शिक्षणाचा 'उद्योग’ ..!
गेल्या काही दिवसापासून शैक्षणिक धोरणांचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. ऐन शैक्षणिक सत्राच्या मध्यात शिक्षक बदल्यांचे काहूर मध्यंतरी उठविण्यात आले होते. त्यानंतर १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शिक्षणाच्या खासगीकरणाला चालना देणाऱ्या या निर्णयाच्या आदेशाची शाई वाळते ना वळते तोच शिक्षण क्षेत्रावर पुन्हा एक नवा प्रयोग करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शिक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांना एंट्री देण्यासाठी महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारणा विधेयक आणण्यात आले असून, बुधवारी ते विधानसभेत संमत देखील करण्यात आले आहे. यामुळे, आता खासगी कंपन्यांना राज्यात कोठेही आणि कोणत्याही माध्यमाची शाळा सुरू करण्यास परवानगी असणार असून, रिलायन्स, टाटा, बिर्ला, अदानी यांसारख्या कंपन्यांनाही राज्यात शिक्षणसंस्था सुरू करण्याची कवाडे खुली झाली आहेत. त्यामुळे शिक्षणाचा ‘उद्योग’ करण्याचे हे धोरण शिक्षणाला कुठे घेऊन जाणार याबाबत चिंता व्यक्त केल्या जातेय.. अर्थातच, कंपन्यांच्या शाळा शिक्षणावर कसा परिणाम करतील याचे मूल्यमापन काळाच्या कसोटीवर केल्या जाईलच..परंतु, कंपन्यांना शिक्षक क्षेत्रात उतरवून सरकारी शाळा बंद करण्याचा तर सरकारचा मानस नाही ना ? यावर मंथन करावे लागेल.
‘महाराष्ट्र स्वयंअर्थसहायित शाळा अधिनियम, २०१२’ सुधारणा विधेयकानुसार कंपनीस ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर स्वयंअर्थसहायित शाळा सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे कंपन्या आपल्या निधीचा उपयोग शिक्षण क्षेत्रात करू शकतील. खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाल्यास तेथे शुल्कवाढीला मोकळे रान मिळेल.. हा पहिला आक्षेप या निर्णयावर ऐकायला मिळतोय. त्यातील तथ्य नाकारता येणार नाही. कुठलीही कंपनी ही नफा कमविण्याच्या उद्देशानेच बाजरात भांडवल गुंतवत असते. त्यामुळे कंपन्यांच्या शाळांमध्ये सामाजिक दृष्टिकोन वैगरे राहील, ही अपेक्षा भाबडीपणाची ठरू शकेल. अर्थात, कंपन्यांच्या शाळांवर शिक्षण शुल्क कायद्यान्वये नियंत्रण राहणार असून या कायद्यातही सुधारणा करून तो अधिक कडक केला जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत २० पालक आणि १० शिक्षकांचा समावेश असलेली पालक- शिक्षक समिती गठीत केली जाईल आणि त्यातील ७५ टक्के सभासदांनी मान्यता दिल्यावरच शुल्क वाढ करता येईल. अशी तरतूद करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यानी केली आहे. परंतु सध्याही अशा समित्या अस्तित्वात आहेत. खासगी शाळा या समित्यांचे मत किती विचारात घेतात, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे कायद्याने शुल्कवाढीवर नियंत्रन मिळवता येईल, हे न पटण्यासारखेच आहे. दुसरे म्हणजे कंपनी शाळा आल्यानंतर त्यांच्या स्पर्धेत सध्याच्या शाळा टिकतील का ? कमी पटसंख्येअभावी अगोदरच शासन शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. त्यातच कंपनी शाळा आल्या आणि या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कंपन्यांनी पालकांना अमिशांचे पॅंकेज दिले तर सहाजिकच सरकारी शाळांचे कंबरडे मोडेल.. आणि, सरकारला या शाळा बंद करण्याचा मार्ग खुला होईल. त्यामुळे गोरगरीब आणि दुर्गम भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकेल. कंपन्या काही दिवस ना नफा ना तोटा तत्वावर काम करतीलही. पण ते सर्वकाळ या तत्वाला बांधील राहतील, याची काय शास्वती?
आपल्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. कारण, शिक्षण हे कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक व मानसिक परिवर्तनाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा तो पाया आहे.चांगली सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न व सृजनशील पिढी फक्त शिक्षणातूनच घडविता येते. मग ही पिढी घडविण्याची जबाबदारी सरकार कंपन्यांवर देणार आहे का ? यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खेळ होऊन ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचीत राहिली तर हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग ठरणार नाही का? २०१५ मध्ये शालेय शिक्षण विभागाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ अभियान सुरु केले होते. या अभियानाचाचे यश आज रोजी दृष्टीक्षेपात येत आहे. अनेक हरहुन्नरी शिक्षकांनी आपल्या स्वखर्चातून, लोकसहभागातून शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत नवशैक्षणिक वातावरण निर्माण होण्यास सुरवात झाली असताना शिक्षणाच्या बाजरीकरणाचा घाट कशासाठी. राज्यातील मुलांना मोफत शिक्षण पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे.. शासन ही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने प्रश्न सुटणार नाही तर अजून बिकट होणार आहेत.
