धर्म शास्त्र आणि निर्णय

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 28 September, 2017 - 13:31

शृती स्मृती पुराण व वेद यांपैकी आपण हिंदू धर्मातील आधारभूत ग्रंथ नक्की कोणते मानावेत याबद्दल काही वेळा संभ्रम निर्माण होतो . याचे कारण असे की आज आपण ज्याला हिंदू धर्म म्हणतो तो धर्म अनेक स्थित्यंतरातून गेलेला आहे . वेदकाल हा साधारण इ . स . पूर्व ८००० वर्षे ते मौर्य चंद्रगुप्त काल म्हणजे इ स पूर्व ५०० पर्यंत .याकाळात सुरुवातीला वेद त्यानंतर उपनिषदे आरण्यके रचली गेली . पौराणिक काल हा साधारणपणे इ स पूर्व ५०० ते इ स १२०० पर्यंत मानला जातो . या काळात वैदिक धर्मास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले . सुरुवातीला बुद्ध जैन चार्वाक आदि बंडखोर विचारवंतांच्या आधुनिक धर्मविचारांचा सामना करावा लागला याच काळात हिंदू धर्मात अनेक स्थित्यंतरे झाली . आदि शंकराचार्य ना याच काळात हिन्दू धर्मसंरक्षणाचा आणि प्रसार प्रचाराचा मोठा कार्यभाग उचलावा लागला .

आणि नंतर इस्लामी व ख्रिस्ती धर्मप्रसारकांशी लढावे लागले . त्यावेळीच कट्टर सनातनी विचार अस्तित्वात आले . हा काल साधारण इ स १२०० ते इ स १८०० पर्यंत ठरतो , आक्रमणे आणि धर्मांतरे थोपवताना धर्म अधिकाधिक कट्टर व सनातनी बनला .

अठराव्या शतकानंतर हळूहळू सुधारणावादी प्रवृत्ती वाढीस लागल्या याचे कारण इंग्रजी शिक्षण... अशाप्रकारे बदल aअणि स्थित्यंतरे होत आजचा सबगोलंकारी हिंदू समाजधर्म बनला आहे .

स्थूलमानाने विचार करता वैदिक , पुराणकालीन , सनातनी आणि सुधारणावादी असे चार मुख्य बदल किंवा ट्प्पे हिंदू धर्मात आहेत .

अशा चार टप्प्यांवर जी धर्मग्रंथ निर्मिती झाली त्याची सामाजिक पार्श्वभूमी विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते . मग आपण जेव्हा आपण म्हणतो कि अमुक शास्त्रनियम अथवा धर्मनिर्णय अमुक पुस्तके अथवा ग्रंथाधारित आहे , त्यावेळी उपरोल्लेखित सामाजिक अवस्थेचा संदर्भ जोडून त्याकडे पाहणे अपेक्षित असते . उदाहरणार्थ जसे सती प्रथेबाबत काही धर्मग्रंथात नियम असले तरी आज ते उल्लेख अप्रस्तुत ठरतात कारण आज सतीप्रथा कायद्याने मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो . त्याच धर्तीवर गुरुचरित्रादि ग्रंथातील अनेक शास्त्रादेश हे पंधराव्या शतकातील सामाजिक परिस्थितीला अनुलक्षून दिलेले आहेत . तद्वतच ते आजच्या काळात प्रासंगिक अथवा सयुक्तिक ठरतील असा भरवसा देता येत नाही ...

यास्तव धर्म शास्त्र ग्रंथ आणि नियम आदेश रूढी परंपरा याबाब्त पोथीनिष्ठेपेक्षा सद्यकालीन वर्तमानातील सामाजिक परिस्थितीचे आकलन करून तारतम्याने बोलावे लागते . अन्यथा ज्ञानेश्वरांना जसे पैठणचे धर्मपीठ निकाल देण्यास असमर्थ ठरले तसा प्रकार व्हायची वेळ यायची ...

