खेळ

Submitted by कूटस्थ on 5 December, 2017 - 23:11

"ए सोड ना रे आम्हाला त्या नव्या घरात...तू एवढी ३ मोठी घरे बांधली आहेस आणि तरी तू आम्हाला सोडत नाहीस तिथे" ती दोघेही एकदमच म्हणाली.
"काळजी वाटते तुमची. तुम्हाला माहिती आहे माझे तुमच्यावर किती प्रेम आहे...नाही राहू शकणार मी तुमच्याशिवाय.. तिकडे गेल्यावर तुम्ही मला विसरलात तर?" तो उत्तरला.
"अरे आम्ही तुझ्याच काळजाचा तर तुकडा आहोत कसे विसरू तुला?" ती म्हणाली. तिच्या बरोबरच्या त्याचेही तेच भाव. आता दोघांच्या हट्टासमोर याचे काय चालणार.
"अरे बाबांनो मी हि ३ घरे केवळ करमणूक म्हणून बांधली आहेत. पण तुम्ही खरेच जायला तयार आहात?"
"होSSSSSSSSSSSS" दोघेही अगदी मोठ्याने ओरडली, "अरे तू कित्ती म्हणजे कित्ती छान घरे बांधली आहेस, खेळायलाही बरेच काही आहे...किती वेगवेगळ्या आणि नवीन गोष्टी आहेत तिथे....गम्मत येईल...अनेक गोष्टी आम्हाला स्वतः पण तयार करता येणार आहेत...अगदी आमच्यासारखे सुद्धा..कित्ती धमाल...खेळू आम्ही भरपूर...कंटाळा आला कि येऊ आम्ही परत"
"एक लक्षात ठेवा, आत जायचा मार्ग सुकर आहे पण बाहेर येणं तितकं सोप्पं नाही." तो उद्गारला....आता तिकडे जातच आहात म्हणून सांगतो...इथे तुम्ही सतत माझ्याबरोबर असता म्हणून काही बंधने नाहीत तुम्हाला...नेहमी आनंदात असता...पण एकदा घरात गेलात कि तसे होईलच असे नाही... तिकडचे नियम तुम्हाला पाळावेच लागतील...अगदी मीच ते बनवले असले तरी मी ते सहजासहजी मोडत अथवा बदलत नाही.
"बर" दोघेही म्हणाली. महत्वाचे नियम काही असतील तर सांग.
ऐका तर मग....
"एकाच घरात तुम्ही सदासर्वकाळ राहू शकत नाही....जाताना तुम्हाला ३ कोट चढवावे लागतील...प्रत्येक घरासाठी १ कोट. पहिल्या घरातून दुसऱ्या घरात गेलात कि पहिला कोट तिकडेच सोडायचा...तसंच दुसऱ्यातून तिसऱ्या घरात जाताना...शेवटी तिसरा कोट उतरवलात कि माझ्याकडे परत....
परंतु एका घरातून दुसऱ्या घरात जाण्याचे काही नियम आहेत...सर्वात प्रथम तुम्ही तीन कोट चढवून पहिल्या घरात जाल. तिथे मनोसोक्त खेळ, बागडा...परंतु सगळ्यात मोठा नियम म्हणजे....जो काही पसारा कराल ...जो उच्छाद मांडाल ..जे काही दिवे लावाल तिथे, ते सगळे तिकडेच निस्तरून यायचे.....सम्पुर्ण निस्तरल्याशिवाय सुटका नाही.. त्यामुळे जे कराल ते सांभाळून...
तिथे जे मागाल ते सगळे मिळेल...परंतु त्याक्षणीच मिळेल असे नाही...खूप नंतरही मिळेल...पण मिळाल्याशिवाय राहणार नाही.....त्यामुळे जे मागाल, ज्याची इच्छा धराल ते सर्व विचारपूर्वक मागा....कारण मिळेपर्यंत तुम्ही त्या घरातून कायमचे बाहेर पडू शकणार नाहीत. तात्पुरते पडाल पण दुसऱ्या मार्गाने परत यालच पुन्हा....
काही काळानंतर कोट जीर्ण होईल, फाटू लागेल...थोडा त्रास पण होईल....त्यावेळी पहिला कोट पहिल्या घरात टाकून तुम्ही दुसऱ्या घरात जाल...तिथे दुसरा कोट तुमच्या अंगावर चढवला असेलच...जेंव्हा तोही जीर्ण होईल तेंव्हा परत तुम्ही पहिल्या घरात याल....एक नवीन कोटासकट....असे तोपर्यंत चालेल जोपर्यंत तुम्ही पहिल्या घरातील तुम्ही स्वतः मांडलेला पसारा आवरत नाही किंवा तिथे तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील व तिथे तुमच्यासाठी काही मागण्यासाठी किंवा तुमचे मन रिझवण्यासाठी काहीच शिल्लक नसेल....असे जेंव्हा होईल त्यावेळी तुम्ही दुसऱ्या घरी कायमचे जाल...पुन्हा पहिल्या घरी नाही यावे लागणार....मग हाच खेळ दुसऱ्या आणि तिसऱ्या घरासाठी सुरु....
असे करत करत जेंव्हा तुम्ही तिसरे घरदेखील सोडाल तेंव्हा तुम्ही मला भेटू शकाल...
लक्षात ठेवा - या घरात तुम्ही कधी आनंदी व्हाल तर कधी दुखी...कधी तुम्ही खूप उत्साहित असाल तर कधी मरगळलेले...परंतु जेंव्हा माझी गरज भासेल तेंव्हा फक्त मनापासून आठवण काढा...मी दिसणार नाही तुम्हाला..पण अदृश्य मदत नक्की करेन...शेवटी तुम्ही माझीच पोरं....तुमच्या भेटीसाठी मी केंव्हाही तयार असेन...फक्त प्रयत्न करा मला भेटण्याचा....
"बोला मंजूर?"
"हो" दोघेही जोराने बोलली...अत्यंत जड मनाने त्याने त्या दोघांना निरोप दिला....
.
.
.
न मोजता येण्याऱ्या अनन्त वर्षानंतर.......

