२०१८ मधिल टॉप १० स्ट्रॅटेजीक टेक्नॉलॉजी ट्रेंड्स

Submitted by मी_किशोरी on 19 December, 2017 - 00:03

गार्टनर इंक. ही एक अमेरिका स्थित जगातील अग्रगण्य संशोधन व सल्लागार संस्था आहे. ही संस्था इन्फरमेशन टेक्नॉलॉजी संबंधित विविध नवनवीन प्रकारचे येणारे तंत्रज्ञान, कुठल्या तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात वापर होतो, त्यामुळे उद्योग जगाला तसेच जनसामान्यांना काय फायदे आणि तोटे होतात, कुठल्या संस्था त्यावर कशा प्रकारे काम करत आहेत या सर्व गोष्टींचा खोलवर अभ्यास करते. सर्व माहितीचे विश्लेषण करून, मिळणाऱ्या इन्साईट्स - अंतर्ज्ञान उद्योग व व्यवसाय जगताला पुरवत असते. प्रमुख आय. टी. कंपन्या या माहितीचा उपयोग त्यांच्या पुढील काळातील तंत्रविषयक स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी नियमितपणे करत असतात. इतकेच नव्हे तर गार्टनरच्या 'टॉप १०' रेटिंग मध्ये, किंवा गार्टनरच्या मॅजिक क्वाड्रंट मध्ये स्थान मिळवण्यासाठी तंत्र निर्मात्यांची स्पर्धा सुरू असते . मॅजिक क्वाड्रंट मध्ये स्थान मिळणे हे त्या तंत्र निर्माण संस्थेसाठी खूप प्रतिष्ठेचे असते. मग या कंपन्या त्यांच्या मार्केटिंगमध्ये मॅजिक क्वाड्रंटचा दिमाख मिरवतात. गार्टनर तंत्रनिर्मात्यांना खालील प्रकारे मॅजिक क्वाड्रन्टमधे विभागते - लिडर्स, च्यालॅंजेर्स, व्हिजनरीज, नीश niche

GartnerQuaderant1.png

अर्थातच लिडर्स क्वाड्रन्ट मधले मग राज्य करतात.
बिझनेस इंटेलिजेंन्स मधिल तंत्रज्ञानासाठीचा गार्टनर क्वाड्रन्ट २०१७

GartnerQuaderant2.png

तर अशा या गार्टनर संस्थेचा प्रत्येक वर्षी , नवीन येणाऱ्या वर्षात कुठले कुठले तंत्रज्ञान आघाडीवर असेल याबद्दल 'टॉप १० ट्रेंन्डस ' असा अहवाल प्रसिद्ध होतो. उद्योग जगतासाठीच नव्हे तर सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा हा ट्रेंड म्हणजे कल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. याचे मुख्य कारण असे की नवीन येणारी टेक्नॉलॉजी सर्वसामान्यांना विचार करायला वेळही न देता झंजावातासारखी येते आणि त्यांचे छोटे जग व्यापून टाकते. याशिवाय भारतीय लोकांच्या दृष्टीने या 'टॉप १०' ट्रेंड्सचे महत्व अजून एका गोष्टीमुळे आहे. आपण भारतीय आय. टी. सर्विसेस जसे कि प्रोग्रामिंग, डेटा एन्ट्री व अशा इतर अनेक सेवांसाठी लागणारे मनुष्यबळ पुरवण्यात अग्रेसर आहोत. हे कुशल मनुष्यबळ आपल्या असंख्य इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये तयार होते. परंतु आपल्या सर्व विद्यापीठामध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा अगदीच दरवर्षी बदलत नाही. अर्थात पूर्वीपेक्षा सर्व विद्यापीठे अद्यावत अभ्यासक्रम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करत आहेत पण तरीही आपले तरुण जी कौशल्ये मिळवून कॉलेजेस मधून बाहेर पडतात आणि उद्योग-व्यवसायांमध्ये नोकऱ्या मिळवून देणारी कौशल्ये यामधली तफावत खूपच मोठी आहे. कारण नवनवीन टेक्नॉलॉजीज विकसित होण्याच्या वेगाचा दर हा विद्यापीठांच्या अभ्यासक्रम अद्यावत करण्याच्या दरापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. यामुळेच इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडणारे फक्त ४०% युवक नोकऱ्या मिळवू शकतात तर ६०% युवक पुढील बराच काळ बेकार राहतात. या ४०% युवकांमध्ये शिकण्याची विशेष क्षमता तरी असते किंवा त्यांनी स्वतःला एखाद्या 'इन डिमांन्ड टेक्नॉलॉजी' मध्ये कुशल बनवलेले असते. उद्योगांकडे नोकऱ्या असतात पण त्यांना त्यासाठी 'परफ़ेक्ट फिट ' मिळत नाहीत, तर हजारो तरुण बेकारीमुळे निराशेच्या गर्तेत फिरत राहतात. इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विदयार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी म्हणूनच नवीन टेक्नॉलॉजी ट्रेंड्सकडे सजगपणे लक्ष देऊन, त्यातील एखाद्या टेक्नॉलॉजीचे स्किल - कौशल्य इंजिनिअरिंगच्या शिक्षणाबरोबरच आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. फक्त इंजिनिअरिंगच नव्हे तर कॉम्प्युटरशी संबंधित पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम जसे BCA, MCA, BSc , Msc computers, शिकणाऱ्या सर्वांनी, ज्यांना शिकून लवकर नोकरी मिळवायची आहे, त्यांनी नोकरीभिमुख स्किल्स, कौशल्ये मिळवणे गरजेचे आहे. जे लोक व्यवसायाभिमुख विचारप्रणालीचे आहेत त्यांना तर 'टॉप १० टेक्नॉलॉजी ट्रेंन्डस' माहित असणे अजूनच महत्वाचे आहे.
येणाऱ्या नवीन वर्षासाठी, म्हणजे २०१८ साठी, गार्टनर टॉप १० टेकनॉलॉजी ट्रेंड्स असे आहेत.

