पैसा झाला खोटा

Submitted by ओबामा on 9 November, 2017 - 02:33

“बहनो और भाईयों“ अशी प्रेमाने साद घालून पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजता त्यांच्या भाषणात चलनबंदीची घोषणा करून अख्या भारतालाच नाही तर सगळ्या जगाला एक जोरदार धक्का दिला. या निर्णयाचे फायदे तोटे यावर आज एक वर्षांनंतरदेखील जोरदार चर्चा झडत आहेत. या निर्णयाने काळ्या पैशाच्या वापरावर बंधने येतील असे जोरदार प्रतिपादन करण्यात आले. त्या धाग्याला धरून आणि आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होते आहे त्याचे निमीत्त साधून एक कथा आपल्या समोर सादर करत आहे. ही कथा, घटना व यातील पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक असून यांचा वास्तविक जीवनाशी काडीमात्र संबंध नाही आणि असल्यास तो निव्वळ एक योगायोग समजावा. ही कथा कोणत्याही निर्णयाचे समर्थन करण्यासाठी लिहीली नाहीये याची वाचकांनी नोंद घ्यावी. तेव्हा कथा वाचून ती आवडली किंवा आवडली नसल्यास त्यासंबंधीचे अभिप्राय जरूर कळवावेत ही नम्र विनंती.
***************************************************************************************************************************************
दरवाजावर हळूच टकटक झाली. फोनवर अदबीने बोलणार्या सोपानरावांच्या कपाळावर एक हलकी नापसंतीची आठी उमटली. आता यावेळी कोण तडमडला असेल याचा विचार पण करायला त्यांना मेंदूचा वापर करायचा नव्हता. फोनवर पलिकडे त्यांच्यापेक्षा कोणी मोठ्या जरबेची व्यक्ति बोलत आहे हे त्यांच्या आवाजावरून व देहबोलीतून जाणवत होते. थंडगार एसी रूममध्ये बसलेले असूनदेखील त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. पलिकडला एकही शब्द न विसरता त्याप्रमाणे जर अंमलबजावणी झाली नाही तर होणार्‍या परिणामांची जाणीव त्यांना होती.
“होय साहेब, मी सगळे सांभाळून व्यवस्थित करून घेतो. आपण कसलीच काळजी करू नका.” फोन ठेवण्याअगोदर पलिकडच्या व्यक्तिला आश्वस्त करण्यासाठी जितके आश्वासक बोलता येईल तितक्या ते बोलले. फोन ठेवताच त्यांनी एक कचकन शिवी हासडली व रागाने बोलून गेले,
“साला, यांची कामे करताना सगळी रिस्क आम्ही घ्यायची, टेन्शन आम्ही वहायची पण मलई खाताना सर्वात जास्त हिस्सा मात्र यांना द्यायचा. काही लोचा झाला तर शिव्याबी खायच्या पन साहेबांचे नाव बाहेर येता कामा नये म्हनून तोंडाला कुलूप पण घालायचे.” पण लगेच दचकून इकडेतिकडे बघत त्यांनी जीभ चावली. येथे भिंतींना सुध्दा कान असतात, तेव्हा जे काय बोलायचे ते मनातल्या मनात.
त्यांच्या साहेबांना बाहेर शिक्षणसम्राट म्हणून मोठा मान होता. शहरातील अनेक शिक्षणसंस्था त्यांनी उभ्या केल्या होत्या आणि सगळ्या ठिकाणी आपली विश्वासू माणसे नेमली होती. त्यातलेच एक म्हणजे सोपानराव सकपाळ. साहेबांच्या कृपेनेच आज या जिल्ह्यातील अनेक शाळा चालविणार्‍या एका मोठ्या संस्थेच्या संचालक कमिटीवर अध्यक्ष म्हणून ते विराजमान होते. तसे आतापर्यंत १० वर्षे साहेबांसाठी छोटीमोठी कामे करताना १-२ किरकोळ तक्रारी वगळता काहीच मोठा गोंधळ झाला नव्हता, त्यामुळेच ते साहेबांच्या खास मर्जीतील माणूस बनले होते. पण आज त्यांना आपली गत फक्त सांगकाम्या नोकरासारखी झाली आहे, असे त्यांना मनोमन वाटून गेले. साहेबांसाठी बरीच कामे करताना त्याबदल्यात आपल्याला फारच कमी हिस्सा मिळतो तेव्हा यावेळी काहीतरी अशी युक्ती केली पाहिजे की ज्याने साहेबांचे काम पण होईल आणि आपल्याला पण चांगला हिस्सा भेटेल. त्यांचे व्यवहारी मन जलद गतीने चालायला लागले. नवीन शिक्षक भरतीबद्दल साहेबांकडून काही (आर्थिक) मार्गदर्शक सूचना त्यांना आत्ताच फोनवरून ऐकायला मिळाल्या होत्या. त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे होते. त्याच विचारात गढलेले असताना परत एकदा दारावर टकटक झाली. त्यांनी कोरडेपणानेच बाहेर उभ्या माणसाला आत येण्यास सांगितले.
