तर गंमत अशी झाली ....

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 October, 2017 - 15:53

तर गंमत अशी झाली ....

आमच्या ऑफिसमध्ये एक प्रसाद नावाचा ईंजिनीअर आहे. साधारण वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झालेय. अगदी हेवा वाटावा अशी सासू त्याला मिळालीय. सासुरवाडी म्हणाल तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वरचेवर तिथे जी पंचपक्वान्न बनतात, वा खास जावईबापूंसाठी बनवली जातात, ती याला घरपोच दिली जातात. आणि हा ते दुसर्‍या दिवशी ऑफिसला आणतो. किंबहुना ऑफिसला नेतो म्हणून त्याहिशोबाने जास्तच दिली जातात. त्यामुळे आमचीही चंगळ होते. प्रसाद आणि त्याची सासू अशी जोडी ऑफिसमध्ये प्रसिद्धच आहे. पण त्यापेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे तो त्याच्या सासूने बनवलेला शिरा!

रवा, दूध, साखर, केळं, वेलची, मनुके ईत्यादींचे जे काही अप्रतिम आणि चविष्ठ मिश्रण तयार होते, आणि तोंडातल्या लाळेत ते असे काही विरघळते, की बस्स रे बस्स. ताटातली चिकन बिर्याणी बाजूला सारावी आणि त्याच्या शिर्‍याला जागा करून द्यावी ईतका भारी! आणि आम्हा सर्वांना पोटभर खाता यावा ईतका तो दिला जातो. बरेचदा मी गंमतीने म्हणतोही त्याला, "बायको मरो आणि सासू जगो, सत्यनारायणच पावलाय तुला Happy

असो, तर आज कॅन्टीनमध्ये लंच टाईम संपता संपता अचानक त्याने सरप्राईजिंगली पिशवीत हात घालून शिर्‍याचा डब्बा बाहेर काढला आणि टेबलवर एकच जल्लोष उडाला. जवळच आमचे सेक्शन मॅनेजर उभे होते. काहीतरी कामानिमित्त, बहुतेक एखादा पर्सनल फोन करायला तिथे आले असावे. त्यांनी सहजच आम्हाला दंग्याचे कारण विचारले. उत्तरादाखल आम्ही त्यांच्यासमोर शिर्‍याचा डब्बा धरला. त्यांनी मोठ्या भक्तीभावाने चमचाभर हातात घेत विचारले, "प्रसादाचा शिरा का?" ... मी तितक्याच उत्स्फुर्तपणे उत्तरलो, "प्रसादाचा नाही सर.., प्रसादचा शिरा" आणि सारे हसायला लागले.

त्यांनी तो शिरा तोंडात टाकला आणि तोंड वेडंवाकडे करत निघून गेले.. त्यावर "हायला हा शिरा खाउन कोणी तोंड असे करू शकते का???" मी अगदी आश्चर्याने बोललो, आणि काहीतरी मोठा विनोद झाल्यासारखे सारे उगाचच पुन्हा एकदा हसले.

सर्वांचे जेवण उरकले, मी माझ्या नेहमीच्या शिरस्त्यानुसार फेरफटका मारून आलो, कामाला लागलो. शिरा खाऊन पोट जड झाल्याने सर्वांच्याच डोळ्यावर हलकीशी पेंग येत होती, पण दुपारी तीन वाजता रिव्यू मिटींग असल्याने सारे येनकेन प्रकारे झोप ऊडवून लावायच्या प्रयत्नात होते. दोन पंचाव्वन झाले तसे वॉशरूम गर्दीने खचाखच भरले आणि धावतपळत, ओले हात एकमेकांच्या शर्टपॅंटला पुसत, दोन एकोणसाठलाच सारे मिटींगरूम मध्ये जमा झाले. आजच्या मिटींगला एचओडी सरांनीही हजेरी लावली होती. नेहमीचीच वळणे, मध्यांतर, चहापाणी वगैरे घेत मिटींग शेवटापर्यंत आली. पण संपता संपता सेक्शन मॅनेजर सरांनी पुन्हा उगाचच उकरून काढल्यासारखा मी मध्यंतरी एक प्रोजेक्टमध्ये घातलेला घोळ बाहेर काढला. तसे सर्वांनाच ते माहीत होते, एचओडी सरांनाही माहीत असावेच, पण तरीही उगाचच त्यांच्यासमोर "हाच तो ऋन्मेष, हाच तो घोळ घालणारा कामचुकार मनुष्य" अशी पुन्हा आरती ओवाळली गेलेली कोणाला आवडणार होती. मी मुकाटपणे ऐकून घेतले. परत परत आपल्यातर्फेही तेच उगाळण्यात अर्थ नव्हता. माझ्यावर तोंडसुख घ्यायचे समाधान मिळवल्यावर अगदी उठता उठता सरांनी मला सहज म्हटले, "आणि हो ऋन्मेष, ते ‘प्रसादचा शिरा’ नसते. प्रसादाचा शिरा हेच बरोबर आहे ! ....

घ्या! .. मी मनोमन कपाळावर हात मारला. यांनी माझ्या म्हणण्याचा असा अर्थ काढला होता. मी शक्य तितक्या विनम्रतेनेच म्हणालो, "अहो सर तो शिरा प्रसादने आणलेला. म्हणून मी त्याला प्रसादचा शिरा असे गंमतीन म्हणालो. ईट मीन्स प्रसाद’स शिरा. बाकी तुम्ही त्याला अगदी ‘प्रसादीचा शिरा’ म्हटले असते तरी मी लहान तोंडी मोठा घास घेत तुमचे व्याकरण कर्रेक्ट करायला गेलो नसतो.