ट्रेंड क्रमांक १ - आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय हे कदाचित आतापर्यंत तुमच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोहचले असेलच, कारण हा विषय अगदीच नवीन नाहीय तर गेले वीस ते पंचवीस वर्षे चर्चेत असलेला विषय आहे. पण गेल्या एक दोन वर्षात कंपन्यांनी एकदम जोरदार उसळी घेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये प्रगती केली आहे. सोफिया नावाच्या रोबोटला सौदी अरेबियाने त्यांचे नागरिकत्व बहाल केलेले तुम्ही ऐकले, वाचले असेल. तसेच सौदी अरेबियानेच एक पूर्ण शहर जे फक्त रोबोट्सचेच शहर असे विकसित करायला सुरु केले आहे हेही तुम्हाला माहिती असेलच.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय? आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे असा कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर कंट्रोल्ड रोबोट किंवा सॉफ्टवेअर तयार करणे जे मनुष्याप्रमाणे, इंटेलिजंट मनुष्याप्रमाणे विचार करेल व वागेल.

ट्रेंड क्रमांक २ - इंटेलिजन्ट ऍप्स अँड अनॅलिटीक्स

अनॅलिटीक्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर कॉम्प्युटर्समध्ये जमा केलेल्या डेटा किंवा माहितीचे विश्लेषण करून त्यामधून निर्णय घेण्यास मदत करणारे निष्कर्ष काढणे म्हणजेच एक प्रकारे इंटेलिजन्स पुरवणे
कुठलेही ऍप, अप्लिकेशन किंवा सर्व्हिस यापुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त इंटेलिजंट असण्याची, बनण्याची गरज असून त्यासाठी त्या सर्व सॉफ्टवेअर्स मध्ये अंतर्गत प्रगत अनॅलिटीक्स वापरले जाणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे अनॅलिटीक्समध्ये अंतर्भाव होणाऱ्या विविध तंत्रप्रणाली जसे डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा मायनिंग, प्रिस्क्रिप्टिव्ह - डिस्क्रिप्टिव्ह - प्रिडिक्टिव्ह अनॅलिटीक्स, ऑन लाईन ऍनालीटीकल प्रोसेसिंग, स्टॅटिस्टिकल अनॅलिटीक्स, डेटा सायन्स, बिझनेस इंटेलिजन्स या सर्व गेले १५ वर्षाहून अधिक काळ महत्वपूर्ण बनून राहिलेल्या तंत्रांचे आधुनिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. या सर्व प्रणाली वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांशी संबंधितही आहेत.

