बैलदारा आणि फेण्यादेवी

Submitted by योगेश आहिरराव on 3 October, 2017 - 08:01

बैलदारा आणि फेण्यादेवी

35.jpg
आषाढ महिन्यातल्या धुव्वाधार पावसात ‘कोथळीगड’ ‘नाखिंडा’ घाटाचा ट्रेक केला होता त्याच वेळी दक्षिणेकडील पदरातल्या ‘कळकराई’ वस्तीतून जाणार्या घाटवाटा खुणावत होत्या. ऐन श्रावणात एका शनिवारी सकाळी सकाळी कशेळेकडे कुच केले, यावेळी साथीला होते सह्यमित्र ‘जितेंद्र खरे’, ‘विनायक’ आणि ‘निखिल’. बदलापुर नेरळ कर्जत पाईपलाईन रोडची पावसात पार दैना झालीय हे माहित होतेच त्याला पर्यायी बदलापूर-मुळगाव-बोराडपाडा-कळंब-कशेळे हा मार्ग निवडला. रस्ता एकदम सुस्थितीत आणि रहदारीमुक्त, त्यामुळे कल्याणहून निघून विक्रमी वेळात कशेळे गाठले. नेहमीच्या ठिकाणी चहा नाश्तासाठी थांबलो, तेव्हा पावसाने चांगलाच जोर धरला होता. कशेळेच्या चौकात भीमाशंकरकडे जाणारे मोठमोठे ग्रुप होते, त्याच गर्दीतून वाट काढत कोठिंबे मार्गे धामणी रोड पकडला मोगरज गावापलीकडे जाधववाडी येथे एका घराजवळ अर्थातच मालकांच्या परवानगी नुसार गाडी लावली. वाडीतून सरळ जाणारा रस्ता मेचकरवाडी पुढे धामणीला जातो, आम्ही थोडे अंतर जात उजवीकडे चौधरीवाडीसाठी वळालो. भुरभुरणारा बारीक पाऊस सोबतीला होता, समोर सह्याद्रीची रांग अर्ध्याहून अधिक धुक्यात हरवली होती. तिथेच कुठेतरी आमची उतराईची फेण्यादेवी घाटाची खिंड लपलेली. पंधरा मिनिटांत चौधरीवाडीत दाखल झालो, एका घराजवळ राम राम शाम शाम मग पुढच्या कळकराईच्या वाटेची चौकशी. पायथ्याच्या चौधरीवाडीतून पदरातल्या कळकराई वस्तीवर जाण्यासाठी मुख्य वाटा दोन, एक थोडी लांबची पण सर्वांच्या सोयीची 'गायदरा' तर दुसरी उभ्या चढणीची नाळेची वाट. पावसात अर्थातच गायदरा जास्त वापराची. तिथेच गावकरींसोबत चर्चा करून, त्यांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेत गायदराच्या वाटेला लागलो. वाट झक्क मळलेली कळकराईतील बरीच मंडळी कर्जत एस टी साठी या वाटेने कमीत कमी वेळात ये जा करतात. तिरकी वळणे घेत वाट चढू लागली, पहिला छोटा झाडीचा टप्पा पार करून बाहेर आलो तर डावीकडे दरीपल्याड कोथळीगड डोकावला, पाऊस थांबून आता श्रावणातला ऊन पावसाचा खेळ सुरू झाला होता. कोथळीगडापासून ते पार नाखिंडा माथ्यापर्यंत ढगांची ये जा सुरू होती आणि नेहमीप्रमाणे धबधब्यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. पुढे पठारावर दोन आडव्या वाटा ओलांडून सरळ पुढच्या दहा मिनिटांत बहुतेक मोगरजकडून येणारी मोठ्या वाटेला लागलो. लहानसे टेपाड चढून पदरातल्या मोकळ्या रूंद पठारावर दाखल झालो, समोरच काही गावकरी शेतीकामात व्यस्त होते. या भागात अडीच तीन हजार फुट उंचीच्या सह्यपर्वताच्या निम्म्याहून अधिक उंचीवर सह्यशिरोधारेला समांतर असे पठार लाभले आहे यालाच पदर असे म्हणता येईल. भीमाशंकर भागात इथून सुरूवात करायची झाली तर फेण्यादेवी अलीकडे ही कळकराई