मी माझे माझ्यामधले अंतर वाढवले

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 October, 2017 - 15:44

मुक्कामी पोचला तरी नाहीच कळवले
आयुष्याला खिंड म्हणत ज्याच्यास्तव लढले

तो इतक्या निगुतीने खोटे बोलत होता
मीही मग ते खरे वाटल्याचे भासवले

मनातले सगळे तर मी मांडले सविस्तर
पत्र चुकीच्या पत्त्यावरती पण पाठवले

त्याच्या-माझ्यामधले अंतर मिटले नाही
मी माझे माझ्यामधले अंतर वाढवले

हरेक दगडाला येताना सांगत आले
माझे घर काचेचे आहे ... मीच बनवले

वेडी झाले ठार ...ठार वेडी झाले मी
राधा मीरा सगळ्या सगळ्यांना लाजवले

एक भिकारिण देवळात बसलेली दिसली
मरणयाचना करतानाची मी आठवले

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users