दारातून येणार्‍या व्यक्तीला बघून त्यांनी आपल्या कपाळावरचा घाम पुसला व चेहर्‍यावर खोटे स्मित आणत ते म्हणाले,
“या या, जोशीसर, आज आमच्याकडे कसे काय येणे केलेत. मला बोलावणे धाडले असते तर मी आलो असतो तुम्हांला स्टाफरूममध्ये भेटायला!”
सोपानराव सकपाळांनी खोट्या लाघवीपणाने दारातून आत येणार्‍या वसंत जोशींचे स्वागत केले पण मनातून मात्र भलत्याच वेळी भेटायला आलेले जोशीसर त्यांना एकदम नकोसे वाटले.
जोशीसर म्हणजे ही शाळा सुरू झाली तेव्हांपासूनचे संस्कृत व गणिताचे शिक्षक. सत्यवादी व सरळमार्गी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी आयुष्यात कधीही आडमार्गाचा अवलंब केला नव्हता म्हणूनच येवढ्या वर्षांच्या नोकरीनंतर देखील ते अजूनही वन रूम किचनच्या घरात रहात होते. कित्येक गरीब मुलांना त्यांनी स्वतःच्या घरी बोलावून विनामोबदला शिकवले होते आणि म्हणूनच ते सर्व विद्यार्थ्यांसाठी आदरणीय होते. हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकले व घडले होते. त्यांचे बरेच विद्यार्थी आज अनेक सरकारी ऑफिसात, खाजगी कंपन्यात मोठ्या पदावर कामाला होते. पण त्यांनी कधीच त्याचा गैरफायदा घेतला नाही. त्यांना आत्तापर्यत दोन वेळा आदर्श शिक्षकाचा पुरस्कार पण मिळाला होता. याच वर्षी ते रिटायर होणार होते. सोपानरावांना त्यांना मोठ्या आदराने समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. कदाचित फंडाची रक्कम किंवा पेन्शन संबंधी त्यांना काही बोलायचे असेल असे सोपानरावांना वाटले. पण बराच वेळ खुर्चीत बसून जोशीसरांची चुळबूळ चालू आहे तेव्हा विषय काहीतरी महत्वाचा आहे हे चाणाक्ष सोपानरावांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तेव्हा हे त्याच्याही पलिकडचे असेल अशी सोपानरावांची खात्री पटली. पण आज अचानक जोशीसर आपल्याकडे अश्या कुठल्या कामाबद्दल बोलणार असतील याचा विचार सोपानरावांच्या मनात येतो न येतो तोच जोशीसरांनी घसा खाकरून हळू आवाजात बोलण्यास सुरूवात केली,
“आज मी जरा घरगुती गोष्टीसाठी तुमच्याकडे आलो आहे. माझ्या उभ्या आयुष्यात मी कोणाकडेही माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबियासाठी कधीही हात पसरले नाहीत. पण आता जमाना बदलला आहे. कशी आणि कुठून सुरूवात करू हेच कळत नाहीये. आयुष्यभर मुलांना गणित सोपे करून शिकवले पण हे घरच्या जमाखर्चाच्या गणिताचे कोडे काही सुटत नाही“ जोशीसरांनी मान खाली घालून वरील वाक्ये सावकाश उच्चारली.
