!! श्रद्धांजली !!

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 November, 2017 - 01:03

एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले. काही वर्षांनी अण्णांचे वडील उरण येथील नागाव (मांडळ आळी) ह्या गावी ५ एकर जमीन घेऊन, घर बांधून तिथेच स्थायिक झाले. नागावात आल्यावर अण्णांना मात्र मोठा मित्र परिवार मिळाला. काही वर्षांत आजोबांचे आजारपणामुळे निधन झाले. मोठ्या भावांची लग्ने होऊन सगळे नोकरी निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले होते. २-३ बहिणींचीही लग्ने झाली होती. अण्णांचे मोठे भाऊ मुंबईला नामवंत वकील होते. आग्री समाजातील पहिला वकील म्हणून अण्णांना त्यांचा खूप अभिमान होता. अण्णांनी दहावी पर्यंत मजल मारली आणि घरी थोडा हातभार लावावा ह्या उद्देशाने मोठ्या भावाकडे धाव घेतली. मोठ्या भावाने त्यांना वरळी येथील एका दुधाच्या केंद्रावर नोकरी मिळवून दिली आणि अण्णांच्या जीवनाला एक मजेशीर कलाटणी मिळाली. अण्णा जेव्हा ह्या दूध केंद्रावर काम करत होते त्या काळातील काही गमती जमती अण्णा सांगत तेव्हा एखाद्या सिनेमा प्रमाणे आपल्या डोळ्यासमोर चित्रपट उभा राही . अण्णा ज्या दूध केंद्रावर होते तिथल्या कर्मचारी मुलांबरोबरही अण्णांची चांगली मैत्री जमली. अंगात तरुण रक्त उसळत असल्याने मौज-मजा करणे हा ह्या मुलांचा स्थायी भाव झाला होता. चौपाटीवर जाऊन भेळ खाणे, हिंडणे, चिडवा-चिडवी मस्ती हे नित्याचेच होते. केंद्रावर एक हौद होता तिथे बर्‍याच शूटिंग व्हायच्या मधुबाला आणि किशोर कुमार यांच्या एका गाण्याच्या शूटिंगचे वर्णन करताना मधुबालाचे सौंदर्य आणि तो सीन टीव्ही मध्ये न पाहताही पाहिल्यासारखा वाटतो. पुढे अण्णांनी आपल्या उरण-नागाव मधील काही मित्रांनाही दूध केंद्रावर रोजगार मिळवून दिला. तेव्हा नुसती मौज मजाच नाही तर अण्णा सावरकरांची भाषणे, साने गुरुजी, अत्रे, पु.ल. देशपांड्यांची व्याख्याने ऐकायलाही दूरवर जात. अण्णांचे देशप्रेमही ह्या वेळी उफाळून यायचे. साने गुरुजींच्या राष्ट्रीय सेवा दलात त्यांनी प्रवेश घेतला होता. अण्णांना ह्या काळातला इतिहास अजूनही तोंडपाठ होता. ते सगळे प्रसंग जसेच्या तसे उभे करून सांगण्याची कला त्यांच्यात होती.