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सर्वसामान्याना शिक्षणाचे दारे खुली करून देण्यासाठी अंगावर शेणाचे गोळे झेलले. राजश्री शाहू महाराजानी शिक्षण सार्वत्रिक आणि मोफत करण्यासाठी आपली हयात अर्पण केली. अनेक दृष्टी नेते समाजसुधारकांनी शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशातील प्रत्येक मुलाला शिक्षणाचा संवैधानिक अधिकार मिळाला. शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याची निर्मिती करण्यात आली. शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यापासून ते वाड्या वस्त्यांवर पोहचु लागली असताना तिला खासगीकरणाच्या ताब्यात देणे कितपत योग्य? हा प्रश्न साहजिकपणे उपस्थित होतो. तसे खासगीकरणाच्या धोरणाचा आणि शिक्षणक्षेत्राचा फार जुना संबंध आहे. शिक्षणाला जोवर खासगीकरणाचा स्पर्श झाला नव्हता तोवर शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सरकारची होती. परंतु शिक्षण हा सुद्धा पैसे कमविण्याचा राजमार्ग होऊ शकतो हे काही राजकारण्यांच्या लक्षात आल्यानंतर खासगी शाळांची संकल्पना पुढे आली. स्थानिक प्राधिकरण, नोंदणीकृत संस्था, न्यास आदींना नवीन शाळा काढण्याची परवानगी देण्याचा कायदा आली आणि राज्यात खासगी शाळां-महाविद्यालयांचे जाळे तयार झाले. यातील काहींनी इमाने इतबारे शिक्षणाचे पावित्र्य जपले, परंतु, काहींनी शिक्षणाचा धंदा करून मोठी माया जमा केली.अवास्तव फी, डोनेशन, देणग्या यामुळे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले. त्यातच आता कंपन्यांच्या शाळा येण्याचा मार्ग खुला झाल्याने हा विषय गंभीर बनला आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शिक्षण महागडे होत असताना सरकारचे शिक्षणातून जबाबदारी झटकणारे धोरण भविष्यात वंचितांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण करणारे ठरण्याची श्यक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे यावर साधक बाधक चर्चा व्हावी, यासाठीच हा लेख प्रपंच..!!!
-अँड. हरिदास
आता रीतसर कायदे करून या
आता रीतसर कायदे करून या लोकांना कायद्याच्या कचाट्यात आणलं जाईल. आणि व्हाईट मध्ये व्यवसाय करू इच्छिणारे टाटांसारखे लोक या फिल्डमध्ये येऊ शकतील.>>>>
रिलायन्स फौंडेशनच्या शाळा मुंबईत आहेत व त्यांचा रिपोर्ट खूप चांगला आहे. आता तुम्ही म्हणाल फी परवडेल का? तर सिनियर केजीसाठी इथे सगळीकडेच भरमसाठ फी द्यावी लागते.
दुर्गम भागात शाळा बंद केल्यात का? तिथे मुळात सुरू तरी आहेत का? करण तिथे शिक्षकच मिळत नाहीत, सरकारने बदलीवर पाठवलेले शिक्षक एकतर खूप खटपटी करून बदली रद्द करतात नाहीतर तिथे जाऊन कसेबसे दिवस रेटतात यांच्याही बातम्या झळकत राहतात अधून मधून.
हो हो
हो हो
म्हणून फार अंतकरणाने भाजपाने हृदयावर दगड ठेऊन त्या शाळा बंद केल्या. आपण भाजपा सरकारचे आभार मानू
तावडे की जय, फसवणीस यांचा विजय असो
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/over-1300-schools-to-be-...
मूळ बातमी ही आहे. जिथे 10 पेक्षा कमी मुले शिकतात त्या शाळा बंद करून त्या मुलांना तिथल्या इतर शाळांमध्ये दाखल करून घेणार जिथे जास्त मुले आहेत व शिक्षक आहेत.
पूर्ण बातमी वाचा व ठरवा.
वर लिहीणार्या कित्येकांनी बातमी वाचलीच नसणार.
चित्र मात्र असे उभे करताहेत की भरवस्तीतली मुलांनी गजबजलेली शाळा बंद पाडून ती सोन्याच्या भावाची जमीन कोणा 'लाभार्थ्याला' फुकट देताहेत.
सरकारवर जोडे अवश्य मारा पण पूर्ण माहिती घेऊन जोडे मारा. नाहीतर तुम्हाली जसा प्रत्येक सरकारी कामातला छुपा हेतू दिसतो तसा मायबोलीकरांनाही तुमच्या बीबीमधला छुपा हेतू दिसायचा.
10 आहेत तर तिथे पटलावर संख्या
10 आहेत तर तिथे पटलावर संख्या वाढवण्यासाठी तावडे यांनी काय उपाय केले हे जाणून घेण्यास उत्सुक्त आहे.
दिल्लीत पण असाच अनुभव होता पण सिसोडियाने शाळा बंद केल्या नाही. 1300 ही संख्या थोडी नाही . एकीकडे मराठी वापरा मराठी लिहा म्हणून बोंब ठोकायचा दुसरी कडे मराठी शाळा खाजगी संस्थेसाठी बंद करायच्या अशी दुहेरी नीती या सरकारची आहे. इतकी वर्षे जर 1300 शाळा चालू होत्या त्या अचानक संख्या वगैरे थातुरमातुर कारण देऊन बंद करायचे प्रयोजन काय ते सगळ्यांना ठेवून आहे
तिथल्या मंडळींना कुटुंब
तिथल्या मंडळींना कुटुंब नियोजन करू नका म्हणून सांगत असावेत .
हो असेही भाजपा वाले 4-5 मूल
हो असेही भाजपा वाले 4-5 मूल जन्माला घाला म्हणून ओरळी ठोकत आहेच.
साधना, तुम्ही म्हणताय की इथे
साधना, तुम्ही म्हणताय की इथे लिहिणार्यांनी मूळ बातमी वाचलीच नसणार. हे मला पटतंय बघा. म्हणजे "१३०० शाळा बंद करुन त्या मुलांना नजीकच्या दुसर्या शाळांत स्थलांतरित करणे" हा एक वेगळा निर्णय आणि "खाजगी शाळांना प्रोत्साहन देणे" हा एक वेगळा निर्णय आहे असे दिसते आहे.
