मी, अनन्या नी .....दंगल भाग 2

Submitted by विनार्च on 9 October, 2017 - 09:40

https://www.maayboli.com/node/64166 भाग 1

फाईट म्हणजे एक पर्व असत... फाईट डीक्लेयर झाली कि मुलांची वजनं तपासा मग वेट गृप पहा ... बोर्डर लाईनला असली मुलं तर त्यांना आधीच्या वेट गृपमध्ये आणायचा प्रयत्न करा...पण उपासमार बिलकूल नाही... अटलिस्ट वजन वाढणार नाही याकडे लक्ष ठेवा. आम्ही कायमच वजनामुळे आमच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या मुलीच्या समोर येतो.

मग सुरु होते फाईटची प्रॅक्टिस जी इतर वेळी ही होत असते पण ह्या काळात विशेष भर दिला जातो. अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस फाईट कुणासोबत ही होते... यात मुलगा, मुलगी, बेल्ट, वय, वजन, उंची हे भेदभाव पाळले जात नाहीत... त्यामुळे एखादा जुनिअर आपल्या सिनिअर ला एखादी परफेक्ट किक मारण्यात यशस्वी होतो तेंव्हा त्याचा अविर्भाव ‘एकच मारा पर क्या सॉलिड मारा ना’ असतो 

मग उजाडतो फाईटचा दिवस... रिपोर्टिंग टाईम अर्ली मॉर्निंग असतो.मुलांना अगदी कमी खायला देवून घेवून जायचं कारण आपण जरी घरी वजन केल असल तरी त्यांच्या काट्याचा भरोसा नसतो . भारतात खेळाच्या बाबतीत किती उदासीनता आहे हे ह्या दिवशी प्रकर्षाने जाणवते ... टोटल मिस मॅनेजमेंट...
वजन झाल की खावून आपल्या फाईट ची वाट बघत बसून रहायचं... खरतर आयोजक वेट गृपनुसार साधारण किती वाजता फाईट सुरु होईल हे सांगू शकतात... नीट क्रमाने फाईट ठेवू शकतात पण यातलं काहीही होत नाही... सकाळपासून नुसत बसून रहायचं , कधी कधी संध्याकाळी शेवटी नंबर लागतो ...तोवर मुलंही कंटाळलेली असतात ,मध्ये कुठे जावूही शकत नाही कारण फाईट कधी सुरु होईल हे माहित नसत आणि एकदा आपला नंबर लागला नी आपण जिंकलो की पुढच्या फाईटसाठी मध्ये १० मिनिटांचाही वेळ मिळत नाही... फायनलला पोहचेपर्यंत पोरांचा पार दम निघालेला असतो... बिचाऱ्यांना आधीच्या फाईट मधून रिकव्हर व्हायला पुरेसा वेळही मिळत नाही ,याचं खूप वाईट वाटत ... तरी जमेल तसा ,जमेल तिथे निषेध नोंदवत असतो आम्ही ... होप लवकरच सुधारणा होतील.

जर मुंबईमध्ये फाईट असेल तर आमचा दिवस पहाटे सुरु होतो...मुंबई बाहेर असेल तर आदल्या दिवशी ...पिकनिक सारखी तयारी असते फक्त मन धास्तावलेलं असत... 'पोर सुखरूप परत येवू दे' हा घोष सुरु असतो मनात पण चेहऱ्यावर ऑल वेल ...
नाश्त्याचा डबा,जेवणाचा डबा,स्नॅक्स,ग्लुकोनडीच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या ,लेकीचा युनिफोर्म (हा घालून नेत नाही तिला, नाहीतर वाढलेच दोन किलो ) , तिचे गार्डस इतक सगळ घेवून घरातून निघावं लागत. हे मस्ट असत कारण बर्याचदा अशा ठिकाणी फाईट असतात की आसपास हॉटेल सोडा दुकानंही नसतात. ह्या दिवशी बाबाही सोबत येतो ... सोडतो नी जातो आणि अंदाजे फाईटच्या वेळेला परत येतो किंवा पूर्ण दिवस ही थांबतो ... जसं जमेल तसं पण इतकं नक्की असत की अनन्या रिंगमध्ये असताना, बाबा बाहेर असतोच असतो.