ट्रेंड क्रमांक ३ - इंटेलिजंट थिंग्ज

वेमो - गुगलच्या सेल्फ ड्रायविंग कारबद्दल तुम्ही वाचलं असेल. इंटेलिजंट थिंग्ज म्हणजे निरीक्षकांशिवाय किंवा कुठल्याही मनुष्याच्या देखरेखीशिवाय स्वतःचे स्वतः काम करणाऱ्या स्मार्ट वस्तू, जसे वेमो किंवा स्मार्ट कॅमेरा, स्वयंचलित शेती करणारी अवजारे, कारखान्यांमधील स्वयंचलित यंत्रे इत्यादी..
आता वस्तू इंटेलिजंट होण्यासाठी या वस्तूंमध्ये अगदी लहान आकाराचे पण पुरेशी क्षमता असलेले प्रोसेसर्स म्हणजे छोटेखानी कॉम्प्युटर्सच बसवले जातात. पण त्याबरोबरच तापमान, दाब, स्पर्श, अडथळा, द्रव पदार्थ, त्यांची घनता व पातळी, वायुमधील घटक इ. सर्व ओळखू शकणार, मोजू शकणारे - सेन्स करू शकणारे इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्स अशा इंटेलिजंट वस्तूंमध्ये वापरले जातात. इथे बाकी सर्व इंटेलिजंट टेकनॉलॉजीज बरोबरच इलेक्ट्रॉनिक्स सेन्सर्स आणि त्यांचे प्रोसेसर्स बरोबरचे कनेक्शन, कम्युनिकेशन हे सर्वही तितकेच महत्वाचे आहे.

ट्रेंड क्रमांक ४ - डिजिटल ट्विन्स

एखाद्या प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या वस्तू, मालमत्ता, प्रक्रिया किंवा प्रणाली यांची डिजिटल प्रतिकृती म्हणजे डिजिटल ट्वीन. असे डिजिटल ट्वीन त्याच्या 'रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट ' शी लिंक्ड असते आणि त्या ऑब्जेक्टबद्दल माहिती पुरवते. उद्यम जगतात असे डिजिटल ट्विन्स त्याच्या खऱ्या ऑब्जेक्टचे मॉनिटरिंग, डायग्नॉस्टिक्स, प्रोग्नोस्टीक्स म्हणजे प्रिडिक्टिव्ह डायग्नॉस्टिक्स या सगळ्या साठी वापरले जात आहेत. उदा. एअर क्राफ्ट इंजिन, विंड टरबाइन इत्यादींचे डिजिटल ट्विन्स वापरले जात आहेत. डिजिटल ट्विन निर्मितीसाठीही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, अनॅलिटीक्स या बरोबरच इंटरनेट ऑफ थिंग्ज ही संकल्पना व तंत्र वापरले जाते.

ट्रेंड क्रमांक ५ - EDGE एज टेक्नॉलॉजी युजींग क्लाऊड

एज कॉम्प्युटिंग म्हणजे जिथे माहिती निर्माण होते तिथेच माहिती स्रोताजवळच ती प्रोसेस करणे. एज कॉम्प्युटिंगमुळे कनेक्टिव्हिटी, लॅटेन्सी, बॅन्डविड्थ याच्याशी संबंधित आव्हाने जास्त चांगल्या प्रकारे हाताळता येऊन जास्त चांगली कार्यक्षमता मिळवता येते. एक सर्वसामान्य गैरसमज असा आहे की एज कॉम्प्युटिंग आणि क्लाऊड कॉम्प्युटिंग या दोन विरोधी किंवा परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या विचार पद्धती आहेत. पण यापुढचा ट्रेंड या दोन टेक्नॉलॉजीजचा एकत्र वापर करणे हा आहे.

