‘माथेरान’ व्हाया ‘आलेक्झांडर’ आणि ‘रामबाग’

Submitted by योगेश आहिरराव on 18 October, 2017 - 00:43

‘माथेरान’ व्हाया ‘आलेक्झांडर’ आणि ‘रामबाग’

b1.JPG
मागे एकदा रामबाग पॉईंटवर असताना, डावीकडच्या निमुळत्या आणि तीव्र उताराच्या डोंगरधारेने काही माणसं उतरताना दिसली. नीट निरीक्षण केल्यावर सहाजिकच चौकशीअंती असे कळाले की आलेक्झांडर पॉईंटहून खालच्या दुर्गम वाडीतली ही गावकरी माणसं कामानिमित्त माथेरानला ये जा करतात. रामबाग पॉईंटची वाट माहित होतीच त्याला जोडून हि वाट करायचीच हे मनोमन ठरवून टाकले सुध्दा. आधी "धोदाणी"मार्गे मंकी पॉईंट ते पेब किल्ला हा ट्रेक २०१२ साली केला होताच, तसे माथेरानला प्रचलित मार्गाने बर्याच वेळा गेलो पण त्याहीपेक्षा पहिल्यांदा २००२ साली भर पावसात केलेला पेब माथेरान ट्रेक नंतर अशा वेगळ्या कातकरी-ठाकरं-धनगर, गुराखी क्वचित आमच्या सारख्या डोंगरवेड्यांना खुणावणार्या या वाटांनी पार मोहात पाडलं. यंदाचा पावसाचा जोर काही कमी होत नव्हता, अनंत चतुर्दशी नंतरच्या दुसर्या शनिवारी हा बेत पक्का केला. मित्रवर्य ‘जितेंद्र खरे’ निसर्गात रमणारा अवलिया माणुस त्यात अशा काही आडवाटा असतील तर हमखास एका पायावर तयार फक्त कधी निघायचे ऐवढेच सांगायचे. आदल्या आठवड्यात डेंग्यूने फणफणून सुध्दा हे सह्याद्री रसिक कोणतेही आढेवेढे न घेता तयार झाले. त्यात सायंकाळी ऐनवेळी बदलापुरस्थित ‘सुनिल चव्हाण’ आमच्यात सामील झाला. खऱ सांगू तर अशी स्वत:हून निसर्गप्रेमापोटी विचारणा करणारे मित्र असले तर नकार कसा देणार ? शनिवारी सकाळी सर्व तयारीनिशी मी आणि जितेंद्र, सुनिलच्या घरी बाईक ठेवून पुढे त्याच्या चारचाकीने कर्जतच्या दिशेने निघालो रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली कसंबसं कर्जतहून बोरगाव फाट्याला वळालो. वावराळे कडे न जाता सरळ बोरगाव गाठले. मोरबे धरणाचा फुगवटा पार रस्त्याला छेदत होता, त्यापल्याड माथेरानचा माथा ढगात हरवलेला. जलाशयाच्या काठाने वळणावळणाचा रस्ता पार करून पोखरवाडी अलीकडे गाडी उभी केली. दुरवर धरणाची भिंत समोर जलाशयाचा फुगवटा, पल्याड माणिकगड, जवळचा इरशाळ आणि प्रबळगडाची काळ्या बुरूजाकडची सोंड सहज ओळखता आली. पोखरवाडीतून माथेरानकडून येणारा मोठा ओढा, लोखंडी पुलावरून ओलांडून वाट चढणीला लागली. आकाशात तुरळक ढग त्यामुळे उनाचे चटके जाणवू लागले त्यात भर म्हणजे वारा गायब परिणाम पहिल्याच चढाईला धाप आणि घामाच्या धारा. हळूहळू जात बर्यापैकी उंची गाठली उजवीकडे दरीत मोठा ओढा तर पलिकडच्या बाजूला अशाच समपातळीवर सोंडईवाडी आणि चांगेवाडी अश्या छोट्या