मग वर ते सनव ताई जे लिहितायत की सरकारी शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळत नाही मग त्या बंद करुन रितसर कायदे करुन वगैरे ते टाटांसारखे खाजगी संस्था देतील मग सगळं छान छान होईल वगैरे वगैरे , त्याला तुम्ही सहमतीसुद्धा दर्शवली आहे. म्हणजे तुम्ही दोघींनीही मूळ बातमी वाचली नव्हती असाच अर्थ होतोय.
मूळ बातमी ही आहे. जिथे 10
मूळ बातमी ही आहे. जिथे 10 पेक्षा कमी मुले शिकतात त्या शाळा बंद करून त्या मुलांना तिथल्या इतर शाळांमध्ये दाखल करून घेणार जिथे जास्त मुले आहेत व शिक्षक आहेत.<<
>>
मूळ बातमी नुसती वाचली नव्हती तर त्याचे विश्लेषण सुद्धा केलं होत..
लेख स्वरूपात आहे.. लिंक तुटू नये म्हणून पूर्ण लेख पोस्ट करत आहे..
रोगापेक्षा इलाज भयंकर'!
शिक्षण विभागाच्या विविध घोषणांनी शिक्षण क्षेत्र व्यथित झाले असल्याची ओरड सुरु असतानाच पुन्हा एका नव्या घोषेंनेनें प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे धाबे दणाणले आहे. पटसंख्या कमी असलेल्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला असून, ज्या शाळांची पटसंख्या १० पेक्षा कमी झाली, अशा शाळांवर आता बंदीचे गंडांतर येणार आहे. अर्थात, 'शाळा बंद' ऐवजी स्थलांतरित हा शब्द वापरून शासनाने निर्णयामागील त्रीव्रता कमी केली असली तरी. स्थलांतराचे नियम आणि अटींमध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील विध्यार्थ्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची श्यक्यता आहे. गुणवत्ता कमी झाल्यामुळे सरकारी मराठी शाळांना पटसंख्येचा रोग जडला. शाळांची गुणवत्ता का खालावत आहे, याचे निदान करून पटसंख्या वाढीसाठी उपचार करण्याची आवश्यकता असताना शाळांवर थेट बंदीची शस्त्रक्रिया करणे म्हणेज 'रोगापेक्षा इलाज भयंकर' असेच म्हणावे लागेल. दहापेक्षा कमी पटसंख्या हे निश्चितच त्या शाळांचे आणि पर्यायाने व्यवस्थेचे अपयश असताना यासाठी दुर्गम भागातील गोरगरीब मुलांना का वेठीस धरल्या जातेय ? समायोजांची प्रक्रिया राबवून एकही शिक्षक अतिरिक्त होणार नाही, अशी वलग्ना करणारे शिक्षणमंत्री विध्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करणार आहेत कि त्यांची सर्व सर्जनशीलता संपुष्टात आली आहे? सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणून शिक्षण सार्वत्रिक करण्याचा आव आणायचा, आणि नंतर वेगवेगळ्या निर्णयाद्वारे शिक्षणाच्या हक्कालाच हरताळ फासायचा, हे षडयंत्र गेल्या काही वर्षापसून राबविण्यात येत आहे. राज्यातील मराठी शाळा बंद करून शिक्षणाचे खासगीकरण करण्याच्या उद्देशाने तर हा डाव रचल्या जात नाहीये ना, अशी शंका आता आता उपस्थित केल्या जाऊ लागली आहे.
राज्यातील १३१४ शाळा काई पटसंख्येअभावी 'बंद' सरकारी भाषेत स्थलान्तरित करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घोषित केला आहे. या शाळातील विध्यार्थ्यांना त्यांच्याह परिसरात असणाऱ्या शाळांमध्ये सामावून घेण्यात येणार असून शिक्षकांचेही त्याच शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे. मात्र ज्या शाळा बंद किंव्हा स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतलाय, त्या सर्व शाळा दुर्गम भागातील आदिवासी शाळा आहेत. यातील विध्यार्थ्याचें समायोजन करताना त्यांना परिसरात १-२ किलोमीटरवर दुसरी शाळा असेलच, याची काय शास्वती? आणि शाळा दूर असेल तर या मुलांना शाळेत जाण्यासाठी दळणवळणाची सुविधा सरकार देणार आहे का. दुर्गम भागात आवश्यक प्राथमिक सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार असमर्थ ठरत असताना आदिवासी मुलांच्या जाण्या-येण्यासाठी सुविधा पुरविली जाईल, हि अशा भाबडीपणाचीच ठरेल. त्यातच मुलींसाठी दूरचा प्रवास सुरक्षित राहिलेला नाही, शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या विविध घटना समोर येत आहेत. शिवाय, शाळा लांब अंतरावर गेल्याने मुलांचा शाळांमधील रस कमी होतो आणि परिणामी शाळाबाह्य मुलांची संख्या वाढते, असा अनुभव आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दुर्बल आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आश्रमशाळा, आदिवासी शाळा उभारण्यात आल्या होत्या. आता ह्या शाळा बंद झाल्यास सरळ सरळ या विध्यार्थ्याचें शिक्षण बंद होणार आहे. परिसरातील संलग्न शाळेमध्येच शिक्षकांचीही समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून एकही शिक्षक नोकरीवरून काढण्यात आला नसल्याची माहिती शिक्षणमंत्री देतात, मात्र या प्रक्रियेतून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे कुठे समायोजन करण्यात येईल, याच उत्तर सरकार देत नाही. आज राज्यात १२ हजाराच्या जवळपास शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत, आज नाही तर उद्या या शाळांवरही कारवाईची कुर्हाड कोसळणार यात शंका नाही.मग एवढ्या मोठ्या मुलांचं आणि शिक्षकांचं समायोजन श्यक्य आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. परंतु याच संयुक्तिक उत्तर यंत्रणेकडून मिळत नाही, हे दुर्दैवच..