ट्रेंड क्रमांक ६ - कॉन्व्हरसेशनल प्लॅटफॉर्म्स - संवादात्मक मंच
कॉन्व्हरसेशनल प्लॅटफॉर्म्समध्ये आतापर्यंत संवादाचा हेतू मांडणे आणि तो संवादातून पोहचवणे हे वापरकर्त्याचे काम होते, आहे. पण आता या सर्व प्लॅटफॉर्म्सवर जे काही प्रमुख बदल बघायला मिळतील त्यामध्ये एक मुख्य बदल हा असेल. या सिस्टिम्स काही साधी उत्तरे स्वतःहून देण्याइतक्या सक्षम असतातच, पण आता या सिस्टिम्स संवादकर्त्याचा हेतू जाणून घ्यायला लागतील. यापेक्षाही अजून अवघड क्रिया करायला या सिस्टिम्स सज्ज होतील. जसे, गुन्ह्यातील साक्षीदारांच्या साक्षी नोंदवणे व त्यावरून संशयिताचे चित्र रेखाटने. हे फक्त एक उदाहरण होय. अशा बऱ्याच अवघड गोष्टी शक्य होतील.

ट्रेंड क्रमांक ७ - इमर्सिव्ह एक्सपिरिअन्स - गुंगवून टाकणारा अनुभव
व्हर्चुअल रिऍलिटी - आभासी वास्तव आणि त्याचा उपयोग करून आलेले निरनिराळे गेम्स तुम्हाला कदाचित माहित असतील. बसल्या जागी आपल्याला दुसऱ्या जगात, वेगळ्या ठिकाणावर पोहचवू शकणारे आणि तिथे असण्याचा अनुभव देऊ शकणारे हे तंत्र आहे. यामध्ये आता 'ऑगमेंटेड रिऍलिटी’ची भर पडलीय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्सच्या साहाय्याने हा अनुभव अधिक वास्तवाशी जवळ नेणारा केला जातोय. या दोन्ही तंत्रांचा एकत्र वापर करून 'मिक्सड रिऍलिटी’ हे नवीन तंत्र तयार झाले आहे. आणि यामध्ये कॉन्व्हरसेशनल प्लॅटफॉर्म्सचा इंटेलिजन्स वापरून, प्रत्येक अँप्लिकेशनमध्ये तुम्हाला अधिक गुंगवून टाकणारा अनुभव म्हणजे 'इमर्सिव्ह एक्सपिरिअन्स' देण्याचा चढाओढीने प्रयत्न होईल.

ट्रेंड क्रमांक ८ - ब्लॉकचेन

बिटकॉइन या डिजिटल कॉइनच्या सर्व व्यवहारांसाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरली जाते. ही एक सार्वजनिक नोंदवही असून, डिजिटल करंसीच्या व्यवहारांच्या सर्व नोंदी, खाजगी माहिती न देता, चिन्हात्मक पद्धतीने, सर्वांना बघता येतील अशा पद्धतीने नोंदवल्या जातात. बिटकॉइनच्या यशानंतर उद्योग जगताचे लक्ष या टेक्नॉलॉजीकडे वेधले गेले. विविध क्षेत्रांमध्ये या टेक्नॉलॉजीचा उपयोग करता येईल याचे आकलन झाल्यानंतर त्यादृष्टीने प्रयत्न व संशोधन सुरु झाले. २०१८ मध्ये म्हणूनच ब्लॉकचेन एक मुख्य प्रवाह असेल.

ट्रेंड क्रमांक ९ - इव्हेंट ड्रिव्हन टेक्नॉलॉजीज

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि इतर टेक्नॉलॉजीजमधल्या प्रगतीमुळे, ऑटोमेशनमुळे उद्योग व्यवसायातल्या कुठल्याही इव्हेंटला, घटनेला सेन्स करणे, ओळखणे, समजणे , आयडेंटिफाय करणे व त्यानुसार पुढचा घटनाक्रम आखणे आता आणखी सोपे होत चालले आहे. २०१८ मध्ये अशा इव्हेंट ड्रिव्हन टेक्नॉलॉजीजची चलती असेल.

ट्रेंड क्रमांक १० - कन्टिन्यूअस ऍडॉपटिव्ह रिस्क अँड ट्रस्ट असेसमेंट - CARTA
जसजसे डिजिटल बिझनेसेस मधली गुंतागुंत वाढत आहे, नवनवीन अत्याधुनिक साधने उपलब्ध होत आहेत तसे संभाव्य धोके वाढत आहेत. पारंपरिक सुरक्षेची साधने डिजिटल जगात पुरेशी नाहीत. CARTA या तंत्रामध्ये आधुनिक पद्धत वापरून अंतर्गत तसेच बाहेरून होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षा दिली जाते.

