
भाग पहिला - पार्श्वभूमी
मी भारतातल्या सर्वात उत्तरेकडील लडाख भागात होणाऱ्या, जगाच्या पाठीवरील सर्वात उंच अशा, ‘खारदुंगला चॅलेंज’ नावाने ओळखल्या जाणार्या ७२ किमी अंतराच्या अल्ट्रामॅरेथॉन मधे भाग घेतला होता आणि ती स्पर्धा ९ सप्टेंबर २०१७ रोजी निर्धारित वेळेत पूर्ण केली.
स्पर्धा पूर्ण केल्यावर अनेकजण माझे अभिनंदन करताना म्हणत होते; ‘स्वप्न पूर्ण झाल्यावर कसे वाटते आहे’ पण खरे सांगायचे झाले तर ‘खारदुंग ला चॅलेंज’ हे माझे स्वप्न वगैरे नव्हते. खरोखरच 'खारदुंग ला' बाबतीत एकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या आणि मग ते आपलं ‘असंच झालं’.
पण मग लगेच प्रश्न येतो, की १६ आठवडे आधीपासून योजनाबद्ध तऱ्हेने धावण्याचा सराव करणे, तिथल्या वातावरणाच्या सरावाकरता आधीपासून लडाखमधे जाउन राहणे आणि मग इतक्या मोठ्या अंतराची विरळ हवामानातील भली मोठी स्पर्धा पुर्ण करणे हे 'असेच' कसे होऊ शकते? म्हणजे मुळात मी ह्या स्पर्धेकरता नाव नोंदणी केलीच कशी काय आणि का ? म्हणजे मुळात ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा असे ठरवले तरी का?
तर त्याचे असे झाले की गेले ३-४ वर्षे (म्हणजे साधारणपणे मी धावायला सुरुवात केल्यापासूनच) पुण्याबाहेरच्या कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायला आमच्या ‘ढक्कन अॅथलीट’ क्लबचे सदस्य नेहेमीच एकत्र जात असतो. आमचा चमू कमीत कमी ३-४ पासून ते अगदी ३०-४० पर्यंत कितीही लोकांचा असतो. मुंबई-हैदराबाद सारख्या मॅरेथॉन करता जास्त माणसे जमतात. ऑरो व्हील, 'रन द रण', किंवा लोणार अशा ठिकाणी जरा कमी माणसे येतात. साधारणपणे ३ वर्षांमागे असेच अरुणची मनापासून ईछा होती म्हणून आम्ही लडाख मॅरेथॉनमधे भाग घेण्याकरता गेलो होतो. अर्थात त्यावेळी ४२ किमी अंतराची पूर्ण मॅरेथॉन हेच आमचे ध्येय होते. वातावरणाचा सराव व्हावा म्हणून जाताना श्रीनगरहून रस्त्याने वर लेहला जायचे ठरवले होते आणि तसे विमानाने श्रीनगर पर्यंत पोचलो देखील होतो. पण त्यावेळी मला घरगुती निकडीमुळे श्रीनगरहून परत यावे लागले होते आणि बाकीची मंडळी श्रीनगर येथे पुरात अडकली होती. अगदी आदल्या रात्री गाडीरस्त्याने लेहला कसेबसे पोचल्यावर त्यातल्या दोन जणांनी हाफ मॅरेथॉन तर एकाने पूर्ण मॅरेथॉन धावून पूर्ण केली. बहुतेक त्याचवेळी आमच्या गृपच्या मनात, ‘खारदुंगला चेलेंज’ - जगाच्या पाठीवरील सर्वात उंचावरील गाडीरस्त्यावर धावायच्या ईच्छेचे बीज रोवले गेले. अर्थात त्याही वेळी माझा भाव, माझ्याकरता हे अशक्य कोटीतले आहे, ज्यांना करायचे आहे ते करतील आपण आपली राहिलेली फुल मॅरेथॉन करू असाच होता.
