झाशीची राणी!

Submitted by suhasg on 18 September, 2017 - 16:06

सोमवारची एक प्रसन्न सकाळ , मी दिवसभराच्या कामाची आखणी करत होतो, आज अपॉईंटस कमी होत्या त्यामुळे काही जुनी साचलेली कामे कशी हातावेगळी करता येतील त्याबद्दल विचार करत होतो इतक्यात फोन वाजला...

“हॅलो, गोखले सर ना?’

”हो , मी सुहास गोखलेच बोलतोय, आपण?”

“मी अंकिता बोलत्येय”

“सुप्रभात अंकिताजी, कशाच्या संदर्भात फोन केलाय आपण?”

“आपण ज्योतिष बघता ना?”

“बरोबर, मी पत्रिका बघून भविष्य विषयक मार्गदर्शन करतो”

“एरव्ही तशी मी कोणा लल्लु पंजु ज्योतिषाला पत्रिका वगैरे दाखवत फिरत नाही पण आपल्याला भेटावेसे वाटले म्हणून फोन केला”

“अहो पण नाशकातल्या इतर ज्योतिषांचा तुलनेत मी ‘लल्लु पंजु’ च आहे त्याचे काय? ”

“काही तरीच काय हो काका, तुमच्या बद्दल बरेच चांगले ऐकले आहे म्हणून भेटावे वाटले”

“धन्यवाद, पण आपण कशा साठी भेटणार आहात?”

“अहो असे काय विचारता! ज्योतिषी ना तुम्ही?”

“हो”

“मग तुमच्या कडे ज्योतिष विचारायलाच येणार ना? का तुमच्या बरोबर सेल्फी काढून घ्यायला!”

“हो तेही खरेच म्हणा. तसाही माझ्या बरोबरचा सेल्फी काहीच्या काही दिसेल”

“असे नाही काही, तुमचा फेसबुक वरचा फोटो मस्त आहे”

“तो फोटो शॉप केलेला आहे, प्रत्यक्षात मी तसा दिसत नाही”

“पण मला कोठे सेल्फी काढायचाच तुमच्या बरोबर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार त्याचे उत्तर तुम्ही द्यायचे “

“म्हणजे तुम्हाला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे आहे असेच ना?”

“हो पण आणि नाही पण’

“म्हणजे? मला कळले नाही”

“मी आपल्याला भेटले की सगळा खुलासा होईल”

“आपण ज्योतिष विषयक मार्गदर्शना संदर्भात भेटणार असाल तर ठीक पण 'आपलं सहजच भेटायचेय' , 'ज्योतिष अभ्यासातल्या शंकां विचारायच्यात' , 'ज्योतिष खरे का खोटे यावर चर्चा करायचीय' अशा साठी वेळ देऊ शकत नाही, क्षमस्व”

“तसले काही नाही माझे काम वेगळेच आहे . खरे सांगायचे तर मला ज्योतिषा कडे जायची गरजच नाही पण तरीही आपल्याला भेटणार आहे ”

“तुम्ही मला गोंधळात टाकता आहात , आपला काही प्रश्न असेल तर आपल्याला ज्योतिषा कडे जायला लागणार ना? मग ज्योतिषा कडे जायला लागणार नाही असे का म्हणता आहात?”

“मी कशाला जाऊ ज्योतिषा कडे ? उलट ज्योतिषांनीच माझ्याकडे आले पाहीजे!”

“कशाला?”

“अहो कशाला म्हणुन काय विचारता, माझी पत्रिका बघायला ?”

“पण चांगला, बिझी ज्योतिषी सहसा जातकाच्या दारात जाऊन होम सर्व्हीस देत नसतो, काही वेळा जातक कोणी खास व्यक्ती, सेलेब्रिटी असेल, झेड प्लस सिक्युरीटी वाला राजकारणी असेल तर गोष्ट वेगळी, मी स्वत: अशा लोकांच्या साठी त्यांच्या इगतपुरी, पनवेल अशा ठिकाणच्या फॉर्म हाऊसेस वर , मुंबईला मलबार हिल वरच्या आलिशान बंगल्यांत गेलो आहे पण त्या अपवादात्मक अशा स्पेश्यल केसेस होत्या”

“मी सेलेब्रीटी नाही पण माझी पत्रिका तुम्ही म्हणता तशी अपवादात्मक स्पेश्यल आहे, म्हणून ज्योतिषांनीच माझ्या कडे आले पाहीजे”

“असे काय स्पेश्यल आहे?”