आता यातील कुठलाही एक जरी ट्रेंड घेतला तरी त्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान संपूर्णपणे एकाच व्यक्तिला अवगत असेल, तो त्यामध्ये तज्ञ असेल असे असणे बरेच अवघड आहे. कारण या सर्वच ट्रेंडमध्ये अनेक वेगवेगळ्या ज्याला हायब्रीड म्हंटले जाते अशा टेक्नॉलॉजीजचा एकात्मिक रित्या वापर होतो. अतिजलद व हाय व्हॉल्युम डेटा प्रोसेसिंग व डेटा ऍनालीटीकस, मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, स्पीच रेकग्निशन, व्हिजन सिस्टिम्स, एक्स्पर्ट सिस्टिम्स, रोबोटिक्स, स्टॅस्टिकल प्रोग्रामिंग लँग्वेज, डेटाबेस मॅनजेमेंट सिस्टिम या सर्व तंत्र प्रणालींचा एकत्र वापर केला जातो. या मधील कुठलयाही एका टेक्नॉलॉजीचे ज्ञान तुमच्याकडे असेल, आणि ती तंत्रप्रणाली बाकीच्या प्रणालींशी दळणवळण, संवाद कशी करते याचे कौशल्य तुम्ही जर मिळवले असेल तर तुम्ही नोकरी मिळवण्याचा सहज गड सर करू शकाल. व्यावसायिकांना मात्र आपल्या व्यवसायाला यातील काय उपयोगी पडेल, काय मारक ठरेल, यातल्या कुठल्या ट्रेंडचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होईल, या सर्वच गोष्टींचा विचार करावा लागेल.
Sofia.pngSelfDrivingCar.png

सर्व प्रकाशचित्रे - आंतरजालावरून साभार

-धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

छान !

धन्यवाद हर्षल_चव्हाण , अक्कलशून्य.
हा माझा मायबोलीवरचाच नव्हे तर सर्वार्थानं पहिला लेख आहे.
पहिल्यावहिल्या अप्रुपाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

छान लेख. पुढील लेखनास शुभेच्छा. ह्यास इथे पुलेशु असा शॉर्ट फॉर्म आहे. ती पहिली चित्रे काही समजली नाहीत पण लेख समजला.

व्वा! लेख पूर्ण वाचला नाही, सावकाश वाचेन. पण माबोवर असे काही विषय मांडल्याने खूप छान वाटते हे सांगायला आवर्जून प्रतिसाद दिला आहे.
तुमचा ह्या विषयावर चांगला अभ्यास असेल तर तुमच्याकडून अजून लेख आलेले आवडतील.

धन्यवाद अमा, अभि_नव, पुरंदरे शशांक
नानकळा , धन्यवाद. सातत्याने लिहिण्याचा विचार तर जरूर आहे.
आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाची गरज आहे.

मी मायबोलीची खूप पूर्वीपासून अगदी नियमित वाचक आहे.
त्यामुळे आपल्या सर्वांची मला ओळख आहेच.

छान माहिती.

तुमचा ह्या विषयावर चांगला अभ्यास असेल तर तुमच्याकडून अजून लेख आलेले आवडतील.>>> +१

छान लेख.
तुमचा ह्या विषयावर चांगला अभ्यास असेल तर तुमच्याकडून अजून लेख आलेले आवडतील.>> +१११ं
मायबोलीवर स्वागत आणि धन्यवाद !!

छान माहिती. इंटरनेट ऑफ थिंग्जचा ट्रेंड म्हणून या यादीमध्ये समावेश का नाही?