वस्ती, तशीच समपातळीवर कोथळीगडाखालची पेठ वस्ती, पुढे वाजंत्रीघाटा जवळची रानमळा, तुंगी, पदरवाडी ते पुढे सिध्दगडमाची ते पुर्वीचे साखरमाची पर्यंत या सर्व पदरातल्या लहान मोठ्या वाडी वस्त्या. पुर्णपणे निसर्गावर अवलंबून तसेच दैनंदिन गरजेच्या वाणसामानासाठी मुख्य गावात ये जा करण्यासाठी सहाजिकच इथल्या घाटवाटांचा वापर सोयीचा. कळकराई ते पेठ गाव याभागात पुर्वापार दळणवळण अथवा व्यापारकामासाठी उपयुक्त ठरलेल्या काही प्राचीन घाटवाटा आहेत. जसे की पेठ गावाजवळची ‘नाखिंडा’ घाटाची वाट जी देशावरच्या भामा खोर्यातल्या वांद्रे गावात जाते. पेठच्या किल्ल्याला बिलगुण असणारी सरळसोट निमुळत्या सोडेंची अशी ‘कौल्याची धार’, याही वाटेने वांद्रे गावात पोहचता येते. मग दक्षिणेला ‘बैल घाट’ आणखी थोडे पुढे जात ‘पायरी घाट’ आणि ‘फेण्यादेवी घाट’ या सर्व प्रमुख घाटवाटा. त्यात बैल घाट आणि पायरी घाट हे पेठवाडी आणि कळकराई यामधील जंगलातल्या पदरातून निघून अनुक्रमे तळपेवाडी आणि सावळा जाण्यासाठी स्थानिक गावकरी अजुनही वापरतात. सह्यमाथ्यावरून एक भली मोठी नाकडासारखी कातळभिंत कळकराई वस्तीला एका बाजूला कवेत घेऊन उभी आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर या भिंतीच्या उत्तरेला पदरात कळकराई वस्ती तर दक्षिणेला ही भली मोठी भिंत ज्या ठिकाणी मुख्य रांगेला छेदते ती खिंड म्हणजेच फेण्यादेवी घाटाचा माथा.
आमच्या आजच्या नियोजनानुसार पायरी घाटाने चढाई करून सावळा - मेटलवाडी गाठून फेण्यादेवी घाटाने उतराई असे होते. आम्हाला घाटाने वर जायचे आहे असे वस्तीत सांगितल्यावर तिथे जमलेल्या महिला मंडळाने सरळ फेण्यादेवीने जाण्याचा सल्ला दिला, मग आमचे नियोजन सांगितल्यावर त्यांनी बैलदारा घाटाची वाट सुचवली. ‘प्रिती पटेल’ सोबत झालेल्या चर्चेनुसार आणि माझ्या माहितीनुसार फेण्यादेवी सोडला तर बैल आणि पायरी हे दोनच घाट या भागात तर मग हा बैलदरा कुठून आला ? या दोन घाटापैकी एका घाटाने जितेंद्र खरे वैशाख महिन्यात उतराई केली होती तेव्हाच त्यांनी पदरातल्या जंगलातली पुरातण विहीर ही बघितली होती, वाटांच्या नावात काहीतरी गफलत़ होत होती. आमची हि चर्चा सुरू असताना ‘लक्ष्मण तळपे’ तिथे आले, "दोन मिनिटांतच छत्री घेऊन येतो मग जाऊ" खरतर गरज नव्हतीच मुळी पण आमच्यासोबत स्वत:हून निघाले. मनात विचार केला पावसाची आणि धुक्याची साथ आहेच आणि त्यात या पदरातले दाट जंगल, फारसा धोका नसला तरी योग्य वाट मिळाली नाही तर वेळेचे गणित अवघड त्यात दुपारनंतर असाच जोर राहिला तर फेण्यादेवीचा पहिलाच भला मोठा ओढा ओलांडने आणखीच कठीण होणार. फारसे आढेवेढे न घेता लक्ष्मण भाऊ सोबत इथल्या वाटेंबद्दल चर्चा करत चालू पडलो. मुख्य मळलेली वाट धरून काही अतंरावर डावीकडे खालच्या अंगाला जाणारी बारीक पण स्पष्ट अशी वाट पकडली, वाटेत काही ठिकाणी जनावरांना पायबंद घालण्यासाठी काठ्या लावल्या