“ते मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनच सांगेन “

“चला , निदान त्या साठी का होईना तुम्ही माझ्या सारख्या लल्लु पंजु ज्योतिषाला स्वत: येऊन भेटायला तयार आहात तर”

“हां, काही वेळा असे करावे लागते”

“तुम्ही म्हणता तशी तुमची पत्रिका स्पेश्यल असेल तर मला त्याचा अभ्यास करायला आवडेल”

“पत्रिका ठेवा बाजूला, नुसते माझ्या चेहेर्‍या कडे बघून माझ्या प्रश्नाचे उत्तर देता आले पाहीजे”

“अहो पण मी ‘फेस रिडींग’ करणारा म्हणजे चेहेरा पाहून भविष्य सांगणारा नाही”

“मग कसले ज्योतिषी म्हणायचे तुम्ही”

“पत्रिका बघून ज्योतिष सांगणारा “

“ते माहीती आहे मला पण माझा प्रश्न इतका सरळ आहे की चेहेरा पाहूनच उत्तर आले पाहीजे ते जमले नाही तरी पत्रिका बघून का होईना, एका मिनिटांत उत्तर देता यायला पाहीजे”

“हे बघा , मी माझ्या पद्धतीने काम करतो आणि ‘एका मिनिटांत उत्तर द्या’ अशा अटीं घालून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाही”

“काका, रागावलात?”

“माझी कामाची पद्धत आणि आपल्या अपेक्षा यात मेळ बसत नाही असे दिसतेय”

“ते एक मिनीटाचे जाऊ दे , तुम्हाला लागेल तेव्हढा वेळ घ्या पण माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.. “

“ठीक आहे, पण त्यापुर्वी आपली सर्व माहीती आणि आपला प्रश्न आधी कळला पाहीजे”

“का?”

“त्याचे असे आहे , मी प्रथम माझ्या पद्धतीने पत्रिका तयार करतो मग जातकाने विचारलेल्या प्रश्नाच्या अनुरोधाने पत्रिकेचा सखोल अभ्यास करतो आणि मगच उत्तर देतो , या सगळ्यांना बराच वेळ लागतो, काही वेळा दोन तासां पेक्षा जास्त, तुमचा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे त्यावर अवलंबून असते हे”

“मी आत्ता काही माहीती देणार नाही, आपण भेटू तेव्हा सगळी माहीती देत्ये , प्रश्न पण सांगत्ये , मग तुम्ही पत्रिकेचा काय तो अभ्यास करा, किती का वेळ लागेना तो पर्यंत मी तुमच्या समोर खुर्चीत बसुन राहीन”

“तसे जमणार नाही”

“का?”

“अहो मी काम करत असताना तुम्ही समोर असणार , तुम्ही चुळबुळ करणार , अधून मधून काही बाही विचारत राहणार, त्याने माझ्या कामात व्यत्यय येणार, ते मला चालणार नाही शिवाय मी माझे काम करत असताना दुसरा कोणी माझ्या कडे एकटक बघत बसला आहे ही कल्पनाच मला सहन होणार्‍यातली नाही”

“मग कसे करायचे”

“तुम्ही आपली माहीती , प्रश्न सांगा, मी अभ्यास करुन ठेवतो आणि त्यानंतर एकमेकांच्या सोयीने वेळ ठरवू तेव्हा माझ्या ऑफिस मध्ये या, मी आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर सांगेन”

“मला माझा प्रश्न आधी सांगायचा नाही आणि माहीतीही अशी फोन वरुन देणार नाही”

“मी समजू शकतो, स्त्रीयांचे प्रश्न अत्यंत खासगी असतात, ते फोन वर सांगताना त्यांना संकोच होतो, ठीक आहे आपण असे करु , आपण माझ्या कडे याल तेव्हा माहीती द्या , प्रश्न सांगा, शक्य झाले तर मी लगेच उत्तर देईन पण जास्त वेळ लागणार असेल तर एका बैठकीत काम होणार नाही, आपल्याला नंतर पुन्हा एकदा भेटायला लागेल”

“दुसर्‍यांदा यायला लागणारच नाही, तुमच्या सारख्या तज्ञ ज्योतिषाला जास्त वेळ लागणारच नाही, मला खात्री आहे ना”

“धन्यवाद, तुमची माहीती आणि प्रश्न कळल्या शिवाय किती वेळ लागेल ते सांगता येणार नाही. पण मी प्रयत्न करतो.”

“मग मी केव्हा येऊ?”