असो
इत्यलम

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामीजी आपल्या बर्‍याच मुद्द्यांशी सहमत व्हावेसे वाटते
माझ्याकडून थोडे आणखी मुद्दे-
१. एकूण वेद वान्ङ्मयापैकी सध्या फारच थोड्या प्रमाणात ज्ञात / उपलब्ध आहे असे मागे ऐकले / वाचलेले आठवते . नालंदा-तक्षशीला विद्यापीठ विध्वंसात आणि अन्य ठिकाणच्या इस्लामी आक्रमणांत मोठ्या प्रमाणात वेदवान्ङ्मय भस्मसात झाले . त्यात काय होते? हे कधीच कळू शकणार नाही का? हा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे असे ॑ वाटते .

२. तुम्ही ज्यास सुधारणावादी हिंदू धर्म म्हणालात त्यात स्वामी विवेकानंदांचे योगदान देखील महत्त्वाचे आहे. प्राचीन धर्मज्ञानाची पुनर्मांडणी आणि पुनर्मूल्यांकनाचे तसेच हिंदू धर्मातील मूल्यवान ज्ञानखजिन्याची पाश्चात्य जगास ओळख करून देण्यात विवेकानन्दांचा मोठा वाटा आहे.
त्याचप्रमाणे मॅक्समुलर आदि विद्वानांनी केलेल्या वेदांच्या भाषान्तराचा मोठा प्रभाव विसाव्या शतकातील हिंदू धर्म अभ्यासकांवर पडला हे सत्य नाकारून चालणार नाही .

>>>>>वेळी उपरोल्लेखित सामाजिक अवस्थेचा संदर्भ जोडून त्याकडे पाहणे अपेक्षित असते . उदाहरणार्थ जसे सती प्रथेबाबत काही धर्मग्रंथात नियम असले तरी आज ते उल्लेख अप्रस्तुत ठरतात कारण आज सतीप्रथा कायद्याने मनुष्यवधाचा गुन्हा ठरतो . त्याच धर्तीवर गुरुचरित्रादि ग्रंथातील अनेक शास्त्रादेश हे पंधराव्या शतकातील सामाजिक परिस्थितीला अनुलक्षून दिलेले आहेत . >>>>>
1) यात राजसत्ता ही धर्मसत्तेच्या वर आहे असे गृहीतक आहे.(मला ते मान्य आहे, बाकी धर्मनिष्ठाना मान्य आहे का हा प्रश्न आहे)
2) आजच्या सामाजिक परिस्थितीला अनुलक्षून धार्मिक बाबींची पुनर्बांधणी करायची जबाबदारी आजचे शंकराचार्य का स्वीकारत नाहीत?

सती प्रथाबंदी म्हणजे इंग्रजांनी धर्मात केलेली ढवळाढवळ आहे असे समजून त्या काळी धर्ममार्तंडांनी न्यायालयात दाद मागितली होती असे ऐकून आहे. इंग्रजांनी राज्य करावे पण आमच्या धर्मात ढवळाढवळ करु नये असे विचार त्याकाळी होते

ज्याला आपण हिंदू संस्कृति म्हणतो त्या संस्कृतित अनेक वेगळे पंथ आहेत. अनेक गुरुंच्या गुरु शिष्य परंपरा आहेत. उदा. वैष्णव, शैव, नारायण, सौर, गाणपात्य, भागवत, वारकरी, शाक्त, अघोर, जैन, बौद्ध, शीख, नाथ, दत्तात्रय, देवी,चार्वाक, वैदिक त्यातही ब्रह्मसंप्रदाय आदित्यसंप्रदाय, ऋग्वेदाच्या विविध शाखा, यजुर्वेदाच्या विविध शाखा, सामवेदाच्या विविध शाखा, अथर्ववेदाच्या शाखा इ. इ.

या सर्वांचे तत्वज्ञान, परंपरा एकच नाही. त्यामुळे अनेकदा एकच नियम सर्वत्र एकसारखा दिसून येत नाही.

यामुळे अनेक नियमांबाबत गोंधळ होतो कारण आपणास एकाच संप्रदायाचे नियम माहिती असतात अन्य संप्रदायाचे नियम त्याचे विरुद्धही असू शकतात. यामुळेच अनेकदा गोंधळाची परिस्थिति निर्माण होते.

वेगवेगळ्या समुदायांच्या परंपरा ही भिन्न असतात.