उकल

Submitted by दाद on 18 December, 2017 - 00:56

एव्हाना गिरिशने आपलं नशीब स्वीकारलं होतं. डॉक्टरी उपाय, लोक सांगतात म्हणून मंत्र-तंत्राचे वगैरे सगळे उपाय झाले होते. त्याला मूल होऊ शकणार नाही हे त्याला आणि सुनिताला स्वीकारणं सुरुवातीला जड गेलं. पण दोघही सुशिक्षित होते, आपापल्या कामात बुडून जायचे.
सुनीता एक प्रतिथयश चाईल्ड सायकॉलॉजिस्ट आणि गिरिश एक स्वीमिंग कोच. दोघांची ओळखही तिच्या एका पेशंटच्या मधूनच झालेली. मनं जुळली आणि लग्नं केलं. दोघांना मुलांची अत्यंत आवड. पाचेक वर्षात अनेक प्रयत्नांअंती, आणि टेस्ट्स्मधून गिरिशमध्येच दोष निघाल्याने मूल होणार नाही हे लक्षात आलं तेव्हा दोघेही तसे कोसळलेच. पण दोघेही शिकलेले होते, समजदार होते. नातेवाईकांनी जोर देऊनही विचार्-विनिमय करून दत्तक वगैरेच्या भानगडीत पडायचं नाही असं ठरवलं. दोन्ही घरात सगळीच माणसं समजदार असणं हा दैवयोग, पण त्यांच्या बाबतीत होता खरं. त्यांना संभाळून घेणारे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी होते अवती-भवती.

आपापल्या क्षेत्रात दोघेही माहीर होते, अगदी समरसून काम करायचे. गिरिशचे विद्यार्थी सगळ्य देशभरातल्या स्पर्धांमध्ये यश मिळवत होते. गिरिश स्वीमिंगबरोबरच वेगवेगळ्या वनस्पती अर्कांचा, तेलांचा मालीश करण्याच्या एका आयुर्वेदिक तंत्राचाही गुरू होता. त्याच्या हिमालयातल्या एका एक्स्पिडिशनमधल्या एका जर्मन मित्राचा हा बांधलेला गंडा आणि मिळवलेली विद्या. त्यासाठी त्याच्याबरोबर तिबेट, हिमाचल आणि राजस्थानही फिरला, औषधी वनस्पती शोधत. गिरिशचं हे असं वेगळेपण सुनिताने असोशीने जपलं होतं.
सुनिता भारतातच नव्हे तर बाहेरही विख्यात होती. तिचे पेपर्स जगभर वाचले जायचे. तिच्याशी कंसल्ट करायला बाहेरूनही पेशंट्स यायचे.

दोघांच्या कामाच्या वेळाही जुळून आलेल्या. दोघेही दुपारी तीनेक तास घरी असायचे. तेव्हा गिरिशच्या स्वयंपाकघरात सुनिताची आणि सुनिताच्या बागेत गिरिशची लुडबुड चालायची. एकमेकांना आपापल्या कामातल्या गोष्टी सांगत तोही वेळ जायचा.

एक दिवस पोलिओने उजवा पाय अधू झालेल्या चिन्मयला त्याची आई घेऊन आली स्विमिंगपूल वर. आधी फोन करून त्यावेळी इतर कुणी पूलवर नाही ह्याची खात्री करून घेऊन त्या आल्या. आधी नुसत्याच स्वत्: आल्या, कुणीही आजूबाजूला नाही ह्याची खात्री करून घेऊन मगच गाडीतून ड्रायव्हरच्या मदतीने व्हीलचेअरवरून चिन्मयला आणलं. एकच पाय अधू होऊनही व्हीलचेअरमध्ये बसलेला चिन्मय, टेबलाच्या पलिकडे खिडकीच्या बाहेर बघत किंवा खाली मान घालून होय किंवा नाही इतकच पुटपुटणारा हा मुलगा नुसता पायानेच अधू झालेला नाही हे गिरिशच्या लक्षात आलं. चित्राताई त्याला गाडीत बसवून परत आल्या, गिरिशशी बोलायला..

हा चौदा-पंधरा वर्षांचा तरूण मुलगा दोन वर्षांपूर्वी पर्यंत शाळेच्या बास्केट्बॉल, हॉकीच्या टीममध्ये होता, एक उत्तम गायक आणि तबला वादक होता हे सांगून पटलं नसतं. जगन्मित्र, हरहुन्नरी, विनोदी अशा एका कोवळ्या, नुकत्याच बहरू लागलेल्या आयुष्यावर पोलिओने उभे आडवे आघात करून त्याला निष्पर्ण केलं होतं.

चिन्नूचे वडील स्वत्: एक उत्तम ऍथलेट होते त्यांच्या शाळेच्या, कॉलेजच्या कारकिर्दीत. अजूनही वयाच्या पन्नाशीतही ते कंपनीच्या हॉकी टीममध्ये खेळत होते. स्वत:ला कामात गढवून घेत आणि जास्तीत जास्त बाहेर रहात त्यांनी घरातला प्रॉब्लेम जवळ जवळ डिनाय केला होता. घरी असत तेव्हा, भेटत तेव्हा चिन्नूला गाडीतून कुठे कुठे फिरायला नेणे, त्याच्या सुखसोई, औषधोपचार या सगळ्याची चौकशी आणि आपल्यामते हात-भार लावत. पण एक बाप म्हणून त्याच्या मानसिक तयारीकडे त्यांच्याकडून काहीच अपेक्षा करणं मूर्खपणाचं ठरलं असतं. चित्राबाईंच्यामते त्यांनी अजून हे स्वीकारलच नव्हतं. ते स्वत: अजून तयार नव्हते तर चिन्नूला काय मदत करणार होते ते?