“याच आठवड्यात भेटू आपण पण त्यापूर्वी माझे मानधन आपल्याला माझ्या बँक खात्यात जमा करावे लागेल, ते जमा झाले की एक-दोन दिवसात भेटीची वेळ देतो”

“हे मानधनाचे काय?”

“अहो, मी व्यावसायीक ज्योतिषी आहे , माझ्या सेवेचे योग्य ते मूल्य मिळायला हवे ना?”

“ते ठीक आहे पण मानधन आधी बँकेत भरायचे म्हणजे..”

“त्याचे काय आहे, मला बरेच अप्रिय अनुभव आलेले आहेत म्हणून मी आता मानधन जमा झाल्या शिवाय काम सुरु करत नाही”

“मानधन भरलेच पाहीजे का?”

"हो, त्याला माझा नाईलाज आहे, व्यवसाय आहे त्याची काही पथ्ये मला पाळावीच लागतात”

“मानधनाचे काय ते भरेन मी पण मला असे वाटते की माझे काम मानधना न देताच व्हायला हवे..”

“माफ करा , मी मोफत ज्योतिष सांगत नाही, आपला मोफत चा आग्रह असेल तर आपले जमणार नाही”

“मला मोफत काही नक्को, मला असे म्हणायचे आहे की मला मानधन भरायची गरजच भासणार नाही, माझी पत्रिकाच अशी आहे की आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन वर जाताना मलाच पैसे द्याल , ”

“काय म्हणता , मी तुमची पत्रिका तपासायची , तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे वर जाताना तुम्हालाच पैसे द्यायचे?”

“हो, अगदी अस्सेच , माझी पत्रिका आहेच तशी स्पेश्यल, फार कमी लोकांची अशी पत्रिका असते, अशी पत्रिका अभ्यासायला मिळाल्या बद्दल तुम्ही स्वत:ला भाग्यवान समजाल, आहात कोठे?”

“अच्छा, पण तसे असले तरी मी असले काही करत नसतो, म्हणजे मी पत्रिका अभ्यासायला मिळाली म्हणून कोणाला पैसे दिले नाहीत आणि देणार ही नाही. शिवाय मी फुकट ज्योतिषही सांगणार नाही. मला वाटते आपण आता थांबावे, माझ्या कडून आपले काम होईल असे वाटत नाही”

“काका पुन्हा रागावलात”

“आपल्या अपेक्षा काहीतरी वेगळ्या आहेत आणि मी त्या बाबतीत काही करु शकणार नाही तेव्हा नुसत्या गप्पा मारण्यात कशाला वेळ वाया घालवायचा?”

“माझी पत्रिका बघितल्यावर आपले मत बदलेल!”

“पुन्हा तेच, हे पहा आता शेवटचे सांगतो, मी मानधन घेतल्या शिवाय काम करत नाही, लक्षात आले?”

“मानधन देईन मी त्यात काय ? पण किती मानधन घेता तुम्ही?”

“माझे मानधन आपण विचारलेल्या प्रश्नांची संख्या , प्रश्नांचे स्वरुप यावर अवलंबून असते , आता आपण प्रश्न सांगायला तयार नाही मग मानधनाची रक्कम कशी ठरवणार?”

“म्हणजे चांगलीच अडचण निर्माण झाली म्हणायची की”

“हो, तसेच दिसते आहे पण आपण असे करु, मी तुम्हाला वेळ देतो, त्या दिवशी आपण रुपये xxxx घेऊन या . आपण आलात की लगेच आपला प्रश्न सांगा, मी मानधना बद्दल बोलतो. रक्कम योग्य वाटली तर आपण मानधन कॅश मध्ये द्या आमने सामने. मी लगेच आपले काम सुरु करतो, मानधनाचे नाही पटले तर आपण वापस जाऊ शकता”

“पण माझी पत्रिका पाहून तुम्हाला मलाच उलट पैसे द्यावे वाटले तर?”

“मी असे उलट पैसे देणार नाही हे आधीच स्पष्टपणे सांगीतले आहे”

“मला उलट पैसे द्यायचे की नाही हे तुम्हीच ठरवा , माझा आग्रह नाही, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की झाले”

“ठीक आहे, मी माझ्या पुढच्या अपॉईंट्मेंट तपासतो, फोन होल्ड करा जरा”

“हो काका”

...

