खरे ऐकणे भल्याभल्यान्ना झेपत नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 10 November, 2017 - 02:35

आजकाल हे कसे कुणाला समजत नाही ?
की फितुरीने युध्द कुणीही जिंकत नाही

प्रेम-जिव्हाळा सरळसोट हे दोन्ही रस्ते
ह्यावरती का कुणी-कुणीही चालत नाही ?

मिरवणूक निघते की निघते शवयात्रा ही
धक्काबुक्कीवाचुन दर्शन लाभत नाही ?

फेबिकोलचा जोड देउया का नात्यान्ना ?
सख्खा-सख्ख्याशीही नाते टिकवत नाही

खरे बोलणे अपेक्षीत असते कोणाला ?
खरे ऐकणे भल्या-भल्यान्ना झेपत नाही

सजा कोणती अखेर देवू लेखणीस ह्या ?
मनात जे जे आहे ते ते मांडत नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users