सोपानरावांना काहीच बोध झाला नाही हे त्यांच्या चेहर्‍यावरील गोंधळलेल्या भावावरून कळून येत होते. सोपानरावांना खरेतर या संस्कारी बोलण्याचा तिटकारा होता. जोशीसरांनी लवकर काय ते विषयाबद्दल सांगून मोकळे व्हावे म्हणजे नवीन शिक्षकांच्या भरतीच्या आर्थिक गोष्टींवर लवकरात लवकर लक्ष केद्रींत करता येईल याची जाणीव होऊन उगाचच नाटकी हसत ते जोशीसरांना म्हणाले,
“जोशीसर, तुम्ही अगदी मोकळेपणाने व निःसंकोचपणाने बोला. जमल्यास मला आपला जवळचा मित्र समजा. मी जमेल ती सगळी मदत करण्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करेन.“
सोपानरावांच्या या आश्वासक बोलण्याचा जोशीसरांवर थोडा परिणाम दिसला व ते खुर्चीत सावरून बसले. त्यांनी पुढचे बोलण्यास सुरूवात केली,
“धन्यवाद. मग तुमचा जास्त वेळ न घेता मुख्य विषयावरच येतो. तुम्हांला माहीतच असेल की या वर्षी मी रिटायर होणार आहे. नंतर घरात कमावणारे असे अजूनतरी कोणीच नाही. एकुलत्या एका मुलाने शिक्षणासारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे म्हणून त्याला चांगले मार्क असून देखील मी बी. एड. करायला लावले. पण आजकाल, नवीन सरकारी नियमांमुळे व आरक्षणाच्या चक्रव्यूव्हात अडकल्यामुळे त्याला कुठेच नोकरी लागत नाहीये. गेले एक वर्षे तो बेरोजगार आहे. आपल्या येथे नवीन शिक्षक भरती करायची आहे असे गेल्या आठवड्यात कोणीतरी स्टाफरूममध्ये बोलत होते. माझा मुलगा चुणचुणीत आहे शिवाय त्याला मुलांना शिकवण्याची तळमळ आहे. तेव्हा आपल्याकडे काही.......“
“जोशीसर, तुम्ही योग्य वेळी माझ्याकडे आला आहात. मी आत्ताच यांच्याशी फोनवर बोललो.....(साहेबांशी याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून). तेव्हा ह्याच मुद्द्यावर चर्चा झाली बघा. तुमचे काम होणार. अहो तुमचा मुलगा म्हणजे मला मुलासारखाच नाही का, काय?“ जोशीसरांचे वाक्य अर्धवट तोडत व त्यांना दिलासा देत सोपानराव बोलले.
“त्याच काय आहे, या वर्षाअखेरीस आपल्यासारखे बरेच जुने शिक्षक रिटायर होणार आहेत. शिवाय पुढच्या वर्षी आपण शाळांची पटसंख्याही वाढवतो आहोत. काही शाळांच्या नवीन विस्तारीत भागाचे काम देखील सुरू झाले आहे. तेव्हा आपल्याला नवीन शिक्षकांची गरज भासणारच आहे. पुढच्या 2 महिन्यात आपल्याला पुढील शैक्षणिक वर्षाकरिता नवीन शिक्षकांची भरती तातडीने करायची आहे. आपल्याकडे आपण एकदम सरळ व सोप्या पध्दतीच्या चाचणीचा मार्ग अवलंबतो. सगळ्या टप्प्यातून उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होणार्‍या तरूणांचीच आपण आपल्या शाळेत निवड करतो.“
जोशीसरांना या वाक्यांनी चांगलाच दिलासा वाटला. या बातमीने आनंदीत होणार्‍या बायकोचा व मुलाचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर तरळला.
