ह्या अनुयायांकडून त्यांना मागूदेत खुलासे

Submitted by बेफ़िकीर on 20 December, 2017 - 11:02

गझल - ह्या अनुयायांकडून त्यांना मागूदेत खुलासे
========

(20 डिसेंम्बर 2017)

ह्या अनुयायांकडून त्यांना मागूदेत खुलासे
कुणीतरी त्या पुतळ्यांमध्ये फुंका प्राण जरासे

काल आरश्यासमोर गेलो बऱ्याच वर्षांनी मी
दोघांनीही दिले एकमेकांना बघत उसासे

जरा काढ कळ, तुझा व्हायला आतुर आहे मीही
मरण मला अन मरणाला मी देतो रोज दिलासे

सुरक्षीत राहून स्वतः, तकलादू गझला रचतो
कुणीतरी उलटे फिरवा रे माझ्या घरचे वासे

सदा यशस्वी होण्याइतकी क्षमता तुझ्यात आहे
बस उलट्या बाजूने बघ उलटे पडलेले फासे

स्त्री विरहित दुनियेवरची खोटी कविता रचुदेना
जरा एकटा सोड मला तू माझ्या कामपिपासे

त्यांचा अंत भयंकर आहे, त्यांना माहित नव्हते
मला हासले जाळ्यामधुनी जे सुटले ते मासे

तुझ्यामुळे काहीही होते, काय तुला सांगू मी
हे जग माझे नसूनसुद्धा हे जग माझे भासे

तिखट वास्तवे सोसायाची हिम्मत कुणात नाही
चघळत बसते 'बेफिकीर' दुनिया नुसते बत्तासे

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users