बैठे खेळ कधीच न खेळलेला हा गडी आता तासनतास कंप्यूटरवर काही-बाही वाचत असायचा. शाळेत अभ्यासातही त्याचं लक्ष कमीच झालं होतं. एक 'काय फरक पडतो' अस attitude तयार झाला होता.

आत्ता पंख उभारून घरट्याबाहेर पडू पहाणारं आपलं पिल्लू जाया होऊन घरट्यात कुचमत बसलेलं बघून चित्राबाई कुणाही आईइतक्याच घायाळ झाल्या होत्या. आपल्यापरीने त्याला जमेल तसं "ताळ्यावर" आणण्याचा प्रय्त्नं करत होत्या.

त्यांचं ऐकताना, त्यांच्याशी बोलतान गिरिशला जाणवलं की हा नुसताच चिन्मयचा प्रॉब्लेम नाही, सगळ्या घरालाच पोलिओने जायबंदी केलय.

"अरे, असं नाउमेद होऊन कसं चालेल? त्याला मोठ्ठा आघात आहे हा. तुझी बाकीची मुलं शिकतात ना, ते त्यांना आवडतं पोहायला म्हणून. त्यांच्यासाठी तो एक खेळ आहे, किंवा नुसतच एक नवीन स्किल. चिन्मयसाठी ही औषधाची गोळी आहे... आणि हे तो जाणून आहे... हेच तू विसरतोयस", सुनिता गिरिशला समजावत होती.

गिरिशने खूप समजावूनही हा नुसता शारिरिक नाही तर पर्यायाने मानसिक प्रॉब्लेम झाला आहे, हे चित्राबाईंना पटत नव्हतं. सुनीता किंवा दुसरी कुणीही मानसोपचारतज्ञ त्याला भेटणं आवश्यक आहे. किमान काऊंसेलिंगतरी व्हायला हवं. हे कसही समजावून सागितलं तरी पटत नव्हतं. दिवसेंदिवस गिरिशला अजून काय करावं समजत नव्हतं.

"अगं पण आता जवळ जवळ पाच महिने होत आले... अजून त्याच्यात काहीच सुधारणा नाही. मी सांगतोय तितकं आणि फक्त तितकंच करतोय तो. त्यातही स्वत:हून काही करण्याची इच्छाच नाहीये........
अगं तू बघायला पाहिजेस. किती नाईलाज म्हणून त्या व्हील्चेअर वरून पाण्यात उतरतो. शक्य झालं असतं ना, तर व्हील्चेअर सकटच पाण्यात आला असता.... पोहायला!
आई आणते, म्हणून हा येतो. मी सांगतो म्हणून हात हलवतो, पाय मारतो. 'पुरे का' विचारलं तर नेहमी 'हो'! तेसुद्धा मानेने. अग हा बोलतच नाही. माझ्याशीच नाही अस नाही, कुणाशीच नाही..... I really don't know what to do.... मी जे करतोय त्याचा काय परिणाम होतोय.... मुळात परिणाम होतोय का नाही हे सुद्धा कळत नाहीये मला.
बर.... त्याचे जरा जरी रिस्पॉन्सेस यायला लागले ना, तर मी मसाज थेरपी पॅरलली चालू करू शकतो..... पण जोपर्यंत......"

सुनिताने त्याच्याकडे टक लावून बघत होती आणि तिच्या ओठांच्या कोपर्‍यावर हलकं हसू होतं. शरीर आणि मन यांच्या दु:खांच्चा विचित्र पीळ, गुंता, तो सुद्धा दुसर्‍याकुणाचा तरी घेऊन तिचा नवरा बसला होता. आपल्यामते सोडवण्याच्या प्रयत्नात. समोर reference बुक्सचा पसारा, टिपणं काढलीयेत. चार रंगांची पेन, हायलायटर्स.....

तिला एकदम मागे कधीतरी हट्टाने त्याने विणकाम शिकायला घेतल्याचं आठवलं, ते सुद्धा दुरंगी हातमोजे असलं काहीतरी.
'येत नाही म्हणजे काय', असल्या आवेशाने गिरिश सुया फिरवत होता..... ते बघण एक परवडलं. पण ते एन्जॉय करण्यासाठी मग मोठ्ठ्याने गाणी म्हणायचा. हळूवार हातांनी टाके घालत स्वत:शी गुणगुणणार्‍या सासूबाई तिला आठवल्या आणि हा प्रकार! .....'विनोदी'च्या पलिकडे.

पण एकदिवस त्याच्या खोलीतून काहीच आवाज कसे नाहीत म्हणून डोकावली तर दोन्ही रंगांच्या लोकरीच्या गुंड्यांचा गुन्ता सोडवत बसला होता. तो सोडवताना आणखिन गुंता होत होता. तिची मदत घ्यायचं साफ नाकारलं. तिने सासूबाईंना बोलावून घेतलं, "तुमच्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, सोडवायला या" म्हणून सांगत.
त्याच्या खोलीतला प्रकार बघून त्यांनी डोक्याला हात लावला होता आणि तिला धपाटा घातला होता.