गुणवत्तापूर्ण आणि सार्वत्रिक शिक्षणासाठी विद्यार्थी केंद्री व्यवस्था असणे गरजेची असते. व्यवस्थेची सुविधा नव्हे तर, विद्यार्थ्याचं हित कुठलाही निर्णय घेताना विचारात घ्यायला हवे. परंतु शैक्षणिक धोरण ठरविताना विध्यार्थ्यांचा किती विचार केला जातो, हा प्रश्न संशोधनाचा ठरू शकेल. शिक्षण क्षेत्रात विध्यार्थी केंद्री निर्णय न घेता व्यवस्था केंद्री निर्णय घेतल्या जात असल्याने आज शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नवनिर्मिती होऊच नये हे ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य होते. स्वातंत्र्याच्या सात दशकात शिक्षण पद्दत सुधारण्यासाठी विविध योजना आणि धोरणे आणल्या गेली.यामुळे परंपरागत शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल होत आहे, ही बाब स्वागताहार्यच आहे. पण शिक्षण सार्वत्रिक होण्याच्या मार्गातील अड़थळ्यांची शर्यत अजुन संपलेली नाही. अज्ञान म्हणा कि परिस्थिति पण दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहचायला बराच उशीर झाला. शिक्षण मोफत आणि सक्तीचे करण्यासाठीही २१ व्या शतकाचे पहिले दशक उजाडावे लागले. आता कुठे दुर्गम भागातील आदिवासी ना शिक्षणाचं महत्व कळू लागल आहे. डोंगर दऱ्यात राहणारी मुलंही पाठीवर दप्तर घेऊन अक्षर गिरवू लागली. त्यातच शाळा बंद करुण मुलाना दुसऱ्या शाळेत पाठविण्यात आले तर किती जन यासाठी तयार होतील. सुविधेच्या अभावी विद्यार्थयानी शाळा सोडून दिली तर यासाठी जबाबदार कोण, शिक्षण हक्क कायद्याचे ह उल्लंघन ठरणार नाही का? त्यामुळे सरकारने कोणताही निर्णय घेताना परिनामांचा विचार करावा, ही अपेक्षा आहे. एखाद्या व्यवस्थेला रोग जडला असेल तर तो बरा करण्यासाठी उपाय केला जाने अपेक्षित असते. ग्रामीण शाळांची पटसंख्या कमी झाली याचा अर्थ त्या शाळांची गुणवत्ता घसरली, असाच घ्यावा लागेल. त्यामुळे गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रित करून अधिकाधिक पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. व्यवस्थेला एकादा रोग जडला असेल तर तो बरा करण्यासाठी उपचार केले जावेत.. ग्रामीण शिक्षणला झालेला पटसंखेचा रोग बरा करण्यासाठी शासनाचे अभियान प्रभावीपने राबविन्याची गरज आहे. राज्यातील एकही मूल शाळाबाह्य राहू नये यासाठी सरकारच धोरण ठरविते, सर्व शिक्षा, प्रगत शैक्षणिक सारखे अभियान राबविले जातात. शिक्षण हक्काचा कायदा आणून शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे केले जाते. मग राज्यातील शाळा बंद करून सरकारला काय साध्य करायचे आहे. एकीकडे मराठी शाळा बंद करायच्या आणि दुसरीकडे खासगी शाळाना परवाने वाटायचे. सरकारचे हे विसंगत धोरण शिक्षणाला खासगीकरणाकडे नेण्यासाठी तर नाही ना, अशी शंका कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाच्या मनात निर्माण होऊन शकेल. त्यामुळे पटसंख्येचा बाऊ करून शाळा बंद करण्यापेक्षा पटसंख्या वाढीसाठी सरकारने प्रयत्न करायाला हवेत..!!
इथे लिहिणार्यांनी मूळ बातमी
इथे लिहिणार्यांनी मूळ बातमी वाचलीच नसणार. हे मला पटतंय बघा.<<
>> नानाकळा..
मुळात पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचा निर्णय आणि खासगीकरणाचा निर्णय वेगवेगळा आहे.. याचा संबंध येतोही आणि नाहीही येत.. म्हणजे बघा सरकारी शाळेत चांगले शिकवत नाही म्हणून पटसंख्या कमी होते.. पटसंख्या कमी होते म्हणून शाळा बंद करायच्या.. शाळा बंद करायच्या म्हणजे खासगी शाळा लागणार कि मग कंपनीवाल्याना शाळा उघडण्याची सवलत द्यायची. बरं हा प्रकार हजार दोन हजार शाळांपुरता मर्यादित नाही. १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा झाल्यानंतर २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचा नंबर आहे. अर्थात तशी अधिकृत घोषणा अद्याप नाही. परंतु जे धोरण ठरविले जात आहे ते खरंच पटसंख्या वाढीसाठी ठरविल्या जात आहे का ? हे बघा आणि आज नाही तर उद्या या शाळांचाही नंबर लागणार आहे.. आज आपल्याला पटणार नसेल तर येणाऱ्या काळात हा निर्णय झाल्यावर आपण यावर चर्चा करूया..
सरकारवर जोडे अवश्य मारा पण
सरकारवर जोडे अवश्य मारा पण पूर्ण माहिती घेऊन जोडे मारा. <<<
>>> आपल्या प्रत्येक मुद्याचे माझ्यापरीने उत्तर देण्याचा माझा मनपूर्वक प्रयत्न राहील. पण आपल्याला जे माहीत आहे त्या माहितीच्या मागे अजूनही काही माहिती दडली आहे का ? सरकारचा प्रत्येक निर्णय सरळ अर्थानेच घेतला जातो असे नाही.. बऱ्याचदा अशा निर्णयांना विविध कंगोरे असतात. ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला याबाबत अधिक माहिती असेल किंव्हा नवीन मुद्दे चर्चेत येणार असतील तर माझ्याही ज्ञानात भर पडेल. फक्त मुदा पूर्ण विश्लेशीत करा..