काही वर्षांनी अण्णांना त्यांच्या मोठ्या भावाने प्रीमियर ह्या कुर्ला येथील कंपनी मध्ये नोकरी मिळवून दिली. अण्णांसाठी उरण मधील एका प्रार्थमिक शिक्षिकेचे स्थळ चालून आले आणि अण्णांचे लग्न जमले. अण्णांच्या वरातीत अण्णांच्या भावाकडे एक फॉरेनर जोडपे आले होते ते ही वरातीत मिसळू नाचल्याने अजूनपर्यंत ती वरात आठवणीत अजरामर आहे. अण्णांना पत्नीही सुस्वभावी, शांत मिळाली. तिची शाळा उरणमध्ये व अण्णा मुंबईत. त्यावेळी सहज जाण्या-येण्याच्या खास सोयी नव्हत्या त्यामुळे अण्णा रविवारी घरी येत. अण्णांची पत्नी म्हणजे माझी आई व अण्णांची आई म्हणजे माझी आजी दोघी सासू-सुना घरी राहायच्या. वाडीसाठी एक गडी कायमचा ठेवलेला. दोन वर्षांनी अण्णांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुलगा मोठा झाला व बोलायला लागला तेव्हा एक दिवस "अण्णा तुमी आमाला का शोडून जाता?, इथेच का लाहत नाही" ह्या बाळबोध वाक्याने अण्णांच्या काळजावर घाव घातला तेव्हा पासून अण्णांनी नाइट शिफ्ट घेऊन रोज मुंबईला ये-जा करू लागले ते सेवानिवृत्त होई पर्यंत. पुत्ररत्नाच्या ८ वर्षानंतर अण्णांना कन्यारत्नाचा लाभ झाला आणि आता कुटुंब सहवासाची त्यांची ओढ अधिक वाढली. रोज संध्याकाळी ६ वाजता अण्णा घर सोडत कधी सायकल घेऊन, कधी उरणवरून टांगा तर कधी चालतच मोरा बंदरावरून अण्णा ८ ची लाँच/पडाव/मचवा काही मिळेल ते पकडायचे. सकाळी ७-८ वाजता भाऊच्या धक्क्यावरून लाँच तर कधी कुलाब्यावरून मचवा पकडून घरी यायचे. पावसाळ्यात वादळी वार्‍यामुळे लाँच बंद असायच्या पण मचवे चालू असायचे मग अण्णा त्या जीवघेण्या वादळी वार्‍यातील स्वतःचे अस्तित्व टिकवण्याची शर्थ करणार्‍या मचव्यात आपल्या कुटुंबाच्या सहवासासाठी प्रवास करायचे. पण कधी त्यांची त्याबाबत तक्रार नसे.

अण्णा घरी येऊ लागल्यामुळे आता शेतीत, मळ्यांतही लक्ष घालू लागले. अण्णांचा मित्रपरिवार व अण्णांचे स्वतःचे मन सामाजिक कार्यात रस असल्याने अण्णा आपल्या मित्रांसोबत अनेक सामाजिक कार्यक्रमातही भाग घेऊ लागले. सामाजिक कामे ही साधी नव्हती. चळवळीच असायच्या त्या. अण्णांचे नागावातील नाना पाटील नावाचे मार्गदर्शक ह्यातील मेन पुढारी होते. अण्णांवर त्यांचा अतिशय प्रभाव होता तो शेवट पर्यंत. विधवा महिलांना खूप वाईट वागणूक दिली जाते, त्यांना समाज त्यांचा काही दोष नसताना मानाने जगू देत नाही म्हणून एकदा एका विधवा महिलेला ह्या मित्रपरिवाराने सत्यनारायणाच्या पूजेवर बसविले होते. गावातून तेव्हा ह्या सगळ्यांसकट अण्णांवरही रोष केला होता पण त्याची अण्णांना तमा नव्हती. जनजागृती हे त्यांचे ध्येय होते. अशा अनेक चळवळींमध्ये अण्णांनी ह्या ग्रुपद्वारे भाग घेतला. साधारण १९९० च्या दरम्यान गावकर्‍यांनी अण्णांना गावचे अध्यक्षस्थान दिले. त्या वर्षी अण्णांनी गावातील तरुण मंडळीची साथ घेऊन गावात अनेक उपक्रम राबवले. त्या वर्षी गावातील मुलांनी असंख्य कंदील बनवून ते पूर्ण गावात रस्त्यावर लावले, १ मे ह्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील मुलांनी तयार केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात अण्णांनी त्या वर्षापासून चालू केली. होळी दिमाखात साजरी झाली. गावातील स्वच्छतेवर भर दिली गेली. अनेक समाजोपयोगी कार्यक्रम अण्णांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत पार पाडले गेले.

उन्हाळ्यात येणारे आंबे- फणस आपल्या सगळ्या नातेवाइकांना पोहोचवण्याची अण्णांची लगबग चालू असायची. अण्णा एक उत्साही शेतकरी होते. नाइट शिफ्ट करून सकाळी घरी आले की ते शेतात कामावर रुजू होत. पावसाळ्यात भात शेती तर हिवाळ्यात भाजीपाल्याचा मळा हे ठरलेले होते. वांगी, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, पालेभाज्या, नवअलकोल, फ्लॉवर ह्या प्रत्येकाची वेगवेगळी शेते अण्णा पिकवायचे. त्यावेळी वाडीत भाजीचा सुगंध दरवळायचा. ते प्रयोगशील शेतकरीही होते. फक्त पारंपरिक शेती न करता ते दर वर्षी एक शेत प्रयोगासाठी ठेवायचे. ह्या प्रयोगात त्यांनी ह्या भागात सहसा कोणी पीक न घेतलेला वाटाणा, कलिंगड, , हरभरा, भुईमूग, ऊस, बटाटा अशी शेती हौशीने केली.