आत्तासुध्धा अगदी जमिनीवर फतकल मारलं नव्हतं पण चेहर्‍यावर भाव तेच होते.... हतबल!

तिचं एकटक बघणं गिरिशच्या लक्षात आलं. आता आपली मानसोपचारतज्ञ बायको आपल्याला सुधारणार, हे ही लक्षात आलं.
"काय? .... काय झालं? टकरी कावळिण दिसत्येस आत्ता", frustrate होऊन चिडला की लहान मुलांसारखा दिसायचा आणि वागायचाही. तसच आत्ताही.

"तुला आठवतं तुझं वीणकाम?" चुकीची आठवण करून देणं होतं.... चुकीच्या वेळीही. पण इलाज नव्हता.

"त्याचं काय आता?", टोपण नसलेल्या बॉलपेनाचं टोपण शोधत गिरिश म्हणाला.

"त्यावेळचा गुंता आठवतोय? आणि आईंनी काय सांगितल होतं?....", आता मात्र गिरिश खुर्चीवर बसला. एकात एक बोट अडकवून बनवलेल्या मुठीवर हनुवटी- 'गडी ऐकून घ्यायला तयार'चं लक्षण.
सासूचे शब्द त्यांच्याच टोनमध्ये सुनिताने त्याला ऐकवले.

"गुंता झालाय हेच आधी कबूल कर, स्वत:शी. गुंता अलवारच उलगायचा असतो, बोद्या. त्याच्याबरोबर धसमुसळेपणा करून चालत नाही.
बर... गुंता हा धाग्याचा स्वभाव नाही.... कुणीतरी घातल्याशिवाय गाठी बसत नाहीत..... मग सुताच भूत बनायला वेळ लागत नाही. धाग्याच्या पीळाबरोबर जा... तो वळेल तसा वळ, त्याच्या प्रत्येक गाठीतून शीर. दिसताना सूरगाठ दिसत्ये पण निरगाठ असू शकते..... तरच तुला ह्या चक्रव्यूहातून बाहेर यायला जमेल. नुसतीच आत उडी घेऊन दे-मार घे-मार केलस तर तुझा अभिमन्यू झालाच म्हणून समज!",

थोडं मिश्किल हसत, थोडं खरच गंभीर होत, सासूबाईंची नक्कल करत सुनीता बोलत होती. अभिमन्यू वगैरे मसाला तिचाच... पण ते गिरिशला आठवणार नाही हे ही तिला माहीत होत.
तिचं बोलून झालं तसा गिरिश उठला आणि कमरेवर हात ठेवून खिडकीबाहेर बघत उभा राहिला. मग वळून तिला घट्ट मिठीत घेऊन कपाळावर ओठ ठेवले. आता चहाची फर्माईश असा तिच्या मनातला विचार, "चहा टाक मस्तपैकी तोपर्यंत दोन फेर्‍या मारून येतो...." असा बोलून दाखवत बूट घालून बाहेरही पडला.

हसत सुनिता वळली.... हे नेहमीचं. डोक्यातली चक्र फिरायला लागली की, धावायला जायचं! आता येईल परत मोठ्ठा गुंता घेऊन किंवा नीट गुंडाळलेला गुंडा घेऊन म्हणत चहा टाकला आणि वाट बघत बसली.

पाच आठवड्यांनी आज पहिल्यांदा गिरिश पूलवर निघाला होता. त्यादिवशी पाच मिनिटांत येतो सांगून गेलेला एकदम हॉस्पिटलमध्येच गेला. दोनच रस्ते सोडून एका बंगल्यातल्या कुणीतरी चुकून वेगात गाडी रिव्हर्समध्ये बाहेर काढली. फुटपाथवर धावणारा गिरिश उडवला गेला आणि उजवा पाय आणि डावा हात फ़्रॅक्चर करून बसला. एकतर आधी शुद्धीवर यायलाच दोन दिवस लागले.
सुनीताचा जीव अर्धा झाला होता. आई-तातांना तिने जबरदस्तीने घरी पाठवलं. दोघेही हार्ट पेशंट्स. त्याचे विद्यार्थी, मित्र सगळे येऊन जात होते.... धावून धावून सगळ्यांनी मदत केली. पायाचं ऑपरेशन करावं लागलं. सगळं स्थिरस्थावर होऊन घरी यायला आठवडा लागला.

घरी आल्यावरही गाडी रूळावर यायला बरेच दिवस लागले. नुसता विचार करायचा तर पळून येणार्‍या ह्या पात्राला बैठे प्रकार जरा जडच गेले. थोडी चिडचिड, वैताग. ऑपरेशनची जखम भरून येणं, फिजिऑच्या वार्‍या, कधी फिजिओचे व्यायाम करायचा कंटाळा, कधी आदल्या दोन दिवसांचा आणि दुसर्‍या दिवसाचाही व्यायाम आजच करायचा, प्लास्टरवाल्या पायचा पिलर घेऊन स्वयंपाकघरात काम करण्याचा हट्ट, मग तिला स्वयंपाक शिकवण्याचा प्रयत्नं, तिच्या आमटीच्या पातेल्यात पातळ आमटी म्हणून सूर मारण्याची acting करताना तोल गेला, बाकी काही नाही पण खोक पडली डोक्याला मागे.