अनन्या रिंगमध्ये वेगळीच असते... खरतर तिच्या सारखी मुलगी ह्या खेळात टिकली याचंच आश्चर्य वाटत रहात ... लेक माझी प्रचंड नाजूक आहे ...तिच्या गालाला लाडात हळुवार जरी पकडल तरी लालेलाल होतात , नाक चिमटीत पकडलं मस्करीत अलगद तरी काळा डाग उमटतो(यावरून मी आईच्या किती तरी शिव्या खाल्या आहेत... जेंव्हा पहिल्यांदा असं झाल तेंव्हा मी जीव तोडून सांगत होते की मी हलकच पकडलं होत नाक पण कुणी विश्वास ठेवला नव्हता मग नंतर स्वानुभवाने खात्री पटली ), उन्हात गेली की तिचा रंग बदलतो, लालेलाल ... टोमॅटो म्हणतात तिला तिच्या वर्गातले तर अशी मुलगी रिंगमध्ये उतरते नी ते ही बऱ्याचदा स्वत:पेक्षा फुटभर तरी उंच व वयाने मोठ्या मुली विरुद्ध ... नॉर्मली मुलांना जेंव्हा अंदाज येतो आपण ही फाईट हरणार तेंव्हा ती उगीच मार खात थांबत नाहीत क़्विट करतात पण ही कधीच म्हणजे कधीच फाईट अर्धवट सोडत नाही ... बाहेरून आम्ही कितीही बोंबलू दे ... 

न्या रिंगमध्ये नी मी गॅसवर ... तीन मिनिटांचे दोन किंवा तीन राऊंड मोस्टली दोनच ...ह्या ६ मिनिटात माझं जे होत ते शब्दात सांगूच शकत नाही .तिच्याकडे येणारी प्रत्येक किक काळजाचं पाणी करून जाते. इतरवेळी कधीच देवाच नाव न घेणारी मी ,त्या ६ मिनिटात इतक्या वेळा त्याला आळवते  ...रिंगच्या आत मी नाही करू शकत तिला सोबत, तू उभा रहा तिच्या मागे... "देवा, माझी लेक येऊ दे सही सलामत बाहेर ...बास ... मला नको कोणत मेडल... फक्त तिला सुखरूप ठेव" नी तोंडाने ओरडत असते ...दे अनन्या ... येस्स यु आर डुइंग गुड ... मार पुश किक... टाक तिला रिंगच्या बाहेर. 
हे दोन्ही एकाच वेळी जमवण महाभयंकर 

एकदा एका फाईटमध्ये अनन्याच्या तोंडावर जबरदस्त किक बसली  ...तोंडातून रक्तच रक्त ...तरी पोरगी तोंड पुसून परत उभी राहिली ,मी फक्त नाही म्हणतच राहिले...इतकी चिडले की रिंगच्या बाहेर आल्याबरोबर न्याला घेवून तडक घरी निघाले  ...निघतानाच म्हणाले ,’बास झालं तुझं तायक्वांदो ,हा शेवटचा चढला युनिफॉर्म अंगावर ... पूर्णवेळ न्या शांत होती नी मी पॅनिक ...डॉक्टर कडे नेल ...दात ओठात घुसला होता ,नाक फुटलं होत ... डोळ्याच्या आसपास काळनिळ झाल होत... तपासून घेतल ... मार लागला होता पण सिरीयस काही नव्हत ...पण माझ्यासाठी, ते सिरीयसच होत... माझा निर्णय झाला होता.
दुसऱ्याच दिवशी न्या युनिफोर्म घालून तयार , मी म्हटल “हे काय आहे ?”
न्या म्हणाली “शाळेत पडते तेंव्हा लागतच ना ? म्हणून शाळेत जायचं सोडलंय का मी ? डिफेन्स करताना अंदाज नाही आला म्हणून इतकं लागल ... अजून प्रॅक्टिस करायला हवी” नी बापाचा हात धरून निघून ही गेली. मी एकदम ,"क्या से क्या हो गया" स्टेट मध्ये ... त्या सगळ्या पिरीयडमध्ये तिने एक पेनकिलर घेतली नाही... माझ्यासाठी हे सगळ खूप जास्त होत. त्याच वर्षी मी तिला बॅडमिंटनकडे वळवायचे जोरदार प्रयत्न केले. एक दिवस आड त्याच कोचिंग असायचं तर पठ्ठी ते ही करू लागली नी हे ही ... मी म्हटल करू दे किती करतेय ते ... खूप जास्त मेहनत झाली की कंटाळून तायक्वांदो सोडेल ... मी नाही मागे हटणार  ...पण कसलं काय मीच हट्ट सोडला. 

