,"आज सोडतो तुला पुन्हा जर आमच्या वाटंला गेला तर याद राख". भाऊंनीही हातातील फावडे खाली फेकले व ते दादांजवळ येऊन उभे राहिले.बापूच्या बहीणीने त्याला कसेबसे उठवले.चिखलाने माखलेला बापू व त्याची बहीण आपल्या घराच्या दिशेने चालू लागले. ते पाहून दादा अप्पा व भाऊंना म्हणाले,"जा रं ह्यांला घरापर्यंत पोहचवून या" मग अप्पा नी भाऊ त्या दोघांमागे चालू लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी दादा आपल्या गावातल्या शेतात आले.त्यांनी आपल्या संत्र्याच्या बागेवरती नजर फिरवली.झाडांवरचा रसरशीत संत्रा पिकू लागला होता.लवकरत संत्र्याची तोडणी करावी लागणार होती.दादांच्या मुखावर आनंदाचे भाव उलगडले.ते विचारांच्या तंद्रीत घराकडे निघाले.तोच त्यांच्या समोर बापू येऊन उभा राहीला आणि दादांना म्हणाला,"तूच मला भेटलास शेरास सव्वाशेर".
शेराला सव्वाशेर अप्पा झाले ना
शेराला सव्वाशेर अप्पा झाले ना.. दादा नाही.
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले आहे. कल्पनेला उगीच फाजील महत्त्व दिलेले नाही.
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले आहे. कल्पनेला उगीच फाजील महत्त्व दिलेले नाही. >>
सॉरी, पटकन हसायलाच आले. सत्यकथा आहे का?
च्रप्स, शेरास सव्वाशेर दादाच झाले. अप्पा भाऊ यांनी मारले पण ते लेफ्ट हॅन्ड आणि राईट हॅन्ड झाले, त्यांचा डॉन दादाच होता ना
अवांतर कथेतील नावे आवडली - अप्पा, भाऊ, अण्णा, बापू, दादा ... सगळी अगदी घरच्यासारखी
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले आहे. कल्पनेला उगीच फाजील महत्त्व दिलेले नाही.>>>>>>>>>>>>

बापू जे म्हणाले तेच मी लिहीले
बापू जे म्हणाले तेच मी लिहीले आहे. कल्पनेला उगीच फाजील महत्त्व दिलेले नाही.
>>> तुम्ही बापू का या कथेतले?
काहीही असो, १००+ चाहते
काहीही असो, १००+ चाहते असलेल्या बेफिकीर यांच्या गेल्या काही धाग्यांना जेव्हढे प्रतिसाद मिळताहेत त्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळवले या गोष्टीने.
लिहीत रहा, कधीतरी वाचकांची नस सापडेल तुम्हाला!