होत्या. वस्तीसोडून पंधरा मिनिटाच्या चालीनंतर एका ओढ्यापाशी आलो, सहाजिकच डुंबायचा मोह झालाच. हाच ओढा पार करून वाट काटकोनात डावीकडे वळाली आता दरीकडे तोंड केल्यावर समोरच लोभसवाणा कोथळीगड डावीकडे आम्ही आलो ती कळकराईची वाट. पुढील पदरातील सरळ वाट चालू लागलो, मध्ये अनेक एकापेक्षा एक सरस धबधब्यांची सोबत होतीच साधारण वीसएक मिनिटांच्या चालीनंतर पेठवाडीकडे जाणारी मुख्य वाट सोडून उजवीकडची वाट धरली. सौम्य तिरकी चढाई मग पुन्हा जंगलातली आडवी वाट या भागातले जंगल तर खासच त्यात ऐन पावसाळ्यात तर सांगायलाच नको, उंच उंच आभाळाशी स्पर्धा करणारे मोठमोठे महाकाय वृक्ष अगदी टिपिकल भीमाशंकर. थोड्या अंतरावर वाटेचा चौक लागला, यात उजवीकडची वाट बैलदारा घाटाने सावळाला जाते तर डावीकडील खाली मेचकरवाडी- धामणी कडे व सरळ जाणारी वाट जंगलातल्या पुरातन विहीरीकडे. इथेच सोबतच्या जितेंद्र खरेंना वैशाखातला त्यांचा हा ट्रेक आठवला, झाले असे की ते सावळा गावातून याच घाटवाटेने खाली आले मग याच चौकातून उजवी मारून त्या विहीरीजवळ पोहचले. त्यांना जायचे होते पेठवाडीकडे, त्या दिशेने विहीरीपासून सरळपुढे काही अंतर जात पुन्हा वाट वर चढू लागली शेवटी पुन्हा माघार घेत खालच्या पदरातून पेठवाडी गाठली. आता लक्ष्मण भाऊ सोबत हि सर्व चर्चा झाल्यावर असे कळाले की, चौकातून वर चढणारी घाटवाट यालाच गावकरी 'बैलदारा' असे म्हणतात तोच 'पायरी' घाट, जो आमचा आजचा चढाईचा मार्ग आणि सरळ विहीरीच्या पुढे जात जी वाट वर चढते तो 'बैलघाट' ज्याने तळपेवाडीत जाता येते. थोडक्यात आता नावाचा गोंधळ सुटला.
चौकातून सरळ जात वाटेतला छोटा ओढा पार करून दहा मिनिटातच मोठ्या बांधीव पुरातन विहीरीजवळ पोहचलो. चौकोनी अशा विहीरीत मध्यभागातून उतरण्यासाठी दगडी पायर्या, बाजूलाच जनावरांना पाणी पिण्यासाठी दगडी पन्हाळे. दाट जंगलात इतक्या आतल्या बाजूस ही मोठी विहीर पाहून आश्चर्य वाटले, पण एक मात्र खरं पुर्वीच्या काळी कोथळीगडाच्या आसपासचे नाखिंडा, कौल्या, बैलघाट आणि बैलदारा हे प्रमुख वहाते राबता असणारे घाट यात शंकाच नाही त्यासाठीच पाठीवर सामान वाहणार्या जनावरांसाठी हि खास पाण्याची सोय. पावसामुळे आजुबाजूला बराच झाडोरा वाढल्याने फोटो नीट मिळाले नाही. आल्यापावली पुन्हा फिरत चौकात आलो, इथेच लक्ष्मणभाऊचा निरोप घेतला. घड्याळात वेळ १२:१५. बैलदारा घाटाची झाडीभरली चढाई सुरू झाली. छोट्या ओढ्यानजीक वाट बाहेर आली, मागे कोथळीगड तुंगीपासून ते पदरगडाचा भाग सहज नजरेत आला. पावसाने उघडीप दिल्याने हे बघणे शक्य झाले. नागमोडी वळणे घेत अगदी पध्दतशीरपणे रचाई केलेल्या वाटेने पाऊण तासात माथ्यावर दाखल झालो. मुख्य वाटेला काही अंतरावर जात दोन फाटे फुटले डावीकडचा तळपेवाडी तर उजवीकडे सावळा. आम्ही अर्थातच उजवी धरली, एके ठिकाणी पठारावर कड्यावर थांबलो पण इथे येईपर्यंत वातावरण पुर्ण पालटले. खालच्या दरीतून