हसावं की रडावं कळत नाही. आज
हसावं की रडावं कळत नाही. आज जे अनेक शिक्षणसम्राट संस्था चालावून पैसे आणि भूखंड कमवत आहेत त्यांनी पुरेसं बाजारीकरण already केलेलं नाहीये का?<<
>> अच्छा, त्यांनी बाजरीकरण केलं म्हणून आता कंपन्यांनाही बाजार भरवू द्यायचा का? खासगी संस्थांना शाळा काढण्याची परवनगी देण्याच्या निर्णयाचे दुष्परिणाम समोर असताना पुन्हा यात व्यावहारिक हित जपणाऱ्या कंपन्यांना एंट्री देणे कितपत योग्य आहे.
साधारण सहा दशकापूर्वी सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणे ही सर्वमान्य गोष्ट होती. ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल ते खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असत. पण सुरुवातीच्या काळातील बहुतेक खासगी शाळा या शिक्षणप्रसाराच्या सामाजिक भावनेतून सुरू झाल्या होत्या. काही चांगल्या शिक्षण संस्थांचा जन्मही या काळात झाला. सरकारी अनुदान असलेल्या शाळांची फी सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने त्याचाही कुणाला त्रास नव्हता. सरकार अनुदान द्यायचे तर त्यावर नियंत्रणही ठेवायचे. पण, हळूहळू खासगी शाळांची स्पर्धा सुरू झाली. मुलांना, पालकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविल्या जाऊ लागली. त्यातून शिक्षणाचे बाजरीकरण सुरु झाले.शिक्षणाचा मूळ उद्देश बाजूला सारला गेला. "ज्ञानाचे मंदिर" ही शाळांची ओळख हळहळू पुसल्या जाऊ लागली. शाळा नुसत्या शिकवण्याच्या यंत्रणा बनल्या. बरं या शाळांकडून पालकांची नानाविध कारणाने लूट केल्या जाऊ लागली. त्याविरोधात दाद मागण्याची सोय सुद्धा आज कुठे उरलेली नाही. या प्रकाराला आळा घालून शिक्षण सूत्रबद्ध दर्जेदार आणि सार्वत्रिक करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना शिक्षण क्षेत्राला खासगीकरणाकडे घेऊन जाणे उपयुक्त ठरेल का ?
अगोदर झालेलं बाजरीकरण रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, कि पुन्हा बाजरीकरणाच्या नव्या वाटा मोकळ्या कराव्यात ?
"पुरेसं बाजारीकरण ऑलरेडी" झालेल असेल तर...झालेली चूक सुधारावी कि चूक झाली म्हणून अजून चुका कराव्यात, याबद्दल थोडं मार्गदर्शन अपेक्षित आहे.
२० पेक्षा कमी पटसंख्या
२० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा १२ हजार असल्याची माहिती ज्यावेळी उपरोक्त लेख लिहला त्यावेळी माझ्याकडे होती.. त्याला आता बरेच दिवस झाले असून २० पेक्षा कमी किंव्हा त्यादरम्यान असलेल्या २० हजार शाळा असल्याची माहिती हाथी आले आहे.. आकड्यांच्या गफलतीवरून गैरसमज होऊ नये यासाठी..
10 आहेत तर तिथे पटलावर संख्या
10 आहेत तर तिथे पटलावर संख्या वाढवण्यासाठी तावडे यांनी काय उपाय केले <<
>> सहमत, उत्तर अपेक्षित आहे.
अगोदर झालेलं बाजरीकरण
अगोदर झालेलं बाजरीकरण रोखण्यासाठी प्रयत्न केले जावेत, कि पुन्हा बाजरीकरणाच्या नव्या वाटा मोकळ्या कराव्यात ?
"पुरेसं बाजारीकरण ऑलरेडी" झालेल असेल तर...झालेली चूक सुधारावी कि चूक झाली म्हणून अजून चुका कराव्यात, याबद्दल थोडं मार्गदर्शन अपेक्षित आहे.
स्पर्धा वाढली की consumer चा फायदा होतो. आजमाझ्याआ मैत्रिणीला मुलाला पाठवायला एक धड शाळा नाही. जर चार शाळा सुरु झाल्या तर तीला पर्याय मिळतील. शिक्षण सम्राट लोकांची मक्तेदारी संपेल.
हे सरकारकडून होणार नाही कारण सरकारी नोकरीबद्दलचा attitude म्हणजे फुकट पैसा असा असतो. शिवाय, उत्तम चालणार्या शाळाही वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे खराब झालेल्या पाहिल्या आहेत. मी एकूणच खाजगीकरण (with appropriate controls ) च्या बाजूने आहे.
सनव, तुम्ही फार मोठ्या
सनव, तुम्ही फार मोठ्या गैरसमजात आहात. माहितीच्या अभावामुळे व पूर्वग्रहातून तुमचा हा गैरसमज झालेला आहे. खाजगी म्हणजे बेस्ट आणि सरकारी म्हणजे वर्स्ट हा जो अॅटिट्युड आहे तो घातक आहे. लेखक म्हणतात तसं सर्वच खाजगी करायचे तर मग देशही चालवायला खाजगी कंपन्यांना द्यायचा का?
appropriate controls ची व्याख्या कोण ठरवणार? आज खाजगी रुग्णालयांना सरकारने केलेलं फी रेगुलेशन मान्य नाहीये. शाळांबाबतीतही हेच होऊ शकते. तसेच शाळा म्हणजे हॉटेल नव्हे. ते दहा-पंधरा वर्षांनी मेजरेबल रिजल्ट दाखवणारे क्षेत्र आहे. अनेक पैलू आहेत.
