आहे ना?

Submitted by नानुभाऊ on 5 November, 2017 - 23:20

आहे ना?

जाणवते जे मला, तुलाही कळते आहे ना?
दुःख आपले फारच मिळते-जुळते आहे ना?

तुझा मोकळा षड्ज ऐकुनी मी सांगू शकतो..
तुझ्या आतही एक व्यथा घुटमळते आहे ना?

आठवणींचा पाउस पडतो बाराही महिने
तुझ्या मनाचे हळवे छप्पर गळते आहे ना?

माझ्याशिवाय जगणे इतके सोपे नाही हे
कळले तर होतेच तुला, पण वळते आहे ना?

भेट टाळली, पण भेटीची ओढ कशी टाळू?
हेच तुलाही छळत असावे.. छळते आहे ना?

व्यक्त व्हायला मला गझलचे माध्यम सापडले
तुला व्यक्त होण्याची संधी मिळते आहे ना?

- केतन पटवर्धन

Group content visibility: 
Use group defaults