एक फाईट घराजवळच्या शाळेत होती त्यामुळे हौशी ने माझी आई बघायला आली... न्या मस्त खेळत होती ... फायनल पर्यंत पोहोचली पण तोवर पार दमली होती नी समोर खूप मोठी मुलगी... तरी न्या मस्त प्रयत्न करत करत होती... सेकंड राऊंडला मात्र न्यासाठी खूपच जास्त झालं ...ती दमलीय हे दिसत होत पण समोरची ची पुढे येवून मारायची हिम्मत होत नव्हती ...तर तिचे वडिल रिंगच्या बाहेरून ओरडले , “ये पुढे नी मार ,ती दमलीय पूर्ण”
फिर क्या ... मातोश्रींनी जी तलवार उपसली , “लाज वाटते का ? केवढस ते पोर आहे ... मार म्हणता ...माराच ,बघते तुम्हाला” ... 
अरे देवा ! सगळे फाईट सोडून हा सामना पहायला गोळा ... हसून हसून धमाल  ... आईला शांत करताना नाके नऊ आले ... तो माणूस पण बिचारा, “अहो आई हा खेळच असा आहे” टाईप बोलून समजावतोय पण आमचं महाराणा प्रतापांच रक्त असं सहजी थंड होत होय...
न्या ला सिल्व्हर मिळालं पण आईसाहेब ठणकावून आल्या , “हे गोल्ड्पेक्षा भारी आहे , किती मोठ्या मुलीच्या विरुद्ध खेळत मिळवलय” बिचारी गोल्ड्वाली कानकोंडी झाली. भास्कर सरांनी आज्जीला तायक्वांदो जॉईन करायची ऑफर दिली लग्गेच .त्यानंतर मात्र ‘नो आज्जी फॉर मॅच’ हा फतवा निघाला ... 

न्याचा अजून एक प्रोब्लेम आहे ,तिच्या विरुद्ध तिची मैत्रीण आली कि न्या पाय उचलतच नाही ... मग सरांकडून हे एवढ लेक्चर , डोळ्यातून पाण्याच्या धारा पण तोंडातून एक शब्द नाही, वाटत आता सुधारणार नक्कीच पण नेक्स्ट इव्हेंटला सेम सिच्युएशन आली की आहेच... ये रे माझ्या मागल्या. किती समजावलं पण अजून तरी काही काही उपयोग नाही.. 

सरांच्या हाताखाली शिकून गेलेल्यांनी स्वताच्या अकाडमी उभारल्या आहेत. त्यातले काही तरीही इथे येवून मुलांना ट्रेन करत असतात. त्यातल्या एकाने फाईटच्या वेळेला ह्या मुलांना येवून सांगितल कि माझ्या मुलांना मारायचं नाही. मुलं सरांना काय उलट बोलणार ? काही बोललीच नाहीत पण मॅचला जे धुतलंय ...अरे देवा! .... एका मुलाने आपल्या अपोनंटला नीट ऍडजस्ट करून ते सर बसले होते त्यांच्या समोर आणलं नी जी किक मारली कि समोरचा जावून त्या सरांच्या मांडीवर बसला ... फोर्स इतका होता की ते सर खुर्ची सकट मागे पडले ... धमाल हसले होते सगळे तेंव्हा ...त्यानंतर पासून ह्या एक्सट्रा इंस्ट्रक्शन बंद झाल्या अगदी ... मॅचचे किस्से सॉलिड असतात नेहमीच  