त्यावेळी मला असे अचानक परत यावे लागल्यामुळे राम ने माझ्याकरता एक खारदुंग ला चॅलेंज लडाख worlds highest marathon ५३७० मी. असे लिहिलेला ‘मग’ आणला होता जो तेव्हापासून माझ्या ऑफिसातल्या टेबलावर विराजमान आहे. तो ‘मग’ अधूनमधून आठवण करून देई की आपल्याला परत लडाख ला जायचंय. पण ते तितपतच.
त्यामुळे मागच्या वर्षी देखील तिकडे जायचे घाटले गेले नव्हते. या वर्षासाठीचे मनसुबे जेव्हा आखले गेले तेव्हा मी आमच्या मित्रमंडळींसोबत हजर नव्हतो पण अशा अनेक स्पर्धा एकत्र जाउन धावून आलो असल्याने मी सगळ्यात आधी नावनोंदणी आणि विमानाचे बुकिंग करून मोकळा झालो. तेव्हा बाकीचे सगळे ‘आज-उद्यातच नाव नोंदणी करतो’ मोड मधे गेले, मी ही म्हटले करतीलच ते. पण झाले भलतेच !
ही स्पर्धा साधी नव्हती, विरळ हवेतले ७२ किमी असल्याने इच्छुक सहभाग्याने गेल्या ३ वर्षात किमान दोन पूर्ण मॅरेथॉन पाच तासाच्या आत पूर्ण केलेले हवे अशी पूर्वअट होती; ती पूर्ण करू न शकल्याने आमच्यातले दोनजण गळाले. आणि बाकीच्यांसोबतही अशी काही परिस्थिती उद्भवली की ते दोघेही येणार नाहीत असे निश्चित झाले. थोडक्यात काय तर ज्या मित्रांनी ह्या वर्षी ‘खारदुंग ला’ करायचे ठरवले होते त्यांना जमणार नाहीये हे निश्चित झाले. मग सुरु झाली बोलणी; ‘तूही एकटा कशाला जातोस आपण पुढच्या वर्षी जाउ’ विरुद्ध ‘तू खारदुंग ला पुढच्या वेळी कर यावेळी फुल / हाफ मॅरेथॉन धाव’ वगैरे बोलणी. पण खाईन तर तुपाशी न्यायाने कोणीही हाफ / फुल्ल मॅरेथॉन करायला तयार होईना. नावनोंदणी खेरिज विमानाचे केलेलं बुकिंग, मिळालेली रजा, चालू केलेले ट्रेनिंग हे सर्व पाहता मी ठरवले की आपण जायचेच. त्याशिवाय मी जाणारच असे सांगून पाहू म्हणजे एखादेवेळी शेवटी का होईना ह्यांच्यापैकी कोणी ना कोणीतरी येईलच असा एक होरा होता. (जो भरवशाच्या लोकांबाबत खोटा ठरला). पण आमच्या ग्रुप मधला एक वेगळाच, तुलनेने नवा गडी, निखील पूर्ण मॅरेथॉन करता नाव नोंदता झाला त्यामुळे परिचयातील एकजण तरी लडाख मध्ये माझ्याबरोबर असेल हे निश्चित झाले आणि नाही म्हटले तरी जरा हायसे वाटलेच. तसेच अजून एक राम, राम अय्यर हा देखील हाफ मॅरेथॉन करणार होता. निखीलने त्याचे रजिस्ट्रेशन करण्या अगोदर, ‘मी एकटा तिकडे जावून करणार तरी काय’ असे वाटून माझ्या तिथल्या वास्तव्याच्या काळात असलेल्या ‘स्टोक कांगरी’ ट्रेकचेही बुकिंग ‘ट्रेक द हिमालय’ कंपनीकडून करून टाकले. म्हटले तेवढेच जरा कंपनी मिळेल नवीन ओळखी होतील. मी तिकडे ३० ला पोचणार होतो आणि हा ट्रेक ३० ऑगस्ट पासून ६ सप्टेंबर पर्यंत असणार होता. माझी स्पर्धा ९ तारखेला असल्याने हे जमण्यातले होते. (गंमत अशी की हा असा वातावरणाचा सराव व्हावा आणि कंपनी मिळावी म्हणून आणि तारखेत सहज बसतो म्हणून बुक केलेला ट्रेक २०००० फूट उंचीवरचे शिखर असलेले ‘द स्टोक’ आहे हे मला अजिबात माहित नव्हते. नंतर जेव्हा मित्राकडून आणि अधिक वाचून त्याबद्दल कळले तेव्हाच मी ठरवून टाकले की जमले तरच समिट करायचे नाहीतर सोडून द्यायचे. डोंगर काही कुठे पळून जात नाही परत जाऊ.)
