उद्यमितेची साथ

Submitted by चिवा on 13 October, 2017 - 20:09

2017-09-27-PHOTO-00000008.jpg

`व्यवसाय उभा करायचा होता पण जवळ पैसे नव्हते. एका स्नेह्यांना पत्र लिहिलं काही मार्ग सुचवा म्हणून. त्या स्नेह्यांनी, मुंडलेकाकांनी पत्राला उत्तर म्हणून दहा हजार रुपये पाठवले आणि निरोप पाठवला, दहा हजाराचे दहा लाख करून दाखवा. तेव्हा त्यांनी जी रक्कम दिली, तेवढ्यावर आम्ही व्यवसाय सुरु केला. मुंडलेकांकानी पाठवलेला निरोप खरा केला आणि तो ओलांडून आता बरेच पुढे आलो.’ उद्यमिता’ संस्थेच्या गौरी विचारे सांगत होत्या. उदयमिता ही संस्था पर्यावरणपूरक, देखण्या अशा पर्स, बटवे, फोर्ल्डर्स बनवते. या पर्सची डिझाइन्स वारली, जरीचे काठ वापरून केलेली असतात. या कामामुळे निम्न आर्थिक स्तरातल्या जवळजवळ चाळीस जणींना रोजगार मिळतो आहे. घरबसल्या कामही मिळतं आहे.

गौरी पुण्याची. नारायण पेठेत वाढलेली. तेवढ्याच जगाशी तीन दशकं ओळख. नोकरी-संसार-मुलं-बाऴं यापेक्षा वेगळं काहीतरी, कोणाच्यातरी उपयोगी पडेल असं काम करायला मिळायला हवं ही लहानपणापासून इच्छा होती. 2004 मध्ये नारायण पेठ सोडून थेट चित्रकूटला जाऊन पोहोचली आणि तिथेच जगण्याचं कारण सापडलं.

`पुण्यात नोकरी करत होते पण मला काहीतरी राहातय असं वाटायचं. नुसतं स्वतःपुरतं जगण्यात मजा येईना. माझा मित्र महेश खरे आणि चतुरंग’ संस्थेचे विद्याधर निमकर यांनी मग मला नानाजी देशमुखांशी गाठ घालण्यासाठी चित्रकूट’ला नेलं. त्या भेटीनं मला माझं calling काय आहे हे उमजलं.

नानाजी तेव्हा नन्ही दुनिया ही लहान मुलांची शाळा सुरु करण्यासाठी जमवाजमव करत होते. त्या शाळेसाठी प्रकल्पप्रमुख म्हणून काम कर असं नानाजींनी सुचवलं. मला काम तर आवडलं पण या नव्या आयुष्याशी, संपूर्ण नव्या जगाशी ओळखही आवडली.

चित्रकूट हे मध्य प्रदेश- उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांच्या सीमेवरचं गाव. भाषा, माणसं, कामाची पद्धत सगळंच निराळं. पण शिकण्याचीही मजा होती. शाळेचं काम सुरू होताना नानाजींसारख्या मोठ्या समाजसेवकाबरोबर काम करण्याचा अनुभव अजून मला उपयोगी पडतो.’

गौरीनं नन्ही दुनियासाठी एक वर्ष काम केलं. नंतर नानाजींनी तिचं लग्न लाऊन दिलं. विकास विचारे चित्रकूटला काम करायचे. दोघांची ओळख होती पण या दोघांचं लग्न लावून द्यावं ही कल्पना दिल्लीच्या कुमुदताईंची आणि नानाजींची.

लग्न झाल्यावर विकास आणि गौरी नकाशावर बोट ठेऊन जे गाव असेल तिथे – इतके फिरले. माजलगाव, गेवराई, आंबाजोगाई अशा छोड्या-मोठ्या गावात रहून कामं करत 2006 मध्ये औरंगाबादला आले.

2017-09-27-PHOTO-00000012.jpg

`विकास तिथे एका प्रकल्पासाठी काम करत होता. माझी मुलगी, जानकी लहान होती. तिला घेऊन मी वेगवेगळ्या प्रशिक्षण उपक्रमांना जात असे. विकास गावागावांमध्ये व्यवसायाभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबवायचा.’ बीडमध्ये अशा एका उपक्रमानंतर शिवणकाम शिकलेल्या काही बायका म्हणाल्या, ताई, आम्हाला हे काम तर आवडलय. पण आमचं आम्ही करू शकू असं अजून वाटत नाही. काही मदत करू शकाल का? मग त्यावर विचार करायला सुरुवात केली आणि छोटी मोठी कामं मिळालीही. एका हॉस्पिटलसाठी नवीन बाळांसाठी झबली टोपडी करून द्यायला लागलो. तिथेच एकीनं एक पर्स आणली, म्हणली की अशी पर्स करता येईल का आपल्याला? मग मी तशा पर्सचं डिझाइन करून, कटींग करून शिवून घेतली. माझ्या बायांना शिवायला तर उत्तम जमत होतं. हे काम पुढे नेता येईल असं वाटायला लागलं.