“अंकिताजी, हॅलो, आर यु देअर? ”

“हा काका, केव्हा येऊ”

“अंकिताजी तुम्हाला येत्या गुरुवारी संध्याकाळी ५:०० वाजता यायला जमेल ? ५:०० ते ६:०० असा एक तास मी देऊ शकतो, सकाळची वेळ हवी असेल दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी ११:०० वा येऊ शकता आपण”

"आज - उद्या - परवा नाही का जमणार?"

"नाही हो, आजच्या अपॉईंटमेंटस तर गेल्या आठवड्या पासुन लागल्या आहेत आणि उद्या - परवा एकदम प्यॅक आहेत, तुम्ही गुरुवार - शुक्रवारचे जमवा, नाहीतर मग एकदम पुढच्या सोमवारी.."

"पुढचा सोमवार नक्को, मी शुक्रवारचेच जमवते , सकाळी ठीक ११:०० वाजता येत्ये”

“ठीक आहे , मी तशी नोंद करतो, माझा पत्ता एसेमेस करतो, माझे ऑफिस सापडायला एकदम सोपे आहे , तरी पत्ता सापडायला काही अडचण आली तर फोन करा“
“हो”

“आणि एक, जर काही कारणांमुळे यायला जमणार नसेल किंवा उशीर होणार असेल तर शक्य तितक्या लौकर मला कळवलेत तर वेळ अ‍ॅडॅजस्ट करता येईल.”
“नक्की काका, मी येत्ये दिलेल्या वेळेला”

“धन्यवाद आणि शुभेच्छा “

-----

ठरलेल्या दिवशी , ठरलेल्या वेळी , पांढरी अ‍ॅक्टीव्हा दारात थांबली.

अंकिता आली.

दिसायला बेतासबात , सावळी, शेलाटी,मध्यम उंची , मोठ्ठाल्ले काजळ घातलेले डोळे. आजच्या काळात अभावानेच दिसणार्‍या दोन वेण्या , पांढरी सुती साडी, गुलाबी रंगाचा ब्लाऊज, गळ्यात , कानात काही नाही पण हातात हैद्राबादी मीना काम केलेली , बटबटीत , रुंद बांगडी. हातात एक कळकट पर्स आणि पायात चीप 'लखानी' चपला,

“या , अंकिताजी, वेलकम, पत्ता सापडायला काही अडचण आली नाही ना?”

“नाही, फोन मध्ये जीपीएस असते ना”

“हा, ते ही खरेच की, आजकाल ही फार मोठी सोय झाली आहे”

“हो ना”

अंकिताचा आवाज फोन वर वाटला त्यापेक्षा जास्त गोड वाटला.

अंकिता माझ्या समोरच्या खुर्चीत बसली खरी पण कोणत्याही क्षणी उठावे लागेल अशा बेताने अगदी सावधगिरीने.

मी अंकिता आली त्यावेळेचा ‘कन्सलटेशन चार्ट बनवत होतो, तरी अंकिता कडे डोळ्याच्या कोनातून पाहात होतो.

जातकाची ‘बॉडी लॅग्वेज’ बरीच माहीती देत असते, त्याचा कन्सलटेशन मध्ये मोठ्या खुबीने उपयोग करुन घेता येतो. जातक वेळेवर आला की उशीराने, उशीर झाला असल्यास काय सबबीं सांगीतल्या जात आहेत , कशा सांगीतल्या जात आहेत, जातकाची एखादी लकब, हातवारे, बोलायची पद्धत, आवाजाचा पोत, हसणे, शब्दांचे उच्चार , वाक्यरचना , कपाळावर किती घाम आला आहे, इथपासुन ते जातकाने घातलेले कपडे , वापरलेला डिओ / परफ्युम, मोबाईल , मोबाईल चे कव्हर (असल्यास), कन्सलटेशन चालू असताना जातकाला फोन आला तर त्याच्या मोबाईल ची रिंग टोन,जातक इनकमिंग कॉल कसा हाताळतो, जातक खुर्चीत कसा बसतो, पाय जमिनिला टेकलेले आहेत का अधांतरी लोंबकळताहेत, पाय सरळ आहेत की एकमेकां वर चढवलेले (क्रॉस केलेले) एक ना दोन अशा अनेक गोष्टीं मधून जातकाच्या मन:स्थिती बद्दल अंदाज येतो. पत्रिकेतल्या ग्रहांचा अन्वयार्थ कसा लावायचा याचा सुगावा पण ह्या निरिक्षणांतुन लागत असतो.