संबंधित विषयावर मत द्यायला ना नाही पण ते तपासून घेतलेले काय वाईट?
म्हणजे तुम्ही दोघींनीही मूळ
म्हणजे तुम्ही दोघींनीही मूळ बातमी वाचली नव्हती असाच अर्थ होतोय.>>>>
हो, पहिले 2-3 प्रतिसाद देईतो मी तरी वाचली नव्हती. मी बीबीवर जे लिहिलेय तेच बरोबर धरून चाललेले. आणि म्हणून मला कंपन्यांना शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करायला देताहेत हे जे वर लिहिलंय त्याचे आश्चर्य वाटत होते. मी काही दुर्गम भागात राहत नाही. मी जिथे राहते तिथे सगळ्या खासगीच शाळा आहेत, आणि त्याही मोठ्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या फाउंदेशसनच्या. माझ्या गावी 3 खासगी शाळा आहेत त्यापैकी 2 निवासी आहेत पण नेहमीसारखी आहे.
मग आता नवीन कसला निर्णय झालाय? मला फक्त मी वर दिलीय ती बातमी दिसतेय.
आणि त्या बातमीत हेही आहे की निर्णय 2009 सलीच घेतला गेलाय. मग गेली 8 वर्षे शिक्षण खाते काय करतेय? दहा मुलेही शाळेत का नाहीत याची कारणे का नाही शोधली? सरकार कोणाचेही असले तरी ही खाती स्थिरच असतात ना? त्यांचे काम सुरूच असते ना?
खासगी म्हणजे बेस्ट असे लोकांना वाटते याला सरकारने स्थापन केलेल्या यंत्रणा चालवणारे लोक जबाबदार आहेत. ते का नाही आपली कामे धड करत? पगार मिळतो वेळेवर मग कामे का नाही करत नीट? मुंबईत सरकारी इस्पितळात अतिशय उत्कृष्ट उपचार करून मिळतात. पण तरीही लोक खासगीकडे धाव घेतात. पासपोर्ट ऑफिसात टीसीएस फक्त A व B डेस्क सांभाळते, C साठी सरकारी माणूस बसलेला असतो. तिथे आपण पोचलो की नशिबाचा धावा करायचा. त्याचा मूड लागला तर फटकन काम होऊन जाते पण मूड नसेल तर तो रडवूही शकतो हे प्रत्यक्ष अनुभवलंय. सरकरी नोकर नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी, समोरच्याचा अंत न पाहता का नाही करत? यावर कोणालाही काहीही बोलायचे नाहीय.
म्हणजे तुम्ही दोघींनीही मूळ
म्हणजे तुम्ही दोघींनीही मूळ बातमी वाचली नव्हती असाच अर्थ होतोय.>>>>
हो, पहिले 2-3 प्रतिसाद देईतो मी तरी वाचली नव्हती. मी बीबीवर जे लिहिलेय तेच बरोबर धरून चाललेले. आणि म्हणून मला कंपन्यांना शिक्षण क्षेत्रात घुसखोरी करायला देताहेत हे जे वर लिहिलंय त्याचे आश्चर्य वाटत होते. मी काही दुर्गम भागात राहत नाही. मी जिथे राहते तिथे सगळ्या खासगीच शाळा आहेत, आणि त्याही मोठ्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या फाउंदेशसनच्या. माझ्या गावी 3 खासगी शाळा आहेत त्यापैकी 2 निवासी आहेत पण नेहमीसारखी आहे.
मग आता नवीन कसला निर्णय झालाय? मला फक्त मी वर दिलीय ती बातमी दिसतेय.
आणि त्या बातमीत हेही आहे की निर्णय 2009 सलीच घेतला गेलाय. मग गेली 8 वर्षे शिक्षण खाते काय करतेय? दहा मुलेही शाळेत का नाहीत याची कारणे का नाही शोधली? सरकार कोणाचेही असले तरी ही खाती स्थिरच असतात ना? त्यांचे काम सुरूच असते ना?
खासगी म्हणजे बेस्ट असे लोकांना वाटते याला सरकारने स्थापन केलेल्या यंत्रणा चालवणारे लोक जबाबदार आहेत. ते का नाही आपली कामे धड करत? पगार मिळतो वेळेवर मग कामे का नाही करत नीट? मुंबईत सरकारी इस्पितळात अतिशय उत्कृष्ट उपचार करून मिळतात. पण तरीही लोक खासगीकडे धाव घेतात. पासपोर्ट ऑफिसात टीसीएस फक्त A व B डेस्क सांभाळते, C साठी सरकारी माणूस बसलेला असतो. तिथे आपण पोचलो की नशिबाचा धावा करायचा. त्याचा मूड लागला तर फटकन काम होऊन जाते पण मूड नसेल तर तो रडवूही शकतो हे प्रत्यक्ष अनुभवलंय. सरकरी नोकर नेमून दिलेली कामे वेळच्या वेळी, समोरच्याचा अंत न पाहता का नाही करत? यावर कोणालाही काहीही बोलायचे नाहीय.
नाना, भारतातील वास्तव्यातून
नाना, भारतातील वास्तव्यातून झालेले मत आहे. अनेक उदाहरणे पाहिली आहेत. Lets agree to disagree.
तोंडाने कम्युनिझम आनि सोशलिझम चा जप करणारे महाराष्ट्रातले अप्पर कास्ट कम्युनिस्ट नेते पण स्वतःच्या रशियन नावंवाल्या पोरांना अमेरिकेत पाठवून देतात. रशियात नाही! Capitalism (with moral controls) is way to go.