बस्स, एवढा वेळ आमचे संभाषण ऐकत बसलेले, आणि आतापर्यंत काहीही अर्थबोध होत नसलेले एचओडी सरांनी मध्येच उडी घेतली.. "अगदी प्रसादीचा शिरा म्हटले असते तरी म्हणजे काय? नक्की काय गैर आहे यात? आमच्याकडे प्रसादीचा शिरा, प्रसादीचे केळे असेच म्हणतात.. काय व्याकरण चूक आहे यात?"

..... मी एक ढेकर दिली आणि शांतपणे लाईटचा स्विच बंद करत रूमबाहेर पडलो.

तर ही अशी गंमत झाली Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसादीचा शिरा खाऊन ढेकर दिली ही गंमत आहे का?
>>>>
हूहू ही सुद्धा एक गंमतच आहे की..

@ ढेकर दिला की ढेकर दिली... मी सुद्धा लिहिताना या संभ्रमातच होतो. पण हे वाक्य टाळताही येत नव्हते. कारण ढेकर तर या घटनेतील पंचलाईन होती. शेवटी मग आतला आवाज ऐकला आणि ढेकर दिली

काय गंमत आहे ह्यात Uhoh
Submitted by अंकु on 12 October, 2017 - 13:34

>>>>

छोटीशीच गंमत आहे. सरांनी म्ह्टले प्रसादाचा शिरा आहे का तर तो शिरा प्रसादने आणला असल्याने मी प्रसादाचा शिरा ऐवजी प्रसादचा शिरा असे गंमतीने म्हटले. सरांना वाटले मी त्यांची व्याकरणातील चूक काढतोय. सरच ते. भडकले आणि तेव्हा काही न बोलता मिटींग मध्ये माझी तासली.

बरं जेव्हा त्यांचा गैरसमज दूर करायला मी प्रसादीचा शिरा असा कुत्सितपणे उल्लेख केला तेव्हा एचओडी सरांच्या गावी नेमका तोच वापरातला शब्द निघाला. आणि मी आगीतून फुफाट्यात पडलो..

छोटीशीच गंमत आहे, प्रत्यक्षात घडल्यामुळे आणि मी स्वत: अनुभवल्याने मला भारी वाटले ईतकेच Happy

दिला असतास तरी चालला असता
>>>>
म्हणजे ढेकर दिला किंवा ढेकर दिली असे दोन्ही चालते का?
किंवा पुरुषाने ढेकर दिला आणि स्त्रीने ढेकर दिली असे असते का?
ढेकराला स्वत:चे लिंग नसते का?

ढेकर सोडला... ऐकावे ते नवलच. मला वाटते शरीरातून बाहेर पडणारा वायू किंवा ध्वनी हा गुरुत्वाकर्षणाच्या कुठल्या दिशेने प्रवास करतोय त्यावर सोडला की दिला हे ठरत असावे.

मी एक ढेकर दिली आणि शांतपणे लाईटचा स्विच बंद करत रूमबाहेर पडलो.

हे काय कळले नाही,इतके लोक मधे चिंतन करत असताना ढेकर देवुन डायरेक्ट लाईट बंद करुन बाहेर पडलात म्हणजे कमालच आहे. काय डायरेक्टर वगैरे की काय कंपनीचे ??????

बॉन्ड, चिंतन कम मीटींग संपली होती.

च्रप्स, आयटी कंपनी नाही. मेकेनिकल, पायपिंग, सिविल, ईलेक्ट्रीकल, आर्चिटेक्ट अश्या प्रत्येक सेक्शनला एक सेक्शन मॅनेजर आहे. आणि या सर्व सेक्शनचे मिळून जे टेक्निकल डिपार्टमेंट तयार होते त्याचा हेड म्हणजे एचओडी, हेड ऑफ टेक्निकल डिपार्टमेंट, ईंडिया.

म्हणजे ऋन्मेष ऐटीत असतो, आयटीत नाही.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 14 October, 2017 - 11:40
वा मानवजी काय सिक्सर हाणलायं.

चांगलीच गंमत झाली राव तुमची..
साहेबांच्या पुढे नंदीबैलासारखी मान हलवनेच योग्य. आपन त्यांना त्यांची एखादी चुक कितीही नम्रपणे सांगितली तरी त्यांना तो घोर अपमान वाटतो आणि मग अशा गमती-जमती होत असतात.

वैभव धन्यवाद
चला एकाला तरी यात गंमत वाटली.
अन्यथा मी कालपासून विचार करत होतो, मलाच काय उगाच यात गंमत वाटली जे जे गंमत अशी झाली शीर्षक दिले आहे Happy

धन्यवाद राहुल.
आपला प्रतिसाद मला आयुष्यात आणखी एखादी गंमत लिहायचे बळ देईल Happy

मला पण गंमत वाटली हो ऋन्मेशभौ..
तुमची गप्पा मारल्यासारखं लिहिण्याची हातोटी वाखाणण्यासारखी आहे..
(नीट लक्षात घ्या, वाखाणण्या सारखी म्हटलंय, मी मराठी माणूस आहे त्यामुळे एवढीच स्तुती करू शकतो.)

धन्यवाद, आणि अगदी बरोबर. मी लिहितानाही स्वत:शी गप्पा मारतच लिहित असतो. बरेचदा लिखान संपवून बेडरूम बाहेर आल्यावर आई विचारतेही, "काय रे रुनम्या, कोण होतं आत? Happy