लवकर लवकर सगळं करता यायला पाहिजे या फंदात तो क्रचेस नीट न वापरता चालायचा. मग धडपडायचा. फिजिओथेअरपिस्ट बाई शेवटी सांगून गेली तिलाच... की गिरिशने नीट लक्ष दिलं नाही तर त्याच्या रिकव्हरीला खूप जास्तं वेळ लागेल. शिवाय तो क्रचेसचा वापर नीट करत नाहीये. नको त्या मसल्सवर जोर येऊन त्यांच्यावर करेक्टीव्ह थेरपी करायला लागेल, लवकरच. सुनीताने सांगितलं, आठवण केली की ऐकायचा.... स्वत:चा स्वत: असला की ये रे माझ्या मागल्या!
क्रचेस घेऊन चुकीचं चालताना दुखायचच, मग तोंड वेडीवाकडी करायचा.

सगळेच विद्यार्थी येऊन जायचे, गप्पा मारून जायचे. चिन्मयही आई-वडिलांबरोबर येऊन गेला एक्-दोनदा. पोर जमली की गिरिश खुष असायचा. क्रचेसवर चालत चहा-कॉफी वगैरेचा गोंधळ घालायचा.

..........पण त्या सगळ्यातून पार पडून आज शाळेच्या पहिल्या दिवसासारखा पूलवर निघाला होता. अजून कोचिन्गसाठी पोहता येणार नव्हतं. पाण्यात उतरायला परवानगी नव्हती.
पण.... जाण्याचा, मुलांना भेटण्याचा उत्साह प्रचंड होता. नुसती गडबड चालली होती. माझं हे घेतलस का, ते विसरशील, क्रचेस कुठेत, चल लवकर, उशीर झाला, मुलं वाट बघत असतील, तिसरी बॅच चालूही झाली असेल.... एक ना दोन!
स्वत्: मानसोपचारतज्ञ नसती ना, तर सुनीताला वेड लागलं असतं सकाळी उठल्यापासूनच्या दोन तासात. जरा शांतपणे सगळं आवरू म्हणून, शेवटी त्याला तिने आधी गाडीत जाऊन बस एक शब्द न बोलता, म्हणून पिटाळला.

तरी शेवटी गाडीत बसल्यावर तो मागच्या सीटवरून काही सांगू जाणार तोच तिने अल्टिमेटम दिला, 'गिरिश, हाताची घडी आणि तोंडावर बोट. चूप एकदम. मी सगळं घेतलय काही विसरल्ये नाहीये. पूलवर पोचेपर्यंत एक शब्द बोललास तर परत घरी नेऊन सोडेन'.
खरच गप्प बसला, शहाण्या मुलासारखा.
गाडीतून उतरायला मदत करताना तिच्या लक्षात आलं की, हा शर्टाखाली स्वीमिंग ट्रंक्सच घालून आलाय, वर नुसता टॉवेल गुंडाळून..... पोट धरून हसताना तिचा तोलही गेला.
'अरे, पाण्यात उतरणार नाहीयेस ना? मग....'
'अग, होतेय का घालून बघत होतो.... मग तू सरळ गाडीत जाऊन बस म्हणून ओरडलीस.... मग, तेच तर सांगायचा प्रयत्नं करत होतो....., काही हरकत नाही. सुलेमानची लुंगी लावून येईन परत' असं म्हणून आपल्यामते ताठ मानेने क्रचेसवर लंगडत गेलाही.... येणारे जाणारे सगळे डोळे विस्फारून बघत होते.

हुश्श करून ती कामावर जायला निघाली. खूप दिवसांनी डोक्यावर कसलही ओझं न घेता आज कामावर निघाली होती.

दुपारी जरा लवकरच त्याला घ्यायला गेली आणि ऑफिसातला प्रकार बघून अवाक झाली. बाहेर सुलेमानने तिला सतर्क केलच होत. गिरिश भयंकर चिडला होता. त्याला पूलच्या कमिटीने पूर्ण बरा होऊन डॉक्टरचं फिटनेस सर्टिफिकेट आणल्याशिवाय पूलवर येऊ नकोस म्हणून सांगितल होतं. तो नुसतं मुलांचं ट्रेनिंग बघत खुर्चीवर बसतो म्हणाला, ते ही ऐकलं नाही. त्याला पूलच्या आवारातही प्रवेश नव्हता.
सुनिता विचार करत होती, की तिच्या हे कसं लक्षात आलं नाही? बरोबरच आहे, एक पायावरचा हा लंगडधीन पडला, बिडला तर? केव्हढ्याला पडेल ते?

ऑफिसात, खुर्च्यांमध्ये चिन्मय आणि अजून दोघे बसलेत, गिरिश एकाच कुबडीचा आधार घेऊन फेर्‍या मारतोय. कमिटीचा रवी रानडे कमरेवर हात घेऊन गिरिशच्या त्राग्याकडे बघतोय, दोन पोर, गिरिशच्या वाटेत येणार्‍या वस्तू दूर करतायत. एकच खुर्ची जेव्हा त्या बिच्चार्‍या पोरांनी दुसर्‍यांदा त्याच्या वाटेतून हलवली तेव्हा मात्र सुनिताला राहवलं नाही.

ती आत आली.
"अरे काय म्हणायचय काय तुम्हाला? मला नुस्तं तिथे बसायलही परवानगी नाही? जरा कुठे एक फ़्रॅक्चर झालं तर लगेच हे करू नको, ते करू नको, हळू, जपून, हे आत्ता जमणार नाही.... पाय घसरून पडेन म्हणे.
आयुष्य गेलं माझं ह्या.... ह्या पूलवर. अरे, जमिनीपेक्षा पाण्यात जास्तं रहातो मी. कोणाला सांगताय?..... आ? कोणाला?"....