इकडे भिरभिरणार्‍या नजरेने अंकिताने माझा आणि माझ्या ऑफिसचा वेध घेतला, तीची नजर कशावर स्थिर नव्हती, क्षणात ती माझ्या कडे बघायची तर क्षणात माझ्या टेबलावरच्या पुस्तकांची नावे वाचायची, दुसर्‍या क्षणी भिंतीवरच्या कॅलेंडर कडे. मध्येच तीने हाततल्या रुमालने चेहेरा पुसला , हातातला मोबाईल प्रथम माझ्या टेबलावर ठेवला पण लगेच उचलून हातातल्या पर्स मध्ये ठेवला मग पुन्हा पर्स मधून बाहेर काढून हातात गच्च पकडून ठेवला.

एव्हाना अंकिताच्या आगमनाच्या वेळेचा ‘कन्सलटेशन चार्ट ‘ कॉम्प्युटर च्या स्क्रिन वर झळकला होता, त्या चार्ट कडे मी विस्मयाने पाहात राहीलो, असा विचित्र , बुचकळ्यात टाकणारा. खतरनाक चार्ट मी कधीच बघितला नव्हता. क्षणभर मी सुन्न झालो मला सावरायला काही सेकंद लागले, जातक समोर बसला होता म्हणून नाहीतर मी एव्हाना कपाळावर हात मारुन घेतला असता!

कन्सलटेशन चार्ट ने दिलेला धक्का चेहेर्‍यावर दिसू नये याची पुरेपुर काळजी घेत , मी अंकिताला एक छानसे स्माईल देत म्हणालो..

“बोला , अंकिताजी, सुरवात करु या, प्रथम हे सांगा आपला प्रश्न काय आहे?”

अंकिता एकदम सावरुन बसली, इतका वेळ चौफेर फिरफिरणारे तिचे डोळे एकदम स्थिर झाले, नुसते स्थिर नाही झाले तर चक्क बटाट्या सारखे बाहेर आले!

“काका , तुम्हाला माहीती नसेल पण मी अंकिता नाही तर झाशीची राणी आहे, आहे म्हणजे काय आहेच पण मी इंदिरा गांधी सुद्धा आहे बरे का , अगदी त्यांच्या सारखी दिसते की नाही ? हो आणि मी वागते सुद्धा त्यांच्या सारखीच, मी कधी झाशीची राणी असते तर कधी इंदिरा गांधी, काही वेळा तर गंमतच होते , मी एकाच वेळी इंदिरा गांधी पण असते आणि झाशीची राणी पण असते ! झाशीची राणी असताना घोडा दौडवायचा, लढाया करायच्या , इंदिरा गांधी असताना पॉलिटीक्स खेळायचे , निवडणूका लढवायच्या आणि राणी असताना ती जड तलवार तरी किती म्हणून फिरवायची, तलवार लागते ना अंगाला , रक्त पण येते बर्‍याच वेळा. सोप्पे नाहीये ते. मी आणखी काय काय म्हणून करायचे सांगा ना ? झाशीची राणी का इंदिरा गांधी असा नुसता गोंधळ झालाय माझा , डोके फुटायची वेळ आली बाई, तेव्हा एकदाचे माझी पत्रिका बघून सांगा, मी नक्की कोण आहे ‘झाशीची राणी ‘ का ‘इंदिरा गांधी’ ?

----

एक सत्य घट्ना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढे काय झाले? +१>>
काही नाही, मल्टिपल पर्सनालिटी डीसॉर्डर.. Biggrin

पुढे काय झाले याची उत्सुकता आहेच पण पहिले संभाषण खूप लांबल्यासारखे वाटते. ते जरा काटछाट केलेत तयार बरे होईल. मल्टिपल पर्सनालिटी डीसॉर्डर ची च शक्यता आहे Happy

नाही अग्निपंख.. कारण हा परिच्छेद वाचा..

––---------------------------
एव्हाना अंकिताच्या आगमनाच्या वेळेचा ‘कन्सलटेशन चार्ट ‘ कॉम्प्युटर च्या स्क्रिन वर झळकला होता, त्या चार्ट कडे मी विस्मयाने पाहात राहीलो, असा विचित्र , बुचकळ्यात टाकणारा. खतरनाक चार्ट मी कधीच बघितला नव्हता. क्षणभर मी सुन्न झालो मला सावरायला काही सेकंद लागले

मित्रांनो,

माझ्या कडे जाने २०१७ मध्ये आलेल्या एका अभागी मुलीची कथा आहे सत्य घटना आहे , अगदी जसे झाले तसे कथन केले आहे.

