‘कासव’

Submitted by भारती.. on 5 October, 2017 - 01:23

‘कासव’

६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांतर्गत 'कासव'ला २०१६ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.अन्यही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला ‘’कासव’’ ६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय.

डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे. मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईत ४ ऑक्टोबर रोजी फेमस स्टुडिओज महालक्ष्मी येथे- या रिलीजच्या पूर्वसंध्येला म्हणता येईल - ‘’कासव’’ बघण्याचा योग आला.

याआधी ‘’संहिता’’ ची द्विस्तरीय वीण असलेली घट्ट संहिता अनुभवलेली असल्याने ‘’कासव’ बद्दल पुरेशी उत्सुकता होती, सुवर्णकमळाचं स्वर्णवलयही लाभल्याने ती वाढली होती.

‘’कासव’’चं कथानकही तसंच व्यामिश्र आहे.काळाच्या आव्हानाची जाणीव करून देणारं आहे. कथानकात एखादी कच्ची , एखादी अंधुक राहिलेली जागाही जाणवली. पण तंत्राचे छोटे खंड महत्वाचे नसतात तर व्यापकता आणि समग्रता महत्वाची असं एक तत्त्व आहे.’’कासव’’मध्ये व्यक्तिगत पडझडीला सृष्टीच्या निर्मितीचक्रात मानवाने जो उत्पात आणला आहे त्याची जोड दिली गेली आहे. संहिता त्यामुळे सशक्त होत जाते, व्यापक होत जाते.

सुरुवातीला मुंबई शहराच्या बकाल बदनाम ब्रिजेस ,फूटब्रिजेसवर फिरलेला कॅमेरा कथानकाला गती आल्यावर देवगडच्या विशाल समुद्रावर, अंगावर झेपावणाऱ्या लाटांवर फिरू लागतो.हिरवं रान, समुद्रपक्षी, जांभ्या दगडातल्या घरा-गडग्यांचं,जुन्या देवळांचं , लाल मातीच्या पायवाटांचं देखणं जग टिपू लागतो. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटू लागतं.पण विनाशाची चाहूल इथेही लागत आहे. माणसांच्या स्वार्थापायी कासवांच्या नष्ट होणाऱ्या ,आदिम मौल्यवान प्रजाती, समुद्राच्या पोटातले मासे व्यवसायाची नीती न पाळता धुवून काढणारं आधुनिक तंत्र.

एकीकडे अजूनही निसर्गाच्या कुशीत टिकून राहिलेला निरागस गोडवा अशिक्षित नोकरमाणसे, लहान चहाविक्रेता मुलगा , गोड मालवणी बोली, दशावतारी खेळाचा थरार यातून संक्रमित होतो..संवाद साधेच पण सूत्रमय आहेत.

अभिनय प्रत्येकानेच जीव ओतून केलेला आहे.अलोक राजवाडेचा संतुलन हरवलेला तरुण आणि इरावती हर्षेंची जानकी प्रगल्भतेने व्यक्त झाले आहेत. एका वेगळ्या नात्यातल्या लहान लहान जागाही या दोघांनी ताकदीने अभिनीत केल्या आहेत. डॉ मोहन आगाशे,किशोर कदम तर कसलेलेच कलाकार. संतोष रेडकर,अन्य दशावतारी करणारे कलाकारही लक्षात राहतात.लहानशा अंकुश घाडीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे.

'कासव' या चित्रपटाचं संगीत - पार्श्वसंगीत साकेत कानेटकर यांचं आहे. सुनील सुकथनकर यांचीच दोन गाणी आहेत जी सायली खरे व आलोक राजवाडे यांनी गायली आहेत.'लेहर समंदर' अविस्मरणीय.

सूक्ष्म-विराट एकमेकात गुंतलेल्या निसर्गचक्रांच्या जपणुकीची जाणीव ही आजची आस्तिकता आहे.नैराश्य आणि विनाश यापासून माणसाला वाचवणारी शक्ती.’कासव’’चा हा संदेश आहे आणि तो अंगावर न येता पोचतो हे कसलेल्या अभिनेत्यांचं आणि दिग्दर्शकांचं यश आहे.

