|| अर्ध-सहस्त्रचंद्रदर्शन ||

Submitted by Charudutt Ramti... on 28 November, 2017 - 01:49

एक्क्याअंशिव्या वर्षी जर सहस्रचन्द्रदर्शनाचा सोहोळा { सहस्र की सहस्त्र?... मराठी शुद्ध लेखनातील गेल्या 'चाळीस' वर्षातलं अनेक कोड्यांपैकी एक ‘न’ सुटलेल कोडं, एकदा नारायण पेठेत राहणार्या आमच्या ओळखीच्यांपैकी एक सहस्त्रबुद्धे नावाचे गृहस्थ आहेत त्यांच्या कडे जाऊन मला हा विषय डिसकस करायचाय. नक्की काय हो ‘सहस्र’ की ‘सहस्त्र’? आणि ह्या प्रश्नाने ते बुचकळ्यात पडलेले मला पाहायचय. } , तर हा सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहोळा जर एक्क्याऐंशीव्या वर्षी होत असेल तर, माझे त्यातले आजमितीला किमान पाचशे तरी चंद्र पाहून झाले असणार.
वरती मी “गेल्या चाळीस वर्षात न सुटलेल’” असं म्हणालो ते ह्याच करता. वाक्प्रचार म्हणून नव्हे, अगदी शब्दश: ‘चाळीस’ वर्षात. कारण परवाच आमच्या चाळिषीतल्या पदार्पपणाचा ऐतिहासिक दिवस पार पडला ! तसे चन्द्रा चे आणि माझे नाते फार जुने आहे. पाच वर्षाचा असे पर्यंत गॅलरी मधून चन्द्र दिसल्या शिवाय जेवत नसे असं आजोबा म्हणत. आणि गॅलरीत चंद्र दिसूनही मी जर जेवायला नाटकं केली तर आई कानाखाली चांदणं उमटवायची असं माझा थोरला भाऊ सांगतो.

पुढे नील आर्मस्ट्रॉँग ने चन्द्रा वर पहिले पाऊल टाकले आणि आमचा परीक्षेतील ताप वाढवला. कारण नील आर्मस्ट्रॉँग ला चन्द्रा वर पहिले पाऊल टाकल्या वर काय वाटले ते वीस ओळीत लिहा अशी टिटवी मग चौथी ते सहावी पर्यंत मागे लागली. खरं तर नील आर्मस्ट्रॉँग हे सदगृहस्थ, मी जन्मायच्या आधी तब्बल आठ वर्षे आधी चन्द्रा वर जाऊन परत पृथ्वीवर सुखरूप परतले होते. त्यांनी स्वत:च्या तोंडाने सर्व जगाला सांगितले होते त्यांना तिथे जाऊन काय वाटले ते. तरी पण आमच्या बाईंना “नील आर्मस्ट्रॉँग ला तिथे जाऊन काय वाटले असेल असे तुम्हाला वाटते ते थोडक्यात लिहा” असे प्रश्न परीक्षेत टाकून काय समाधान मिळायचे कुणास ठाऊक. असले बुचकळ्यात टाकणारे प्रश्न न सुटल्यामुळे नंतर मार्क का कमी पडतात ‘’ह्या’’ला सगळ्या विषयात? म्हणून कुणीतरी आईला सांगितल त्याला गुरुचरित्राचे पाठ वाचायला लावा आणि संकष्टी करायला लावा. गणपती ही विद्येची देवता आहे. ह्याला मुळातच बुद्धी कमी असली, तरी संकष्टी सुरू केली की मग थोडा तरी फरक पडेल असे गुरूजींनी सांगितले.

गुरुजी म्हणजे देवळातले, शाळेतले नव्हे. शाळेतल्या गुरूजींनी कधीच हात जोडले होते. मग ती संकष्टी सोडण्याकरता बरेच महिने (खरेतर बरेच वर्षे) परत चंद्राची वाट पहाणं मागे लागलं. नंतर बरेच दिवसांनी त्या बिचार्या गुरूजींनी सहस्त्रचन्द्र दर्शन केले आणि ते (कायमचे) निघून गेले. माझी बुद्धीही वाढली नाही आणि मार्क्स ही. माझी संकष्टी ही कायमची सुटली आणि भुकेल्या पोटी माझं चन्द्राची वाट पाहणंही थांबल. परत मी ज्या काही थोड्या फार संकष्टी त्या नंतर केल्या असतील त्या केवळ शेंगदाण्याचा कूट घालून केलेल्या खमंग अश्या साबुदाण्याच्या खिचडी साठी…! पुढे दोन तीन चांगले मित्र झाले. मोमिन, पठाण, खान वगरे. ते मित्र रमजान ला शीरखुर्मा ( आणि ईद उल फित्र ला, किंवा बकरी ईद ला बिर्यानी ) खायला बोलवायचे. पण त्या साठी चन्द्र दिसणं महत्वाचं असायचं. त्या मुळे चंद्राचा आणि माझा ऋणानुबंध हा असा साबूदाण्याच्या खिचडी पासून सुरू होतो तो डायरेक्ट इदेच्या बिर्यानी पाशी येऊन थबके पर्यंतचा असा हा अगदी घनिष्ट आहे. पुढे मग इतर मित्रही कॉलेज संपल्यावर आणि नोकरी च्या निमित्तानं 'बसायला' बोलावू लागले. कुठे बसायच...अरे “ब्लू मून” ला ये...साडे सात ला. तिथे जरा बाहेर लॉन आहे..मस्त चांदण्यात गप्पा मारू. काही असे हे नॉनवेज चंद्र तर काही सोवळ्यालते कोजगीच्या रात्री पहाटे सोसायटीत केलेल्या गाण्याच्या मैफिलीतले केशर घालून प्यायलेले चन्द्र. मोजायला गेले तर अदामासे पाचशे...पण तसे पहिले तर एक एक चन्द्र लाखा लाखा चा. कधी जीवनात नशा आणणारा कधी जीवन समृद्ध करणारा.