रेड वन नंतर ट्रेनिंग अजून खडतर होत गेलं, ब्लॅक बेल्टची तयारी ... असं वाटायचं जावून सांगाव सरांना , ‘सीमेवर धाडायचं नाही आहे हो पोरांना’ पण काय बोलणार पोरंच सरांना सामील .एकदा बांबू घेवून मुलांच्या दिशेने धावत जाताना पाहिलं सरांना ... धस्स झालं होत काळजात ,इथे पाच बोट उचलताना हजारवेळा विचार करतो आम्ही नी हे बांबूने फोडतात ...मी तर जाणारच होते तावातावाने भांडायला पण लेकंच मध्ये पडली , म्हणे , ‘ह्या ! हे तर काहीच नाहीय ,आम्हाला पोट कडक करायला सांगून पोटात मारतात ... आता काहीच लागत नाही, आम्हाला सवय झालीय, आमच शरीर तयार करताहेत... तेच आमचं हत्यार’

हे अगदी खरंच होत म्हणा , इतकी वर्ष मेहनत करून ह्या मुलांची शरीरं चांगलीच तयार झालीत.आता सगळी परिमाणंच बदलली आहेत घरात. आधी न्या नी तिचा बाबा मस्तीत मारामारी करायचे ,तेंव्हा मी बोंबलायचे , ‘विनू सांभाळून ...लागेल रे त्याला’ आता फक्त एकच अक्षर बदललंय , ‘मनू सांभाळून ...लागेल रे त्याला’ 

हळूहळू मला पाहून माझ्याकडे धावत येणाऱ्या न्याला पाहून आनंदापेक्षा भीती वाटू लागली ... omg  ही आता येवून धडकणार . आता तर नियमच काढलाय मी ‘माझ्या अंगाशी मस्ती नाही , जे असेल ते लांबून’ ,बाबाशी अजून सुरु असते पण मी पहाताच बोंबाबोंब सुरु करते. 

ह्यावरून एक गंमत आठवली , ह्यावर्षी न्याच अधिवेशन बदलल्याने सगळे शिक्षक नवीन ,कुणीच ओळखीच नाही. तर झालं असं , यांचे पीटी चे सर पहिल्यांदाच वर्गावर आले नी स्वत: बद्दल सांगू लागले . ‘माझं अस ट्रेनिंग झालय ,मी इतका स्ट्रॉंग आहे नी ऑल’ मग विचारल ‘वर्गात मार्शल आर्ट कुणी शिकतंय का ? पूर्ण वर्गाने अनन्याकडे बोट दाखवल... तिला पुढे बोलावल नी सांगितल , ‘पूर्ण ताकतीने माझ्या हातावर पंच मार’ हे ऐकल्या बरोबर मी ,” बाळा , नाही ना मारलास जोरात ?”  न जाणो मोडून आलेली असायची पण नशीब ती म्हणाली , ‘कस मारेन ग मी जोरात ? हळूच मारला पण नंतर ते जे बोलले ते ऐकून वाटल मारायलाच हवा होता’
“का ग ? काय बोलले ?”
म्हणे , 'बघा , ही मुलगी इतकी वर्ष ट्रेनिंग घेतेय पण तिच्या पंच ने मला काही झाल नाही'
मग त्यांनी ह्यांच्या वर्गातल्या सगळ्यात उंच धिप्पाड मुलाला बोलावल नी न्या च्या शेजारी वर्गाच्या दारात उभ केल मग मुलांना म्हटल,