साधनाजी,
साधनाजी,
तुमच्या खालील विधानांचे उत्तर देतो.
खासगी म्हणजे बेस्ट असे लोकांना वाटते याला सरकारने स्थापन केलेल्या यंत्रणा चालवणारे लोक जबाबदार आहेत. ते का नाही आपली कामे धड करत? पगार मिळतो वेळेवर मग कामे का नाही करत नीट?
>> यासाठी जरासं आपल्याला स्वातंत्र्यपूर्वकाळ व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा लगेचचा वीस वर्षाचा काळ बघावा लागेल. आपण आज जी सरकारी व्यवस्था बघतोय ते कीतीही नाही म्हटलं तरी ब्रिटीश प्रशासकिय व्यवस्थेचीच देण आहे. त्यात कोणताही आमूलाग्र बदल आपण केला नाही कारण आपल्याला तशी सवड म्हणा किंवा शक्यता वाटली नसावी. ब्रिटीश व्यवस्था ही ब्रिटीशांचे सरकार चालवण्याच्या सोयीने तयार केलेली होती. त्यात नेटीवांचे प्रश्न सोडवावे ही भावना नव्हती. केवळ राज्यकारभारात, देश चालू राहण्यात काही अडथळा येऊ नये इतपत नेटीवांची कामे केली की झाले. त्यात सरकारी जवाई ही जी संज्ञा आपण नेहमी ऐकतो ती त्यातुनच आली आहे. सरकार म्हणजे मालक होते त्या काळात, प्रत्येक सरकारी अधिकारी हा मालकच, नेटीव हे नोकर-गुलाम. ही संस्कृती निर्माण झाली आणि संपत आली असे म्हणवत नाही. तेव्हा जनतेला कस्पटासमान वागणूक देणे व्यवस्थेच्या मुळातच आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशउभारणीसाठी अनेक लोकांची गरज होती, अक्षरशा: घराघरातून शिकलेली पोरें ओढून सरकारात भरती करण्यात आली होती. या सरकारचे आपल्याशिवाय पान हलू शकत नाही हे त्यांनाही कळले होतेच. ती मगरुरी त्यामुळे आली. एकदा नोकरीवर लावलेला मोठ्या कारणाशिवाय काढू शकत नाहीत. त्यातही शंभर वाटा आहेतच. त्याचे कारण तेव्हा लोकच मिळत नव्हती म्हणून असलेली टिकवून ठेवून कसेतरी बाबापुता करुन भागवण्याचा प्रकार होता.
वरील सर्व प्रकार त्या त्या काळाची गरज व अगतिकता म्हणू शकतो. त्यात कोणा पक्षाला, नेत्याला, सरकारला दोष देऊन उपयोग नाही. मात्र आज तशी कोणतीही परिस्थिती नाही. तेव्हा आज म्हटले तर रिफॉर्म्स होऊ शकतात. (पण शक्य होणार नाही असे वाटते. )
सरकारी लोकही सरसकट सगळेच कामचुकार नाहीत, अन्यथा देश चालला नसता (असं माझं वै म) पण सिरियस रिफॉर्म्स आवश्यक आहेत.
जिल्हापरिषद शाळांमध्ये सरकारी शिक्षकांच्याच आधारे शैक्षणिक बदलांची मोठी क्रांती होत आहे. कदाचित मोट्या शहरात राहणार्या अनेकांना ते माहित नसते.
अमेरिकेत बसून शेळ्या हाकणारे
अमेरिकेत बसून शेळ्या हाकणारे इथे बरेच आहे . खास करून भाजपाचे चुकीचे निर्णय सगळेच बरोबर वाटणारे व पटणारे
तोंडाने कम्युनिझम आनि सोशलिझम
तोंडाने कम्युनिझम आनि सोशलिझम चा जप करणारे महाराष्ट्रातले अप्पर कास्ट कम्युनिस्ट नेते पण स्वतःच्या रशियन नावंवाल्या पोरांना अमेरिकेत पाठवून देतात. रशियात नाही!
>> आलात का तुमच्या फेवरिट टॉपिकवर... विषयांतर आहे हे नमूद करतो. मूळ विषयावर काही माहिती असेल तुमच्या मुद्द्याच्या व भूमिकेच्या बाजूने तर अवश्य द्या. तुम्ही काय पाहिलं आणी कोणत्या नजरेनं पाहिलं हेही महत्त्वाचे असते.
Capitalism (with moral controls) is way to go.
>> मला याची एक दोन उदाहरणे द्याल का?
नाना, capitalism communism हा
नाना, capitalism communism हा जुना वाद आहे. मी capitalism च्या बाजूने असल्याने मला खाजगीकरण योग्य वाटत आहे. दुसर्या बाजूने विचार करणाऱयांना बरोबर उलटे वाटेल. म्हणूनच म्हटलं, lets agree to disagree.
मी कोणत्याही बाजूने नसतो.
मी कोणत्याही बाजूने नसतो. तेव्हा मला सर्वच बाजूंचे ऐकायला आवडते. मूळ विषयावर काही माहिती असेल तुमच्या मुद्द्याच्या व भूमिकेच्या बाजूने तर अवश्य द्या
जिल्हापरिषद शाळांमध्ये सरकारी
जिल्हापरिषद शाळांमध्ये सरकारी शिक्षकांच्याच आधारे शैक्षणिक बदलांची मोठी क्रांती होत आहे. कदाचित मोट्या शहरात राहणार्या अनेकांना ते माहित नसते.<<
>> सहमत आहे.. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणांतर्गत अनेक शाळा चा मोठा विकास झाला आहे. आधुनिक, प्रगत, अद्यावत तंत्रद्यान असेल किंव्हा इतर सोयी सुविधा सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. इथली गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुद्धा खासगी शाळांपेक्षा सरस आहे. अर्थात अशा शाळांची संख्या मोजकी आहे. मात्र हळूहळू इतरही शाळा सुधारण्यास सुरवात झाली आहे.