पण मधेच ही चाळिशी कशी चटकन आल्यासारखी. आत्ता आत्ता तर परवा पर्यंत बागेत मामाचं पत्र हरवलं खेळत होतो. अर्ध्या चडडी मधे विहिरीत मधे उड्या मारत होतो. चडड्यांचे खिसे भरून गाभूळलेल्या चिंचा भरून घेऊन येत होतो, जिन्या खाली बसून खायला, मे महिन्यात...! अन्थरुणात पडून रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत ब्लॅक अँड व्हाईट टीवी वर तेनालि रामन आणि व्योमकेश बक्षी पाहत होतो, अनवाणी पायांनी रस्त्याकडेला खेळ खेळत असताना टाचेत घुसलेले काटे उभ्याउभ्याच बोटांच्या चिमटिने काढून तसेच त्या टाचे कडे दुर्लक्ष करून अंगावर आलेले राज्य संपवत होतो....आत्ता आत्ता परवा पर्यंत...ही चटकन अशी चाळिशी कुठून आली मधेच कळलच नाही...!

आता उगाचंच ह्या चाळिशीची व्यवच्छेदक लक्षणे पाळत जगायाचं. उगाचचं पोक्त वागायचं. निरव्याज गप्पा टप्पा सोडून इनवेस्टमेंट च्या मोठमोठया गोष्टी करायच्या. “जाऊदे रे अभ्यास करू उद्या, आज चल पिक्चर टाकु एक!” म्हणणारे, आता मोठ्या मोठ्या करियर च्या गप्पा करणार. लाइफ इन्षुरेन्स आणि चिल्ड्रन्स प्लान घेऊन झाले आता पेन्षन प्लान वर वेळ आणि पैसा खर्ची पडणार.

काल पर्यंत आम्हीच पोरकट म्हणून वावरणारे आता एकदम "मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे" ह्या सदरात जाऊन बसणार. चालायाचचं, शेवटी काय तर , कर्तव्यम् आचरं कर्मम, अकर्तव्यम् अनाचरम् |

ते काहीही असो. परवाचा दिवस (परवाचा म्हणजे - प्रकट दिन....प्रकट दिन!) बाकी झकास गेला. कामावर गेलोच नाही. सकाळी सकाळी वेदाला कधी काळी पंधरा तीन आठवड्या पुर्वी ओटी मधे आलेले दोन नारळ सोलून दिले. तिने ओल्या खवणलेल्या खोबर्याची आणि ताज्या ताज्या सोललेल्या मटार ची मस्त पैकी उसळ केली. ती चापून खाल्ली ( पुण्यातल्या मटार ला जगात कुठेही सर नाही! पोरीबर्तन वाल्या दिदिन्नि रॉषोगूल्ल्या चं काय जियोग्रॅफिकल इंडिकेशन बिंडीकेशन केलं कोलकात्यात तसं पुणेकरांनी मटारचं जियोग्रॅफिकल इंडिकेशन पुण्यातल्या मंडईत करायला हरकत नाही....). जेवण झाल्यावर दुपारी चक्क दीड तास झक्कास पैकी ताणून दिली. वॉटसअप आणि फेस्बूक वर मित्र ( आणि मैत्रिणिंन्नी..! ) दिलेल्या शुभेच्छंना दाद दिली. सकाळी सकाळी तीन चार फोन आले जिवालगांचे...आता तरी सुधर लेका...चाळिशी आली तुझी, अशी आठवण करून देणारे.

एकंदरीतच दिवस कसा सत्कारणी लागला. वय, सेविंग्स आणि पेन्शनप्लान यांची चिंता करण्यासाठी अजुन साडे चारशे , पाचशे तरी चन्द्र शिल्लक आहेतच की उरलेले !

चारूदत्त रामतीर्थकर
पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त,
चाळीशीच्या शुभेच्छा
>>>>तसे चन्द्रा चे आणि माझे नाते फार जुने आहे. >>>
हे , "चांद से मेरा पुराना रिशता है। " च्या चालीत वाचावे काय? :p

चाळिशीच्या खूप खूप शुभेच्छा .
अर्ध सहस्त्र चंद्रदर्शन झालं ... पूर्ण सहस्त्र चंद्रदर्शन पण पूर्ण होऊ दे तुमचं. .
बाकी लिखाण मस्त . मला तुमचं लिखाण नेहमीच आवडतं.
आज हे खूप दिवसांनी लिहिलंय.