`मी आणि विकासनं ठरवलं की आता हेच काम पुढे न्यायचा प्रयत्न करायचा. हाती भांडवलं जमा झाल्यावर आम्ही औरंगाबादला वस्त्यांमधल्या बायकांशी बोलून, त्यांना शिवणकाम शिकवून, काम सुरू केलं. सुरुवातीला आम्ही तिथेच एका वस्तीत, एका दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर राहायचो, तिथे काम सुरू केलं. माझ्याकडे अगदी सुरुवातीला ज्या बायका आल्या त्या अजून आहेत साथीला. आता पस्तीस ते चाळीस बायका आहेत माझ्याकडे.

2017-09-27-PHOTO-00000031.jpg2017-09-27-PHOTO-00000030.jpg

मुळात असं काम सुरू करायचं तर कामाचं स्वरूप असं हवं होतं की जे काम या बायकांना घरी बसून करता येईल. आता मी त्यांना कटींग करून, डिझाइन समजावून देते. त्या सामान घेऊन जातात आणि त्यांच्या दिनक्रमानुसार वेळ काढून काम पूर्ण करून मला आणून देतात.’

उद्यमिते’च्या या पर्सेस, फोल्डर्सचं फिनिशिंग चकचकीत असतं. कुठे शिवण उसवलीय, दोरा लोंबतोय असं चित्र नसतं.

`हो, हो, ते आम्ही अगदी कटाक्षानं पाळलय. क्वालिटी कंट्रोलसाठी माझ्याकडे पाच-सहा बायका आहेत. त्या केवळ प्रत्येक वस्तू फिनिश्ड दिसते आहे ना, याची काळजी घेतात. त्यामुळेच तर दर्जा आणि नावही टिकून राहातं.’ गौरी सांगत होती.

`आम्ही देशभरात, देशाबाहेरही वस्तू पाठवतो. नुकतीच आम्ही लंडनची एक ऑर्डर पूर्ण केली. त्यांना महिन्याभरात पंचवीसशे पिशव्या हव्या होत्या. तेव्हा मात्र माझ्या बायकांनी मला इतकी साथ दिली. आम्ही सगळ्याजणी तेव्हा उठता बसता केवळ तेवढंच काम करत होतो. मजा म्हणजे या बायकांनी तेव्हा मेस लावली होती. जेवण करण्यात, भांडी विसळण्यात वेळ जाऊ नये म्हणून. त्यांनी हजार रुपयांचा डबा लावला आणि बारा-पंधरा हजार रुपये मिळवले एका महिन्यात.’

2017-09-27-PHOTO-00000019.jpg2017-09-27-PHOTO-00000020.jpg

या बायका आता आर्थिकदृष्या सक्षम आहेत. मुळात त्या सगळ्याचीच चणचण असलेल्या घरातल्या आहेत. हजार रुपये एकरकमी बघणं मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी.

`हेदेखील फार महत्वाचं वाटतं मला,’ गौरी म्हणाली, `आपल्या कष्टाचे पैसे मिळवण्यातून सगळं घर बदलतं. ज्या घरची बाई पैसे मिळवते, तिचा नवरा, मुलं तिला काम करताना बघतात, मुलांना क्लास लावायला, चार गोष्टी घ्यायला बायका स्वतःचे पैसे काढून देऊ शकतात, पोरांसाठी दूध, फळं आणू शकतात. शाळेत जाणारी मुलं बाहेर विनाकाम फिरत बसायची, ती आता आईला मदत करायला येतात. आपण शिकावं म्हणून आई खूप काम करतेय हे मुलं बघतात आणि त्यानं मुलांच्या वागण्यातही खूप फरक पडताना दिसतो. या वस्त्यांमध्ये बाईच्या कार्यमग्न राहण्यानं त्या घराचा चेहरामोहराच बदलून जाताना मी पाहिला आहे. घरात बोलताना वापरल्या जाणा-या शिव्या कमी होण्यापासून ते आपणही सतत कामात राहिलं पाहिजे, नवं काहीतरी शिकलं पाहिजे हे त्या घरातल्या प्रत्येकालाच वाटायला लागलेलं दिसतं.

ही लंडनची ऑर्डर पूर्ण केल्यावर आमच्या बायांना पैसे दिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी मी कधी विसरणार नाही. तीच माझी अजून अजून काम करण्याची ऊर्जा आहे.’