नाही म्हटले तरी आजवरच्या सगळ्या स्पर्धाकरता कोणी ना कोणी सोबत असताना जथ्याने गेल्यामुळे एका कम्फर्ट-झोनमधे वावरायची सवय झाली होती. त्यामुळे आमच्या ग्रुपमधला मी एकटाच जाणार असे कळल्यावर थोडे धाकधूक ही वाटत होते पण मग मलाच वाटले असे किती दिवस चालणार. मुंबई मॅरेथॉन करता जाता येताना आम्ही सगळे एकत्र असलो तरी प्रत्यक्ष स्पर्धेत धावताना सगळेच्या सगळे अंतर मी एकट्याने धावलो होतो, तेव्हाही मला असाच डिस्कमफर्ट जाणवला होता आणि त्यामुळे कम्फर्ट झोनबाहेर पडण्याची निकड तेव्हापासूनच प्रकर्षाने जाणवत होती. मग मनाशी म्हटले हीच ती वेळ, आता अनायासे अशी परिस्थिती उद्भवली आहे तर मागे हटणे नाही. त्याशिवाय आता तर स्टोक कांगरी ट्रेक करताही पैसे जमा करून झाले होते आणि ऑफिसकडून रजा मंजूर झाली होती त्यामुळे म्हटले होउन जाऊ द्या.
हे हिमालया, मी येतोय.
भाग २ - वातावरणाच्या सरावाकरता केलेला स्टोक कांगरी ट्रेक
https://www.maayboli.com/node/64089
आला आला ढाण्या वाघ वृत्तांत
आला आला ढाण्या वाघ वृत्तांत घेऊन आला. लै भारी. मजा येतेय वाचायला, लगे रहो.
एक चँप आणि तू, तुम्ही दोघे सातत्याने काहितरी प्रेरणादायी करत असता एन्ड्युरन्स क्रिडाप्रकारात त्याचा 'माज' न करता ते वाचायला फार भारी वाटते.
जबरी रे ! मी वाटच पहात होतो
जबरी रे ! मी वाटच पहात होतो कधी लिहीतोस त्याची.
छान सुरूवात. तपशीलवार वाचायला
छान सुरूवात. तपशीलवार वाचायला मजा येणार.
मस्तच....
मस्तच....
पुढचे भाग पटापट टाका. पुभाप्र....
बरेच दिवस वाट पहायला लावली
बरेच दिवस वाट पहायला लावली हर्पेनदा, आता पुढचे भाग लवकर येऊ देत..
बाकी.. टवणेसर +१
धन्यवाद मंडळी,
धन्यवाद मंडळी,
पुढचे भाग लगोलग देण्याचा मानस आहे.
इतकं सारं लिहायचे म्हणजे किती कष्ट पडतात
पण एक वाचक म्हणून सगळं लिखाण पटापट यावं ह्या भावनेशी मी सहमत आहे.
बरेच काही लिहून झाल्यावरच पहिला भाग टाकला आहे.
म्हणून जरा उशीर झाला.
मस्त रे हर्पेन
मस्त रे हर्पेन
>>>>>एक चँप आणि तू, तुम्ही दोघे सातत्याने काहितरी प्रेरणादायी करत असता एन्ड्युरन्स क्रिडाप्रकारात त्याचा 'माज' न करता ते वाचायला फार भारी वाटते. >>>>> +७२ किमी
एकच नंबर भारी जमलाय हा भाग.
एकच नंबर भारी जमलाय हा भाग.