‘बघा , मी माझी मुठ यांच्या पोटावर ठेवणार नी फक्त उघडणार’... नी त्या मुलाच्या पोटावर मुठ ठेवली नी उघडली , तो बिचारा भेलकांडत खिडकी पर्यंत गेला .. मग अनन्याची टर्न , ती म्हणे ते मुठ उघडताना धक्का देत होते त्यामुळे तो इतक्या लांब गेला . मग मी विचारल ,’तू कुठवर गेलीस ग ?’ तर म्हणे , ‘शक्य आहे का, मी जाग्यावरून तरी हलणे’ मी सरांचा विचार करून गपच झाले. सर म्हणे सांगत होते , "बघा हा फायदा असतो ट्रेनिंगचा म्हणूनच ही बिलकूल हलली नाही." आता आमची सरांशी छान गट्टी झालीय . मजा मजा सुरु असते हल्ली ...नी माझं धास्तावन आहेच फक्त आता ते समोरच्या साठी असत बऱ्याचदा 

दंगलमध्ये आमीर मुलीचे पाय चेपत असतो , ते पाहून टचकन पाणी आलं डोळ्यात ... रात्री लेक झोपल्यावर मी तिच्या अंगावरून हात फिरवते तेंव्हा तिच्या हाता पायावरचे नवीन नवीन काळे डाग माझं काळीज चिरत जातात ...दगडासारखे तिचे हात हातात घेवून वाटत, मी तिला तायक्वांदोला घालून चूक तर केली नाही ना ? पण या प्रश्नाला आता काहीच अर्थ नाही... मी आता गोष्टी बदलू शकत नाही , तिचा निर्णय झालाय नी मला तिच्या सोबत वहायचं आहे ...तिला जायचं आहे त्या दिशेने ... त्यामुळे चुपचाप तिच्या हातापायांना तेल लावते नी दुसऱ्या दिवसासाठी तयार करते .... स्वत:ला, कारण ती तर आधीच तयार असते , येणाऱ्या उद्याला सामोर जायला... 

अनन्याच्या फाइटची ची लिंक आहे , रेड गार्डमध्ये अनन्या ...नॉर्मली रेकॉर्डिंग करता येत नाही पण हे एक लकिली मिळालं 

https://youtu.be/YiiNznkWgVM

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लिहीलंय.
आधीही वाचलं होतं.स्ट्रॉन्ग आई आणी हळवी आई यांच्यातलं द्वंद्व.
न्या ला कायम यश मिळो.अपयश मिळालं तर फेअर फाईट मधलं अपयश असो.

मेले में बिछडी जुडवा बहन तो नहीं तुम ?
मस्त लिहिलंय. कॉम्पीटीशन चं वाचताना एकदम अगदी अगदी झालं. मी बार्क्याचं व्हिडियो शूटिंग करते तर प्रत्येक इव्हेंटनंतर तो जेंव्हा नीट उभा राहतो तेंव्हा सोडलेला सुस्कारा प्रत्येक वेळी व्यवस्थित ऐकू येतो .
पुढच्या वाटचालीकरता तिला आणि तुम्हालाही शुभेच्छा

धन्यवाद! हर्पेन, आशूचॅम्प, मी अनु,मेधा, जीएस.
अनु ,लढाई अखंड सुरू आहे Happy
मेधा ,अगदी ...तो सुस्कारा सगळं सांगून जातो . आता इतकी वर्षे झालीत लेक खेळतेय पण माझी परिस्थिती जैसे थे च आहे Sad

खतरनाक !

भारतात खेळाच्या बाबतीत किती उदासीनता आहे हे >>>>>> खरेच त्रासदायक आहे पुढे केलेले वर्णन

हॅटस ऑफ टू अनन्या.... तिची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे.
हे इतकं सगळं यात असतं हे माहित नव्हतं..... खूप छान लिहिलंय तुम्ही
वाचताना सारखं दंगलचं गाणं आठवत होतं

मस्त लिहिलेय. अनन्याचं खूप कौतूक वाटते. अभ्यास,चित्रकला, क्राफ्ट, खेळ सगळ्यात पुढे असते ही. तुमचं पण कौतूक आहे तिला इतक्या सपोर्ट करता.