“पण काय आहे ना सर, आपल्यासारख्या लोकांनीपण इतरांनी केलेल्या मदतीच्या बदल्यात आपण समोरच्याला काय देऊ शकतो याचा थोडा विचार करायला हवा ना. बरोबर आहे की नाही?“ सोपानराव डोळे बारीक करून व जोशीसरांवर आपली नजर रोखून म्हणाले. सोपानरावांच्या प्रश्नाचा रोख न कळल्याने व अचानक बदललेल्या त्यांच्या पवित्र्याने जोशीसर थोडे गोंधळले. त्यांनी न राहून सोपानरावांना विचारले,
“मला आपल्या बोलण्याचा रोख नाही कळला. मी आपल्या शाळेसाठी माझे रक्त आटवले आहे. इतकी वर्षे मी शाळेसाठी व मुलांसाठी झिजलो आहे. कधीही मी माझ्यासाठी काहीच मागितले नाही. पण आज परिस्थितीच अशी आली आहे तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा कोणासमोर तरी ओंजळ पसरली आहे.“ जोशीसर अगदी अपराधी भावनेने बोलले, पण लगेच स्वतःला सावरून व डोळ्यातून येणारे पाणी निर्धाराने रोखून ते म्हणाले,
“माझ्या मुलाची तुम्ही परीक्षा घ्या. सगळ्या निवड चाचण्यातून उत्तीर्ण झाल्यावरच त्याची निवड करा. मला खात्री आहे, तो या सगळ्यातून उत्तम गुणांनी उत्तीर्ण होईल.“
“जोशीसर, ते तर आम्ही करूच. त्यासाठीच आम्ही येथे बसलो आहोत. पण यात सरकारी नियम, आरक्षणाचे कोटे हे सगळे आलेच की. काय? आता आपली संस्था चालवत असलेल्या शाळा विनाअनुदानीत आहेत तेव्हा काही नियम शिथील होतात किंवा आपल्या लोकांकरता ते शिथील करून घेता येतात. ते सगळ तुम्ही माझ्यावर सोडा. पण काय आहे ना, आपल्या संस्थेचा पसारा वाढतो आहे. शैक्षणिक देणग्या हळूहळू घटत चालल्या आहेत. सरकारी मदत ना मिळण्यात जमा आहे. आता मला सांगा या नवीन वास्तू उभारणीचा खर्च, नवीन वाढलेल्या लोकांचे पगार, सरकारी अधिकार्यांचा मेवा इ. खर्च चालवायला पैसा कुठून उभा करायचा संस्थेने?“ सोपानरावांनी एकदम रोखठोक प्रश्न विचारला.
जोशीसरांच्या चेहर्‍यावरचे हावभाव टिपत त्यांनी पुढचा खडा टाकला,
“संस्थेची खालावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्व निवड झालेल्या उमेदवारांकडून दहा दहा लाख रूपये विस्तारीत सुधारणा फंड म्हणून घ्यायचे ठरवले आहे. तुम्ही या संस्थेचे जुने मेंबर म्हणून मी तुम्हांला 50 टक्के सुट देतो. शाळेनंतर बाकीच्या शिक्षकांप्रमाणे घरगुती शिकवणी घेण्यास तुमच्या मुलास सुट असेल. नाहीतरी आजकाल शाळांतून शिकतो तरी कोण, काय? नंतर आपल्या शाळेच्या नावामुळे त्याच्याकडे शिकवणी लावायला लोकांच्या रांगा लागतील रांगा. तुमचा मुलगा वर्ष - दोन वर्षात नक्कीच सगळी रक्कम वसूल करू शकेल.“
जोशीसरांना आपल्या पायाखालची जमीन दुभंगते आहे असे वाटले. ज्या संस्थेच्या शाळांसाठी आपण एवढ्या खस्ता खाल्ल्या त्याच संस्थेच्या संचालकाकडून आपल्याकडे अशी काही मागणी होईल याची त्यांनी कल्पना पण केली नव्हती. त्यांच्या घशाला कोरड पडली. विचार करून कळवतो म्हणून ते उठले.