छान व अभ्यासपुर्ण लेख..
गार्टनर बद्दल, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करू लागल्यावर काही वर्षांनंतर समजले. परंतु शिकत असताना अजिबात माहिती नव्हती. अभियांत्रिकी महाविद्यालयांचे नियमन करणारी संस्था AICTE,.अभ्यास क्रम ठरवताना कसा उपयोग करित असेल ते माहिती नाही. पण अभियांत्रिकी शाखेतुन शिक्षण घेतांना व बाहेर पडल्यानंतर दिशा ठरवायला नक्कीच याची मदत होऊ शकते. मि शिकत असताना, शक्यतो आपल्या सिनिअर लोकांच्या सल्ल्याने आपली दिशा ठरवली जात असे. त्या वेळी Web Technology, नवीन व Hot असुन सुद्धा काही लोकांनी लवकरात लवकर मोठ्या संस्थेत नोकरी मिळेल म्हणून बाहेर पडल्यानंतर Mainframe सारखे महागडे कोर्स केले.

धन्यवाद rockstar१९८१, चैत्रगंधा, maitreyee, बन्नु .

चैत्रगंधा, या सर्वच ट्रेण्ड्स मध्ये, इंटरनेट ऑफ थिंग्ज चा वापर अपरिहार्य व अंतर्भूत रित्या करावाच लागणार आहे.

उत्तम आढावा. यातले अनेक ट्रेन्ड्स तुम्ही नमूद केल्याप्रमाणे एकमेकांवर (तंत्रज्ञानाच्या दृष्टीने) अवलंबून आहेत.
नोकरीचा गड सर करण्याबाबतः या ट्रेन्ड्सनुसार निर्माण होणार्‍या नोकार्‍या ह्या फक्त संगणक क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत असल्यास मिळणार नाहीत. बहुतांशी नोकर्‍या या डोमेन नॉलेज असल्यावरच मिळतील. केवळ संगणक किंवा प्रोग्रॅमिंग तंत्र अवगत केलीत तर पुन्हा तुम्ही नुसते प्रोग्रॅमरच उराल. पुढे जाण्याच्या संधी कमीच राहतील. त्यापेक्षा विद्यार्थ्यांनी विशेषतः इंजिनीअरींग करून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांनी थोडी कमी ग्लॅमर असलेली, सुरुवातीला पैसा कमी मिळत असला तरी कोअर क्षेत्रातील नोकरी निवडावी व डोमेनवर पकड घट्ट करून अधिक संधी नंतर मिळतील त्याचा लाभ घ्यावा असे माझे मत आहे.

अतिशय सुंदर माहिती, सोप्या शब्दांत! आवडला लेख. ४, ९ आणि १० बद्दल ऐकले नव्हते आधी.

मात्र गार्टनर हे अशा अ‍ॅनॅलिस्ट कंपन्यांपैकी प्रमुख असले, तरी फॉरेस्टर व इतरही अशा कंपन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या रूपांत अशी माहिती प्रकाशित करतात. फॉरेस्टर वाले क्वाड्रण्ट च्या ऐवजी "व्हेव्ह" म्हणून एका त्यांच्या प्रोप्रायटरी स्वरूपात प्रकाशित करतात.

या कंपन्यांचे महत्त्व वरती लिहीले आहे त्यात आयटी कंपन्या आपली दिशा ठरवायला व हे तंत्रज्ञान तयार करणार्‍या कंपन्यात त्यात सर्वात वरती आपले नाव दिसेल हे करायला उत्सुक असतात हा भाग आला आहे. पण कदाचित त्याहीपेक्षा मोठे कारण आहे या रिपोर्ट्स ना महत्त्व असण्याचे - ते म्हणजे इण्डस्ट्रीमधल्या विविध कंपन्यांचे टॉप चे लोक- म्हणजे भावी ग्राहक- हे रिपोर्ट्स वाचतात. त्यांना जेव्हा या क्षेत्रात काही सर्विसेस, अ‍ॅप्लिकेशन्स वगैरे विकत घ्यायची असतील कंपनीअंतर्गत प्रकल्पांकरता, तेव्हा ते या रिपोर्ट्स मधे "वरती" असलेल्या कंपन्यांना संधी देतात. म्हणजे तंत्रज्ञान विकसित करणार्‍या प्रॉडक्ट कंपन्या व त्याच्याभोवती आपल्या सर्विसेस देणार्‍या आयटी कंपन्या या दोघांच्या दृष्टीने नवीन बिझिनेस व रेवेन्यू मिळवण्याकरता या रिपोर्ट्स चे खूप महत्त्व असते.