"हो ना, अरे, दोन कल्ले असते ना तर तुला मासाच म्हटलं असतं, बिनशेपटीचा.", ती आत शिरत म्हणाली. पोरांसकट रवी सुद्धा हसला, हळूच.

गिरिश तावातावाने काही म्हणायच्या आधी तीच पुढे म्हणाली, "माझाच गाढवपणा. इथल्या दमटपणाने, तुझी जखम सुकायला जास्तं वेळ लागेल असं डॉक्टरच नव्हते का म्हणाले? तेच लक्षात आलं म्हणून आले लगेच. उगीच गोंधळ नको बाबा. स्विमिंगच्या टूर्नामेन्ट्स आल्यात चार महिन्यांवर. एकदा का तू यायला लागलास की मग आजारी पडायला वेळ नाही. पोरांच्या ट्रेनिंगमध्ये खंड नको पडायला तुझ्यामुळे, चल.".

तिने हात पुढे करताच चिन्मयने गिरिशची दुसरी कुबडी पुढे केली. एव्हाना गिरिश दमलाही होता आणि तसं कुठेतरी त्यालाही पटत होतच. फक्त त्याच्या "तावाला" कुठेतरी पळवाट हवी होती.

"रवी, टूर्नामेंटमध्ये भाग घेतलेल्या सगळ्यांना उद्या पाठवून दे रे घरी.... आणि सतीशलाही, ते जास्त महत्वाचं. तो बिचारा करून घेतोय पोरांकडून सद्ध्या पण कॉम्पिटिशनच्या दृष्टीने कुणाकडून काय करून घ्यायचं. ते गिरिश आणि तो ठरवतील. आजच पाठव त्याला वेळ असला तर", रवीने तिच्याकडे बघत मान हलवली.
आश्चर्य म्हणजे गिरिशही, "बघ हा, वाट बघतो मी, सतीशला पाठव नक्की. ए, प्रॅक्टिस चालू ठेवा रे. आणि सतीश सांगतोय ते ऐका. नाहीतर लंबे करेन एकेकाला परत आल्यावर" अस म्हणून वळला. ती गिरिशच्या मागून बाहेर पडेपर्यंत पोरांचे नि:श्वास आणि रवी धप्पकन गिरिशच्याच खुर्चीत बसलेला तिने ऐकला.

चिन्मय आपणहून ड्रायव्हरबरोबर घरी आला होता. गिरिश डॉक्टरकडून परत येईपर्यंत तासभर थांबला. सुनिता आवरता आवरता, तिच्या स्वभावाप्रमाणे इकडचं तिकडचं बोलत राहिली. गिरिशचा धडपडा स्वभाव, तिची उडणारी तारांबळ, फिजिओथेरपिस्टबरोबरची गिरिशची झक्काझक्की, तीच कशी त्याला सरळ करते, चिन्मयच्या घरच्यांची चौकशी असलच काही बाही.

तेव्हढ्यात फिजिओवाली आलीही. आणि तिच्याच मागोमाग गिरिशही. चिन्मयला बघून खुलला.
"अरे, चिन्मय काय म्हणतोस? इकडे कसा?"

"सर, तुम्हाला थोडं...., तुमच्याशी एक बोलायचं....विचाराय..." चाचरत बोलणार्‍या चिन्मयने कमरेवर हात घेऊन उभ्या फिजिओवालीकडे बघितलं आणि पुढे म्हणाला, "मी थांबतो. तुमचं होऊद्या."

मग आज नको, आता नको, मी दमलोय, हा चिन्मय कधीपासून बसून आहे, त्याचा खोळंबा वगैरे तेवीस कारणं देऊनही जेव्हा तिने तिची उपकरणं काढली तेव्हा तोंड वेडीवाकडी करत गिरिशने पुढचा तास कसातरी घालवला. ती त्याला त्याच्या क्रचेसवरच्या वाईट सवयींबद्दल बजावत होती. ह्या प्रकराकडे बघून चिन्मयच्या ओठांवर हसू फुटलेलं. फिजिओथेरपिस्ट गेल्यावर मोठ्ठी बला टळल्यासारखा चेहरा केला गिरिशने.

मोठ्ठी टाळी वाजवून हात चोळत म्हणाला, "आता बोल. काय म्हणतोस?" आणि आपल्या सवयीने क्रचेसवर फेर्‍या मारायला सुरूवात केली.
"सर तुम्हाला... मला.... आय मीन....तुम्ही...." चिन्मयचं चाचरत बोलणं ऐकून गिरिश सुनिताकडे वळून म्हणाला, "बाईसाहेब, काहीतरी पोटाचं बघा बुवा. त्या फिजिओच्या व्यायामांनी प्रचंड भूक लागलीये.... एक अख्खा पाणघोडा नाहीतरी किमानपक्षी भरला जिराफतरी खाईन..... पण ते नंतर. आत्ताला पोहे चालतिल.... आणि पोहे संपलेत..... कोपर्‍यावरचा वाणी उघडा आहे का ते विचारू नकोस. मी बघितलं नाही मगाशी. पण तो नेहमीच उघडा असतो. थंडीतही बनियनही घालत नाही.... स्टेशनपलिकडे जा... जरा चालणं होईल.... मीच काय म्हणून व्यायाम करायचा......"