ढगांचे लोंढे वर येत होते हवेत गारठा वाढून पठारावर धुके जमा होऊ लागले. थोडे तरी निवळेल या आशेवर तिथेच बसून राहिलो पण इथून कोथळीगडाच्या आसपासचा नजारा बघणे आमच्या नशिबी नव्हते. भानावर येत घड्याळात पाहिले दिड वाजून गेले होते. पटापट चालत माथ्यानजीकचा उतार उतरलो समोर दुरवर आंध्र धरणाचा फुगवटा आणि मागे ढाकचा डोंगर ओळखु आला. खाली आल्यावर शेताच्या बांधावरून पलीकडच्या डांबरी रस्त्याने सावळाकडे निघालो. सावळा गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घरातून आणलेले दुपारचे जेवण घेतले, अगदी थोडीच वामकुक्षी घेईस्तोर तीन वाजून गेले. पाऊस एकदम बारीक पण आणखी जोर वाढला तर फेण्यादेवी उतरणे अवघड हि शंका जितेंद्रनी बोलून दाखवली त्याचे कारण ही तसेच होते तीन आठवड्यांपुर्वी जेव्हा घोडेपाडी घाटाचा ट्रेक केला होता तेव्हा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे फेण्यादेवी उतरणे रद्द करावे लागले होते. अर्थातच पावसाचा आणि हवामानाचा अंदाज अशा घाटवाटांच्या ट्रेक मध्ये फार महत्वाचा. क्षणात पाण्याची पातळी वाढून हे मोठ्ठाले ओढे पार करणे अवघड आणि अशक्य होते, अशावेळी निसर्गाचा आदर ठेवून माघार घेणे शहाणपणाचे ठरते.
निघतो तोच पाऊस थांबला, हि आमच्यासाठी एक जमेची बाजू. मेटलवाडीची वाट धरली मध्येच गावातले, "काय भीमाशंकर का ? कुठे भीमाशंकर का ?" सारखे विचारत होते. लोणावळा ते भीमाशंकर या ट्रेक मधला हा महत्वाचा टप्पा म्हणूनच... कोंडेश्वर, कुसुर, खांडी, सावळा, तळपेवाडी, वांद्रे, पधारवाडी, कमळजाई ही सर्व या ट्रेकरूट मधली महत्वाची स्थानं.
मेटलवाडीतल्या लोहारांच्या घरापासून उजवीकडे वळालो. सर्वत्र हिरवागार नजारा, सोबतीला वहाता गार वारा त्यावर डोलणारी हिरवीगार भातशेतीची रोपं आणि क्षणातच सुर्यराव ढगाआडून बाहेर आले अचानक वातावरण चांगलेच बहरले. पुन्हा श्रावण ॠतु आपला खेळ दाखवु लागला. फेण्यादेवी घाटाची सुरूवात शोधणे मुळीच अवघड नाही, मेटलवाडी पलीकडे एक मोठा ओढा पश्चिमेकडे झेपावला आहे तोच ओढा उजवीकडे ठेवून मळलेली पायवाट अलगदपणे घाटात घेऊन जाते. उजवीकडे ओढ्यापलीकडे एक मोठे टेपाड दिसते, हेच सरळसोट कळकराईत उतरले आहे. या दोन या वाटेवरच्या मुख्य खुणा. जसजसे पुढे जाऊ लागलो ओढ्याचा आवाज ऐकू येऊ लागला, या पठारावरचे बहुतेक छोटे मोठे ओढे-नाले याच्या मुख्य प्रवाहात सामील होतात. डावीकडच्या कड्याला बिलगुण उत्तम दगडी पायवाट शे दिडशे फुट खाली उतरताच डाव्या हाथाला पुरातण फेण्यादेवीचे ठाणं, पावसामुळे पाला पाचोळा इतरत्र पडलेला काही हिरव्या बांगड्या आणि एकदोन नारळाच्या करवंट्या अशी सध्याची अवस्था. पुर्वापार चालत आलेल्या या वाटांवरचे हे अनगड देवी देवता, प्रत्येक येणारा जाणारा वाटसरूंचे श्रध्दास्थान प्रवासा सुखरूप पार पडून रक्षण करणारी हि पुरातन दैवतं. देवीला मनोमन नमन करून निघालो. आता पुढची वाट काही