एकदा माझ्या घरी

Submitted by निशिकांत on 15 November, 2017 - 23:58

विनवण्या केल्या किती नानापरी?
या सुखांनो एकदा माझ्या घरी

वस्त्र विरले जीवनाचे, काल जे
खूप शोभीवंत होते भरजरी

गतसुखांनो दावता का वाकुल्या?
आठवांनीही दिवाळी साजरी

पोळते संभाषणांची वानवा
संस्कृती नवखी, विना श्रावणसरी

चाल आभासी जगाची वेगळी
येथ येते मृगजळांनी तरतरी

तंग कपडे, ना पदर ना ओढणी
लुप्त झाली आज राधा बावरी

सोडवावे तूच प्रश्नांना तुझ्या
का विसंबावे उगा देवावरी?

एक ठिणगी पेटवायाला पुरे
ज्ञात असुनी पाडली का बाबरी?

हौस नाही बंगल्याची या जिवा
पामरा दे मंदिराची पायरी

बोलण्याने दूर गेले आप्तही
चांगला "निशिकांत" हो तू वैखरी

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users