मराठी चित्रशक्तीचा अभिमान वाटावा असा हा चित्रपट.
अवश्य थिएटरमध्ये जाऊन अनुभवावा, त्याला व्यावसायिक यश मिळवून द्यावं .
धन्यवाद आणि सर्व शुभेच्छा मायबोली.

भारती बिर्जे-डिग्गीकर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्क चार वर्षं झाली या अनुभवाला आणि या लेखनाला, इथे फारच कमी, एकुलता एकच प्रतिसाद आहे Happy माझी सिनेपत्रकारिता त्यामुळेच पुढे बहरली नसावी. सुमित्राताईंचा मला मायबोलीमुळे रिलीजच्या पूर्वसंध्येला अनुभवलेला प्रसन्न वावर आणि पाहायला मिळालेला हा दुसरा चित्रपट. धन्यवाद..

तुम्ही योग्य शब्दांत व्यक्त केलं आहे..
सुंदर चित्रपट आहे..! _/\_
रिलीज झाल्यावर आवर्जून पाहिला होता..
'लेहेर समंदर रे' बरेच दिवस डोक्यात राहिलं होतं, हे आत्ता आठवलं.
बाकी सुमित्रा भावे-सुनील सुकथनकरांचे सिनेमे नेहमीच आवडत आले आहेत. Happy
घो मला असला हवा, अस्तु, देवराई, दोघी.. शिवाय काही डॉक्युमेंटरी फिल्म्स पण आहेत यू ट्यूबवर..

भारतीताई फार छान लिहिलंय.

बरं झालं धागा वर काढलात, नजरेतून निसटून गेलेलं हे लेखन. कासव बघायला हवा.

अरे वा! धन्यवाद मानव, सोनाली,पाचपाटील, अंजू, अमितव !माझ्याही विस्मरणात गेलेली ती संध्याकाळ आज उजळली आहे.
सोनाली, आता कुठे बघायला मिळेल बरं.. "संहिता" यू ट्यूब वर आहे, हा मात्र सापडत नाहीय. सुकथनकरांनाच विचारावं लागेल किंवा चिनूक्सला.
अमितव, माझ्या सिनेपत्रकारितेचा बोऱ्या वाजण्याची काही कारणं म्हणजे मायबोलीकर स्टार छायाचित्रकार जिप्सी या वेळी सोबत नव्हता त्यामुळे एकही रंगारंग खमंग फोटो प्रूफ नाही(इतर दोन्ही वेळा त्याने काढलेल्या फोटोंमुळे यच्चयावत येरूंना स्टार वैल्यू आली होती ) , शिवाय मायबोलीकरीण सखी जाईही यावेळी अनुपस्थित.. मामला फिसकटलाच मग:)

हा चित्रपट माझ्या माहेरच्यांनी पाहिलेला. त्यांना चांगलाही वाटलेला. मी संथ असावा असे समजून बघायचा टाळलेला. आवड आपली आपली. पण लिहीलेय छान. सिनेपत्रकारीतेला बहर येणार असेल तर त्यात माझाही एका प्रतिसादाचा वाटा Happy

धन्यवाद ऋन्मेssष , हरचंद Happy अशा प्रयोगांमध्ये संहिता कधी संथ,कधी तुटक होते ,याला वास्तवाची अशीही रूपं असतातच असं म्हणावं किंवा प्रयोगाच्या मर्यादा असं समजून घ्यावं.एखाद्या तात्त्विक आवाहनाला कथेचा रूपबंध देणं. फार मोठं आव्हान.

भारतीताई फार छान लिहिलंय.

बरं झालं धागा वर काढलात, नजरेतून निसटून गेलेलं हे लेखन. कासव बघायला हवा. >>>>+ 9999