आमच्या लेकाने दोनेक वर्ष करून सोडले तायक्वांदो. ऑरेंज बेल्ट असताना. हे करता करताच उरलेल्या दिवशी बास्केटबॉल खेळायला जायला लागला. त्या वयात तायक्वांदो पेक्षा बास्केटबॉल जास्त इंटरेस्टींग वाटायचं त्याला... तिथे मस्ती पण चालायची. कोच बास्केटबॉल ट्रेनींग नंतर थोडा वेळ खोखो - कब्बडी खेळवतात. शिवाय सगळे जवळचे मित्र बास्केटबॉल मध्ये. थोडा ब्रेक म्हणता म्हणता मग कधीतरी सुटलंच तायक्वांदो.
आता मात्र मध्ये अध्ये दुसरी कोणतीही ॲक्टिव्हिटी केली तरी किमान बास्केटबॉल सोडू देत नाहीये. सलग ३+ वर्ष झाल्याने आता इंटरेस्ट ही आलाय.

अफाट आहे हे!
व्हिडिओ मध्ये अनन्या कुठली हा प्रश्न आधी विचारणार होतो... पण आता गरजच नाही!
तिला शुभेच्छा Happy

कौतुका बद्दल धन्यवाद !_/\_ वावे,रुन्मेष, अंजली,अल्पना,अमितव Happy
एक कोणता तरी खेळ हवा, इतकं झालं तरी पुरे असतं त्यामुळे बास्केट बॉल खेळतोय तर उत्तमच आहे, अल्पना.
तिथलं वातावरणच इतकं भारलेलं असत की मुलं जीव तोडून मेहनत करतातच.
आता इंटर स्कुल साठी तयारी सुरू आहे ,त्यातून मुलं ऑलिम्पिक साठी निवडणार असे घोषित केले आहे ,त्यापासून सरांनी बॅनर च लावून टाकलाय ,"अपना सपना ऑलिम्पिक मेडल हो अपना"
नी घासून घेताहेत पोरांना ,कुठवर जातील माहीत नाही पण प्रयत्न पूर्ण सुरू आहेत.
मुलांना मॅट्स हव्या आहेत फाईट प्रॅक्टीससाठी त्या साठी फ़ंड जमवतोय , स्पोर्ट मिनिस्ट्री मध्ये आनंदी आनंद आहे Sad
सरांना छत्रपती पुरस्कार मिळाला होता तेंव्हा त्यांना विचारलं होत की काय हवं ते सांगा तुम्हाला ,त्यांनी mats द्या फक्त म्हटलं होतं ,आज इतकी वर्षे झाली तरी पत्ता नाहीय mats चा.
सर फी इतकी कमी घेतात कारण सगळ्यांना परवडायल हवं, त्यात कित्येक मुलं फ्री शिकतात . तरी बरीच जमवा जमव करून साहित्य गोळा केल आहे बाकी तरी दीड लाखाच सामान अजून लागणार ...
फ़ंड रेंज करण्यासाठी काय करता येईल ?
कुणाला माहीत असेल तर गाईड कराल का प्लिज
माजी विद्यार्थी ,पालक यांनी आपापला वाटा उचलून झाला आहे तरी कमी पडतेच आहे .
मुलांचा स्पीड इतका वाढलाय की आता माणूस उभा राहू शकत नाही प्रॅक्टीस साठी ,डमी लोकल घेतला तर एका सेशन मध्ये फाटला. त्यामुळे उत्तम प्रतीचे साहित्य हवे आहे. जर कुणाला शक्य असेल तर प्लिज मदत करा .

छान लिहिले आहे तुम्ही ! तुम्हाला तिघांनाही वाटचालीसाठी शुभेच्छा.
फंडरेझिंगसाठी इथे आणि फेसबुकवर नीट माहितदे/ छायाचित्र देऊन धागा सुरु करा ना. जमतील पैसे.

आम्हीही मदत करु.

हॅटस ऑफ टू अनन्या.... तिची जिद्द वाखाणण्यासारखीच आहे.
हे इतकं सगळं यात असतं हे माहित नव्हतं..... खूप छान लिहिलंय तुम्ही >>>>> +99999 Happy

____/\____

खूप छान लिहीलयं.
अनन्या आणि तुमचं खूप कौतूक. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.!