अंतर ओढयातूनच उतराययची होती. पाऊस जरी थांबला होता तरी पाण्याला वेग होता, अशावेळी एक महत्वाची खुण म्हणजे जर तुम्ही खाली आणि वर पाण्याचा जोर वाढला तर पाण्याचा सफेद रंग बदलून मातकट होतो आणि पातळी अचानक वाढून खालचे दिसणारे दगड धोंडे पाण्याखाली जातात व आधाराला काहीच दिसेनासे होते हिच ती धोक्याची घंटा मानावी. क्षणभर थांबलो नीट निरीक्षण केले, जरी पाण्याला जोर होता तरी ओढ्यातले मोठे धोंडे स्पष्ट दिसत होते. त्यात सध्याचे ओढ्याचे रूप आणि मागच्या वेळी जितेंद्रनी अनुभवलेलं रूप यात खुपच फरक होता. वर आकाश चक्क निरभ्र व उन पडलेले म्हणजेच क्षणात पाऊस येऊन अचानक पातळी वाढण्याचा धोका नाहीच. काठीने काही ठिकाणी पाण्याची खोली तपासत जितेंद्रने उतरायला सुरूवात केली, सावकाशपणे एक टप्पा उतरून वळसा मारतो तोच मुख्य वाट ज्या ठिकाणी ओढ्याला पार करते त्याच ठिकाणी आधाराला मोठे पाईप आडवे लावलेले दिसले सावधपणे पाईपाचा आधार घेत ओढा पार करून मुख्य वाटेला लागलो. आता मागे डावीकडे दरीत झेपावणारा ओढा, पलीकडची मोठी कातळभिंत, खाली गच्च रान हे सर्वच त्या वेळी गुढ भासत होते. पुढे वाटेत आणखी दोन तीन धबधबे लागले पुन्हा मोहात पडलो तरी वेळेअभावी लवकर आवरते घेत उतराई सुरू ठेवली. पाण्याचे काही पाईप अधुन मधुन दिसत होते बहुतेक उन्हाळ्यात कदाचित कळकराईत हे पाणी वापरात असावे. काही वेळातच पदरात दाखल झालो, मस्तपैकी जंगलात काही वेळ शांतता अनुभवत विश्रांती घेतली. ताजेतवाने होत थोडे अंतर पार करताच कळकराईतली शेती दिसू लागली, डावीकडची मळेगाव पिंपळपाड्याची वाट सोडली. शेतं पार करून मोगरजच्या मुख्य वाटे अलीकडे विसावलो, मागे वळून पाहिले तर आम्ही आलो तो मार्ग. सह्याद्रीचा मुख्य कडा, त्या दरडवण्यार्या कातळभिंती, मोठमोठाल्या घळी. इथेच थांबलो असताना कळकराईतले काही वृध्द् आपल्या गुरांसमवेत परतत होते, बोलताना पुर्वीच्या आंध्र धरण बांधकामावेळच्या आठवणी, त्यावेळी या भागातले बहुतांश मंडळी या घाटवाटांनी कायम ये जा करत. अशा नव्या जुण्या विषयांवरच्या गप्पा आटोपत्या घेत, मोगरजला उतरणारी मुख्य वाट धरली. उतरताना समोरच कोथळीगड, पुढे तुंगी ते भीमाशंकरचा मावळत्या उन्हातला नजारा अजुनच सुखावून गेला. ३०-४० मिनिटांतच मोगरजला आलो, डांबरी सडकेने पुढे जात जाधववाडीतून गाडी घेऊन निघालो. फेण्यादेवीच्या कृपेने श्रावणात दोन सुंदर घाटवाटांची सफर अनुभवता आली.

फोटो साठी हे पहा :
https://ahireyogesh.blogspot.com/2017/09/baildara-fenyadevi.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिखाण आवडलं
नवीन माहिती मिळाली
धन्यवाद योगेश

भारी लिव्हलय..
फोटु पाहिजे होते... आम्ही वाजंत्री-भिमाशंकर-बैलघाट(रानशीळ) केलाय त्यामुळे तिथला नजारा कसा असतो ते बघितलाय..

धन्यवाद.. ईनमीन तीन आणि रोमा.
फोटू टाकणे अवघड झाले आहे सध्या , दोन चार वेळा साईट गडबडली.