वाड्यावस्त्या. त्यामागे सोंडई किल्ला त्याला जोडलेली डोंगररांग थेट गारबेट पर्यंत. अर्ध्या पाऊण तासात बुरूजवाडीत पोहचलो. एका घरात विचारपुस मग आजुबाजूंच्या वाटांची उजळणी. बुरूजवाडीतली जिल्हा परिषदेची शाळा मस्त टुमदार. शनिवार असल्यामुळे अर्धा दिवस शाळा, मास्तर मुळचे कोल्हापूर हातकंगणलेकडचे. आमचा डोंगर भटकण्याचे भारी अप्रुप, खुद्द मास्तरांनी या भागातून गारबेट ते बेकरे पर्यंतच्या काही वाटा सांगितल्या आणि आणखी बर्याच काही अपरिचित गोष्टी. खऱच मानलं बुवा दुर कुठून कुठे नोकरीसाठी छोट्याश्या खेडोपाडीत रहाणे, आठवड्याला कर्जतला जाणे येणे. हे सुध्दा एका अर्थाने रिअल हिरो, यांच्याबद्दल गर्व आणि अभिमान वाटलाच पाहिजे. बुरूजवाडीतल्या शेतातल्या बांधावरून छोटासा शॉर्टकट मारून चढणीवरच्या मुख्य वाटेला लागलो, आता आमचे लक्ष्य होते दुर्गम असे 'खाटवण'. तसे पहाता खाटवण, दांडवाडी, निंबाचीवाडी, बुरूजवाडी, चांगेवाडी, सोंडईवाडी या सर्व या भागातल्या मुख्य दळणवळण वाहतुकीपासून लांब अश्या लहान दुर्गम छोटेसे पाडेच म्हणा हवं तर. यातील बहुतेक पाडे वाड्या हि धनगर व ठाकरांची वसतिस्थाने, सह्याद्रीतल्या जवळपासच्या भागात ठाकरांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अगदी लोणावळा खंडाळा पर्यंत यांच्यात रोटी बेटीचे व्यवहार होतात. डोंगरालगत सपाट जागेत थोडी फार शेती, गुरे पाळून माथेरानला दूध खवा विकणे हा या धनगरांचा मुख्य रोजगार तसेच हॉटेल किंवा बाजारपेठेत मोलमजुरी किंवा जंगली वनौषधी, रानमेवा इ. गोष्टींची विक्री. मुख्य सोयी सुविधांपासून दूर कर्जतहून सकाळची एसटी त्यात बोरगाव, पोखरवाडी आणि आंबेवाडी हिच काय ती मुख्य रस्त्यावरची गावं बाकी सारा मामला पायगाडीचा. याच भागात काही १९६० च्या दशकातले कोयना विस्थापित कुटुंब आता स्थायिक झाली आहेत, अजुनही आकल्पे, आडोशी, आहिर, झांजवड ते पार माळदेव पर्यंतच्या आठवणीत बोलताना रमुन जातात असो तर..
मस्त हिरव्यागार पठारावरची आस्ते कदम चढत जाणारी वाट एकदम सुखावह. माथेरानची रामबाग पॉईंटकडची भिंत डाव्या हाथाला तर उजवीकडे सोंडईपासून गारबेट पर्यंतची डोंगररांग आणि मध्ये दरीत दोन्ही पठारवरचे छोटछोटे ओढे नाले स्वत:ला झोकून देत होते, एकदम सुरेख माहौल. मधला छोटा झाडीतला चढाईचा टप्पा पार करून पुन्हा वाट पठारावर आली इथून समोरचा पेनॉरमा खासच जवळपास १८० अंशात रामबाग पॉईंट पासून समोर आमची चढाईची आलेकझांडर पॉईंटहून उतरलेली सोंड ते उजवीकडे गारबेट ते मागे सोंडईपर्यंतची रांग. हे द्र्श्य पहातच राहीलो, सोबतचा सुका खाऊ आणि फोटोग्राफी यात बराच वेळ घालवला