हे असे आभासवाणे चांदणे आता नको (तरही)

Submitted by इस्रो on 8 October, 2017 - 02:52

ते तुझे स्वप्नी मला गोंजारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

दोन वेळा पंच आणिक लंच बनली एक जी
नोकरीला त्या उगा सांभाळणे आता नको

मोकळ्याने बोलले ते एकमेकांशी जरी
अर्थ काहीही निराळा काढणे आता नको

बिंब अपुले पाहते ती कैकदा ऐन्यात ज्या
त्याच ऐन्याने तिला न्याहाळणे आता नको

शिक जरा वाचायला तू माणसांचे चेहरे
मोठमोठे ग्रंथ केवळ वाचणे आता नको

वाटते घडले असे जे, ते नसू शकते तसे
जे जसे दिसते तसे ते मानने आता नको

वेगळा पर्याय काही शोध 'इस्रो' तू जरा
चारचौघांच्याप्रमाणे वागणे आता नको

- नाहिद नालबन्द 'इस्रो'
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Use group defaults