काय ते ओळखून सुनिता पर्स घेऊन निघाली... समोरच्या बागेतून थेट न जाता, वळसा घालून जायचं ठरवलं. हसूच आलं तिला गिरिशच्या तोफखान्याचं. काय बोलतो.... किती बोलतो.... काय नव्हेच ते.

पण चिन्मय आज आपणहून आलाय, त्याला काही बोलायचय, सांगायचय हे कित्ती चांगलय. गडी थोडा रुळावर येतोय असं दिसतं. बरोबरच आहे. घरी वडील ते तसे.... आईशी या वयात किती अन कसं बोलणार मुलगा?
कठ्ठिणय बाई. त्याच्या वडलांचं तरी. इतकं कसं कळत नाही, आपल्याच मुलाचं आपल्याला? आपण नाही लक्ष ठेवायचं तर कोणी ठेवायचं?

आता झाला अपंग म्हणून काय फक्त खाऊ-पिऊ घालण्याची, कपडे-लत्त्याची शारिरिक जबाबदारीच उरते का? चांगला, इतर मुलांसारखा होता तेव्हा काय करत होतात म्हणाव?
तुमचं नॉर्मल बोलणं चालणं, संवाद, विसंवाद हे सगळं होतच होतं ना? काही वेगळं करावं लागत नव्हतं त्याच्या मनाच्या घडणीसाठी.

एक मोकळं अंगण, निळं आभाळ, थोडा चोचीला दाणापाणी आणि पंखांची ऊब... पिल्ल हा हा म्हणता मोठी होतातच. घरटं असतं संध्याकाळी परतायला... काळज्या सोपवायला बापाची छाती आणि दुधमाखलं तोंड पुसायला आईचा पदर... त्यापरतं काही नको...

अरे, पण एक धट्टाकट्टा तरूण मुलगा जेव्हा शरिराने अधू होतो, तेव्हा मनातही कुठेतरी पडझड होतेच की. मग बाहेर औषधं लावा, कुबड्या द्या... त्यानं मनाची डागडुजी होते का? एक दुखर्‍या जखमेला बॅडेज बांधाल, कुणाच्या स्पर्शापासून वाचवाल...
पण दुखर्‍या मनाच काय? अशावेळी बोलणीच काय पण नजरा सुद्धा घायाळ करणार्‍या.... त्यापासून कसं वाचवाल म्हणते मी?

आणि कधी कधी तर घरातलेच म्हणायचे ते खोदतात खड्डे, हळव्या मनाच्या मातीत.... मुद्दाम नाही पण चुकुनही धक्का लागला तर कोसळतात हे मनाचे कोपरे. हळू, हलकी फुंकर घालूनच वाळवायची असतात असली आसवं. त्यांना स्पर्शही सहन होत नाही!

अपंग झाला म्हणून काय झालं... अरे, एक मूल आहे... हुशार आहे. आजवर खतपाणी घालून वाढवलत.... थोडी मुळं उखडलीत, दुखावलीत.... म्हणून काय त्याचं अंगण नाकाराल?

द्या एक थोडका आधार, उन्हं लागूद्या थोडी कोवळी.... कधी घरात आणून ठेवावं लागेल फार वादळ-वारं असलं तर..... इतर झाडांना घालतात तसं धसा-फसा पाणी ओतून नाही चालायचं.... अलवार हातानं शिंपण करा.... त्याची त्याला मुळं धरू द्या... मग त्याचं आकाश तो शोधेल.... तुम्हालाच विसावा देण्याइतका मोठा होईल, म्हणावं. कसं कळत नाही या आई-वडलांना......

कसही झालं तरी.... तरी..... एक मूल आहे....

हुंदका अनावर होऊन बागेतल्या एका बाकावर बसली. येणारे कढ आतल्या आत जिरवत राहिली. फडफडत्या पापण्यांनी नजर स्वच्छ करत राहिली.

अन, जरा वेळाने...... आपली आपल्याला सापडल्यावर पदराने स्वच्छ तोंड पुसून, भरला जिराफ खाण्याइतकी भूक लागलेल्या नवर्‍यासाठी पोहे आणायला कोपर्‍यावरच्या वाण्याकडे वळली.

अगदी तासाभराने घरी आली तेव्हा हॉलमधलं दृश्य पाहून तिचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसेना.

चिन्मय गिरिशला क्रचेस कसे वापरायचे ते शिकवत होता. गिरिश अतिशय लक्षपूर्वक ह्या गुरूकडे बघत होता. चुकीचं बल दिलं गेल्यास कोणते स्नायू कसे वापरले जातायत, कुठे चुकीचे आकुंचन पावतायत, प्रसरण पावतायत, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन चालू होतं.

वाकून चिन्मयच्या पोटरीचे स्नायू हलक्या हातांनी गिरिशने धरले होते. त्याच्या क्रचेसच्या वापराबरोबर टाच उचलताना, चवडा टेकताना होणारी पोटरीच्या स्नायूंची हालचाल समजावून घेत होता. इतके तल्लीन झाले होते की, ती आत येऊन स्वयंपाकघरात गेल्याचही कळलं नाही दोघांना.