अनेक खासगी अनुदानीत शाळा हया
अनेक खासगी अनुदानीत शाळा हया राजकारणी व शिक्षण सम्राट ह्यांनी आपल्या मतदारसंघ व मतपेढ़ी साबुत राहावी म्हणून मनमानी पद्धति ने चलविल्या आहेत. त्यामुळेच हा निर्णय तुरतास तरी योग्य वाटतो
या धाग्यावर शिक्षकांना
या धाग्यावर शिक्षकांना कराव्या लागणार्या शिक्षणेतर कामांबद्दल चर्चा झाली होती, म्हणून मधल्या काळात वाचलेल्या काही बातम्या.
१. शाळेतील मुलांचे आधार क्रमांक सरकारक्डे अपडेट करायचे. कारण आधार असलेली मुलेच जेन्युइन. पटसंख्या आणि त्यावरून शिक्षकांची गरज ठरवायला हा डेटा वापरणार. भारतात १००% जनतेकडे आधार आहेच.
२. येताजाता शालाबाह्य मुले शोधायची. त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर घेऊन ठेवायचे.
३. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी लागणार्या गोष्टींसाठी देणगीदार शोधायचे.
४. माध्यान्ह आहाराबाबत आधी लिहिलं नसेल, तर तेही.
ज्यामुळे हे लिहावंसं वाटलं ती ही ताजी बातमी
मुख्याध्यापकांवर बांधकाम ठेकेदाराची जबाबदारी
कंपन्यांना खासगी शाळा काढायला द्यायला माझी मुळीच हरकत नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्या 'गरजा' भागवायची सोय होत असेल, तर उत्तमच आहे.
पण बहुसंख्य सामान्य लोकांना सरकारी/अनुदानप्राप्त शाळांत काही किमान दर्जाचं शिक्षण मिळण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.
शिक्षकी पेशात येणार्या लोकांच्या मनोवृत्तीबद्दल इथे बोललं गेलंय. शिक्षकांनी बिनपगारी किंवा अल्पपगारी समाजसेवक असावं अशीच लोकांची अपेक्षा आहे का?
शिक्षण हे जर इतकं महत्त्त्वाचं आहे, तर डॉक्टर इंजीनियर होण्यासाठी लोक धडपडतात (असं मानलं जातं) तसंच शिक्षक होण्यासाठीही त्यांनी धडपडावं, अशी परिस्थिती निर्माण करणं ही शासनाप्रमाणे समाजाचीही जबाबदारी आहे.
प्राथमिक इयत्तांमध्ये
प्राथमिक इयत्तांमध्ये शिकवणार्या शिक्षकांना जो पगार मिळतो तीच आपल्या देशात शिक्षणाची किंमत आहे. बाकी महागड्या शाळांना फक्त स्टेट्स, इमारत, एसी व युनिफॉर्मसाठी भरमसाठ पैसे देतात लोक.
☰
सध्या शिक्षक शाळेत मध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणाऱ्या धान्याच्या गोणपाटांचा हिशेब जमवण्यात गुंतले आहेत. शाळांनी गेल्या सहा वर्षांत शाळेत जमा झालेल्या गोणपाटांची विक्री करून त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करावेत, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत पावसात गळणाऱ्या छताखाली किती गोणपाट टाकले, पाय पुसायला किती वापरले, रद्दी ठेवण्यासाठी किती वापरले, मुलांना टाकाऊतून टिकाऊ गोष्टी तयार करायला शिकवताना किती गोणपाट वापरले याचा ताळमेळ लावत बसण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. बहुतेक शाळांमध्ये अगदी सहा वर्षांच्या गोणपाटांची किंमतही अगदी हजार– दोन हजार रुपयांच्या आतबाहेर असली तरी हिशोब न लागल्यास कारवाईचा आणि ‘भ्रष्टाचाराच्या आरोपाचा धसका’ घेऊन शिक्षक कामाला लागले आहेत.
https://www.loksatta.com/maharashtra-news/teachers-counting-sackcloth-du...
शालाबाह्य़ ऑनलाइन कामाचा ताण,
शालाबाह्य़ ऑनलाइन कामाचा ताण, त्यातच शाळेचा निकाल लावण्याची कालमर्यादा गाठतांना मानसिक संतुलन ढासळल्याने मुकुंद मनोहरदास शोभावत (५४) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. शोभावत हे चांदवड तालुक्यातील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
शोभावत हे अनेक वर्षे नांदगाव तालुक्यातील मोहेगाव शाळेत कार्यरत होते. सध्या त्यांची चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत श्रेणीपात्र मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली होती. शाळांच्या मुख्याध्यापकांना शासनाने विद्यार्थी माहिती या योजनेतील ३९ कलमी अर्ज प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती भरून ऑनलाइन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी त्याची शेवटची मुदत होती. तसेच शाळेचा यावर्षीचा निकाल तयार करून त्यास गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून मंजुरी घेऊन त्याला अंतिम स्वरूप देण्याची मुदतही याच दिवशी होती. या सर्व कामाचा एकत्रित तणाव आल्याने तो सहन न होऊन या शिक्षकाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तशी चिठ्ठी शोभावत यांनी लिहून ठेवलेली आढळली. या घटनेमुळे शिक्षण विभागाकडून लादल्या जाणाऱ्या शिक्षणबाह्य़ कामांमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची होणारी दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा गुरुवारी शिक्षक वर्तुळामध्ये होती.
https://www.loksatta.com/maharashtra-news/online-work-pressure-causes-su...
Pages