गझल

Submitted by विजय दिनकर पाटील on 15 November, 2017 - 22:30

नका चिंता करू शनिवार असताना
इथे सारेच कर्तबगार असताना

इथे थांबून जमते तेवढे मिळवू
कुठे भटकायचे घरदार असताना

किती चालायचे रेषेत एका मी
इथे रस्ताच वक्राकार असताना

कसे शोभेल आपण मोडणे आता
ठरत आल्यापरी व्यवहार असताना

नको बाहेर पडणे आणि गारठणे
पुरेसा कोष हा उबदार असताना

परत जाऊ नको तू रिक्त हातांनी
उभा डोळ्यांपुढे बाजार असताना

तुला टाळायचा ज्वर का बरे येतो
मला भेटायचा आजार असताना

किती तो जीवनाशी वाटतो समरस
व्यथांची पालखी निघणार असताना

तुझ्या शर्थीमुळे तर हा दिवस दिसला
कुठे लपलास तू सत्कार असताना

उरकल्यासारखे का वाटते जगणे
पुढे कित्येक सोपस्कार असताना

- विजय दिनकर पाटील

Group content visibility: 
Use group defaults

>>>तुला टाळायचा ज्वर का बरे येतो
मला भेटायचा आजार असताना>>>क्या बात! क्या बात!

>>>किती तो जीवनाशी वाटतो समरस
व्यथांची पालखी निघणार असताना>>>जबरदस्त!
शेवटचा शेरही खासंच!

संपूर्ण गझल सुंदर आहे . पण हा शेर विषेश भावला .

किती चालायचे रेषेत एका मी
इथे रस्ताच वक्राकार असताना