आणखी एक म्हणजे नवीन करीयर करणार्‍यांकरता हे उपयोगी आहेच. पण गेल्या काही वर्षांत आलेले क्लाउड, बिग डेटा, डेटा सायन्स हे अजून खूप हॉट आहे आणि राहणार आहे. ते अगदी २०१७/१८ च्या नवीन ट्रेन्ड मधे नसले तरी करीयर च्या दृष्टीने खूप उपयोगी आहे.

वरच्या २ नंबर मध्ये बिग डेटा आलय ना?
डोमेन नॉलेज हवं हे तर खरच. पण प्रत्येकाला प्रोग्रॅमिंग हे आलच पाहिजे. पायथॉन आलं तरी चालेल, कंपाईल्ड भाषा नसली तरी चालेल पण ते कन्सेप्ट पहिल्या पासुन माहित हवेतच. डोमेन बदलतो, नवा येतो, अनेकदा डोमेनचं जुजबी ज्ञान घेणं अ‍ॅनॅलिटीकल स्किल असलेल्या व्यक्तीला फार कठिण नसते.

फा, डिजिटल ट्विनचा उपयोग मोठ्या प्रमाणात आफ्टर सेल्स सर्विसमध्ये व थ्री-डी प्रिन्टिंगमध्ये होत आहे. त्याला आयओटी + प्रेडिक्टिव अ‍ॅनालिसिस + रोबोटिक सॉफ्टवेअर ऑटोमेशन अशी फोडणी दिलीत तर फार रंजक युज केसेस दिसत आहेत.
उदा. समुद्रात ऑइल रिगवर एक मशिन आहे. त्याचा डिजिटल ट्विन मशिनच्या उत्पादकाकडे आहे. आयओटी वापरून ऑपरेटिंग कंडिशन व रिअल टाइम ऑप पॅरामिटर मिळत आहेत. वेदर पॅटर्न आयबीम वॅटसनकडून येतो आहे. आता हे सगळे एकत्र जोडून प्रेडिक्टिव अ‍ॅनालिसिस वापरून कधी ब्रेक डाउन होईल, मेन्टेनन्स लागेल व कोणता पार्ट कधी रिप्लेस करायला लागेल ते प्रेडिक्ट करता येईल. मग आरपीए वापरून इआरपी सिस्टममध्ये सर्विस मोड्युल/क्लाउडमध्ये पार्ट रिक्वेस्ट आपोआप जनरेट होइल. ती चीनला फाउन्ड्रीत न पाठवता एका थ्रीडी प्रिन्टरला प्रिन्टिंगला जाईल. जर समुद्रातल्या रिगवरच्या मशिनचा वेअर जास्त झाला असेल तर थोडेसे चेन्ज्ड डिझाइन प्रिन्ट करून तो पार्ट ते मशिन ब्रेकडाउन व्हायच्या आधी रिगवर पोहोचले असेल Happy

वरच्या २ नंबर मध्ये बिग डेटा आलय ना? >>> हो तुझे बरोबर आहे अमित. तेथे जे लिहीले आहे त्यात ते आलेच.

डोमेन बदलतो, नवा येतो, अनेकदा डोमेनचं जुजबी ज्ञान घेणं अ‍ॅनॅलिटीकल स्किल असलेल्या व्यक्तीला फार कठिण नसते. >>> याबाबतीत माझे मत टण्याशी जुळते. इथे डोमेन म्हणजे एक उदाहरण - सेल्स ची प्रोसेस. ती प्रोसेस, त्यातील खाचाखोचा, चॅलेंजेस जर माहिती असतील तर ती आज एका अ‍ॅप्लिकेशन ने तर उद्या दुसर्‍या अ‍ॅप्लिकेशन सोडवणे हे तितके कठीण नसते. हे ही कबूल की ती प्रोसेसच काळानुसार बदलते, पण पूर्णपणे आधीची बंद झाली व नवीन सुरू झाली असे "इण्डस्ट्री" मधे फार क्वचित होते.

मात्र पायथॉन सारखे किमान थोडेफार प्रोग्रॅमिंग आले तर जबरदस्त फायदा असतो.

चांगली माहिती. गार्टनर ची आर्टिकल्स म्हणजे माहितीचा धबधबाच असतो. ईथे मराठीत हे वाचायला खूपच सुटसुटीत वाटतय धन्यवाद.

Pages