त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून सोपानराव बोलले,
“जोशीसर, हे सगळे बोलणे आपल्यातच राहिले तर बरे होईल. नाहीतर..... आणि हो, तुमच्या मुलाची निवड करण्याची जबाबदारी माझी. ह्या हाताने त्याच्या निवडीचे पत्र घ्या आणि त्या हाताने पैसे द्या. सगळ कस एकदम सोपे, सरळ आणि पारदर्शी असेल. कुणालाही काहीही कळणार नाही. सर, अजून किती दिवस या तत्वांना कवटाळून बसणार, आं? जाताना तरी मुलाचे आणि संस्थेचे भले करून जा. नाहीतर तुमच्या या तत्वांमुळे त्याचेपण आयुष्य उध्वस्त कराल. एकदा मुलगा नोकरीला लागल्यावर तुम्हीपण मग तुमचे उरलेले आयुष्य मिळणार्‍या पेन्शनवर, देव देव करत आरामात जगायला मोकळे, काय? लक्षात येतेय का काही?“
जोशीसर काहीच न बोलता मान डोलवत सुन्नपणे सोपानरावांच्या केबीन मधून बाहेर आले. घरी आल्यावर त्यांनी सगळा प्रकार आपल्या मुलाच्या, म्हणजे विजयच्या कानावर घातला. विजयला असे काहीतरी होईल याची कल्पना होतीच. त्याने बाबांना निर्धास्त रहाण्याचा सल्ला दिला. बर्‍याच विचारांती त्याने बाबांना सोपानरावांना होकार कळविण्यास सांगितले व त्याच वेळी सोपानरावांकडूनच पाच लाख कर्जाऊ मिळतील का याची चाचपणी करण्यास सांगितले. पण या व्यवहाराची नोंद कुठेच होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. फक्त शब्दावर किंवा फारफार तर एका साध्या कागदावर दोघांनी (जोशीसर व सोपानरावांनी) याची नोंद करायची. त्याने बाबांना आश्वस्त केले की तो त्यांच्या तत्वांच्या विरूध्द जाऊन काहीही चुकीचे करणार नाही.
मनाविरूध्द सगळे घडत असताना केवळ आपल्या मुलावर विश्वास ठेऊन घाबरत घाबरतच जोश्यांनी सोपानरावांना याबद्दल विचारले. सोपानरावांना तर जोशीसरांच्या या विचारण्याने आनंदाच्या उकळ्याच फुटल्या. आपलेच पैसे घेऊन, तेच पैसे जोशीसर आपल्याला परत करणार आणि नंतर त्यावर परतावा म्हणून व्याजासकट दर महिन्याला काही रक्कम देणार. ज्यांना आपण इतके हुशार समजत होते ते एवढे व्यवहारशून्य असतील यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. जोशीसर मागे लागलेले असतानादेखील, जोशीसरांच्या प्रामाणिकपणावर त्यांचा विश्वास असल्याने त्यांना या छोट्या रकमेची नोंद देखील ठेवावीशी वाटली नाही. सोपानरावांनी ताबडतोब याला होकार दिला व काही दिवसांनी रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. सोपानरावांना आता पैशांच्या गादीवर लोळत आहोत अशी स्वप्न पडायला लागली होती.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सगळ्या चाचण्या पार पाडून, संभाव्य उमेदवारांची पहिली यादी सोपानरावांनी साहेबांना पाठवली, मात्र यात त्यांनी प्रत्येक उमेदवाराकडून घ्यायची रक्कम 50 टक्क्यांनी कमीच दाखवली. उरलेला सगळा हिस्सा त्यांचाच होणार होता. साहेबांना अंधारात ठेवून ते एक वेगळीच चाल खेळत होते आणि आपल्या या चालीवर ते भलतेच खूष होते. या पैशातूनच, मुलीच्या लग्नात तिला हुंड्यात कोरी चारचाकी व कॉलजल्या जाणार्‍या मुलाला चांगली दुचाकी घेऊन द्यायची त्यांनी मनातल्या मनात पक्के करून टाकले. साहेबांकडून मान्यता येताच, ऑक्टोबरच्या मध्यास ज्या उमेदवारांनी रक्कम भरण्याची तयारी दर्शविली त्यांची वेगळी यादी बनविण्यात आली. सर्व उमेदवारांना, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाला घरात भरभरून लक्ष्मी येणार या विचारानेच सोपानरावांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्यांच्या आकडेवारीवरून ही रक्कम साधारण 2-2.5 कोटींच्या घरात जाणारी होती. दिवाळीला आपल्याच लक्ष्मीला घराबाहेर पाठवण्यापेक्षा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याची मुदत त्यांनी जोशीसरांना वाढवून दिली. दोन नोव्हेंबरला जोशीसरांनी रक्कम घेऊन जावी व चार नोव्हेंबरला साहेंबासमोरच ती त्यांच्याकडून स्वीकारणार होते. ठरलेली रक्कम साहेबांसमोर घेतल्याने साहेबांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढणार होता आणि त्याच वेळी साहेबांना जोशीसरांसमोर उघडे पाडण्याचा दुहेरी डाव ते खेळणार होते.