तसेही कुठे पळण्याची घाई होती, हाच निसर्ग तर मुक्तपणे अनुभवायचा होता. ईथून पुढची वाट मस्त मळलेली, विजेच्या तारांची सोबत होतीच. मध्ये एका झापाजवळ भातशेतीची रोपं छान डोलत होती. झाडीभरली वाट बाहेर आली तर समोर मस्त मोठा ओढा तो पार करायला छोटा लोखंडी पूल. पूलाखालून ओढा दरीत झेपावत होता, ओढ्याला फारसा प्रवाह नव्हता सुरक्षित जागा पाहून डुबकी मारलीच. घामटलेल्या शरीराला ओढ्यातल्या गार पाण्याने छान तरतरी आली. पुढे साधारणपणे आणखी अर्धा तास त्या निसर्गरम्य हिरव्यागार पठारावरची वाट तुडवत दुर्गम अश्या खाटवण मध्ये पोहचलो. गावात वाटेची चौकशी करताना बरीच चिल्ली पिल्ली जमा झाली. गावकरींचा कष्टदायक दिनक्रम त्यात सोयी सुविधांची वानवा, काही ने आण अथवा कुणाला औषधपाणी जरी करायचे असले तरी रोजचे मैलौमैल चालणे. पण निसर्गाच्या बाबतीत जरा कुठे कमी नाहीच. माथेरानच्या आलेक्झांडर पासून तर गारबेट पर्यंतच्या पहाडाने गावाला अगदी कवेत घेतले आहे, तिन्ही बाजूला डोंगर आणि बाजूला ओढा. २०-२५ उंबराच्या या गावातून मागच्या बाजूने सरळसोट सोंडेची चढाई थेट आलेक्झांडर पॉईंट वर घेऊन जाते. कामानिमित्त य् जा करत गावातली मंडळी पाऊण तासातच पॉईंट गाठतात. त्यांच्याकडून वाट समजवुन घेत निघालो. एव्हाना आकाशात काळे ढग जमु लागले होते. घड्याळात पाहिले तर सव्वाबारा झाले होते. याचा अर्थ बुरूजवाडी ते खाटवण आम्ही चक्क दोन तास लावले काय करणार, वाटेवरती या दिवसांत निसर्गाने जी काही किमया केली आहे त्यापुढे हे दोन तास ही कमीच. झाडीभरल्या सोंडेवरची चढाई सुरू झाली, थेट छातीवरचा चढ पहिल्या गिअर मध्ये हळूहळू चांगलीच लय सापडली. थोडे वर जाताच अचानक एक मावशी डोक्यावर सामानाचे पातेले घेऊन सामोर्या आल्या. अशावेळी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न, "मावशी अजुन किती वेळ?" मावशी: " इकडं तिकडं कुठे रानात जाऊ नका, सरळ वाट हाय ती सोडू नका तासाच्या आत जाल" जसे वर जात होतो तसे खाली छोटे खाटवण पलीकडे गारबेट पॉईंट तिथे असणारा गारबेट धनगरपाडा आणि मध्ये दरीत झेपावणारे कैक धबधबे. मध्ये एका ठिकाणी दम घेत थांबलो इथुन पुढची वाट अधिक निमुळती आणि तीव्र चढणीची. माथ्यालगतचे अरूंद नाकड्यावरचे कातळटप्पे नजरेत आले. थोडीफार चकदेवच्या शिडीडाक सारखीच. दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये अरूंद पायवाट पुढे व्यवस्थित होल्ड असलेले छोटे कातळटप्पे खऱच चढाईची मजा अनुभवतो तोच झोडप्या पावसाला सुरूवात झाली. काही मिनिटांतच मागे गारबेट पठारावरचे छोटे शुभ्र धबधब्यांचे आकारमान आणि प्रवाह वाढून मातकट