एक नंबर.. अशीच खेळात प्रगती होऊ देत...

राज्यवर्धन राठोड स्पोर्ट्स मिनिस्टर झाल्यावर जरा परिस्थिती बदलेले अशी आशा आहे कारण ते स्वतः अश्याच परिस्थितीतून गेलेले असतील..

फंडींग साठी सारखे सारखे मिनिस्टरीकडे धडकाच..

खूप छान लिहिलयं! आधी वाचलेले तेव्हाही आवडले होते. अनन्याला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा!

विनार्च, फंडिंगसाठी मिनिस्ट्रीकडे प्रयत्न सुरु ठेवा जोडीला इतरही प्रयत्न करता येतील. भारतात यातले काय शक्य आहे याची काही कल्पना नाही पण तरी सुचवतेय.
पेसबुक पेज वर माहिती, फोटो, विडिओ क्लिप्स आणि मदतीचे आवाहन
सोसायट्यांचे दिवाळी कार्यक्रम असल्यास तिथे डेमो आणि मदतीचे आवाहन.
सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने कार वॉश सारखे उपक्रम
मुलं ज्या शाळांचे विद्यार्थी आहेत तिथल्या मॅनेजमेंटच्या सहकार्याने मदतीचे आवाहन , शाळांतून छोट्या रकमेचे तिकिट लावून डेमो
कॉर्पोरेट सेक्टरकडून काही मदत, सहकार्य मिळते का ते देखील पहा.
इथे स्पोर्ट्ससाठी आणि इतर अ‍ॅक्टिविटीजसाठी पैसे उभे करणे हे वर्षभर सुरुच असते.

मस्त लिहिलंय . अनन्या ला खूप खूप शाबासकी आणि शुभेच्छा!
मी स्वाती२ सारखेच लिहिणार होते.
आमच्या इथे स्पोर्ट्स टीम्स फेस्टिवल सीझन्स मधे स्वीट्स, चॉकोलेट्स, बेक सेल , कार वॉश कँपेन हे तर करतातच.
आमची रोबॉटिक्स टीम मॅनेज करण्याचा २-३ वर्षाच्या अनुभवातून काही टिप्स कंपन्यांच्या स्पॉन्सरशिप बद्दल देऊ शकेन.

कंपन्यांकडे स्पॉन्सरशिप मागणे - हे अगदी कार्पोरेट लेवल ला करायला हवे असे नाही. अगदी लोकल छोटी छोटी रेस्टॉरन्ट्स किंवा बिझिनेसेस लहान प्रमाणात भाग घेऊ शकतात. लोकल असल्याने त्यांना तुमच्या टेम बद्दल जास्त आत्मीयता पण असू शकते . छोट्या देणगीदारांना अंडरएस्टिमेट करू नका . दे कॅन बी युअर स्ट्राँग सपोर्टर्स! ते जास्त अप्रोचेबल असतात आणि त्यांच्याकडून देणगी मंजूर करणे कार्पोर्ट्सपेच्क्षा कमी किचकट असते .
फक्त त्यांना देणगी मागताना जर स्पेसिफिक नीड काय आहे ते सांगितले तर ते जास्त कंफर्टेबल असतात द्यायला. जसे उदा. आमच्या रोबॉटिक टीम ला पैसे हवे असतात तेव्हा आम्ही सांगतो सध्या आम्हाला नविन गिअर्स , नविन व्हील्स इ. घेण्यासाठी अमूक इतक्या पैशाची गरज आहे. त्याने आमचा पर्फॉर्मन्स अमूक इतका सुधारेल वगैरे.
अजून पद्धतशीर काम करायचे असल्यास त्यांना अप्रोच करताना वेगवेगळे स्पॉनसरशिप प्लॅन आधीच ठरवायचे आणि त्यांना ऑप्शन द्यायचा कोणत्या लेवल ची हेल्प ते करू शकतील. सिल्वर, प्लॅटिनम , गोल्ड स्पोन्सरशिप प्लॅन्स - अमूक इतका निधी दिल्यास टीम च्या शर्ट वर लोगो . अमूक दिल्यास टीम च्या बॅनर वर लोगो वगैरे.
अशा रितीने जे कोणी देणगी देतील त्यांना टीम चा ग्रुप फोटो आणि खाली थॅन्क्यू वगैरे लिहिलेले लहानसे पोस्टर भेट द्या. ते लोक त्यांच्या ऑफिस/ शॉप मधे डिस्प्ले करू शकतात, आम्ही स्पॉन्सर केलेली टीम म्हणून. तुमच्या प्रॅक्टिस इव्हेन्ट्स ना, तुमच्या काही स्पर्धांना त्यांना आमंत्रण पाठवा. त्यांना तुमच्या यशात सामील करून घ्या. त्यामुळे होते काय की त्यांना विश्वास वाटतो की आपण दिलेले पैसे योग्य रितीने वापरले जातायत. आणि ही "आपली टीम" असल्याचा फील येऊन ते अजून कन्टिन्यूड सपोर्ट करायला तयार होतात.
गुड लक तुम्हाला!

