बंध सर्व तोडले मधेच का? (तरही)

Submitted by इस्रो on 22 December, 2017 - 04:58

भांडलास तू म्हणे खरेच का?
बंध सर्व तोडले मधेच का?

एकदम बसेल गप समोरचा
प्रश्न तो विचारतो असेच का?

रोकडा असेल तर जमेल बघ
बोलतात हे असे सगेच का?

तू नको करु विचार एवढा
जाहले असेच का? तसेच का?

वापरा जुन्यासही जरा जरा
सारखे हवे तुम्हा नवेच का?

शांत बैस नीट ऐक तू जरा
बोलतोस सारखे मधेच का?

दागिनाच दे तयार तू मला
आजवर दिलेस मज वळेच का?

मी जिवंत जर उभा तुझ्यापुढे
दाखले पुन्हा तुला हवेच का?

Group content visibility: 
Use group defaults