रंगाचे दिसू लागले. आमच्या वाटेवर ही वरून पाण्याचे लोट वाहू लागले, अलीकडचा रामबाग पॉईंटची बाजू पुर्ण धुक्यात लपेटली गेली. वाटेत सुरक्षित ठिकाणी तसेच थांबलो काही वेळातच पावसाचा जोर ओसरला. पुढचा कातळटप्पा पार करून आडवी मारल्यावर पलीकडच्या नाकडावर अरूंद पायर्या, साधारण ३५-४० दगडी चिरा वापरून पायरांमुळे हा टप्पा सोपा झाला आहे. त्यानंतरचा शेवटचा टप्पा पार करतो तर समोरच आलेक्झांडर पॉईंटचे रेलिंग आले. तुरळक परप्रांतीय पिकनिकवाली मंडळी, समोरच स्थानिक तरूणाने चहाचा स्टॉल लावला होता. आम्हाला आवाज दिला, तसेही झोडप्या पावसाने काही मिनिटांतच पार ओलेचिंब केले आणि चढाईचे सेलिब्रेशन ही हवेच होते. स्पेशअल चहाची ऑर्डर दिली. चहावाला तरूण माथेरानचा. तो सांगत होता, " कर्जत बोरगाव बुरूजवाडी ते खाटवण रस्त्याचा सर्वे झालाय, रस्ता होणार मग या अवघड टप्प्यावर शिडी आणि दोरी लावणार. तुम्ही भारीच इकडून वर येऊन टोल वाचिवला." हे ऐकून काय बोलावे ? आलेक्झांडरहून डावीकडे वळून रामबाग पॉईंटकडे निघालो.
IMG_6415.JPG
माथेरानची मोठ्या वृक्षराजीतली तांबड्या मातीतली ही मोहमय चाल या दिवसात तर खासच. रामबाग पॉईंटला पोहचेस्तोर पावणेदोन वाजले. एका स्टॉल कम घराच्या पडवीत मालकाच्या परवानगीने सोबत घरातून आणलेला जेवणाचा डबा खायला सुरूवात करतो तोच अचानक कुठून तरी माकडांनी हल्ला बोल केला. पण क्षणात घरातल्या भूभू ने आणि छोट्या ताईने बेचकीतून दगड हाणून त्यांना पिटाळून लावले. त्यांना तर हा रोजचा त्रास ! माथेरानला माकडांचा उपद्रव तर सर्वश्रुत आहेच पण काही वहिवाटेतल्या किल्ल्यांवरही याचे प्रमाण वाढलय. याला कारण बिनडोक लोकांनी या प्राण्यांना आपल्याकडचे खाऊ घालण्याची घाणेरडी सवय, त्यामुळे सहाजिकच अशा गोष्टींची सवय आणि चटक लागते. मग वेळेप्रसंगी ते आक्रमक होऊन हल्ला करायला ही मागे पुढे पहात नाही. जेवण झाल्यावर अल्प विश्रांती नंतर गारेगार लिंबु सरबत घेऊन निघालो. रामबाग पॉईंटहून गावकरीचीं कायम ये जा सुरू असते, अगदी गुरं ढोरांपासून ते अबालवृध्दांना सोयीची ही प्रशस्त वाट त्यात खालच्या निंबाची वाडी, दांड वाडी, बुरूजवाडी ते पार आंबेवाडी पर्यंत. रेलिंगच्या बाजूने उतरायला सुरूवात केली, उत्तम दगडी फरसबंदीची वाट एकदम तिरक्या रेषेत सौम्य उतरण. वाटेत चांगला धबधबा लागला पण दुपारनंतर पाऊस नसल्यामुळे पाणी कमीच. मागे डाव्या हाथाला आम्ही आलो ती आलेक्झांडर पॉईंटची सोंड खाली सरळ रेषेत खाटवण आणि दरी पल्याड थेट गारबेटकडची बाजू. एक वळण घेत काही अंतर तसेच उतरत वाट पदरातल्या जंगलात शिरली. काही ठिकाणी तर पुरूषभर