चार नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता, विजयने जोशीसरांना आपल्या नेमणूकीचे पत्र सोपानरावांकडून घेण्यास पुढे पाठविले. त्यांनी ते घेऊन तडक घरी यावे अशी सूचना त्याने त्यांना दिली. पत्र घेऊन ते घरी पोहोचताच तो स्वतः पैसे घेऊन सोपानरावांना चार वाजता भेटायला गेला. जोशीसरांच्या ऐवजी त्यांचा मुलगा पैसे द्यायला आलेला पाहून सोपानरावांचा साहेबांना जोशीसरांसमोर उघडे पाडण्याचा डाव फसला, त्यामुळे ते थोडेसे निराश झाले. पण साहेबांना खूष बघून त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाची लकेर पसरली. ते नोटांची बंडले कपाटात ठेवायला वळतात न वळतात तोच दरवाज्या बाहेर बुटांचा आवाज आला. दरवाज्यावर नॉक करून रीतसर परवानगी न घेता कोण माणूस आला आहे हे बघायला ते वळले तेव्हा लाचलुचपत खात्यातील अधिकारी पोलिसांना घेऊन त्यांच्या केबीनमध्ये प्रवेश करत होते. त्यांना जराही हालचाल करण्याची संधी न देता पोलिसांनी नोटांची ती बंडले हस्तगत करून त्यांना नोकरी लावण्यासाठी मोठ्या रकमेची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून बेड्या ठोकल्या. आता सोपानरावांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांचा घसा कोरडा पडला होता. असे काही होऊ शकते याचा त्यांनी स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. साहेबांचा चेहरा तर पांढराफटक पडला होता. सोपानरावांच्या चुकीमुळे ते आयतेच पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकले होते. हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेतील सोपानरावांना सगळ्या लोकांसमोर अतिशय अपमानास्पदरित्या पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आले. जराही वेळ न दवडता त्या सगळ्यांना घेऊन ते चौकीत पोहाचले व पुढील कारवाईस त्यांनी जलदगतीने सुरूवात केली. जराश्या दिरंगाईने ही मोठी माणसे वरून दबाव टाकून ही सगळी कारवाई रोखू शकतात याची त्यांना जाणीव होती.
सोपानरावांना बी.पी. चा त्रास होताच, पण या सगळ्या अपमानास्पद गोष्टींमुळे त्यांना अजून त्रास जाणवू लागला. अचानक घडलेल्या घटनांच्या दबावामुळे व नंतरच्या होणार्‍या परिणामांच्या विचारांनी त्यांचे बी.पी. अचानक एकदम वाढले. चौकीतच ते सगळ्यांसमोर चक्कर येऊन खुर्चीतून खाली पडले. त्यांना तातडीने इस्पितळात हलविण्यात आले. मेंदूतील अतिरीक्त रक्तस्त्रावाने ते एकदम कोमात गेले व त्यांना आ. सी. यू. मध्ये हलविण्यात आले. निष्णात डॉक्टरांची एक वेगळी टीम त्यांना बरे करण्यासाठी दिवसरात्र झटत होती. अखेर, चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना कोमातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. सोपानरावांनी डोळे उघडले तेव्हा, त्यांच्यासमोर त्यांची बायको, मुलगा व मुलगी उभे होते. त्यांना कोम्यातून बाहेर आलेले पाहून त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद लपत नव्हता. आपल्या जवळच्या लोकांना पाहून सोपानरावांनादेखील बरे वाटले. औषधोपचारांनी हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. पोलिसदेखील त्यांच्या नाजूक तब्येतीमुळे त्यांच्यावर चौकशीचा दबाव टाकत नव्हते. सोपानरावांना एका स्वतंत्र खोलीत व बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांना टीव्ही पाहण्यास वा पेपर वाचण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. डॉक्टरांनी त्यांना धक्का बसेल अशी कोणतीही गोष्ट वा बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचू नये अशी सक्त ताकीद त्यांच्या कुटुंबियांना दिली होती. त्यामुळे त्यांचे कुटुंबीयदेखील त्यांना सतत आनंदी ठेवायचा, हसवण्याचा प्रयत्न करायचे.