ही सरळ सरळ MPD ची केस होती हे उघडच आहे! कथा शेवट पर्यंत वाचली की मग पहील्या (डेलेबरेटली ) रेंगाळलेल्या संभाषणातली खुमारी लक्षात येईल.

कथा लेखनाची काही तंत्रे असतात , फॉर्म असतात त्यातला एक फॉर्म मी निवडला आहे , ज्यात उत्कंठा वाढवत न्यायची म्हणजे नक्की काय घडणार आहे याचा अंदाज लागू न देता कथा एका उच्चतम बिंदू वर न्यायची ( क्रेसेन्डो ) आणि अगदी शेवट्च्या वाक्यात / परिच्छेदात वाचकांना 'धक्का' द्यायचा , हे कथा लेखनाचे तंत्र आहे , आणि एकदा का असा धक्का देऊन झाला की (सर्जिकल स्ट्राईक) की कथा अ‍ॅबरप्ट पणे आवरती घ्यायची , 'धक्का' हाच कथेचा हाय - लाईट असतो, कथा तिथेच संपवणे योग्य असते. कथेतल्या पात्रांचे नंतर काय झाले हा अनावश्यक भाग असतो, ते लिहीत बसले तर 'धक्क्याचा' इंप्याक्ट कमी / नष्ट होतो.

असो , ज्यांना अंकिता चे काय झाले ह्या बद्दल उत्सुकता आहे त्यांच्या साठी इथेच लिहेन ... आधी वाचकांना 'धक्का' तर अनुभवू द्या !

MPD - मल्टिपल पसनॅलिटी डिसॉर्डर?
पण मग आगमनाच्या वेळेचा ‘कन्सलटेशन चार्ट ‘ म्हणजे काय?
त्यावरुन तुम्हाला विचित्र , बुचकळ्यात टाकणारं खतरनाक असं काय कळलं?
कारण प्रश्न तर तिने नंतर विचारलाय.
कीस पाडत नाहीये. खरंच उत्सुकता आहे म्हणुन विचारतेय.

सस्मितजी ,

‘कन्सलटेशन चार्ट’ हा ज्योतिषाची आणि जातकाची प्रथम नजरानजर होती त्या क्षणाची , त्या स्थळाची , त्या क्षणी बनवलेली एक पत्रिका. या पत्रिकेच्या अभ्यासातुन बर्‍याच वेळा जातक कशा साठी आला आहे, जातकाचा संभाव्य प्रश्न काय आहे, प्रश्ना संदर्भातली पार्श्वभूमी , जातकाच्या आयुष्यात अगदी अलीकडच्या काळात घडलेल्या घटनां आणि अगदी नजिकच्या काळात घडू शकणार्‍या घटनां, जातकाची या क्षणाची मन:स्थिती असा बराच तपशील हाती लागू शकतो. बर्‍याच वेळा हा ‘कन्सलटेशन चार्ट’ इतका बोलका असतो की त्याच चार्ट वरुन जातकाच्या प्रश्नाची उत्तरें देता येतात आणी ती बर्‍या पैकी अचूक येतात असा माझा अनुभव आहे.

पण तिच्या पत्रिकेत काही खास आहे असे जाणवतेय..

ही वाक्ये -
“मी सेलेब्रीटी नाही पण माझी पत्रिका तुम्ही म्हणता तशी अपवादात्मक स्पेश्यल आहे, म्हणून ज्योतिषांनीच माझ्या कडे आले पाहीजे”

मला मोफत काही नक्को, मला असे म्हणायचे आहे की मला मानधन भरायची गरजच भासणार नाही, माझी पत्रिकाच अशी आहे की आपण माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊन वर जाताना मलाच पैसे द्याल , ”

“हो, अगदी अस्सेच , माझी पत्रिका आहेच तशी स्पेश्यल, फार कमी लोकांची अशी पत्रिका असते, अशी पत्रिका अभ्यासायला मिळाल्या बद्दल तुम्ही स्वत:ला भाग्यवान समजाल, आहात कोठे?”

“पण माझी पत्रिका पाहून तुम्हाला मलाच उलट पैसे द्यावे वाटले तर?”

ही वाक्ये वाचून मला वाटलेले की असे काही नसेल, पण जेव्हा तुम्ही तिचा चार्ट बनवला आणि तुम्ही स्वता धक्का मोड मध्ये गेला तेंव्हा वाटले की मुलगी खरे बोलतेय, पत्रिकेत काही स्पेशल नक्कीच आहे...

कथा खूप चांगली लिहिली आहे, खरच शेवटी धक्का दिलाय..