उंचीपेक्षा ही मोठा झाडोरा, वाट आता लिटल चौक पॉईंटच्या बरोब्बर खालच्या रेषेत समांतर उतरत होती. पदरातून बाहेर येताच खाली चौकीवजा थांबा तिथेच शांतपणे बराच वेळ बसलो. इथुन खाली पाहिले तर आमचा सकाळची बुरूजवाडी ते खाटवण ही पठारावरची पायवाट तसेच खालच्या छोटछोटे पाडे आणि वाड्या. पुढचे टेपाड उतरून खालच्या पठारावर आलो, इथुन दोन तीन वाटा फुटल्या सर्व मळलेल्या आम्ही दिशेनुसार बुरूजवाडीकडे जाणारी पकडली. वाटेत मागून येणारे मामा भेटले त्यांनी सांगितले, "चला हिच वाट आहे" बाकीच्या वाटा ही खालीच उतरतात पण त्या निंबाचीवाडी, धनगरपाडा, दांडवाडी टेपाचीवाडी मग सरतेशेवटी बुरूजवाडीत बाहेर पडता येते. कुठलीही वाट पकडली तर खाली पोहचणार फक्त कमी जास्त अंतराचा आणि वेळेचा फरक पडणार. जसे खाली शेवटच्या टप्यात आलो तसा मावळत्या दिनकराचा उन सावलीचा सुंदर खेळ सुरू झाला. मोरबे धरण आणि पाठीमागे माथेरान त्यात पठारावरची हिरव्या रंगाची उधळण सारेच उठावदाऱ. रामबाग पॉईट सोडल्यापासून दांडवाडीत रमत गमत येईपर्यंत दोन तास लागले. पण याच दांडवाडीत एक म्हातारी समोर येऊन पैशाची मागणी करू लागली. नंतर स्वत:हून सांगू लागली, "पुण्याचे आलते ते पैशे देऊन गावातून नंबर घेऊन गेले." हे ऐकून चाट़च पडलो. कशापायी पैसे दिले असतील ? नक्की काय भानगड़ ? जाऊ दे चांगल्या दिवसाचा शेवट अशा डोक्याला मुंग्या येणार्या विषयाने मुळीच करायचा नव्हता, असो तर.. दांडवाडीतून शॉर्टकटने थेट मुख्य रस्त्यावर आलो. मध्ये वाटेत ओढ्यावर छानपैकी अंघोळ मग शरीराने आणि मनाने ताजेतवाने होत परतीच्या प्रवासाला लागलो. प्रचंड आनंददायी अनुभव देणारा माथेरानचा चांगला ट्रेक पोतडीत जमा झाला, तरी चर्चा होतीच ती आणखी काही काही वेगळ्या वाटा जोडायची.

फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2017/10/matheran-alexander-rambag.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त..

मस्तच.
पनवेल-धोधाणी-सनसेट पॅाइंट-रामबाग-बुरुजवाडी-पोखरवाडी-बोरगाव-कर्जत ट्रेक केला आहे.

धन्यवाद रोमा व हार्पेन....

Srd पनवेल-धोधाणी-सनसेट पॅाइंट-रामबाग-बुरुजवाडी-पोखरवाडी-बोरगाव-कर्जत ट्रेक केला आहे.>>> छान क्रोस रूट केलात.

चौक ते वनट्री ट्रेक धरण होण्याअगोदर गेलो आहे पण आता वाट आहे का? >> हो बोरवाडी मार्गे आम्बेवाडीतून वनट्री रूट आहेच की.

या रामबाग वाटेचं विशेष -

मे महिन्याचा सिझन सुरू झाला की बरेचसे घोडेवाले घोड्यांना खाली नेतच नाहीत. त्यांना लागणारे गवत या रामबाग वाटेने सकाळी वर आणले जाते. मुली बायका मोठमोठे गवताचे भारे घेऊन वरती चढून येतात.