सरिता

Submitted by मकरन्द वळे on 18 December, 2017 - 06:26

सरिता

खळखळ सुंदर वाहे निरंतर
सरिता जोडी डोंगर-सागर
पर्वतराजी रमणीय मनोहर
थोर कुलीन लाभे माहेर

ओघळरुपी उगमात जन्मली
आोहोळ निर्झर म्हणुन वाढली
प्रवाह अनेक विलीन करुनी
कौमार्याची सीमा गाठली

कडे कपारी पठार दरी
तरु वल्लरी हिचे सहचरी
अवखळ अल्लड हिचे तरुणपण
ओढ अंतरी शांत अथांगपण

गिरीराज सचिंत कन्या उपवर
कोण मिळावा अथांगसा वर
गगनाविण ना त्याला ठावा
दुसरा कोणी अनुरुप रावा

निसर्ग नदीचा मैतर खास
ठाऊक त्या सरीतेची आस
ऊतरली डोंगर ओढ अनावर
भरला मनी अथांग रत्नाकर

आता हिला कोणी अडवावे
कुठल्या शब्दे अन् समजावे
गिरीकन्या तू मधुर जलाची
साथ निभे का लवण चविची ?

रेशिमबंध परि ठरतात स्वर्गी
अन् भुवरी लागतात मार्गी
घडवी मिलन ओढ अनावर
अमरप्रेमी हे सरिता सागर

Group content visibility: 
Public - accessible to all site users