ही बाजू होती उत्पादनाची. बाजारपेठेचं सगळं काम बघतात विकास. महाराष्टातल्या जवळजवळ सगळ्या प्रदर्शनांत उद्यमितेचा स्टॉल असतो. पुण्यात पर्सिस्टंटसारख्या कंपन्यांमध्येही वर्षातून दोन-तीन वेळा उद्यमितेला स्टॉलसाठी जागा मिळते.

`टेबलावर-खाली-डावी-उजवीकडून कुठूनही पैसाही न देता, केवळ कामाच्या जोरावर आणि प्रामाणिकपणाच्या बळावर विकासनं माणसं जोडली आहेत. बाजारपेठेप्रमाणे कच्चा माल आणण्याची जबाबदारीही विकासची असते. तिथेही त्यानं माणसं जोडून ठेवली आहेत. आधी विकास मुंबईहून माल घेऊन यायचे आता ट्रकनं माल आणावा लागतो.

2017-09-27-PHOTO-00000044.jpg

नवरा बायको एका व्यवसायात असताना पाळायचे अलिखित नियम आम्ही काटेकोरपणानं पाळतो. त्यामुळे व्यवसायामुळे काही वाद होत नाहीत. एकमेकांना सूचना करायच्या तर त्या आम्ही इतरांसमोर करत नाही. निर्णयात ढवळाढवळ तर अजिबातच करत नाही. बाजारपेठ आणि कच्चा माल ही बाजू विकास अन् उत्पादन मी हे आम्ही सांभाळतोच.’

आता पुढच्या पाच वर्षात काही नवीन करायचा विचार आहे का या प्रश्नावर गौरीकडे भरपूर प्लॅन्स होते.

`हो, हो, आम्हाला आता कॉर्पोरेट क्षेत्रासाठी फोल्डर्स, पाऊचेस, इकोफ्रेडली फाइल्स असं मार्केट करण्याची इच्छा आहे. या वस्तूंचं उत्पादन आम्ही करतो आहोतच पण त्याचं स्वरुप जरा व्यापक करावं असा प्रयत्न असणार आहे. आम्ही व्यवसाय सुरु करताना आमच्याबरोबर काम करणा-या चार बायका होत्या. आता चाळीस झाल्या आहेत. मला तो आकडा शंभरावर गेलेला पाहायचा आहे.

माझ्या बायांपैकी दोघींनी स्कूटी घेतली आहे. एकीनं दोन वर्षात लाख-दोन-लाखांचं कर्ज फेडलं आहे. संधी मिळाली की करतात बायका काम. कष्टही करतात खूप. त्यानंच तर अजून काम करावसं वाटतं.’

औरंगाबादमध्ये एका छोट्या खोलीत काम सुरु केल्यानंतर आता दोन खोल्या, तीन खोल्या असं करत करत गौरी-विकासनं पाच खोल्यांचा फ्लॅट भाड्यानं घेतला आहे. पैकी एक खोली पाय ठेवता येऊ शकेल अशी असते बाकी खोल्या मात्र पर्सेसनं भरलेल्या असतात. एकदा माझ्या बायका यायला लागल्या की दिवसभर मग उसंत नसते.’ गौरी हसत सांगत होती.

गौरी आणि विकासच्या उद्यमिते’ला अजिबात उसंत न मिळो याच शुभेच्छा.

उद्यमिता - निम्न आर्थिक स्तरातील महिलांना रोजगार मिळवून देणारा उपक्रम

समाप्त.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ओळख. पर्सेस, बॅगा आणि शिवणकाम - बायकांच्या जिवाभाच्या तीन गोष्टींचा संगम इतका मस्त जुळून आलाय!

मुंबै मधे ग्राहक पेठेत किंवा इतर कुठे स्टॉल्स असतात का यांचे ?

मेधा, हो पार्ले आणि दादरच्या ग्राहकपेठेत असतो त्यांचा स्टॉल.
तुम्हाला त्यांच्या फेबु पेज वरही संपर्क साधता येईल.

देखणं सुबक काम! पुण्यात अन्यत्र कुठे मिळतात या पर्सेस? पर्सिस्टंटचा उल्लेख आहेच, अजूनही कुठे असतील तर जाणून घ्यायचंय.

पुण्यात असतात एक-दोन ठिकाणी. त्यांच्या फेबु पेजवर मेसेज ठेवलात तर पक्कं कळू शकेल. नाहीतर मी विचारून तुम्हाला कळवेन.

मी सोनदरा गुरुकुलमचा विद्यार्थी होतो तेव्हापासून ते औरंगबादमधील गौरी ताई व विकास दादा यांच काम पाहत आलेलो आहे... खरच खुप प्रेरणादायी काम आहे.. मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात गौरी ताईंच्या " उद्यमिते'" न आशेचा नवा किरण आला आहे.. त्यांच्या या सामाजिक कामाला खुप साञ्या शुभेच्छा

taai kunala usachya paachad pasun dish banvnyach trantra mahit aahe ka?
please maahitgarane sanga