सगळी घरं अगदी गजबजून गेलीयेत....आधी दोघंच होती घरामध्ये...परंतु आता करोडो झालीयेत...त्याने दिलेल्या निर्मितीच्या संधीचा फायदा घेत त्या घरात प्रथम पाऊल ठेवलेल्या त्या दोघांनी त्यांच्यासारखेच अनेकजण निर्माण केलेत....तरी त्याचे प्रेम सर्वांवर सारखेच आहे...घरातील काही जण आनंदात आहेत तर काही दुःखात...सदासर्वकाल आनंदात सुखात कोणीच नाही...तो मिळवण्याचा मात्र सगळ्यांचा प्रयत्न सुरु आहे..या घरात काहीच नित्य नाही...सतत बदल....पण एवढ्या वर्षानंतर तो आणि त्याचे बनवलेले नियम मात्र तेच आहेत...पुढे अनेक वर्ष ते तसेच राहणार आहेत.... त्याच्या पहिल्या दोन मुलांपासून... मनू आणि शत्रूपा या पहिल्या स्त्री आणि पुरुषापासून सुरु केलेला हा प्रवास आता करोडो मुलांपर्यंत पोहोचलाय... .प्रत्येकजण घरामधील स्वतःच्या व्यापात मग्न आहे.... अनेकजण तर त्याला विसरूनही गेलेत....पण तो मात्र आपल्या प्रत्येक मुलांची आतुरतेने वाट पाहात आहे...त्याला विश्वास आहे कि त्याची सगळी मुले परत येतीलच त्याच्याकडे.... वाट पाहायची त्याची तयारी आहे....परंतु जोपर्यंत तिन्ही घरातून बाहेर पडून त्याच्याकडे कोणी स्वतःहून जात नाही तोपर्यंत तो काही भेटायचा नाही. ...सगळेच अडकले आहेत... अगदी तोदेखिल....बांधील आहे स्वतःच बनवलेले नियम पाळयला.....स्वतःच बनवलेला हा खेळ स्वतःनेच घालून दिलेल्या नियमाने स्वतःच खेळत आहे...
हा खेळ असाच सुरु राहील...पुढे येण्याऱ्या अनंत वर्षापर्यंत....
खेळ थांबवणे मात्र आपल्या हाती आहे. निदान आपल्यापुरतातरी....बघुयात प्रयत्न करून जमते का?
--------------------------------------------------------------------------------------------
कथा: अध्यात्मिक
पात्र परिचय:
तो: काहीजण त्याला देव म्हणतात काहीजण गॉड तर काहीजण अल्ला
त्याची प्रथम दोन मुले: मनू आणि शत्रूपा (भारतीय आध्यत्मिक कथेनुसार देवाने जे प्रथम स्त्री पुरुष निर्माण केले तेच हे)
३ कोट: आत्म्याचे निवासस्थान असलेली तीन शरीरे (अध्यात्मानुसार मनुष्याचा आत्मा तीन देहात बंदिस्त असतो...जडशरीर म्हणजेच आपले पार्थिव शरीर, सुक्ष्मशरीर म्हणजेच पार्थिव शरीर टाकल्यावर/मृत झाल्यानंतरचे शरीर आणि कारणशरीर म्हणजेच अतिसूक्ष्म शरीर ज्यात आत्म्याचा निवास असतो)
३ घरे: जडलोक, सूक्ष्मलोक आणि कारणलोक ( भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार जडलोक अथवा पृथ्वीव्यतिरिक्त सूक्ष्मलोक आणि कारणलोक हे सुक्ष्मशरीर आणि कारणशरीर यांचे निवासस्थान आहे)
घरांचे नियम: Law of karma

Group content visibility: 
Use group defaults

हा खेळ असाच सुरु राहील...पुढे येण्याऱ्या अनंत वर्षापर्यंत....
खेळ थांबवणे मात्र आपल्या हाती आहे. निदान आपल्यापुरतातरी.
>>> कसे काय?

भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट स्वरूप जाणणे म्हणजेच जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि परिणामी देहाच्या विळख्यातून आत्म्याला मुक्त करणे आहे...परंतु तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न म्हणजेच अध्यात्मिक साधना करणे आपल्याच हाती आहे..

मस्त !!
पहिल्या परिच्छेदात नीटसे कळले नव्हते.. पण हळूहळू उलगडा होतो.. Happy
एकच दुरुस्ती... तीचे नाव "शतरुपा" होते बहुदा शत्रूपा नाही

धन्यवाद प्रसन्न!
हो नावामध्ये 'a' राहिला चुकून टाईप करताना....

छान.

छान लिहिलंय.
पण मनू आणि शत्रुपा कोण?
मला तर ईव्ह आणि अ‍ॅडम माहित होते. Happy

आवडले खूप
3 कोट ने लगेच अंदाज आला