चेहरा दुखरा!

Submitted by vilasrao on 29 September, 2017 - 08:32

मनाने सोसते ती घेतली पण फारकत नाही
तशी ती आज मंगळसूत्र काही वापरत नाही

म्हणावे जर समाजाला कधी ती घाबरत नाही
जशी बिनधास्त होती काल आता वावरत नाही

वडाला घेत गिरकी तर तशी मग आजही असते
रुढी वेढून आहे की तिला ती सोडवत नाही

घटस्फोटामुळे मायेस हक्काच्या मुले मुकती
तिची माघार यासाठी तिला हे सोसवत नाही

मुखौटा हासरा ती चेहऱ्याला नेसवत असते
कधीही चेहरा दुखरा कुणाला दाखवत नाही

विलास खाडे

Group content visibility: 
Use group defaults

व्वा विलासरावजी,छान मांडलीत विदारक अगतीकता!
दुसरा शेर,तिसरा खयाल अधीक आवडले!
बऱ्याच दिवसांनंतर माबोवर? लिहिते झालात ही आनंदाची बात! पुलेशु!

सत्यजित आपले मनापासून आभार! बऱ्याच दिवसांनी आलोय अन कालपासून तुमच्या गजला एक एक करून शांततेत वाचत आहो! इतक्या सुंदर आहेत की प्रतिसाद लिहिण्यात वेळ दडवावा वाटत नाही! संपूर्ण वाचून झाल्यावर प्रतिक्रिया द्याव्या असे वाटले!

खूप-खूप मनापासून धन्यवाद विलासरावजी!आपल्या कौतुकाची पोच मिळाली,त्याबद्दल आभार! निवांत वाचा,लिहीत रहा! शुभेच्छा!