सगळं काही सविस्तर येऊ दे, काहीही स्कीप करू नको, भावी रनर साठी हे एक परफेक्त गाईड ठरेल यात शंकाच नाही
वा वा!!! वाट बघतोय!
वा वा!!!
वाट बघतोय!
वा, सुंदर सुरुवात.
वा, सुंदर सुरुवात.
चांगलाच धाडसी अाहेस रे बाबा..
चांगलाच धाडसी अाहेस रे बाबा..... ग्रेट.....
वावा , मस्त सुरुवात !
वावा , मस्त सुरुवात !
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
पुढचेही भाग टाकले आहेत
आशू - मला लिहायला नीट जमत नाही. होप तुला जे अपेक्षित होते तसे माझे लिखाण उतरले असावे.
भारीच अचिव्हमेंट आहे ही.
भारीच अचिव्हमेंट आहे ही.
तीन वर्ष झाली !
तीन वर्ष झाली !
स्वप्नवत् वाटते आहे माझे मलाच!
त्यावर्षी ७२ केले होते ते ह्या वर्षी २७ पण कसेबसे जमतील अशी परिस्थिती आहे.
करोनामुळे प्रवासावर निर्बंध आल्याने हिमालयात जाता येणार नसल्याने अजूनच जास्त आठवण येते आहे
हर्पेन.. हे मी आधी वाचले
हर्पेन.. हे मी आधी वाचले नव्हते.. ३ न्ही भाग वाचले आज.. मस्तच... हिमालयात एवढ्या उंचीवर.. तेही अल्ट्रामॅरॅथॉन.. सलाम!
अगदी डोळ्यासमोर आला सगळा तो प्रदेश.. मस्त लिहीले आहेस.
माझा हिमालयाशी संबंध म्हणजे २००२ मधे केसरी टुर बरोबर केलेली हिमाचल प्रदेशची ट्रिप.. डलहौसी, चंबा, धर्मशाळा,, कुलु, मनाली व सिमला.... पण तेव्हा बघीतलेली चिनार, देवदारची झाडे व लांबवर दिसणारी हिमाच्छादित शिखरे.. खरच नयनरम्य दिसत होती...
अर्थात तु १८००० फुटावर... म्हणजे अबॉव्ह द ट्री लाइन धावलास.. इतक्या विरळ हवेत तु अल्ट्रामॅरॅथॉन पुर्ण केलीस.. धन्य आहेस!
मी अमेरिकेत कॉलोराडो रॉकीज मधे रॉकी माउंटन नॅशनल पार्कमधे लाँग्स पिक( १४२५९ फुट) वर ४-५ वेळा हाइकींग केले आहे... एकदाही शिखरावर पोहोचलो नाही... शेवटचे १५०० फुट फारच टेक्निकल क्लाइंब आहे...प्रत्येक वेळेला झेपला नाही.. पण १२५०० फुटावर चॅझम लेक म्हणुन तळे आहे..आम्हाला तिथपर्यंतही पोहोचल्याचा आनंद खुप होता.
पण माझा सगळ्यात अविस्मरणिय अनुभव १९९७ ला आम्ही ३ मित्रांनी मिळुन... अॅरिझोनाला..संपुर्ण ग्रँड कॅनिअन हाइक .. ब्राइट एंजल ट्रेल वापरुन... एका दिवसात ..खाली कॉलोराडो नदिपर्यंत जाउन परत वर येउन पुर्ण केली होती.. कधीतरी तो अनुभव शब्दात पकडायचा प्रयत्न करीन.
तुझ्या पुढील साहसांकरता शुभेच्छा!
अरे हो... तुझ्या ऑफिसच्या
अरे हो... तुझ्या ऑफिसच्या डेस्कवर जे विचार लिहीले आहेत.. ते मला खुप आवडले.
धन्यवाद मुकुंद खाली कॉलोराडो
धन्यवाद मुकुंद
खाली कॉलोराडो नदिपर्यंत जाउन परत वर येउन पुर्ण केली होती.. कधीतरी तो अनुभव शब्दात पकडायचा प्रयत्न करीन. >>> आता ह्याची वाट बघणे आले.