आसवे गळती किती?

Submitted by निशिकांत on 16 October, 2017 - 02:12

दोन पुतळे, म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?
पंचधातू, संगमरमर आसवे गळती किती?

एक गांधी त्यात होते, सांगती दुसर्‍यास ते
आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?

भोवताली मद्य विक्री मासही विकते इथे
हेच का फळ मम तपाला? वेदना सलती किती?

देउळे, मशिदी उगा का भांडती हे ना कळे
पाठ माझे अंहिसेचे खिजउनी हसती किती?

संसदेमध्ये कशाला टांगली तसवीर हो?
भूल, थापा, घोषणांची भोवती चलती किती?

लागले अंबेडकरही दु:ख अपुले सांगण्या
खूप पुतळे गाव, शहरी, लोक ते बघती किती?

जाहलो मी अडथळा का? वर्दळीमध्ये असा
नाळ जुडलेली धुळीशी श्वास अडखळती किती?

व्यर्थ मी जन्मास आलो खूप लवकर वाटते
हार नोटांचे अताशा पाहतो मिळती किती

छेडले पुतळ्यास माझ्या दुर्जनांनी जर कधी
डोंब उसळे दंगलीचा, झोपड्या जळती किती?

का मला ठाऊक नाही? कोण वापरते मला
शांत बघतो, निर्बलांना धेंड कुरतडती किती?

चल जरासे विठ्ठलासम, वीट घे! राहू उभे
निर्विकारी शांत असता लोकही भजती किती?

हे बरे "निशिकांत" केले राखला छोटेपणा
स्वर्गवासी होउनीही यातना छळती किती?

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users