फोडणीच्या वासाने शुद्ध आली असावी. क्रचेस घेऊन नव्याने पावलं टाकीत गिरिश आणि तो बरोबर चालतोयना हे पहात उलटा उलटा चालत चिन्मय.... दोघेही स्वयंपाकघरात आले.
"सर, मला वाटतं की आता डाव्या पोटरीवर तितका भार येत नाहीये. आणि टाचही पूर्ण टेकताय तुम्ही..... तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आत्ता लगेच नाही गूण यायचा.... पण....", चिन्मय पायवरची नजर काढून त्याच्या चेहर्‍याकडे बघत म्हणाला.

"बरोब्बर... आत्ता लगेच नाही सांगत येणार पण कम्फर्टेबल नक्की वाटतय.... मी हेच टेक्निक चालू ठेवतो... तुला सांगतोच दोन दिवसात..... आणि थॅंक्स रे. खरच. साधी गोष्टं... सोनारही होताच कान टोचत.... पण काये, आपण पेशल, आपले कान त्याहून सपेशल. आपल्याला सपशेल सोनार लागला भोक पाडायला..., काय?" पुढे होत गिरिशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जवळची खुर्ची ओढून घेऊन बसला. तोपर्यंत चिन्मयने त्याचे क्रचेस भिंतीला लावून ठेवले.

"अरे, पण तू का आला होतास ते नाही सांगितलस?... बोलो, बोलो! क्या कर सकते है हम आपकेलिये? येऊन माझी चाल सुधारलीस ते एक बरं केलस बाबा, हिच्याकडून तुला एकशेदहा मार्कं.... पण ते कारण नव्हतं ना? बोल! .... तुझं बोलून होईपर्यंत हिचे सगळे पोहे शिजवून होतील एक एक करून, बहुतेक.....", गिरिश सुनिताकडे बघत हसत म्हणाला.

"तसं महत्वाचं काही नाही... ते टुर्नामेंट्स बद्दल बोलत होते सगळे... मी म्हटलं की.. मलाही भाग घेता आला तर... म्हणजे अपंगा.... अपंगांचे असतीलच ना काही इव्हेंट्स.... त्यात... तुम्ही म्हणालात... तुम्ही परवानगी दिलीत तर...
म्हणजे माझी..... माझी तयारी आहे.... खूप मेहनत करेन.... तुम्ही म्हणालात तरच..."

'अरे, यार...." म्हणत गिरिशने जोरात टाळी वाजवल्याचं तिने ऐकलं फक्त....

भरले डोळे घेऊन वळण्याचं झालं नाही तिला. तशीच पाठमोरी परत परत पोहे ढवळत राहिली.....

त्यानंतर दोघे थांबलेच नाहीत........
गिरिश तर पूर्ण बरा झालाच पण ह्या गुंत्याची उकलही अलवार करत गेला. सुनिता स्तिमित होऊन हे बघत राहिली.

गेले काही महिने चिन्मयच्या आजूबाजूचा प्रत्येकजण त्याल मदत करत होता, जपत होता. ज्या वयात धडपडायचं त्या वयात "जपून", "हळू", "इथे नाही", "तिथे नको", "हे कसं शक्य आहे?", "ते तर अशक्यच" असल्या जगात फेकला गेला.

त्यादिवशी पूलवर गिरिशचं तारांगण बघितलं, अन मग त्याच्या घरी फिजिओचा घोळ.

नेहमी जिथे तो हतबल होऊन कुणीतरी मदत करण्याची वाट बघायचा, किंवा नको असताना लोक मदतीचा हात द्यायचे.... त्याच अवस्थेत, भोवर्‍यात अडकलेला गिरिश बघितला त्याने.
त्याक्षणी तो स्वत: काहीतरी करू शकला.... कुणालातरी मदत करू शकला. खूप खूप दिवसांनी स्वत्:हून काही करण्याची इच्छाशक्ती जागी झाली आणि करण्याची संधीही मिळाली. दोन्ही अगदी हातात हात घालून...
आपले आपण कुणासाठीतरी काहीतरी करू शकतो. कुणालातरी आपला काही उपयोग होतोय ही भावना सुखावून गेली त्याला.

अनेक दिवस प्रयत्न करूनही चिन्मयच्या कोषात शिरू शकला नव्हता गिरिश. त्याच्या स्वत:च्या असहाय्य अवस्थेने, चिन्मयच्या कोषाची, जगाची एक झलक मिळाली त्याला. आपण इतके वयाने, विचारांनी मोठे म्हणायचे ते, पेलू शकत नाही, हे काही दिवसांचच ओझं... तर हे अर्धवट वयाचं पाखरू अधू पंख घेऊन बावरून घरट्यात लपलं तर काय चुकलं?

चौदा-पंधरा वर्षाच्या वयाला मुलं "मोठे झालोय"च्या जमिनीवर अधांतरी चालत असतात. हळूहळू वय वाढतं, घटना घटनांनी खरोखरच जबाबदारीने वागायला लागतात, प्रसंगांतून शिकतात.... आणि अधांतरी अवस्था हळू हळू जाऊन घट्ट जमीन घडते पायाखाली.... आपली आपणच. मग आत्मविश्वासाने पुढची पऊलं पडतात.... आपोआपच.
चिन्मयच्या ह्या अधांतरी अवस्थेतच जमीनच काय, पण पायच काढून घेतले..... त्याने पुढे चालण्याचंच नाकारलं होतं.

कोष फोडून उडू पहायच्या ऐवजी आपल्याच धाग्यांच्या गुंत्यात अडकला होता.