सोपानरावांनादेखील हळूहळू ते जसे बरे होत होते तसे त्यांनी केलेल्या चुकीची कल्पना येत होती. घरातले कोणीही या विषयावर त्यांच्याशी बोलत नव्हते तरी आजूबाजूच्या लोकांच्या टोमण्यांचा त्यांना अंदाज येत होता. लोकांच्या नजरा त्यांना टोचत असत. यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल याचाच ते बेडवर पडल्या पडल्या सतत विचार करत. त्यात एक समाधानाची बाब म्हणजे, साहेबांना जामीन मिळाल्याची बातमी त्यांना कळली होती. म्हणजे आपल्याला पण जेलमध्ये न जाता घरातून सगळी सूत्रे हलवता येतील. एकीकडे साहेबांच्या मदतीने आपण यातून नक्की बाहेर पडू अशी त्यांना खात्री वाटत होती पण दुसरीकडे इस्पितळात आपल्याला भेटायला साहेब आले नाहीत हे त्यांना राहून राहून खटकत होते.
दहा दिवसांनंतर त्यांना अखेर घरी जाण्याची परवानगी मिळाली. मुलाने त्यांना घालण्यासाठी नवीन शर्ट- पॅंन्टची जोडी आणली होती. कित्येक दिवसानंतर आज त्यांनी गुळगुळीत दाढी केली होती. आज ते प्रसन्न वाटत होते व लवकरात लवकर ते घरी जाण्यास उत्सुक होते. या इस्पितळातील वातावरणाचा त्यांना कंटाळा आला होता. त्यांनी त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ते यमाच्या दारातून सुखरूप परतले होते व आजचा दिवस पाहू शकत होते. समाधानाने व्हीलचेयर मध्ये बसून लिफ्टने तळमजल्यावर बाहेर आल्यावर नर्सने त्यांच्या मुलाला शेवटच्या पेमेंटसाठी व काही कागदपत्रांवर सही करण्यासाठी बिलींग विभागात जायला सांगितले. नाखुषीनेच मुलगा त्यांना घेऊन त्या विभागात गेला. तेथे त्यांना त्या व्हीलचेयरचे डीपॉझीट म्हणून व डॉक्टरांनी दिलेल्या नवीन औषधांचे असे साडेचार हजार रूपये भरायला सांगण्यात आले. मुलाने काऊंटर पलिकडे बसलेल्या माणसाला देण्यासाठी म्हणून पाकीटातून नोटा काढल्या तेव्हा त्या गुलाबी नोटा पाहून सोपानरावांना आश्चर्य वाटले. जेव्हा कुतूहलाने त्यांनी मुलाकडे त्या नोटांची चौकशी केली तेव्हा मुलाने त्यांना पंतप्रधानांनी 8 नोव्हेंबरच्या रात्री केलेल्या चलनबंदीच्या घोषणेबद्दल, चलनातून बाद केलेल्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटांबद्दल आणि चलनात आणलेल्या दोन हजाराच्या नवीन नोटांबद्दल सविस्तरपणे सांगितले. त्याने मोठ्या प्रयत्नाने बॅंकेतून मिळालेली दोन हजारांची नोट कौतुकाने त्यांना दाखविली. तर ते वेड्यासारखे त्या नोटेकडे, ती उलटसुलट करून पहात होते. अचानक त्यांना नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांकडून जमा करून घराच्या माळ्यावरील बॅगेत लपवून ठेवलेले दोन कोटी रूपये आठवले. त्यातील अर्धी रक्कम त्यांना साहेबांना द्यायची होती. पण आता त्या नोटांची किंमत रद्दीतील पेपराइतकीदेखील उरली नव्हती. अचानक त्यांच्या डोळ्यासमोर, साहेबांचा उग्र चेहरा फेरे धरून नाचू लागला. एवढी मोठी रक्कम आपण आता आपण कशी उभी करणार याचे त्यांना अचानक दडपण आले आणि त्यांच्या चेहर्‍यावरचे प्रसन्न भाव अचानकपणे लुप्त होऊन त्याऐवजी त्यांच्या चेहरा पिळवटला. त्यांच्या छातीत जोराची कळ आली व जोरात मुलाला हाक मारून ते खुर्चीत कोसळले ते कायमचेच.........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

@ सस्मित , VB , ऋतु_निक, कऊ & नानाकळा :- कथा लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.