अनन्याची सुंदर चित्रकला पाहिली होती. तिचा हा पैलू आणखीच सुंदर... तुमच्या वाक्या- वाक्यात परीश्रम जाणवत आहेत... तिचे आणि तुमचे....

__/\__
अनन्याला आणि तुम्हालाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

विनार्च, अभिनन्दन तुमचं आणि लेकीचं.
तुमचे जवळपास सगळेच लेख वाचले आहेत यापुर्वीचे. अनन्या एक अफलातून रसायन आहे !
एक फार भावलं तुमच्यामधलं, तुम्ही आई-बबाबांनी घेतलेली मेहनत, दिलेला वेळ आणि अनन्या चा पॉझिटिव्ह प्रतिसाद. कुठलीही गोष्ट असो पुर्णत्वाला न्यायला शिकली आहे ती.
तुमचा लेख वाचुन physics मधल्या superimposed waves आठवल्या Happy

खुप छान लिहिलंय.
अन्यनाची चित्रकला, हस्तकला पाहिली होती आज हा वेगळाच पैलु पाहिला.
अनन्याला शुभेच्छा.

दोन्ही लेख खूप आवडले
अनन्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा

मस्त लेख.
अनन्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा +१११

खूप खूप धन्यवाद _/\_ Happy
कालच झालेल्या जिल्हा स्तरीय आंतरशालेय स्पर्धेत अनन्या ला गोल्ड मेडल मिळाले... या साठी खूप मेहनत केली होती . आता स्टेट साठी निवड झाली तिची त्यासाठी परत मेहनत ,ऑलिम्पिक च्या दिशेने असलेलं हे पहिलं पाऊल सरांच्या कित्येक मुलांनी पार केलंय. खूप अभिमान नी आनंद वाटतोय Happy
स्वाती2 नी मैत्रीयी खूप छान माहिती दिली आहे ,खूप खूप धन्यवाद ,हे कसं नी किती करता येईल हे मिटिंग घेऊन बघता येईल . यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की सर यात भाग घेत नाहीत म्हणजे वेळच नसतो त्यांना प्रॅक्टिस पुढे... नी बोलण्याच्या बाबतीत ही फारच कठीण परिस्थिती आहे ... मुलांशी तासनतास बोलतील पण बाकी कुणी असेल तर समोरच्याने समजून घ्यायच नेमकं काय असेल ते . तरी काही तरी करावं लागणारच
काल मेडल्स जरी शाळांच्या नावावर गेली असली तरी सगळी मेहनत भास्कर सर नी इतर सिनियर्सचिच होती .
शाळेतर्फे कुणी हजर ही नव्हतं Sad
अकादमीच्या मुलींना
6 गोल्ड
2 सिल्व्हर
4 ब्रॉन्झ
तर मुलांना
5गोल्ड
4ब्रॉन्झ मेडल्स मिळाली आहेत.
आता आज आराम करून उद्यापासून स्टेट साठी सज्ज सगळे.

Pages