अण्णांचे त्यांच्या आईवर अत्यंत प्रेम होते. आई हे त्यांचे दैवत होते व तिची त्यांनी तिच्या अखेरच्या क्षणापर्यंत अपार सेवा केली. अण्णांना आपल्या कुटुंबा बद्दल खूप ओढ होती. ह्या कुटुंबात त्यांचे सगळे भाऊ-बहिणी व भाचे कंपनी तर असायचीच पण त्यांच्या पत्नीच्या म्हणजे माझ्या आईच्या माहेरच्या माणसांसोबतही त्यांची वागणूक आपल्या परिवाराप्रमाणेच असायची. पूर्वी शाळेला सुट्या लागल्या की आमचे घर खर्‍या अर्थाने मामाचे गाव व्हायचे. अण्णांची सगळी भाचे-पुतणे कंपनीने घर भरून जायचे. आई आणि आजी हसतमुखाने त्यांचा पाहुणचार करण्यात गर्क असायच्या. आईनेही कधी कंटाळा न करता प्रत्येक गोष्टीत सदैव अण्णांची साथ हसतमुखाने दिली. आमची वाडी माझ्या भावंडांच्या दंगा मस्तीने दुमदुमून जायची. आमच्या विहिरीत अण्णांनी कुटुंबातील सगळ्या मुलांना पोहायला शिकवले. कुटुंबात कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कोणाच काही बिनसलं की सारवासारव करण्यासाठी अण्णांचा आधार घेतला जायचा कारण अण्णा खूप चांगले अनुभवाने तयार झालेले काउन्सिलर होते. अण्णा असे प्रॉब्लेम सोडवायला गेले की त्या व्यक्तीचा राग म्हणा की गैरसमज दूर झालाच पाहिजे अशा पद्धतीने अण्णा त्यांचे प्रश्न हाताळायचे.

अण्णांनी आम्हा दोघा भावंडांनाही शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही भाग घेण्यासाठी ते आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. भावाला क्रिकेटची आवड होती म्हणून त्यांनी क्रिकेटचा पूर्ण किट त्या काळी आणून दिला व त्या खेळात त्याला प्रावीण्य मिळाले. माझ्या लेखनाला, इतर कला गुणांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांना आपल्या नातींचाही फार अभिमान वाटायचा. नातींबरोबर खेळ, चर्चा त्यांचे कौतुक ह्यात ते हरवून जायचे. अण्णांनी आपल्या सुनेलाही सून न मानता मुलीप्रमाणेच वागवले व तिला तसेच आपल्या परिवारातील लहान थोर व्यक्तीला शेवटपर्यंत आधार दिला.

साधी राहणी व उच्च विचारसरणी असे अण्णा होते. त्यांच्या परिचयात जो येईल त्याचे अण्णा मन जिंकून घ्यायचे. कंपनीत, गावात, शहरात असलेल्या दुकानाच्या आसपास त्यांनी अनेक माणसे जोडली. येणार्‍या जाणार्‍याला नमस्कार करून त्यांची विचारपूस करणे हा स्वभाव समोरच्या व्यक्तीच्या मनात अण्णांबद्दल आपुलकी निर्माण करायचा. जमेल तितकी मदत समोरच्या व्यक्तीला करणे ह्या स्वभावामुळे त्यांचा सगळ्यांनाच आधार वाटायचा.

