व्यक्त व्हावयाचा

Submitted by निशिकांत on 19 September, 2017 - 01:07

संकल्प आज केला गजला लिहावयाचा
करतो प्रयत्न आहे मी व्यक्त व्हावयाचा

मनमोकळेपणाने स्वप्नात भेटशी तू
म्हणुनीच ध्यास आहे लवकर निजावयाचा

दारास पिंजर्‍याच्या ठेवू नकोस उघडे
माझा स्वभाव आहे गगनी उडावयाचा

धागे अनेक तुटले उसवून पूर्ण गेलो
नाही विचार कोणासंगे जुळावयाचा

सुकल्या फुला कधी का येतो पुन्हा तजेला?
हव्यास का करावा अंटी नटावयाचा?

खाते दिवाळखोरी लिहिण्यात अर्थ नाही
माझा लिलाव धनको म्हणतो करावयाचा

मी अश्वमेध केला जेंव्हा तरूण होतो
करतो सराव आहे आता हरावयाचा

ते साळसूद नेते फसवी मधाळ वाणी
असतो मनी इरादा गल्ला भरावयाचा

"निशिकांत" का उदासी डोळ्यात अंत समयी?
आहे प्रघात अपुले कोणी नसावयाचा

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users