गिरिशला हात देण्याची संधी मिळाली.... त्याच्या त्या कवचाला हा एक सुखाचा "धक्का" पुरेसा होता. गिरिशला मदत करता करता चिन्मयने आपल्याच गुंत्यातल एक महत्वाचा धागा गिरिशच्या हाती दिला होता.... आत्मविश्वासाचा!
सुनिताच्या मते दुरंगी मोज्यासारखा दोन रंगांचा.... एका बाजूने बघावं तर आत्मविश्वासाचा अन दुसर्‍या बाजूने सह-अनुभूतीचा.

एकदा हाती आलेला हा धागा मग गिरिशने सोडला नाही. त्याला धरून गिरिश त्याच्या पिळातून फिरला. त्याच्या निरगाठी, सुरगाठी शोधल्या. कसलाही धसमुसळेपणा न करता आई म्हणाल्या तस्सा अलवार सोडवला गुंता.

टूर्नामेंट्ससाठी सगळ्यांनीच बेदम प्रयत्नं केले. चिन्मयनेही लावलेला नेट त्याच्या वडिलांच्याही लक्षात आल्याशिवाय राहिला नाही. त्याच्या ट्रेनिंगसाठी येऊ लागले आणि अख्ख्या टीमसाठीच राबले. पोरांना पूलवर घेऊन जाणे, घेऊन येणे, काहीतरी "मस्तपैकी" खाणं आणणे.... आणि टुर्नामेंटच्या दिवशी तर स्वत्:ही त्यांच्या टीमचा लोगोचा शर्ट घालून धावपळ करत होते. पोहायला उभा राहिलेल्या चिन्मयने प्रेक्षकात बघितलं. बाबा त्याच्याकडे बोट दाखवून तो माझा मुलगा आहे हे शेजारच्याला किती अभिमानाने सांगत होते.....

दहावीचं एक वर्ष ड्रॉप घेऊन चिन्मयने पुढल्याच वर्षी दहावी पूर्ण केली. एव्हाना एक उत्तम अपंग जलतरणपटू म्हणून त्याला मान्यता मिळायला लागली होती. शाळेतला आदर्श विद्यार्थी म्हणून मिळालेलं सर्टिफिकेट घेऊन दाखवायला घरी आला. आता नुसते ब्रेसेस लावून चालत होता, स्टिकसचा आधार न घेता.

स्वयंपाकघरात डायनिंगटेबलजवळ खुर्चीत बसून कॉलेजबद्दल बोलत होता, मित्रांबरोबरच्या सुट्टीतल्या गमती जमती सांगत होता. मध्येच गिरिशला डोळा मारून तिच्या मऊसूत, पिळदार चकल्यांची तारीफ करत होता.
त्यांच्या विरोधाला न जुमानता वाकून तिला, गिरीशला नमस्कार करून 'येतो' म्हणून वळला आणि आपल्यामते ताठ मानेने, आत्मविश्वासाने चालत निघाला....

आपल्या आयुष्याचे धागे जुळवायला, त्यातून एक रेशिमघडी विणायला आत्मविश्वासाने झेप घेऊ निघाल्या ह्या पाखराकडे दोघे डोळे भरून पहात राहिले.

( ४ नोव्हेंबर २००७ पासून जुन्या मायबोलीवर प्रकाशीत झालेली कथा - वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, अप्रतिम
प्रतिसादाचे शब्दही डोळ्यातील धुसर पडद्यामुळे नीट दिसत नाही आहेत. खरंच खुप अवघड असतं वाढत्या वयातील मुलांच्या मनातील भावनांचा गुंता सोडवणं. मुळात त्यासाठी तो आधी समजावा लागतो. फील व्हावा लागतो. मग एखाद्या कुशल विणकराच्या कौशल्याने तो सोडवावा लागतो. तसं केलं तर यश येतंच. मनं मोकळी होतात. आभाळ कवेत घेण्यासाठी सज्ज होतात. पालक म्हणून एवढं तर जमायलाच हवं..नाही का?

अप्रतिम!!!
मनात कालवाकालव झाली. डोळे भरुन आले.
अर्थात तुमच्या कथा वाचुन असं होणं नेहमीचच आहे.

दाद, अप्रतिम
प्रतिसादाचे शब्दही डोळ्यातील धुसर पडद्यामुळे नीट दिसत नाही आहेत. +11111

व्वा !!
काय अफाट सुंदर लिहिली आहे हो कथा ...
मान गये आप को.. फिर एक बार!

अप्रतिम!!!
मनात कालवाकालव झाली. डोळे भरुन आले.
अर्थात तुमच्या कथा वाचुन असं होणं नेहमीचच आहे.

>> +७८६

छान कथा..

या शेवटच्या शब्दाचा अर्थ काय आहे? आधी मला शिवीच वाटली ☺️
"गुंता झालाय हेच आधी कबूल कर, स्वत:शी. गुंता अलवारच उलगायचा असतो, बोद्या. "

अफलातून!!!!
तुमची शैली एकदम प्रसन्न आणि ओघवती आहे. खरच खूप छान लिहिली आहे. मनापासून आवडली.God Bless you.

खूप आभार. विसरूनच गेले होते. आणि गंमत म्हणजे मी ही आज प्रकाशित केलीच नाहीये. आपोआप झालीये की काय.. झोपेतून उठल्यासारखी?
वेबमास्तरांचीही करामत असू शकते.

Pages