अण्णा स्वतः चांगले लेखन करायचे. कविता करायचे. मलाही ते लेखनासाठी आणि वाचनासाठी प्रोत्साहन द्यायचे. शाळेतील निबंधांची मुद्देसूद मांडणी करून द्यायचे. त्यामुळे माझी लिखाणात गोडी लागायची. आता माझे लेख मासिके आणि वर्तमान पत्रात पाहताना त्यांना आनंद होऊन ते सगळ्यांकडे माझे कौतुक करायचे. त्यांना आपल्या जावयाचाही फार अभिमान होता. जावयांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनीही त्यांच्या कवितांचे भरभरून कौतुक केल्याने त्यांनाही उतारवयात कवितांमुळे नवी आनंदी उमेद मिळाली व त्यांनी आपले शेवटचे दिवस कविता करून आनंदात घालविले. त्यांच्या अनेक कविता मासिके व वृत्तपत्रात छापून येत होत्या. तसेच ते कवीसम्मेलनातही आपला ठसा उमटवायचे. त्यांचे आपल्या पत्नीवर अत्यंत प्रेम होते. त्यांनी आपली पत्नी शमला हिच्या नावावरून शामल गंध कविता ह्या कविता संग्रहाचे आग्रसेन अंकाच्या संपादिका वासंती ठाकुर यांच्या हस्ते प्रकाशनही केले जो त्यांच्या आयुष्यातला आनंदी मोहोत्सव होता. त्यांच्या कविताही वैविध्यपूर्ण असायच्या. बालकविता, निसर्ग कविता, आग्री कविता, राजकारणी कविता, कौटुंबिक कविता अशा अनेक कवितांचा त्यांच्या कविता संग्रहात समावेश आहे. दुसरा चंद्रनयन नावाचा कविता संग्रह त्यांनी छापायला दिला होता पण तो पूर्ण होण्यापूर्वीच अल्पशा आजाराने ते १६ जुलै २०१७ रोजी अल्पशा इश्वरप्रिय झाले आणि त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली. त्यांचं हे शेवटच कविता संग्रहाच स्वप्न आम्ही कुटुंबीय लवकरच पूर्ण करणार आहोत. अण्णा गेले तेव्हा त्यांचे वय ८० होते पण त्यांची उमेद ६०-७०च्या व्यक्तीसारखी होती त्यामुळे इतका उत्साही, उमेदी माणसाला झटकन देवाज्ञा झाली ह्यावर विश्वास ठेवण परिचितांना कठीण जात आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना व श्रद्धांजली.

Group content visibility: 
Use group defaults

_______/\______

खरंच, ह्रदयातून लिहिलंस....

अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली....

जागू ताई, तुझ्या अनेक लेखांतून अण्णांविषयी लिहीले होतेस. विशेषतः त्यांच्या कायमच्या रात्रपाळी, लाँचने मुंबईला केलेली ये-जा, शेतीतील प्रयोग वगैरे. त्यामुळे अण्णा थोडे परिचयाचेच वाटायचे.
अण्णांना भावपुर्ण श्रद्दांजली!!

अण्णांना भावपुर्ण श्रद्दांजली!!...
एक दिवस मी कुर्ला- भाउचा धक्का-उरण आणि परत असा प्रवास केला होता. . त्यात काय हाल होतात ते बघुन रोज असा प्रवास करायचा याची कल्पना करवत नाही. तुमच्या अंण्णाचा चिकाटीला सलाम.

जागू,अगदी हृदयस्पर्शी लिखाण केले आहेस.
तेव्हा पासून अण्णांनी नाइट शिफ्ट घेऊन रोज मुंबईला ये-जा करू लागले ते सेवानिवृत्त होई पर्यंत.>>>> अण्णांना मानले.ती माणसे वेगळ्याच मुशीतून येत असावीत.
बाबांना श्रद्धांजली !

अनघा, अन्जू, धनवन्ती, पलक, दक्षिणा, शोभा, शशांकदा, वर्षा, टवणे सर, अंजली, रावी, गमभन, साहिल, देवकी, आबासाहेब धन्यवाद. __/\__

जागु, अण्णा कसे होते ते लेखणीतून उभे केलेस अगदी!! त्यांच्या शेतीच्या ध्यासविषयी तुझ्याकडून तुझ्या लिखाणातून कळत तर होतेच, त्यांच्याबद्दल अजून माहिती मिळाली.

त्यांच्या शामलगंध संग्रहातील काही कविता वाचल्यात, खूपच सुरेख, अगदी मातीच्या गंध लेऊन आलेल्या कविता आहेत.

इथे वेगळा धागा काढून काही कविता दे ना!

जागु तुझी श्रध्दांजली एका लाडक्या कन्येने आपल्या पित्याबद्दल वाटणार्या भावना दाखवणारी अशीच आहे.
माझ्यातर्फे तुला आणि तुझ्या आईस या कठीण काळात धैर्य लाभो अशी प्रार्थना करते.

निर्झरा, ऋन्मेष, हेमाताई, साधना, निलूदा, निषदीप, आर्च __/\__

त्यांच्या शामलगंध संग्रहातील काही कविता वाचल्यात, खूपच सुरेख, अगदी मातीच्या गंध लेऊन आलेल्या कविता आहेत.
इथे वेगळा धागा काढून काही कविता दे ना!

मागे मी दोन-तिन कवीता टाकल्या होत्या इथे.